तक्रारदारातर्फे : वकील श्री. वानखेडे
सामनेवालेतर्फे : वकील खानवालजितसिंग बेदी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले ही बँक आहे. तर तक्रारदारांचे सामनेवाले यांच्या गोवा येथील पणजी शाखेत बचत खाते होते. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे पणजी शाखेमध्ये 11 जून 2009 रोजी त्रयस्थ व्यक्तीकडून मिळालेला धनादेश जमा केला होता. तो धनादेश अनादर झाला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना धनादेशाचे अनादरन झाल्याचे कळविले नाही. तसेच त्याबद्दलची स्लिप व मूळचा धनादेश तक्रारदारांना दिला नाही. तक्रारदारांनी 17 जून 2010 रोजी पणजी शाखेशी संपर्क केला, विवरणपत्र मागितले असतांना त्यांना जून 2009 मध्ये जमा केलेल्या रुपये 6,00,000/- च्या धनादेशाचे अनादरन झाल्याचे समजले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून विवरणपत्र घेतले. परंतु दरम्यान धनादेश अनादर झाल्याकामी फौजदारी प्रकरण दाखल करण्याची मुदत निघून गेल्याने तक्रारदारांना त्रयस्थ व्यक्तिीच्याविरुध्द कार्यवाही करता आली नाही, व तक्रारदाराचे नुकसान झाले. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना धनादेशाच्या संबंधात सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केली असा तक्रारदारांचा आरोप आहे.
2. तक्रारदारांचे असेही कथन आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना कुठलीही सूचना न देता तक्रारदारांचे बचत खाते एप्रिल 2010 मध्ये बंद केले, व या प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली.
3. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व तक्रारदांच्या आरोपास नकार दिला. सामनेवाले यांनी असे कथन केले की, रुपये 6,00,000/- च्या धनादेशाचे अनादरन झाल्याबद्दल तक्रारदारांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले होते. व तक्रारदारांनी तो धनादेश सुरक्षित ठेवावा, व त्रयस्थ व्यक्तीस तो पुन्हा खात्यामध्ये पुरेशी रक्कम जमा करण्याची सूचना देतील अशी सूचना दिल्याने तक्रारदारांकडे धनादेश व स्लीप पाठविण्यात आली नाही. त्यानंतर तक्रारदार 14/9/2009 रोजी पणजी शाखेत आले असतांना त्यांना अनादर झालेला धनादेश ताब्यात घ्यावा असे सुचविले गेले, परंतु त्या धनादेशीची रक्कम पूर्वीच मिळालेली आहे, व तक्रारदार घाईमध्ये आहेत असे म्हणून तक्रारदारांनी धनादेश व स्लीप स्विकारली नाही.
4. सामनेवाले यांनी कथन केले आहे की, तक्रारदारांच्या खात्यामध्ये प्रदिर्घ काळ काहीच शिल्लक नसल्याने (0 बॅलन्स) सामनेवाले बँकेला नुकसान होत होते, त्यामुळे सामनेवाले बँकेने तक्रारदारांचे खाते रद्द केले. याप्रकारे तक्रारदारांना कुठल्याही मुद्यावर सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाली नाही असे सामनेवाले यांनी कथन केले.
5. दोन्ही बाजूंनी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजूंच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अनादर झालेल्या धनादेशाच्या संदर्भात अथवा खाते बंद करण्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र आहे काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दिनांक 11/6/2009 रोजी रुपये 6,00,000/- चा धनादेश जमा केला होता, व त्या धनादेशाचे अनादरन झाले ही बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या खाते उता-याच्या नोंदीवरुन स्पष्ट होते. तोच धनादेश पुन्हा दिनांक 13/6/2009 रोजी संबंधित बँकेकडे पाठविण्यात आला तरीदेखील खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेशाचे अनादरन झाले. तक्रारदारांनी जमा केलेल्या धनादेशाचे अनादरन झाले याबद्दल वाद नाही. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, धनादेशाचे अनादरन झाल्याबाबत तक्रारदारांना दिनांक 11/6/2009 रोजी व 13/6/2009 रोजी दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले होते. परंतु तक्रारदारांनी धनादेश सांभाळून ठेवावा व त्रयस्थ व्यक्तीशी ते संपर्क करीत आहेत असे सामनेवाले यांना कळविले होते. त्यानंतर दिनांक 14/9/2009 रोजी तक्रारदार स्वतः पणजी शाखेमध्ये आले असतांना त्यांना धनादेशाबद्दल माहिती देण्यात आली व तक्रारदारांनी असे सांगितले की त्यांना अनादरन झालेल्या धनादेशाबद्दल त्रयस्थ व्यक्तीकडून रुपये 6,20,000/- प्राप्त झालेले आहेत, व ते सदरील रक्कम खात्यामध्ये जमा करीत आहेत.
7. सामनेवाले यांच्या वरील कथनास सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिनांक 26/7/2010 रोजी जे उत्तर दिले त्यातील कथनावरुन पुष्टी मिळते. याचप्रकारचे कथन सामनेवाले यांचे दिनांक 14/9/2010 च्या पत्रामध्ये आहे. या व्यतिरिक्त तक्रारदारांनी खात्याचा जो उतारा दाखल केलेला आहे. त्यामधील नोंदी असे दर्शवितात की, दिनांक 14/9/2009 रोजी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रुपये 3,00,000/- व अधिक रोखीने रुपये 3,20,000/- जमा करण्यात आलेले होते. तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवादाच्या परिच्छेद क्रमांक 6 मध्ये ही बाब मान्य केली की, त्यांनी पणजी शाखेमध्ये रुपये 3,00,000/- धनादेशाने व रोखीने रुपये 3,20,000/- जमा केले होते. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्र अथवा आपल्या लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदार हे पणजी शाखेमध्ये गेलेच नव्हते असे कथन केलेले नाही. तक्रारदारांच्या बचत खात्यातील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी दिनांक 14/9/2009 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रुपये 3,20,000/- रोखीने जमा केले होते. धनादेश अनादराची घटना ही दिनांक 11/6/2009 व 13/6/2009 रोजी घडली व तक्रारदार पणजी शाखेमध्ये दिनांक 14/9/2009 रोजी गेले होते. तक्रारदारांच्या खात्याला एटीएमची सुविधा असल्याने दरम्यानच्या काळात तक्रारदारांनी निश्चितच खात्यामधील बाकी बद्दल माहिती घेतली असेल व त्यांना दिनांक 11/6/2009 रोजी रुपये 6,00,000/- च्या धनादेशाचे अनादरन झाल्याचे माहिती असेल. सबब तक्रारदार त्याबद्दल अनभिज्ञ होते हे संभंव दिसत नाही. त्या परिस्थितीमध्ये दिनांक 14/9/2009 रोजी पणजी येथील शाखेमध्ये गेल्यानंतर तकारदारांनी निश्चितच अनादर झालेल्या धनादेशाची माहिती घेतली असती, व फौजदारी प्रकरण दाखल करणेकामी सामनेवाले यांचे पणजी शाखेतून अनादर झालेला धनादेश व स्लीप प्राप्त केली असते. तक्रारदारांनी दिनांक 14/9/2009 रोजी या प्रकारची कुठलीही कार्यवाही केली नाही हे तक्रारदारांचे वर्तन सामनेवाले यांचे कथनास पुष्टी देते.
8. तक्रारदारांचे खाते उता-यातील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांना दिनांक 14/9/2009 रोजी रुपये 6,20,000/- प्राप्त झाले होते, ही बाब सामनेवाले यांचे कैफीयतीमधील कथनास पुष्टी देते. त्याचप्रमाणे तक्रारदारांना रुपये 6,20,000/- प्राप्त झाल्याने त्यांना अनादर झालेल्या धनादेशाबद्दल रुची नव्हती या सामनेवाले यांच्या कथनास पास बुकातील नोंदी व तक्रारदारांचे वर्तन पुष्टी देतात. तक्रारदारांना फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करावयाची असती तर विलंब माफीच्या अर्जासोबत ते फौजदारी अर्ज दाखल करु शकले असते, व फौजदारी अर्जामध्ये वरील बाबी नमूद करु शकले असते. या प्रकारची कुठलीही कार्यवाही तक्रारदारांनी केली नाही. यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की तक्रारदारांना मुळातच फौजदारी स्वरुपाची कार्यवाही त्रयस्थ व्यक्तीच्या विरुध्द करावयाची नव्हती, व केवळ सामनेवाले यांनी खाते बंद केल्याने व सामनेवाले यांना त्रास देण्याच्या हेतूने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
9. तक्रारदारांचे खाते बंद करण्याच्या संदर्भात सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदारांचे बचत खाते डेबिट कार्डशी संबंधित होते, व बचत खात्यामध्ये 0 रुपये ब-याच काळ शिल्लक असल्याने सामनेवाले यांनी ते खाते बंद केले. तक्रारदारांच्या बचत खात्यातील नोंदी सामनेवाले यांच्या कथनास पुष्टी देतात. तक्रारदारांच्या बचतखात्यामध्ये दिनांक 14/1/2010 रोजी 0 रुपये शिल्लक होते, व तीच परिस्थिती दिनांक 8/4/2010 रोजी होती. तक्रारदारांनी खात्यामध्ये काहीच शिल्लक ठेवले नसल्याने व तक्रारदारांचे खाते 0 बॅलन्सचे नसल्याने, व ते डेबिट कार्डशी संबंधित असल्याने सहाजिकच सामनेवाले यांनी तक्रारदारांचे खाते बंद केले यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे दिसून येत नाही.
10. याप्रकारे तक्रारदार दोन पैकी कुठल्याही मुद्दयावर सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब सिध्द करु शकले नाहीत.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 687/2010 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 27/08/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-