::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 02/03/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
विरुध्दपक्ष क्र. 1 हे विभिन्न गृहोपयोगी वस्तु, अन्नधान्य, तसेच वेष्टित अन्नपदार्थ आदींचा व्यवसाय करणारे प्रतिष्ठान असून, सदर दुकानातून तक्रारकर्त्याने दि. 2/10/2012 रोजी “होम मेड नगकीन”चे पाकीट, वजन 500 ग्रॅम, पॅकींग 09/2012, किंमत रु. 55/- हे खाद्यान्न कॅश मेमो क्र. 107556 दि. 02/10/2012 द्वारे विकत घेतले. सदर नमकिन /फरसान हे विश्वासपात्र गुजराथी व्यक्तीद्वारा उत्पादीत केलेले असून त्याची गुणवत्ता, शुध्दता व चव ही अत्युत्तम असल्याचा भरवसा विरुध्दपक्ष क्र. 1 ने दिला होता. सदर नमकिनचे पॅकेज उघडून त्यातील खाद्य पदार्थ खात असतांना उडीदापेक्षा किंचीत मोठ्या आकाराच्या दगडाच्या एका छोट्या तुकड्यामुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या बाजुच्या दाढेचा एक मोठा भाग निखळून पडल्यामुळे दात पूर्णत: निकामी होऊन त्याला कायमस्वरुपी हानी पोचलेली आहे. त्याकरिता तक्रारकर्ता वैद्यकीय उपचार घेत आहे. त्यामुळे उजव्या बाजुने अन्न चर्वन करण्याची क्रिया संपुर्णपणे नष्ट झाल्यामुळे शारीरिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. तक्रारकर्त्याच्या हे ही निदर्शनास आले की, सदर अन्नपदार्थ शिळे, असुरक्षीत तसेच निकृष्ठ प्रतीचे असून त्याला कडवट चव आहे. सदर खाद्य पदार्थ सदोष असून विरुध्दपक्षाचे हे कृत्य अनुचित व्यापार पध्दतीत मोडणारे आहे. तक्रारकर्त्याने दि. 08/10/2012 रोजी विरुध्दपक्षाला रजिस्टर नोटीसद्वारे सुचना देऊन सदरहू नमकिनचा शिल्लक असलेला अंश परत घेऊन त्याचे क्रयमुल्य परत करण्यात यावे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या हानीची एकत्रित क्षतीपूर्ती म्हणून रु. 50,000/- देण्यात यावी, असे कळविले होते. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीद्वारे प्रार्थना केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन, असुरक्षीत खाद्य पदार्थाची क्रयमूल्य राशी रु. 55/- तक्रारकर्त्याला परत करण्याचे आदेश विरुध्दपक्ष क्र.1 ला देण्यात यावे. तक्रारकर्त्याला झालेल्या कायमस्वरुपी दंतक्षतीमुळे झालेली आर्थिक हानी, शारीरिक कष्ट, मानसिक त्रास व गौरसोय आदींची एकत्रित क्षतीपुर्ती राशी रु. 50,000/- तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र. 1 कडून देण्यात यावे. तसेच न्यायिक खर्चाचे रु. 2500/- देण्यात यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
विरुध्दपक्षाची माल विकण्याची पध्दत अशी आहे की, दुकानात ठेवलेला माल हा ग्राहक स्वत: फिरुन स्वत: निवडतो व खात्री पटल्यानंतर स्वत:च्या जबाबदारीवर विकत घेतो. तक्रारकर्त्याने ज्या फरसान बद्दल तक्रार केली आहे तो फरसान पारदर्शी प्लॅस्टीच्या पिशवीत भरलेला असतो व ग्राहक त्याला पुर्णपणे पाहून आपली खात्री करुन विकत घेतो, त्यामध्ये विरुध्दपक्ष कोणत्याही प्रकारचा ग्राहकांना आग्रह करुन कोणताही माल विकत नाही. ज्या परिस्थितीत माल दुकानात ठेवलेला होता, त्या परिस्थितीत तक्रारकर्त्याने अवलोकन करुन स्वत:चे समाधान करुन माल खरेदी केलेला आहे. विरुध्दपक्षाने दाखल केलेली तक्रार ही कायद्याअंतर्गत चालू शकत नाही. तक्रारकर्त्याने घेतलेल्या उपचारांचे कागदपत्र सुध्दा दाखल केलेले नाही. दाताला कोणत्या कारणामुळे इजा झाली या बद्दल काही कन्क्ल्युझिव मत नाही व दिलेले मत सुध्दा असंयुक्तीक असून त्याला कोणताही आधार नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत जाणून बुजून ही गोष्ट लपविलेली आहे. तक्रारकर्ता हा 80 वर्षाचा आहे व एकंदरीत त्याला किती दात वयाच्या 80 वर्षात शिल्लक आहेत व किती पडलेले आहेत, या बद्दल खुलासा नाही. ज्या दाताला दाखविलेली इजा हयाचे वय मर्यादेचे सुध्दा कोणतेही एक्सपर्ट ओपीनियन नाही. वयोमानाने दांताची Decay होत असते व त्यामुळे सुध्दा दातांमध्ये फॅक्चर येतो, डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट हा दि. 12/11/2012 चा आहे व तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला झालेली इजा ही दि.07/10/2012 ची आहे. विरुध्दपक्षाने डॉ. सुनिल प्र. मारवाल यांना दि. 9/2/2013 रोजी पत्र पाठवून माहिती मागीतली होती, त्या पत्रात मागीतलेली माहीती डॉ. मारवाल यांनी पुरविलेली नाही. विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, अशा प्रकारचा दगड फरसान मध्ये निघालेला नाही. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल करण्यात आला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी गैरअर्जदार क्र. 1 च्या आस्थापनेमधून अन्नपदार्थ घेऊन खाल्यानंतर त्यांना जो त्रास झाला, त्या बाबत कोणतीही तक्रार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कार्यालयाकडे केली नाही. तसेच सदर आस्थापनेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या कोणत्याही अन्न पदार्थाबाबत, अन्न, सुरक्षा व मानदे कायद्यातील Packaging and Lableing regulation 2011 चे उल्लंघन व इतर उल्लंघनाबाबत कोणतीही तक्रार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 चे अकोला कार्यालयाकडे केलेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 चे कोणत्याही दायीत्वात कोणताही कसूर झालेला नाही.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला व दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे स्वतंत्र लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तीवाद व विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षाने दाखल केलेले न्याय निवाडे याचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निर्णय कारणे देवून पारित केला तो येणे प्रमाणे
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी दि. 02/10/2012 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून एक “होम मेड नमकीन” चे पाकीट ज्याची किंमत रु. 55/- होती, ते खरेदी केले. दि. 07/10/2012 रोजी सदर नमकीनचे पाकीट उघडून त्यातील खाद्य पदार्थ खात असतांना त्यात उडीदापेक्षा किंचीत मोठ्या आकाराच्या एका छोट्या दगडाच्या तुकड्यामुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या बाजूच्या दाढेचा एक मोठा भाग निखळून पडला व दात पुर्णपणे निकामी होऊन त्याला कायम स्वरुपी हानी पोहोचली. त्यामुळे उजव्या बाजूने अन्न चर्वन करण्याची क्रिया संपुर्णत: नष्ट झालेली आहे. तसेच सदर नमकीन हे शिळे असून असुरक्षीत व निकृष्ठ दर्जाचे आहे. अशा प्रकारे ते सदोष होते व म्हणून विरुध्दपक्षाची ही कृती अनुचित व्यापारी प्रथेत मोडते. तक्रारकर्त्याने त्याला झालेल्या कायम स्वरुपी क्षती संबंधी विशेष तज्ञाचे मत दाखल केलेले आहे.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिपालनिय नाही. कारण तक्रारकर्त्याने जी हानी नमुद केलेली आहे, त्या बद्दलचा कुठलाही उहापोह त्याने दाखल केलेल्या डॉक्टरांच्या सर्टीफिकेट मध्ये नमुद नाही. तसेच उपचार करणा-या डॉक्टरांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर दाखल नाही. तक्रारकर्त्याचे वय 80 वर्षाचे आहे, त्यामुळे त्याच्या दाताला झालेली हानी याच खाद्य पदार्थामुळे झाली, हे त्याने सिध्द केलेले नाही. तसेच विरुध्दपक्षाने डॉ. मारवाल यांच्याकडून या प्रकरणासंबंधी माहिती मागविलेली होती. परंतु त्यांनी विरुध्दपक्षाच्या पत्राचे कोणतेही उत्तर दिलेले नाही. तक्रारकर्त्याने जे वैद्यकीय दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यावरुन विरुध्दपक्षाकडील खाद्य पदार्थामुळे ही हानी झाली, हे सिध्द होत नाही. अशा त-हेने तक्रारकर्त्याचे आरोप हे संदीग्ध आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी रेकॉर्डवर त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकण्यात आल्या नंतर व दाखल दस्तऐवज तपासले असता, मंचाचे मते असे आहे की, तक्रारकर्त्याने सदर नमकीन ( फरसानचे पॅकेट ) हे दि. 2/10/2012 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून खरेदी केल्याचे दिसते व त्याचे सेवन दि. 7/10/2012 रोजी करतांना त्यात दगडाच्या एका लहाण तुकड्यामुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या बाजूच्या दाढेचा एक मोठा भाग निखळून पडला, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे व हे कथन सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर परिशिष्ठ क्र. अ-2 वर डॉ. सुनिल मारवाल यांचे सर्टीफिकेट दाखल केलेले आहे. सदरहू सर्टीफिकेटचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, हे सर्टीफिकेट दि. 12/11/2012 रोजीचे आहे व त्यात तक्रारकर्ते हे दाताची ट्रिटमेंट घेत असल्याचे नमुद आहे. परंतु तक्रारकर्त्याच्या दाताचे फ्रॅक्चरचे कारण हे निश्चित स्वरुपात कथीत दगडामुळेच झाले आहे, असे त्यात स्पष्ट नमुद नाही. त्यात Probable Manner ने कारण नमुद केलेले आहे. तसेच तक्रारकर्ते हे कधी पासून दातांची ट्रिटमेंट घेत आहे, हे नमुद नाही. सदर सर्टीफिकेट मध्ये पेशंटची हिस्ट्री नमुद नाही. तसेच घटना ही दि. 7/10/2012 रोजीची आहे व सदर सर्टीफिकेट हे दि. 12/11/2012 चे दिलेले असून ते संदीग्ध आहे. तसेच त्यासोबत तक्रारकर्ते यांनी सदर डॉक्टरांचे प्रतिज्ञापत्र जोडलेले नाही. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या उपचारांबाबतचे इतर दस्तऐवज पाहता, असे स्पष्ट दिसते की, तक्रारकर्ते यांचे वय 80 वर्ष आहे व दातांची ट्रीटमेंट ही नक्की याच कारणामुळे चालू असल्याचा बोध या दस्तऐवजांवरुन होत नाही किंवा तक्रारकर्ते यांनी ते सिध्द केलेले नाही. त्यामुळे अशा संदिग्ध सर्टीफिकेटवरुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्ते यांनी सदर फरसान बद्दल अशी तक्रार केली आहे की, या फरसान मधील अन्न पदार्थ शिळे असून असुरक्षीत तसेच निकृष्ठ प्रतीचे म्हणजेच सदोष आहेत. म्हणून तकारकर्ते यांनी ही तक्रार प्रलंबित असतांना विरुध्दपक्ष क्र. 2 आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, यांना गैरअर्जदार क्र. 2 म्हणून तक्रारीत समाविष्ठ करुन घेतले. परंतु मंचाचे मते विरुध्दपक्ष क्र. 2 कडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्याची विरुध्दपक्ष क्र. 2 ची कार्यपध्दती ही स्वतंत्र आहे. एखाद्या अन्न पदार्थाबद्दल तक्रार असल्यास व ते खाल्यानंतर त्रास उद्भवल्यास व त्याबद्दलची अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील उल्लंघनाबद्दलची तक्रार, तक्रारकर्त्याने अन्न व औषधी प्रशासन ( विरुध्दपक्ष क्र. 2 ) यांच्याकडे स्वतंत्रपणे दाखल करणे भाग होते. तशी तक्रार, तक्रारकर्त्याने केलेली दिसत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 ला या तक्रारीत समाविष्ठ करुन घेवून कथीत आरोपाबाबतचा निर्णय मंचाला देता येणार नाही. तसेच तक्रारकर्ते हे या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 चे “ ग्राहक “ नाहीत. अशा प्रकारे योग्य त्या पुराव्या अभावी तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करणे योग्य राहील, या निर्णयाप्रत मंच आलेले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे
- न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.