तक्रार क्र. CC/ 13/ 27 दाखल दि. 04.02.2014
आदेश दि. 12.09.2014
तक्रारकर्ता :- श्री राजेश्वर नामदेवजी शेंदरे
वय – निरंक, धंदा - निरंक
मु.पो.मानेगांव(बाजार) ता.जि.भंडारा
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- जयदुर्गा ग्रामिण बिगर शेती सहकारी
पत संस्था, मु.सिल्ली
तर्फे श्री अजय क्षिरसागर,अध्यक्ष
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.लांबट व अॅड.तलमले.
विरुध्द पक्ष एकतर्फी.
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 12 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्ता राजेश्वर नामदेवजी शेंदरे,मु.पो.मानेगांव(बाजार) ता.जि.भंडारा यांनी विरुध्द पक्ष जयदुर्गा ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था, मु.सिल्ली तर्फे श्री अजय क्षिरसागर, अध्यक्ष हया पतसंस्थेकडे दामदुप्पट मुदत ठेवची रक्कम ती Maturity झाल्यावर परत मागितली असता व संस्थेकडील बचत खाते क्र.600 मध्ये रु.3200/- ही रक्कम परत मागितली असता ती न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण न्यायमंचात दाखल केले आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष जयदुर्गा ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था मु.सिल्ली हया पतसंस्थेमध्ये दिनांक 13/5/2005 ला रु.19,000/- ही रक्कम दामदुप्प्ट व्याज दराने मुदतठेव 6 वर्षे 6 महिने करीता ठेवली. त्या रक्कमेची Maturity दिनांक 14/11/2011 ला झाली आहे. मुदत ठेव पावती पान न.11 वर दाखल केली आहे.
तसेच संबंधीत पतसंस्थेमध्ये बचत खाते क्र.600 मध्ये रक्कम रु.3200 शिल्लक आहे. सेव्हींग पास बुक बचते खाते क्रमांक 600/6 ची झेरॉक्स प्रत पान नं. 12 व 13 वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने मुदत ठेव पावती घेवून रक्कम रुपये 38,000/- मुदत पुर्ण झाल्यावर मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष पतसंस्थेचे मॅनेजर दिलीप ठक्कर व अध्यक्ष अजय क्षिरसागर यांनी रक्कम रु 38,000/- न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रथम डी.आर भंडारा येथे लेखी तक्रार दाखल केली, ती पान क्र.14 वर दाखल आहे. नंतर दिनांक 27/2/2013 रोजी तक्रारकर्त्याचे वकील अॅड.तलमले यांनी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली जी पान नं.15 वर आहे व ती नोटीस विरुध्द पक्षाला दिनांक 16/3/2013 रोजी मिळाली त्याची पावती पान क्र.16 वर आहे.
3. विरुध्द पक्षाने नोटीसचे उत्तर दिले नाही व रक्कम सुध्दा दिली नाही म्हणुन तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्यायमंचात रु.38,000/- ही मुळ रक्कम व त्यावरील 12 टक्के व्याज दिनांक 15/11/2011 पासून मिळण्यासाठी व बचत खात्यातील रक्कम रु 3,200/- व त्यावरील व्याज 12 टक्के दराने दिनांक 29/6/2011 पासून मिळण्याकरीता सदर प्रकरण दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 4/2/2014 ला दाखल होवून विरुध्द पक्षास नोटीस काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 3/6/2014 ला पारित करण्यात आला.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत मुदत ठेव पावती प्रमाणित प्रत व बचत खाते पासबुकच्या प्रमाणित प्रति दाखल केल्या आहेत. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकीला मार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पान क्र.15 वर दाखल केली आहे.
6. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.एस.एस.लांबट यांनी दिनांक 6/9/2014 ला तक्रारीमधील माहिती हाच तक्रारकर्त्याचा युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व कागदपत्रे तसेच तक्रारीमध्ये दर्शविलेला युक्तीवाद यावरुन खालील मुददा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
8. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव योजनेद्वारे दिनांक 13/5/2005 रोजी रक्कम रु.19,000/- जमा केली होती. तक्रारकर्त्याने मुदत ठेव पावती क्र.358 पान क्र.11 वर सदरहू प्रकरणात दाखल केली आहे. या मुदत ठेव पावती क्र.358 वर व्यवस्थापक,सचिव व अध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे. मुदत ठेव पावतीमध्ये मुदतीनंतर मिळणारी रक्कम रुपये 38,000/-, दिनांक 14/11/2011 मिळणार होती हे स्पष्ट होते. तसेच बचत खाते क्रमांक 600 वर रु.3,200/- ची नोंद आहे.
9. तक्रारकर्त्याने दिनांक 14/11/2011 ला मुदत ठेव अंतर्गत Maturity झाल्यावर विरुध्द पक्षाकडे रक्कम रु.38,000/- ची मागणी केली व बचत खाते क्रमांक 600 वर रक्कम रु.3,200/- च्या बँलेन्स ची मागणी केली परंतु विरुध्द पक्षाने रक्कम परत केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाला दिनांक 27/2/2013 ला नोटीस पाठविली. तरी विरुध्द पक्षाने रक्कम परत दिली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची रक्कम मुदतीनंतर परत न करणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे. विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्ता शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास मुदत ठेव रक्कम रुपये 38,000/- (अडतीस हजार) 12 टक्के व्याजासह दयावे. व्याजाची आकारणी दिनांक 15/11/2011 पासून ते संपुर्ण रक्कम तक्रारकर्त्यास मिळेपर्यंत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तसेच बचत खात्यातील रक्कम रुपये 3,200/- (तीन हजार दोनशे) 12 टक्के वयाजासह दयावे. व्याजाची आकारणी दिनांक 29/6/2011 पासून संपुर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत करावी.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक,मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(पाच हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.