द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हे ऑर्डिनंस फॅक्टरी, अंबरनाथ येथे वर्क्स मॅनेजर, एडमिनिस्ट्रेटर या हुद्दयावर काम करतात. तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना डॉक्टरांनी एन्जोप्लास्टी करुन घ्यावी असा सल्ला दिला म्हणून तक्रारदार हे वाजवी दर आकारुन चांगली सेवा देणा-या हॉस्पिटलचा शोध घेत होते. सामनेवाला हॉस्पिटलची त्यांना माहिती मिळाल्यानंतर व तेथे आकारले जाणारे दर त्यांना आर्थिक दृष्टया परवडणारे वाटल्यामुळे त्यांनी जसलोक हॉस्पिटलमध्ये 'सी' क्लास मध्ये ट्रीटमेंट घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे दि.12/07/03 रोजी जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांना 'सी' क्लासमधील 1512 बेड नं.02 ही देण्यात आली. दि.13/06/03 रोजी तक्रारदारांचेवर एन्जोप्लास्टी करण्यात आली. तक्रारदारांच्या एन्जोप्लास्टीनंतर आय.सी.यु. किंवा आय.सी.सी.यु. रुम उपलब्ध नाहीत असे कारण देवून तक्रारदारांना एन्जोप्लास्टी वार्डमध्ये ठेवण्यात आले. दि.15/06/03 रोजी सायंकाळी डॉ.व्ही.टी.शाह यांनी त्या वार्डमधील डयूटीवर असणा-या नर्सना तक्रारदारांना ए-2 क्लास रुममध्ये शिफ्ट करावे अशा सूचना दिल्या. तक्रारदारांनी सुरुवातीपासूनच 'सी' क्लासची मागणी केली होती. तक्रारदारांनी ए क्लास रुम नको असे सांगितले असताना सुध्दा त्यांना ए-2 क्लास रुममध्ये हलविण्यात आले तक्रारदारांनी डॉ.व्ही.टी.शाह यांचेकडे याबाबत चौकशी केली असता 'सी' क्लासचे चार्जेस तक्रारदारांना लावण्यात येतील असे डॉ.शाह यांनी सांगितले. दि.16/06/03 पासून 'सी' क्लास रुममध्ये ठेवावे अशी तक्रारदारांनी विनंती केली परंतु ए-2 क्लास रुममध्येच त्यांना ठेवण्यात आले. तक्रारदार ए-2 क्लास रुममध्ये असताना फक्त रक्तातील साखरेच्या तपासणीच्या टेस्ट करण्यात आल्या, इतर दुस-या कोणत्याही टेस्ट करण्यात आल्या नाहीत. एन्जोप्लास्टी रुममध्ये जी औषधे त्यांना सूचविण्यात आली होती तीच औषधे त्यांनी घ्यावेत असे त्यांना सांगण्यात आले.
2) दि.16/06/03 रोजी तक्रारदारांना सामनेवाला यांनी दि.12/02/03 ते 15/06/03 या कालावधीचे रक्कम रु.2,07,300/- चे बील दिले. त्या बीलाची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये नि. 'सी-2' ला दाखल केली असून त्याचा तपशील तक्रारअर्जासोबत दिला आहे. त्यानंतर दि.17/06/03 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.3,38,277.94 चे बील दिले. सदरचे बील दि.12/06/03 ते 17/06/03 या कालावधीचे होते. त्या बिलाची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि. 'सी-2' ला दाखल केली आहे.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना 'सी' क्लासची मागणी करुनसुध्दा त्यांना ए-2 क्लास रुममध्ये ठेवण्यात आले व वाढीव दराने आकारणी करुन बील देण्यात आले. डॉ.व्ही.टी.शाह यांना वेळोवेळी विनंती केल्यानंतर सदरच्या बीलाची रक्कम रु.3,18,000/- पर्यंत कमी करण्यात आली नाही. सामनेवाला यांनी दि.18/06/03 रोजी तक्रारदारांना डिस्चार्ज दिला त्यावेळी रक्कम रु.2,81,360.50 चे बील दिले. सदरचे बील दि.12/06/03 ते 18/06/03 पर्यंतेचे होते. सदर बीलाची छायांकित प्रत तक्रारअर्जासोबत नि.'सी-4' ला दाखल केलेली असून त्या बीलाचा तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे.
4) दि.10/07/03 च्या पत्राने तक्रारदारांनी सामनेवाला यांचे डायरेक्टर ऑफ फायनान्स श्री.आर.सी.दलाल यांचेकडे आपले गा-हाणे मांडले व बीलांमधील तफावती निदर्शनास आणल्या. श्री.आर.सी.दलाल यांनी तक्रारदारांच्या बीलातून रक्कम रु.2,000/- कमी केली परंतु त्यामुळे तक्रारदारांचे समाधान झाले नाही. तक्रारदारांनी नंतर पी.एम्.ओ. इन-चार्ज यांचेकडे दि.17/07/03 रोजी तक्रार केली. त्यानंतर दि.25/07/03 रोजीच्या पत्रामध्ये श्री.आर.सी.दलाल यांनी तक्रारदारांना 'सी' क्लास रुम देण्यात आली नाही हे मान्य केले. तथापि, श्री.दलाल यांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा आजार व उत्पन्न विचारात घेवून त्याप्रमाणे ठराविक वर्गातील रुम दिल्या जातात. सामनेवाला यांनी दिलेल्या बिलांमध्ये ज्या तफावती आढळून आल्या त्याचा तपशील तक्रारअर्जामधील पृष्ठ क्र.9, 10 व 11 वर दिलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना सर्व बिलांपोटी रक्कम रु.2,81,360.50 पैसे दिले. वास्तविक तक्रारदारांचे होणा-या बिलाची एकूण रक्कम रु.2,10,600/- होती. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रु.70,760/- जादा वसुल केले आहेत व त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदारांनी वेळोवेळी विनंती करुनही त्यांचे म्हणण्यास सामनेवाला यांनी प्रतिसाद दिला नाही व म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता असून सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे मंचाने जाहीर करावे अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून जादा वसुल केलेली रक्कम रु.70,760/- त्यावर 21 टक्के दराने व्याज तसेच किरकोळ खर्चापोटी रक्कम रु.50,000/- ची मागणी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून केली आहे.
5) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे रुग्णाच्या कुटूंबीयांचे उत्पन्न विचारात घेवून त्याप्रमाणे ठराविक त्यांच्या वर्गवारीतील रुम दिल्या जातात. तक्रारदारांचे कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेता तक्रारदार हे सामनेवाला यांचे वर्गवारीप्रमाणे ए-2 क्लासमध्ये बसतात. सामनेवाला हॉस्पीटलच्या नियमाप्रमाणे तक्रारदार हे 'सी-2' वर्गवारीमध्ये बसू शकत नाहीत. श्रीमंत लोकांनी गरीब रुग्णांना राखून ठेवलेल्या वर्गवारीतील रुम्स् वापरासाठी दिल्यास आर्थिकदृष्टया गरीब रुग्णावर अन्याय होईल.
6) तक्रारदार हे एक दिवस 'सी-2' रुममध्ये राहिले होते. एन्जोप्लास्टी नंतर एन्जोप्लास्टी रुममध्ये व त्याप्रमाणे ए-2 क्लासमध्ये 3 दिवस तक्रारदारांना ठेवण्यात आले होते. तक्रारदारांनी सामनेवाला यांनी इन्टेरिअम बिल दि.16/06/03 व 17/06/03 मधील किरकोळ तफावती निदर्शनास आणल्या असल्या तरी सदरची इंन्टेरिअम बिले रुग्णांना एकूण खर्चचा अंदाज येण्यासाठी दिली जातात, रुग्णांनी इंन्टेरिअम बिले त्वरित भरावीत असे अपक्षित नसते. अनावधानाने वरील बिलांमध्ये काही चुका झाल्या होत्या परंतु सदरच्या चुका दि.18/06/03 च्या अंतिम बिलामध्ये दुरुस्त करण्यात आल्या. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे अंतिम बिल हेच रुग्णाने भरणे आवश्यक असते. चुकीचे कोड नंबर, अकाऊंट नंबर किंवा इन्टेरिअम बिलांवर सहया नसणे या किरकोळ बाबी आहेत. दि.16/03/03 चे इन्टेरिअम बिल रुग्ण 'ए क्लास' मध्ये आहे असे गृहीत धरुन तयार करण्यात आले. वास्तविक तक्रारदार हे संपूर्ण कालावधीत 'सी क्लास' मध्ये नव्हते. काही कालावधीसाठी ते 'सी क्लास' मध्ये होते. दोन दिवस एन्जोप्लास्टी रिकव्हरी रुममध्ये व उर्वरित कालावधीसाठी ए-2 क्लासमध्ये होते. एन्जोप्लास्टी रिकव्हरी रुम ही आयसीयू सारखीच नसते. सामनेवाला हॉस्पिटलमध्ये सर्व कॅटेगरीतील रुग्णांना सारखीच व उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा पुरविली जाते. हॉस्पीटलमध्ये गरीब लोकांसाठी विनाशुल्क बेड उपलब्ध असून त्यांनासुध्दा चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते. तक्रारदार सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल झाले किंवा तक्रारदारांना सामनेवाला यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी ए-2 क्लास रुम उपलब्ध नसल्याने तक्रारदारांना सी-क्लास रुममध्ये दाखल करुन घेण्यात आले.
7) तक्रारदारांनी तक्रारअर्जात त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सी- क्लास रुममध्ये दाखल करुन घेतले हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदारांनी हॉस्पीटलमध्ये आगावू रक्कम भरताना ए-2 क्लासचे पैसे भरले होते. तक्रारदारांनी एन्जोप्लास्टी रुम ही आयसीयू रुम नाही असे म्हटले आहे. तथापि, सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे एन्जोप्लास्टी रुममध्ये रुग्णांना इमरजन्सीमध्ये लागणा-या सर्व सुविधा एन्जोप्लास्टी रुममध्ये (लाईफ सेव्हींग इक्विपमेंट) उपलब्ध असतात. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना एन्जोप्लास्टी रुममधून त्यांच्या विनंतीनुसार सी क्लास रुममध्ये हलविणे आवश्यक होते. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता त्यांना सी क्लास रुम देता येत नव्हती. तक्रारदार हॉस्पीटलमध्ये दाखल झाले त्यावेळी ए क्लास रुम उपलब्ध नव्हती म्हणून सी क्लास रुममध्ये ठेवण्यात आले. नंतर हॉस्पीटलच्या पॉलिसी नुसार तक्रारदारांना ए-2 क्लास रुममध्ये हलविण्यात आले. डॉ.व्ही.टी.शाह यांनी तक्रारदारांना ए-2 क्लास रुममध्ये ठेवले तरी बिल सी क्लासचे दिले जाईल असे सांगितले होते हे तक्रारदारांचे म्हणणे सामनेवाला यांनी नाकारलेले आहे. वास्तविक डॉ.व्ही.टी.शाह सामनेवाला यांच्या हॉस्पीटलमध्ये कन्सल्टंट कॉर्डीओलॉजिस्ट म्हणून काम करतात. त्या व्यतिरिक्त इतर कामाची जबाबदारी डॉ.शाह यांचेवर नव्हती.
8) तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारले असून सामनेवाला यांचे सेवेत कोणतीही कमतरता नाही व सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
9) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पीटलमधील रुम चार्जेसमध्ये त्या दिवसाचे जेवन, कपडे, परिचारिका सेवा इत्यादी खर्चाचा समावेश होतो. रुम चार्जेसमध्ये डॉक्टरांच्या व्हिजीटची फी, लॅबोरॅटरी चार्जेस इतर वैद्यकीय तपासण्या व औषधांचा समावेश होत नाही. सामनेवाला हॉस्पीटलमध्ये रुम चार्जेस व पुरविण्यात येणा-या वैद्यकीय सेवांबद्दल योग्य दर आकारले जातात व त्यामध्ये पारदर्शकता असते.
10) तक्रारदारांनी दि.12/06/03 ते 18/06/03 या कालावधीतील सामनेवाला यांच्या हॉस्पीटलमधील वैद्यकीय उपचार व इतर सुविधेसाठी सामनेवाला यांना एकूण रक्कम रु.2,81,360.50 पैसे दिले. सदरचे पैसे देताना तक्रारदारांनी बिलासंबंधी कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी केलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कोणतीही दाद मागता येणार नाही. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा.
11) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहेत तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला यांनी दि.13/03/06 रोजी ऑर्डिनन्स फॅक्टरी, अंबरनाथ यांस पक्षकार करावे असा अर्ज केला होता. दि.29/01/09 रोजी या मंचाचे तत्कालीन अध्यक्ष व सदस्य यांनी दोन्ही बाजुंचे म्हणण्ो ऐकून घेवून सामनेवाला यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरी, अंबरनाथ यांस पक्षकार करावे असा दिलेला अर्ज नाकारला. सामनेवाला यांनी डॉ.व्ही.टी.शाह यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. सामनेवाला यांनी दि.23/07/2010 रोजी अर्जासोबत अडीशनल जनरल मॅनेजर, पी.आर.ओ., भारत सरकार रक्षा मंत्रालय, आयुध निर्माण फॅक्टरी, अंबरनाथ यांच्याकडून माहितीच्या अधिकार कायदयानुसार मिळालेले दि.19/03/09 चे पत्र दाखल केले आहे. दि.04/02/2011 पासून सामनेवाला किंवा त्यांचे वकील या मंचासमोर हजर झाले नाहीत त्यामुळे दि.18/07/2011 रोजी तक्रारदारांचे वकील कु.रश्मी मन्ने यांचे युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व इतर कागदपत्रे विचारात घेवून प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
12) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.70,760.50 पैसे व त्यावर व्याज, नुकसानभरपाई इत्यादी सामनेवाला यांचेकडून
वसुल करता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - जून, 2003 मध्ये तक्रारदार हे वर्क्स मॅनेजर, एडमिनिस्ट्रेटर म्हणून भारत सरकारच्या अंबरनाथ येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करत होते. जून, 2003 चे दरम्यान त्यांना डॉक्टरांनी एन्जोप्लास्टी करुन घ्यावी असा सल्ला दिला त्यामुळे तक्रारदारांनी वाजवी दर आकारुन चांगली सेवा देणा-या हॉस्पिटलची चौकशी केली व दि.12/07/03 रोजी सामनेवाला हॉस्पिटलची त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते सामनेवाला जसलोक हॉस्पिटलमध्ये भरती झाले. दि.12/06/03 रोजी तक्रारदारांना जसलोक हॉस्पिटलमधील 'सी' क्लासमधील 1512 बेड नं.02 ही रुम देण्यात आली. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सी क्लासमधील रुम त्यांच्या मागणीनुसारच देण्यात आली होती. तक्रारदारांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सीजीएचएस स्कीमनुसार सामनेवाला हॉस्पीटलमध्ये भरती करुन घेण्यात आले होते व त्याच्या भरतीपूर्वी जसलोक हॉस्सपीटलमधील तक्रारदारांच्या ट्रीटमेंटसाठी अंदाजे रक्कम रु.3,18,000/- लागतील असे कळविले. सीएचएस स्कीमप्रमाणे त्याकाळात तक्रारदार प्रतीदिन रुम चार्जेससाठी जास्तीतजास्त रु.1,500/- मिळण्यास पात्र होते. जसलोक हॉस्पीटलने तक्रारदारांना दिलेल्या टॅरिफ कार्डनुसार सी क्लास रुमसाठी रु.1,100/- आकारले जात होते म्हणून तक्रारदारांनी त्यांना सी क्लास रुममध्ये ठेवावे अशी सामनेवाला यांना विनंती केली. सुरुवातीला तक्रारदारांच्या विनंतीनुसार सी क्लास मधील बेड देणेत आला. एन्जोप्लास्टीनंतर तक्रारदारांना आय.सी.यु. किंवा आय.सी.सी.यु. रुममध्ये न ठेवता एन्जोप्लास्टी वार्डमध्ये ठेवले. सदर वार्डमध्ये एकूण तीन बेड होते. तक्रारदार एन्जोप्लास्टी वार्डमध्ये दि.15/06/03 चे सायंकाळापर्यंत होते व दि.15/06/03 रोजी डॉ.व्ही.टी.शाह यांच्या सूचनेप्रमाणे तक्रारदारांना त्यांच्या ईच्छेविरुध्द ए-2 क्लास रुममध्ये ठेवण्यात आले. ए-2 क्लास रुमचे चार्जेस तक्रारदारांना सीजीएससी स्कमीप्रमाणे देय नव्हती. म्हणून तक्रारदारांनी त्यांना सी क्लास रुममध्ये ठेवावे अशी सामनेवाला यांच्या कर्मचा-यांना विनंती केली होती तरीसुध्दा त्यांना ए-2 क्लास रुममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांना तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे 2 इन्टेरिअम बिले देण्यात आली त्यापैकी एक बिल रु.2,07,300/- व दुसरे इन्टेरिअम बिल रु.3,38,277.94 चे होते. तक्रारअर्जासोबत तक्रारदारांनी बिलांच्या झेरॉक्सप्रती जोडल्या आहेत. तक्रारदारांच्या वकीलांनी दोन्ही बिलांतील तफावती निदर्शनास आणल्या. तक्रारदारांना प्रत्यक्षात आय.सी.यु.मध्ये न ठेवता आय.सी.यु.चे चार्जेस सुध्दा बिलामध्ये समाविष्ठ करुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना अंतिम बिल रक्कम रु.2,81,360.50 पैशांचे दिले. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.70,760.50 पैसे जादा वसुल केले आहेत असे तक्रारदारांच्या वतीने सांगण्यात आले.
सामनेवाला यांनी त्यांच्या लेखी युक्तिवादामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणा-या खर्चाची अंदाजे रक्कम आधीच कळविली होती. सामनेवाला हॉस्पीटलमध्ये सर्व कॅटेगरीतील रुग्णांना अत्याधुनिक ऊपकरणाद्वारे चांगली ट्रीटमेंट दिली जाते. हॉस्पीटलच्या नियमाप्रमाणे रुग्णांची आर्थिक परिस्थितीनुसार हॉस्पीटलमधील बेड दिली जातात. तक्रारदारांना आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ए-2 क्लास बेड उपलब्ध करुन देणे आवश्यक होते परंतु ज्यावेळी तक्रारदार हॉस्पीटलमध्ये दाखल झाले त्यावेळी हॉस्पीटलमध्ये ए-2 क्लास रुममध्ये बेड उपलब्ध नव्हते. म्हणून तक्रारदारांना सी-क्लास रुममध्ये ठेवण्यात आले. तक्रारदारांचेवर एन्जोप्लास्टी करण्यात आल्यानंतर एन्जोप्लास्टी वार्डमध्ये ठेवण्यात आले. सदर वार्डमध्ये आणिबाणीच्यावेळी लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध होती. तक्रारदारांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ए-2 क्लास रुममध्ये हलविण्यात आले. तक्रारदार सी क्लास रुममध्ये एक दिवस व एन्जो रिकव्हरी रुम/वार्डमध्ये 2 दिवस तसेच ए-2 क्लासमध्ये 3 दिवस होते. तक्रारदारांच्या मागणीनुसार त्यांना सी क्लासमधील रुम उपलब्ध करुन देण्यात आली असती तर गरीब रुग्णांवर अन्याय झाला असता. हॉस्पीटलच्या नियमाप्रमाणे उत्पन्नानुसार ठराविक कॅटेगरीतील रुम रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येतात. हॉस्पीटलच्या अडमिनिस्ट्रेशनमध्ये डॉ.व्ही.टी.शहा किंवा इतर नर्सेसना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. हॉस्पीटलच्या नियमानुसार तक्रारदारांना रुम देण्यात आल्या व चांगल्या त-हेची वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही.
सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेल्या इन्टेरिअम बिलामध्ये तफावत आहेत हे सामनेवाला यांना मान्य आहे तथापि, सामनेवाला यांच्या अनावधानाने काही चुका इन्टेरिअम बिलात राहून गेल्या. इन्टेरिअम बिल हे रुग्णांना खर्चाचा अंदाज यावा म्हणून दिले जाते. अंतिम बिलानुसार रुग्णांनी पैसे ताबडतोब देणे अपेक्षीत नसते असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. या कामी तक्रारदारांना अंतिम बिल रक्कम रु.2,81,360.50 पैसे देण्यात आले. तक्रारदारांचे विनंतीवरुन अंतिम बिलातून रक्कम रु.2,000/- कमी करण्यात आले. तक्रारदारांना एकूण बिल रु.2,81,360.50 सामनेवाला यांनी दिले हे सामनेवाला यांना मान्य आहे परंतु सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे बिलाची केलेली आकारणी योग्य असून त्यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही किंवा त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता नाही.
तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या हॉस्पीटलमध्ये सीजीएचएस स्कीमखाली औषोधोपचार करुन घेतले असे दिसते. तक्रारदारांना असणा-या पगाराप्रमाणे त्यांना रु.1,500/- चे रुम चार्जेस अनुज्ञेय होते असे दिसते म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांना सी क्लासमधील रु.1,100/- रुम चार्जेस असणा-या रुममधील बेड उपलब्ध करुन द्यावे अशी तक्रारदारांची विनंती होती असे दिसते. तक्रारदार सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये दि.12/06/03 रोजी दाखल झाले त्यावेळी त्यांना सी क्लासमधील बेड देण्यात आला होता ही गोष्ट सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला हॉस्पीटलच्या नियमाप्रमाणे रुग्णांची आर्थिक परिस्थिती विचारात घेवून त्यांना हॉस्पीटलमधील ठराविक वर्गवारीतील रुम्स देणेत येतात. श्रीमंत रुग्णांना सी क्लास कॅटेगरीतील किंवा इकोनॉमिक कॅटेगरीतील रुम्ा अलाऊड केले तर गरीब रुग्णांवर अन्याय होईल असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार उत्पन्नाचा विचार करता तक्रारदारांना ए-2 क्लासमधील रुम देणे आवश्यक होते. सामनेवाला हॉस्पीटलने वरीलप्रमाणे काही नियम केले असल्यास ते नियम त्यांनी या मंचासमोर दाखल केलेले नाहीत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सामनेवाला हॉस्पीटलमध्ये दाखल करताना कोणतीही माहिती दिलेली नव्हती किंवा असे हॉस्पीटलचे नियम कुठेही ठळकपणे लिहिलेले आढळून आले नाहीत. रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हॉस्पीटलमधील रुम दिले जातात याबाबत सामनेवाला यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे सामनेवाला यांचे म्हणणे विश्वासार्ह वाटत नाही. ठराविक उत्पन्न असणा-या रुग्णांना हॉस्पीटलच्या ठराविक क्लासचे रुममध्ये राहावे हे सामनेवाला यांचे म्हणणे योग्य व संयुक्तीक वाटत नाही. तक्रारदार सामनेवाला हॉस्पीटलमध्ये दि.12/06/03 रोजी दाखल झाले त्यावेळी त्यांना ए-2 क्लासमधील रुम उपलब्ध नव्हती हे दाखविण्यासाठी सामनेवाला यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. उलटपक्षी उपलब्ध पुराव्यावरुन तक्रारदारांना त्यांच्या विनंतीवरुन सी क्लासमधील बेड उपलब्ध करुन दिला हे तक्रारदारांचे म्हणणे विश्वासार्ह वाटते. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेल्या अंतरिम बिलाच्या तफावती मान्य केल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना एन्जोप्लास्टीनंतर आय.सी.यु. किंवा आय.सी.सी.यु.मध्ये ठेवले नव्हते तर एन्जोप्लास्टी रुममध्ये ठेवण्यात आले. तक्रारदार एन्जोप्लास्टी रुममध्ये 2 दिवस होते असे दिसून येते. उपलब्ध पुराव्यावरुन सामनवेवाला यांनी तक्रारदारांकडून जादा पैसे जादा वसुल केले आहेत असे दिसून येते. अशा त-हेने जादा पैसे वसुल करणे ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणता येते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.70,760.50 पैसे जादा वसुल केले आहेत. तक्रारदारांनी त्याबाबतचा तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे. तक्रारदारांनी अंतिम बिलापोटी सामनेवाला यांना रक्कम रु.2,81,360.50 पैसे दिले ही बाब तक्रारदार व सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवाला यांनी लेखी युक्तिवादात जादा पैसे वसुल केले ही बाब नाकारली आहे. सामनेवाला यांनी माहितीच्या अधिकाराखाली मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी, अंबरनाथ यांचे अडिशनल जनरल मॅनेजर पब्लिक इंन्फॉरमेशन ऑफीसर यांचेकडून माहितीच्या अधिकाराच्या कायदयाखाली मिळालेले दि.19/03/09 चे पत्र दाखल केले आहे. सदर पत्रातील मजकूरावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी जसलोक हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या खर्चापैकी रक्कम रु.2,18,833/- तक्रारदारांना त्यांच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीने दिले आहेत. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांना यापूर्वीच रु.2,18,833/- ही रक्कम मिळालेली असल्याने तक्रारदारांना आता रक्कम रु.70,760.50 पैसे सामनेवाला यांचेकडून वसुल करुन मागता येणार नाही. तक्रारदारांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती म्हणून मिळालेली रक्कम रु.2,18,833/- तक्रारदारांना जसलोक हॉस्पीटलला दिलेल्या अंतिम बिल रु.2,81,360.50 पैसे मधून वजा करता तक्रारदारांना उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागली आहे असे दिसते. तक्रारदारांनी सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये सीजीएचएस स्किमनुसार वैद्यकीय उपचार करुन घेतले. सीजीएसएस स्किमखाली अनुज्ञेय असणारी वैद्यकीय खर्चाची रक्कम रु.2,18,833/- तक्रारदारांना मिळालेली आहे. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून अंतिम बिलामध्ये जादा रक्कम रु.70,760.50 पैसे वसुल केले असल्यामुळे वरील संपूर्ण रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणेचा आदेश करणेत यावा. तक्रारदारांना त्यांच्या वैद्यकीय खर्चापोटी यापूर्वीच रक्कम रु.2,18,833/- मिळाले आहेत हे विचारात घेता सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले अंतिम बिल रक्कम रु.2,81,360.50 पैसे मधून तक्रारदारांना मिळालेली रक्कम रु.2,18,833/- वजा करता राहिलेली रक्कम रु.62,527.50 पैसे द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रकमेवर द.सा.द.शे. 21 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी जादा दराने केली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.62,527.50 पैसे यावर दि.17/06/2003 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल
तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रु.2,00,000/- व या अर्जाचा खर्च रु.50,000/- ची मागणी केली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते. सबब सदरचा तक्रारअर्ज सामनेवाला विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येवून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 86/2005 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.62,527.50 (रु.बासष्ट हजार पाचशे सत्तावीस व पंन्नास पैसे मात्र) यावर दि.17/06/2003 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(रु.तीन हजार मात्र) द्यावेत.
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
7. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.