(पारीत व्दारा मा.श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक– 06 डिसेंबर, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द त्याने विकत घेतलेल्या मोटरसायकलचे पासिंग व नोंदणी करुन न मिळाल्यामुळे दोषपूर्ण सेवे संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं 1) यांचा नागपूर येथे मुख्य वाहन विक्रीचा व्यवसाय असून ते विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे मार्फतीने भंडारा येथे वाहन विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे भंडारा येथील शोरुम मधून दिनांक-05.05.2017 रोजी टी.व्ही.एस.एक्सेल-100 मोपेड मोटरसायकल खरेदी केली. मोटरसायकल खरेदीचे वेळी विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा येथील स्थानिक विक्रेता यांनी वाहनाचा विमा तसेच वाहनाचे आर.टी.ओ.कार्यालयात पासिंग करुन देण्यात येईल असे मौखीक आश्वासन दिले होते. मोटरसायकल खरेदी केल्या नंतर वेळोवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे शोरुमला भेटी देऊन आर.टी.ओ.कार्यालयात नोंदणी करुन देण्याची विनंती केली होती परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी टाळाटाळ केली, वस्तुतः वाहन खरेदीचे दिनांका पासून पंधरा दिवसांचे आत पासिंग करुन देणे आवश्यक होते परंतु ते आज पर्यंत करुन दिलेले नाही. शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1) मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना दिनांक-19.12.2017 रोजी पत्र पाठवून त्याव्दारे भंडारा येथील वाहन विक्रीचा व्यवसाय अचानक बंद केल्यामुळे त्यास वाहनाची सर्व्हीसिंग व ईतर सुविधांचा लाभ घेता येत नाही तसेच त्याने खरेदी केलेल्यामोटरसायकलचे पासिंग आज पर्यंत झालेले नसल्याने त्याला मोटरसायकल रस्त्यावर चालविणे योग्य दस्तऐवजाच्या अभावी कठीण झालेले आहे. मोटरसायकलला नेमप्लेट नसल्याने पोलीसांनी दंड ठोठावलेला आहे. परिणामी विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-05.05.2017 रोजी खरेदी केलेली टी.व्ही.एस.एक्स.एल.100 मोपेड या मोटरसायकलची नोंदणी आर.टी.ओ.कार्यालय भंडारा येथे त्याचे नावे नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-1,00,000/- मिळावेत आणि सदर नुकसान भरपाईवर वाहन खरेदी दिनांक-05.05.2017 पासून ते प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षा कडून मिळावे.
- प्रस्तुत तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळावा.
03. प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल झाल्या नंतर ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे तर्फे वकील प्राची एस.महंकाळ यांनी दिनांक-11.10.2018 रोजी वकीलपत्र दाखल केले तसेच ग्राहक मंचा समोर अर्ज दाखल करुन लेखी उत्तरासाठी मुदतीचा अर्ज सादर केला, त्यावर ग्राहक मंचाने सदरचा अर्ज रुपये-500/- खर्चासह मंजूर केला, ग्राहक मंचाचे आदेशा नुसार खर्चाची रक्कम तक्रारकर्त्याला त्याच दिवशी अदा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा विरुध्दपक्ष क्रं 1 चे वकील प्राची महंकाळ यांनी दि.-16.10.2018 रोजी ग्राहक मंचा समोर मुदतीचा अर्ज सादर केला आणि तो मंजूर करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा दिनांक-23.10.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे वकील प्राची महंकाळ यांनी मुदतीचा अर्ज ग्राहक मंचा समोर सादर केला असता सदरचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यानंतर दिनांक-12.12.2018 रोजी ग्राहक मंचाव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे विरुध्द तक्रार लेखी जबाबा शिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा येथील स्थानिक मोटरसायकल विक्रेता यांचे पत्त्यावर ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता ती “Left” या पोस्टाचे शे-यासह परत आली, सदर नोटीसचे बंद पॉकीट अभिलेखावर पान क्रं 18 व 19 वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारकर्त्या तर्फे ग्राहक मंचा समक्ष विरुध्दपक्ष क्रं 2 यांना तक्रारीतून वगळण्यासाठी अर्ज दिनांक-26.11.2018 रोजी सादर करण्यात आला होता, सदर अर्जावर ग्राहक मंचाव्दारे दिनांक-12.12.2018 रोजी आदेश पारीत करण्यात येऊन विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे नाव तक्रारीतून वगळण्यासाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. ग्राहक मंचाचे आदेशा नुसार विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे नाव दिनांक-12.12.2018 रोजी तक्रारीतून वगळण्यात आले.
05. तक्रारकर्त्याने पान क्रं 11 वरील यादी नुसार एकूण 04 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांनी तक्रारकर्त्याचे नावे वाहन खरेदी केलेल्या मोटरसायकलची डिलेव्हरी चालानची प्रत, विरुध्दपक्ष क्रं 2 स्थानिक विक्रेता भंडारा यांनी तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-05.05.2017 रोजी खरेदी केलेल्या वाहनाची रक्कम रुपये-40,400/- मिळाल्या बाबत दिलेली पावतीची प्रत, तक्रारकर्त्याने दिनांक-30.11.2017 रोजी रजिस्टर पोस्टाने विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता, नागपूर यांना मोटरसायकलची नोंदणी करुन वाहन क्रमांक मिळण्या बाबत केलेल्या अर्जाची प्रत व रजिस्टर पोस्टाची पावती प्रत तसेच तक्रारकर्त्याने दिनांक-19.12.2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना त्याने खरेदी केलेली टी.व्ही.एस.एक्स.एल.100 मोपेड ही मोटरसायकल आर.टी.ओ. कडून पासिंग करुन मिळण्या बाबत रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या अर्जाची प्रत आणि रजि.पोस्टाची पावती प्रत अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं 27 व 28 वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले तसेच पान क्रं 29 व 30 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने दाखल केलेले दस्तऐवज, पुराव्याचे शपथपत्र इत्यादीचे ग्राहक मंचा व्दारे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील श्री कैलास रामटेके यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्दे निष्कर्षाप्रत येतात -
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | त.क. हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय? | होय. |
2 | वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय. |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण-मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 ते 3-
07. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 जे विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे भंडारा येथील स्थानिक मोटरसायकल वाहन विक्रेता आहेत यांचे कडून मोटरसायकल खरेदी केली होती तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 हे नागपूर येथील मुख्य वाहन विक्रेता आहेत, ही बाब तक्रारकर्त्याने पान क्रं-12 वर दाखल केलेल्या दिनांक-05.05.2017 रोजीच्या डिलेव्हरी चालान वरुन सिध्द होते. सदर डिलेव्हरी चालान ही विरुध्दपक्ष क्रं 1 जयमल ऑटोमोबाईल नागपूर मुख्य विक्रेता यांनी तक्रारकर्त्याचे नावे दिलेली असून त्यामध्ये वाहनाचे वर्णन TVS XL Sup 100 (Grey) Engine-DP 1 CH 1955616 असे नमुद केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा येथील स्थानिक वाहन विक्रेता यांनी दिनांक-05.05.2017 रोजीची तक्रारकर्त्याचे नावे वाहन खरेदी केल्या बाबत रक्कम रुपये-40,400/- मिळाल्या बाबत दिलेली पावतीची प्रत पुराव्या दाखल पान क्रं 13 वर तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने रजिस्टर पोस्टाने दिनांक-30.11.2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना त्याने दिनांक-05.05.2017 रोजी TVS XL 100 मोपेड खरेदी केलेल्या मोटरसायकलची आरटीओ कार्यालयात नोंदणी करुन वाहन क्रमांक मिळण्या बाबत केलेल्या अर्जाची प्रत व रजिस्टर पोस्टाची पावती प्रत पान क्रं 14 वर पुराव्या दाखल सादर केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना दिनांक-19.12.2017 रोजी त्याने खरेदी केलेली टी.व्ही.एस.एक्स.एल.100 मोपेड ही मोटरसायकल आर.टी.ओ. कडून पासिंग करुन मिळण्या बाबत रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या अर्जाची प्रत आणि रजि.पोस्टाची पावती प्रत पुराव्या दाखल पान क्रं 15 व 16 वर दाखल केलेली आहे. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने पान क्रं 27 व 28 वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले तसेच पान क्रं 29 व 30 वर लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
08. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल उपरोक्त नमुद सादर केलेल्या दस्तऐवजा वरुन असे सिध्द होते की, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 जयमल ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड हे नागपूर येथील मुख्य वाहन विक्रेता असून त्यांचेच मार्फतीने तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या मोटरसायकलची डिलेव्हरी चालान जारी झालेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 हे, विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांचे भंडारा येथील स्थानिक विक्रेता असून, विरुध्दपक्ष क्रं 2 कडून तक्रारकर्त्याने दिनांक-05.05.2017 रोजी TVS XL 100 मोपेड खरेदी केल्याची बाब दाखल पावती वरुन पुराव्यानिशी सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 जयमल ऑटोमोबाईल, नागपूर यांचा ग्राहक होतो आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
09. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांचे कडील मोटरसायकल, विरुध्दपक्ष क्रं 2 जे भंडारा येथील स्थानिक विक्रेता आहेत यांचे कडून दिनांक-05.05.2017 रोजी खरेदी केली होती परंतु आज पर्यंत त्याला आर.टी.ओ.कार्यालया कडून सदर मोटरसायकलची पासिंग व नोंदणी करुन मिळालेली नाही. या संदर्भात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना रजिस्टर पोस्टाने अनुक्रमे दिनांक-30.11.2017 रोजी आणि दिनांक-19.12.2017 रोजी लेखी पत्र पाठवून त्याव्दारे खरेदी केलेल्या मोटरसायकलचे पासिंग व नोंदणी करुन मिळण्या बाबत विनंती केलेली आहे, सदर दोन्ही पत्रे रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पत्रांच्या प्रती आणि रजिस्टर पोस्टाच्या पावत्या पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत परंतु ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिल्याचे दिसून येत नाही. विरुघ्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता यांना लेखी उत्तर दाखल करण्यासाठी ग्राहक मंचाव्दारे पुरेशी संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर विहित मुदतीत सादर केले नसल्याने त्यांचे विरुध्द तक्रार बिना लेखी जबाबा शिवाय चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे पारीत करण्यात आलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 हे, विरुध्दपक्ष क्रं 1 नागपूर येथील मुख्य वाहन विक्रेता यांचे भंडारा येथील स्थानिक विक्रेता आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 यांना ग्राहक मंचाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आलेली नोटीस लेफ्ट या पोस्टाचे शे-यासह परत आल्याने आणि तसेही विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता असल्याने तक्रारकर्त्याचे अर्जा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे नाव प्रस्तुत तक्रारीतून वगळण्याचा आदेश ग्राहक मंचाने पारीत केलेला आहे.
10. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने पुराव्या दाखल सादर केलेले दस्तऐवज तसेच पुराव्याचे शपथपत्र आणि लेखी युक्तीवाद यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द केलेले आरोप सिध्द होतात. विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार बिना लेखी जबाबा शिवाय चालविण्याचा आदेश पारीत झालेला आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याने त्यांचे विरुध्द केलेले आरोपा खोडून काढलेले नाहीत व लेखी उत्तरही दाखल केलेले नाही म्हणून प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज आणि पुराव्याचे आधारे गुणवत्तेवर निकाली काढण्यास ग्राहक मंचाला काहीही अडचण नाही.
11. तक्रारकर्त्याचे मोटरसायकलचे आरटीओ कार्यालयाकडून पासिंग व नोंदणी न झाल्यामुळे वाहनास क्रमांक मिळालेला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर मोटरसायकल रस्त्यावर चालविता येत नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदरचे प्रकरणा मध्ये मोटरसायकलचे आर.टी.ओ.भंडारा येथून पासिंग करुन घेण्या बाबत कोणताही अर्ज किंवा आर.टी.ओ पासिंग करीता लागणारे विहित शुल्क विरुध्दपक्ष क्रं 1 किंवा थेट आर.टी.ओ.कार्यालय भंडारा येथे भरल्या बाबत दिसून येत नाही. मोटर वाहन कायदया प्रमाणे कोणतेही वाहन पासिंग न करता रस्त्यावर चालविता येत नाही व असे न करता वाहन रस्त्यावर चालविल्यास कायद्दा प्रमाणे तो गुन्हा ठरतो. तक्रारकर्त्याचे मोटरसायकलचे पासिंग झाले अथवा नाही या बाबतचा कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांची नैतिक जबाबदारी येते की, त्यांनी तक्रारकर्ता ग्राहकास विकलेल्या मोटरसायकलचे त्याचे कडून कायदेशीर शुल्क घेऊन वाहनाचे पासिंग आर.टी.ओ.कार्यालयातून करुन देणे अनिर्वाय आहे परंतु सदरचे प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मोटरसायकलची विक्री केली त्या मोबदल्यात त्याचे कडून वाहनाची किम्मत स्विकारली परंतु मोटरसायलकची आर.टी.ओ.भंडारा कार्यालया कडून पासिंग करुन दिलेली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक-30.11.2017 व दिनांक-19.12.2017 रोजी लेखी पत्र पाठवून वाहनाचे पासिंग करण्या बाबत विनंती केलेली आहे परंतु सदरचे विनंतीला सुध्दा विरुध्दपक्ष यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही व दक्षता घेतलेली नाही. सदरची विरुध्दपक्षाची कृती ही सेवेतील त्रृटी असल्याचे स्पष्ट होते म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविल्याने तक्रारकर्ता हा त्याने विरुध्दपक्षा कडून खरेदी केलेल्या मोटरसायकलची आरटीओ कार्यालयातून पासिंग व नोंदणी करुन मिळण्यास तसेच विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे त्यावरुन ग्राहक मंचाव्दारे खालील प्रमाणे प्रकरणात अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 जयमल ऑटोमोबाईल्स, नागपूर मुख्य वाहन विक्रेता यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 मुख्य वाहन विक्रेता यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याने त्यांचे कडून खरेदी केलेल्या मोटरसायकलची आर.टी.ओ.कार्यालय भंडारा कार्यालयातून पासिंग व नोंदणी करुन द्दावी. मोटरसायकल पासिंग व नोंदणीसाठी नियमा नुसार लागणा-या शासकीय शुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः करावा. मोटरसायकलची पासिंग व नोंदणी झाल्या नंतर मोटरसायकलला क्रमांक प्राप्त करुन ते वाहन तक्रारकर्त्याचे ताब्यात दयावे. तक्रारकर्त्याची मोटरसायकल पासिंग व नोंदणी करुन मिळण्यासाठी आता विलंब झालेला असल्याने त्या अनुषंगाने आर.टी.ओ.कार्यालयाकडून आकारलेल्या दंडाची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांनी स्वतः भरावी. तक्रारकर्त्याने सुध्दा मोटरसायकलच्या पासिंग व नोंदणी करण्या करीता विरुध्दपक्ष क्रं 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांना योग्य ते सहकार्य करावे.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांनी तक्रारकर्त्याला दयावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 मुख्य वाहन विक्रेता नागपूर यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.