व्दाराः- श्री. दिनेश एस. गवळी, सदस्य
निकालपत्र
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हे उक्त नमुद पत्त्यावर आपल्या कुटुंबासह कायमपणे राहतात. तक्रारदारासोबत त्यांची आजी-श्रीमती रत्नाबाई गणपती कांबळे उर्फ रत्नाबाई पंढरीनाथ मिसाळ ही राहणेस आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाणी कनेक्शन मिळणेसाठी दि.31.07.2008 रोजी अर्ज केलेला होता. सदर अर्जानुसार सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा पाणी कनेक्शनसाठी अर्ज मंजुर करुन सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा पाणी कनेक्शनसाठी अर्ज मंजूर करुन सामनेवाले क्र.1 यांच्या कार्यालयाकडे सामान्य पावती क्र.031061 नुसार रक्कम रु.450/- डिपॉझिट भरुन घेतली व तुम्हाला तात्काळ पाणी कनेक्शन मिळेल असे आश्वासन दिले. परंतु तक्रारदार यांनी वारंवार विनंती करुन देखील सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे कार्यालयात जावून समक्ष चौकशी केली असता, सामनेवाले क्र.1 यांनी सदर कनेक्शन अर्जावर श्रीमती अनुसया श्रीपती कांबळे हिने हरकत घेतलेबाबत सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांना मा. जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर यांनी किरकोळ अपिल नं.172/2010 मध्ये श्रीमती अनुसया कांबळे हिने मुंबई उच्च न्यायालयात सदर आदेशाविरुध्द रिट पिटीशन क्र.3866/2011 दाखल केलेली होती. सदर रिट पिटीशन दि.23/06/2011 रोजी मे.उच्च न्यायालयाने नामंजूर केलेला आहे असे सांगून त्याची प्रत सोबत नेलेली दाखविली. तक्रारदारांच्या अर्जावर हरकत घेतलेल्या श्रीमती अनुसया कांबळे हिेने हरकत अर्जासोबत कोणत्याही प्रकारे कोर्टाचा आदेश जोडलेला नव्हता. तथापि, कोर्टाचा कोणताही आदेश अथवा तहकुबी नसताना सामनेवाले क्र.1 यांनी विनाकारण कोर्टात केस प्रलंबित आहे अशी कारणेसांगुन कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.20.06.2011 रोजी लोकशाही दिनादिवशी सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द सामनेवाले क्र.2 यांचेकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना कनेक्शन देणेबाबत आदेश दिले.
2 त्यानंतर, दि.01.12.2011 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून नळ कनेक्शन देता येणार नसलेबाबतचे कळविले. त्यामुळे तक्रारदार यांना मे.कोर्टात प्रस्तुतचा अर्ज दाखल करणे भाग पडत आहे. यातील सामनेवाले-कोल्हापूर महानगरपालिका यांनी तक्रारदारांना पाणी कनेक्शन देणे आवश्यक होते. तथापि, सामनेवाले क्र.1 याने जाणवीपूर्वक तक्रारदारांना सेवा पुरविण्यात अक्षम्य अशी दूर्लक्षपणा केलेला आहे व पाणी कनेक्शन देण्यास नकार देऊन मुलभुत हक्कांपासुन तक्रारदार यांना वंचित ठेवलेले आहे. तक्रारीत कारण मे. कोर्टाच्या स्थलसिमेत घडले असलेने घडले असलेने या मे.कोर्टात अर्ज दाखल करुन घेणेचा अधिकार आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना पाणी कनेक्शन देणेबाबत आदेश व्हावा व सामनेवाले क्र.1 यांच्या दुर्लक्षपणामुळे व विलंबामुळे तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागल्याने सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकुण सहा कागदपत्रे दाखल केली असून ती पुढीलप्रमाणे- (1) दि.31.07.2008 ची तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे भरलेली डिपॉझिटची पावती, (2) दि.09.11.2011 रोजी तक्रारदार याने दिलेल्या लोकशाही हिताच्या अर्जास सामनेवाले यांनी पाठविलेले उत्तर, (3) दि.01.12.2011 रोजी तक्रारदारास सामनेवाले यांनी दिलेले उत्तर, (4) दि.19.07.2011 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास माहितीचे अधिकाराअंतर्गत दिलेले उत्तर, (5) दि.14.11.2011 चे मे.जिल्हा व सत्र न्यायालय यांनी अपील नं.172/10 मध्ये दिलेला निकाल व (6) दि.23.06.2011 रोजीचा मा.मुंबई हायकोर्टाचा निकाल-रीट पिटीशन नं.3866/2011.
3 सामनेवाले क्र.1 व 2 यांनी एकत्रित म्हणणे/कैफियत दाखल केली असून त्यांचे म्हणण्याप्रमाणे, तक्रारदार यांची तक्रार साफ खोटी, चुकीची व लबाडीची असुन ती सामनेवाले यांना मान्य व कबुल नाही. तक्रारदार यांची तक्रार आहे त्या स्थितीतव स्वरुपात चालण्यास पात्र नाही. तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारा/विक्रेता असे नाते नसल्याने देखील तक्रार नामंजूर करण्यात यावी. तक्रार अर्जातील कलम-6, 7, 8, 9 व 10 मधील सर्व मजकुर साफ खोटा, चुकीचा असुन तो सामनेवाले यांना मान्य व कबुल नाही.
4 तक्रारदार यांनी साफ खोटी व चुकीच्या तक्रारीची रचना केलेली असून वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. सामनेवाले-संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्था असुन सदर संस्थेचे कामकाज मुंबई प्रांतिक अधिनियमातील तरतुदींप्रमाणे चालत असून सदर संस्थेचे कामकाज हे लोकहिताच्या दृष्टीने केले जाते. तसेच विविध कामांचे स्वरुपांनुसार सामनेवाले-संस्थेचे विविध विभाग करण्यात आलेले आहेत. त्यातील (अ) सामनेवाले क्र.1 हे कोल्हापूर महानगरपालिका यांचे जलअभियंता असून सदर जलविभागाचे काम हे शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आहे व सामनेवाले क्र.2 हे कोल्हापूर महानगरपालिका यांचे मुख्य अधिकारी आहेत. (ब) सन-2008 मध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांच्या वस्तीच्या ठिकाणी/दलित वस्तींचे ठिकाणी असणा-या सार्वजनिक पाणी कनेक्शनवरील भार कमी करण्याकरिता व जास्तीत जास्त लोकांना स्वतंत्र पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केवळ रु.300/- रुपयात पाणी कनेक्शन मिळण्याकरिता योजन आखण्यात आलेली होती. (क) सदर योजनेचा फायदा घेण्याकरिता शहरातुन जवळपास 15569 नवीन पाणी कनेक्शन मिळविण्याकरीता शहरातील विविध विभागांकडून अर्ज सामनेवाले यांच्या संबंधीत कार्यालयात करण्यात आलेले होते. तक्रारदारांनी देखील सदर योजनेअंतर्गत सामनेवाले यांच्या संबंधीत कार्यालयाकडे अर्ज केलेला होता. तथापि, सदर तक्रारदारांनी अर्ज केल्यानंतर सदर अर्जास श्रीमती अनुसया कांबळे या महिलेने दि.06.03.2009 रोजी सामनेवाले यांचेकडे लेखी हरकत सादर केली. तसेच श्रीमती अनुसया कांबळे या मयत असलेचे सांगणेत येते. त्यांचे वारस श्री आकाराम श्रीपती कांबळे यांनी दि.06.02.2012 रोजी कनेक्शन देऊ नये म्हणून तक्रार अर्ज सादर केला आहे. सदर हरकत अर्ज आलेनंतर तक्रारदार व श्रीमती अनुसया कांबळे यांचेदरम्यान ज्या जमिनीमध्ये पाणी कनेक्शन मागणी केली आहे त्या जागा मालकीबाबत कोल्हापूर येथील दिवाणी न्यायाधिशसो, कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित असल्याचे समजुन आले आहे. त्या कारणांने तक्रारदार व हरकतदार श्रीमती अनुसया कांबळे यांच्यात वाद जागा मालकीबाबत असल्याने तक्रारदार यांचा अर्ज स्थगित ठेवला होता. तथापि, वारंवार तक्रारदार व हरकतदार यांचेकडून वादातील पाणी कनेक्शनबाबत वेगवेगळया अर्जाव्दारे आत्महनाचे अर्ज व धमक्या देऊ लागल्याने तसेच उभ्यतांकडून राजकीय बळाचा वापर केला जात आहे. (ड) ज्यावेळेस सामनेवाले यांचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यासाठी गेले असता जागेवर तक्रारदार व हरकतदार- श्रीमती अनुसया कांबळे यांचेतर्फे इसमांनी जागेवर वाद उपस्थित केल्याने पुढील कोणतीही कारवाई करणे सामनेवाले व तर्फे अधिका-यांना अडचणीचे ठरलेले होते. ही बाब जाणिवपूर्वक तक्रारदार यांनी मे.कोर्टापासून लपवुन ठेवलेली आहे व यावरुन तक्रारदार यांचा हेतु शुध्द नसल्याचे शाबीत होते. (इ) तसेच तक्रारदार ज्या मिळकतीमध्ये पाणी कनेक्शनची मागणी करीत आहेत त्या मिळकतीच्या मालकीबाबत वाद न्यायप्रविष्ठ असतांना सदर जागेमध्ये कोणत्याही सक्षम न्यायालयाचे परवानगीशिवाय पाणी कनेक्शन दिल्यास मे. दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर, कोल्हापूर यांचे अधिकारात सामनेवाले व्दारे हस्तक्षेप केल्यासारखे होणार आहे.
5 सामनेवाले ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सामनेवाले क्र.1 व 2 सदर संस्थेचे अधिकारी असुन ते जनहित जपण्यासाठी कटिबध्द आहेत. तक्रारदार यांना पाणी कनेक्शन न देण्यामध्ये सामनेवाले संस्थेचा वा अधिका-यांचा कोणताही गैरहेतु नाही. तक्रारदार यांचे अर्जास हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांनी हरकत घेतली आहे. तसेच तक्रारदार व हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांचेदरम्यान ज्या मिळकतीमध्ये कनेक्शनची मागणी केली आहे त्या मिळकतीच्या मालकी संदर्भातच वाद न्यायप्रविष्ठ असल्याने केवळ तक्रारदार यांचे अर्जाप्रमाणे अदयाप कनेक्शनबाबत निर्णय तहकुब ठेवण्यात आलेला आहे. याउपर मे.कोर्टांनी तक्रारदार यांचे पाणी कनेक्शन देण्याबाबत आदेश केल्यास सामनेवाले हे तक्रारदार यांना पाणी कनेक्शन देण्यास तयार आहेत. तथापि सामनेवाले यांचे विनंतीनुसार, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा व तक्रारदार यांचे प्रसतुत तक्रार अर्जाचे कारणांने सामनेवाले यांना नाहक न्यायालयिन कामात गुंतविल्याने सामनेवाले यांना तक्रारदार यांचेकडून कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणुन रक्कम रु.10,000/- देण्यात यावेत. तसेच सामनेवाले यांनी त्यांचे म्हणण्यासोबत एकुण 14 कागदपत्रे जोडलेली पुढीलप्रमाणे आहेत. (1) तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पाणी कनेक्शनभरणा केलेला अर्ज, (2) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे लिहून दिलेले शपथपत्र, (3) तक्रारदार यांचे कनेक्शन अर्जास आलेला हरकत अर्ज, (4) तक्रारदार यांचे अर्जास आले हरकतदार यांनी हजर केलेले असेसमेंट उतारा, (5) घर नं.727 ई वॉर्ड, या मिळकतीत असले श्रीमती अनुसया कांबळे यांचे नांवे असलेले पाणी कनेक्शनचे बील, (6) घर नंबर 727 ई वॉर्ड या मिळकतीतील वीज बिल, (7) तक्रारदार व श्रीमती रत्नाबाई कांबळे यांचे दरम्यान दाखल रे.क्र.नं.739/09 या दाव्याची प्रत, (8) श्रीमती कांबळे यांचा अर्ज, (9) श्रीमती रत्नाबाई मिसाळ (10) तक्रारदारांचा अर्ज, (11) दि.06.03.2011 चा श्रीमती अनुसया कांबळे यांचा अर्ज, (12) दि.18.03.2011 चा श्रीमती अनुसया कांबळे यांचा अर्ज, (13) दि.28.07.2011 चा श्रीमती अनुसया कांबळे यांचा अर्ज (14) दि.04.02.2012 चा श्री. आकाराम कांबळे यांचा अर्ज अशी कागदपत्रे सोबत जोडली आहेत.
6 तक्रार अर्ज, कैफियती व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषांगिक कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांची पाहणी केली व तोंडी युक्तीवाद ऐकला असता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे शारिरीक व मानसिक त्रासापोअी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणमिमांसाः-
7 मुद्दा क्र.1- तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.1 कडे भरलेली डिपॉझिट रिसीट नं.031061 पाहली असता, सदरची पावती कोल्हापूर महानगरपालिका, शहर पाणी पुरवठा व ड्रेनेज पुरवठा यांनी तक्रारदार-श्री.अतुल दिलीप कांबळे यांना दिलेली असून सदरची पावतीची रक्कम रु.450/- अशी आहे. यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पाणी कनेक्शन मिळण्याकरिता डिपॉझिट रक्कम भरलेली दिसुन येते. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता, अ.क्र.1 कडे नविन नळ कनेक्शन जोडणीकरिता करावयाचा अर्ज दाखल केला असुन त्यामध्ये तक्रारदार-श्री.अतुल कांबळे, पत्ता-घर नं.727, सि.स.नं.2153, आंबेडकर नगर, कसबा बावडा यांचे नावाची असुन सदर अर्जानुसार, तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.300/- भरुन घेऊन नवीन नळ/चावी मंजूर केली आहे असे नमुद केले आहे. सदर अर्जावर प्लंबर तसेच रोखपाल शहर पाणीपुरवठा विभाग, कोल्हापूर यांची सही व शिक्का आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8 मुद्दा क्र.2:- या मुद्दयाचा विचार करता, तक्रारदारांनी दाखल केलेल्या अ.क्र.1 ते 6 कडे दाखल केलेली कागदपत्रे तसेच रे.क.नं.739/2009 दिवाणी कोर्टाचा व किरकोळ सिव्हील अपील नं.172/2010 जिल्हा न्यायालय, कोल्हापूर यांचा निकाल पाहता, तक्रारदार व हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांच्यामध्ये घर जागेबाबत वाद होता हे स्पष्ट होते. जिल्हा न्यायालयातील अपील क्र.172/2010 चा निकाल तक्रारदारांच्या बाजूने दिसुन येतो. तसेच हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली रिट याचिका क्र.3866/2011, दि.23.06.2011 रोजी फेटाळण्यात आली. सामनेवाले यांनी हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांचेमार्फत तक्रारदारांच्या जागेबाबत वाद उपस्थित केल्याने व दि.06.03.2009 रोजी लेखी हरकत दाखल केल्याने तसेच दि.06.02.2012 रोजी तक्रारदारांनी नळ कनेक्शन घेऊ नये म्हणून तक्रार अर्ज दाखल केल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना नवीन कनेक्शन/नळ जोडणी दिलेले नाही असे दिसुन येते.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता, तक्रारदारांना ति-हाईत इसम-हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकाकडे तक्रार केल्यामुळे पाणी कनेक्शन दिलेले नाही असे दिसुन येते. तथापि तक्रारदारांनी दाखल केलेल्या जिल्हा नयायालय व मा.उच्च न्यायालय यांच्या निकालांचे अवलोकन केले असता, सदरचे निकाल तक्रारदारांच्या बाजूने आहे तसेच सदर तक्रारीस ति-हाईत इसम-हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांनी या मंचासमोर हजर राहून कोणतीही हरकत घेतलेली नाही. निव्वळ ति-हाईत इसम-हरकतदार-श्रीमती अनुसया कांबळे यांनी हरकत घेतल्यामुळे तक्रारदारांचे पाणी कनेक्शन मंजूर केलेले नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना पाणी या अत्यंव जीवनाश्वक व मुलभुत गरज असुन देखील पाणी कनेक्शन न देऊन सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
9 मुद्दा क्र.3:- सामनेवाले यांनी तक्रारदारांनी डिपॉझिट भरुन घेऊनदेखील पाणी कनेक्शन जोडून दिलेले नाही म्हणून त्यांची गैरसोय झाल्यामुळे त्यांना मानसिक त्रास व शारिरीक त्रास झाला हे सिध्द होते. त्यासाठी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रक्क्म रु.500/- मिळण्यास पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना पाणी/नळ कनेक्शन दोन आठवडयांच्या आत जोडून दयावे.
3 सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.500/- दयावेत.
4 सदर आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.