नि.33 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 40/2011 नोंदणी तारीख – 05/03/2011 निकाल तारीख - 12/10/2011 निकाल कालावधी- 221 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- 1 भागुबाई उर्फ सुनंदा भगवाण ढवाण 2 श्री. संदीप भगवान ढवाण रा. पिंगळी बुद्रुक, ता.माण जि.सातारा ----- अर्जदार (वकील श्री. दादासो एस.बळीप) विरुध्द 1 जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.,पिंगळी, ता. माण, जि. सातारा तर्फे दादासो आण्णा अर्जून 2. चेअरमन - दादासो आण्णा अर्जून 3. संचालक- दत्तात्रय व्यंकटेश जगदाळे 4. संचालक- बापुराव ज्ञानदेव जगदाळे 5. संचालक- बापुराव मुगुटराव कोकरे 6. संचालक- ज्ञानबा हरिबा कुंभार 7. संचालक- शरद दिनकर जगदाळे 8. व्हा.चेअरमन- सुदाम कृष्णा जगदाळे 9. संचालक- अजमुद्दीन जंगूभाई शेख 10. संचालक- जीवन खंडू साबळे 11. संचालक- रामचंद्र आण्णा यादव 12 संचालक- चंपाबाई अंकुश यादव सर्व रा. पिंगळी बुद्रुक, ता. माण, जि.सातारा -----जाबदार क्र. 1 ते.8, 10 व 11 (वकील श्री.हिंदूराव रा.काटकर) जाबदार क्र. 9 व 12 एकतर्फा न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे – 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावत्यांची व्याजासहीत देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी ठेवपावत्यांची एकूण रक्कम रु. 67,000/- व त्यावरील व्याज, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र. 1 ते 8, 10 व 11 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोहोच प्रस्तुतकामी दाखल आहे. तसेच ताबदार क्र. 9 व 12 चे नोटीस स्विकारत तसलेचे लखोटे या कामी दाखल असलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 3. जाबदार क्र. 1 ते 8, 10 व 11 यांनी या कामी हजर होवून त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.30 व शपथपत्र नि.31 ला दाखल केलेले आहे. जाबदार क्र. 1 ते 8, 10 व 11 यांनी अर्जदाराचे तक्रार अर्जातील तक्रार अंशतः मान्य करुन अन्य तक्रारी नाकारलेल्या आहेत. या जाबदारांचे कथनानुसार अर्जदार यांनी नोटीस पाठविण्यापूर्वी दोन वेळा तोंडी पैशाची मागणी केली असता जाबदार संस्थेकडे पैसे उपलब्ध नसल्याने व संस्था बंद अवस्थेत असल्याने अर्जदार यांना एक महिन्याची मुदत दिली असता अर्जदार यांनी एक महिना न थांबता जाबदार संस्थेला नोटीस दिली. त्यावेळी जाबदेणार यांनी स्वतः संस्थेकडे पैसे जमा झाले आहेत ते घेवून जाणेस सांगितले असता रक्कम आता कोर्टातून घेवू असे म्हणून अर्जदार यांनी पैसे नेण्यास नकार दिला. त्यामुळे जाबदार यांनी अर्जदारांसाठी जमा केलेले पैसे अन्य ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करणेत आल्या. संस्था जसजशी त्यांचेकडे वसुली होईल तसतसे ज्या-ज्या लोकांनी संस्थेकडे ठेवी ठेवल्या आहेत त्यांना अग्रक्रमानुसार पैसे उपलब्ध झाले की दिले जातात. जाबदार संस्था वसुलीच्या प्रमाणात हप्त्याने रक्कम देणेस तयार असतानासुध्दा जाबदार संस्थेस त्रास देण्याच्या हेतूने खोटा व लबाडीचा तक्रार अर्ज दाखल केला असल्याने सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे कथन केले आहे. 4. अर्जदार व जाबदार यांचे वकिलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. अर्जदार क्र.1 यांनी नि. 2 कडे व अर्जदार क्र. 2 यांनी नि. 22 कडे या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी शपथपत्र दाखल केले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्या 5/1 ते 5/4 कडील ठेव पावत्यांच्या मुळ प्रती व नि. 5/5 कडील अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीसीची प्रत पाहीली. प्रस्तुत ठेवपावत्यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 व नि. 22 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5/5 कडील ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदारांना पाठविलेली नोटीस पाहीली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. 5. तक्रार अर्जामध्ये भागुबाई व सुनंदा भगवान ढवाण हे एकाच व्यक्तीचे नाव असून ठेव पावत्यांवरती सुनंदा ढवाण तसेच भागुबाई ढवाण अशी वेगवेगळी नावे नोंदली गेली आहेत. परुतु सुनंदा व भागुबाई एकाच व्यक्तीची नावे आहेत असे अर्जदार शपथपत्राने कथन करतात. तसेच जाबदार यांनी आपले म्हणणेतही यासाठी कोणतीही हरकत घेत नाहीत. सबब अर्जदाराचे कथन ग्राहय धरणेत येत आहे. 6. निर्वादितपणे जाबदार संस्था अर्जदारांच्या ठेव रकमा जाबदार संस्थेकडे आहेत हे मान्य करत आहे. दोन वेळा अर्जदार रक्कम मागणेस आले हे ही मान्य करत आहे. रक्कम मिळाली नाही म्हणून अर्जदाराने नोटीस दिली हेही जाबदार मान्य करीत आहे. परंतु संस्थेकडे रक्कम नाही म्हणून अर्जदाराला ठेवीची रक्कम दिली नाही हे जाबदाराचे कारण कायदेशीर नाही. तसेच जाबदार संस्थेकडे रक्कम जमा आहे तुमची रक्कम घेवून जावा असे अर्जदाराला सांगितले परंतु रक्कम कोर्टातूनच घेवू म्हणून रक्कम घेणेस अर्जदाराने नकार दिला याचे शाबितीसाठी जाबदाराने स्वतःचे कथनाव्यतिरिक्त दुसरा कोणता पुरावा दाखल केलेला नाही. खरोखर जर अर्जदाराने रक्कम घेणेस नकार दिला असेल तर अर्जदाराने कोणाला नकार दिला त्याचे नाव किंवा त्यांचे शपथपत्र घालणेस जाबदार यांस कांही हरकत नव्हती परंतु जाबदारांने तसे केले नाही. सबब जाबदारांचे कथनात तथ्य नसलेने ग्राहय धरणेत येवू नये असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब ठेवींची मुदत संपलेनंतर अर्जदाराने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदाराने अर्जदारांच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरीस्त नि. 5 सोबतच्या नि.5/1 ते 5/4 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपेपर्यंत संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1 अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 1 ते 12 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेव पावती क्र. 658, 732, 739 व 682 वरील रक्कम ठेव पावत्यांवर नमूद व्याजदराने देय होणा-या व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु.5,000/- द्यावेत. 3. जाबदार क्र.1 ते 12 यांनी या निर्णयाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसांचे आत करावी. .4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.12/10/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |