::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे दिनांक ०२.०२.२०१३ रोजी सामनेवाले विकसित करीत असलेल्या मौजा देलनवाडी येथील सर्वे नं. २३ मधील प्रस्तावित LAY OUT मधील प्लॉट नं. ६६, ७१ व ७२ च्या खरेदीपोटी एकत्रित रक्कम रु.१४,१७,५००/- निश्चित करुन त्यापैकी रक्कम रु. ३,००,०००/- अदा केले. सदर प्लॉटची विक्री दिनांक ०२.०८.२०१३ पर्यंत करुन द्यावयाची होती. परंतु सामनेवाले यांनी विहित मुदतीत पूर्तता न केल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिनांक १६.०४.२०१५ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून पूर्तता करण्याबाबत कळविले. तरीदेखील सामनेवाले यांनी पूर्तता न केल्याने सदर रक्कम व्याजासह परत करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे.
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले हजर राहून पुढील कार्यवाही करण्यांस मंचासमोर हजर न राहिल्याने सामनेवाले यांच्याविरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्यांत यावी असा विनंतीअर्ज तक्रारदाराने दिला. न्यायाच्या दृष्टीने अर्ज मंजूर करण्यांत आला. सदर आदेश आज रोजी अबाधीत आहेत.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाबाबतची पुरसीस व तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र मंचास आहे काय? नाही
(2) आदेश? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १
५. सामनेवाले विकसित करीत असलेल्या मौजा देलनवाडी येथील सर्वे नं. २३ मधील प्रस्तावित LAY OUT मधील प्लॉट नं. ६६, ७१ व ७२ च्या खरेदीपोटी एकत्रित रक्कम रु.१४,१७,५००/- निश्चित करुन त्यापैकी रक्कम रु. ३,००,०००/- तक्रारदारांनी अदा केले आहेत. सदर प्लॉटची विक्री दिनांक ०२.०८.२०१३ पर्यंत करुन द्यावयाची होती. तक्रारदारांनी एकूण तीन प्लॉटची खरेदीबाबतचा व्यवहार, माहितीपुस्तिकेतील अटी व शर्तींचे अवलोकन केले असता नफा व मिळकत प्राप्त करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केल्याची बाब सिध्द होते. तक्रारदारांना सदर माहिती पुस्तिकेतील अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाले यांच्याकडे जमा केलेली रक्कम गुंतवणूकीसाठी असून नफा कमविण्याच्या उद्देशाने केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ड) अन्वये “ग्राहक” या संज्ञेची व्याप्ती पाहता नफ्यासाठी केलेल्या गुंतवणूकीबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येणार नाही, असे न्यायतत्व आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून तक्रारदारांनी सदर खरेदी व्यवहार गुंतवणूक व नफा कमविण्याच्या उद्देशाने केल्याची बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, प्रस्तुत तक्रारीतील वादकथनाविषयी न्यायनिर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २
६. मुद्दा क्रं. १ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र.१०७/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)