निकाल (घोषित दि. 15.10.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून दिनांक 30.06.2009 रोजी मल्लिका बीजी या वाणाच्या दोन कापूस बियाण्याच्या बॅग खरेदी केल्या होत्या. परंतू सदर बियाणे भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. म्हणून त्याने जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद, जालना यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर दिनांक 05.12.2009 रोजी पंचनामा झाला पंचनाम्यामध्ये भेसळ असल्याचे आढळून आले. म्हणून त्याने गैरअर्जदाराकडून रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांना मंचातर्फे नोटीस पाठवूनही ते गैरहजर राहिले. म्हणून त्यांचे विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांनी हे नाकबूल केले आहे की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 30.06.2009 रोजी मल्लीका बीजी या वाणाच्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार त्यांचा ग्राहक नाही. तक्रारदाराने दाखल केलेला पंचनामा शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेला नाही. पंचनाम्यामधे बियाण्यातील दोषाबाबत कोणताही उल्लेख नाही. तक्रार ज्या लॉटमधील बियाण्याबाबत आहे त्या लॉटमधील बियाणे भेसळयुक्त नव्हते. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 2 ने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.तक्रारदार हे सिध्द् करु शकतो का की, मल्लिका बीजी या वाणाचे बियाणे भेसळयुक्त आहे ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदारातर्फे अड.बी.डी.कावळे आणि गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वतीने अड.नरेंद्र धुत यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने मल्लिका बीजी या वाणाचे कापुस बियाणे भेसळयुक्त आहे हे सिध्द् करण्यासाठी दिनांक 05.12.2009 रोजीचा पंचनामा नि. 4/4 दाखल केला आहे. सदर पंचनामा जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांनी केलेला नाही. तसेच पंचनामा करणा-या अधिका-यांनी भेसळीबाबतचे निरीक्षण नोंदविताना योग्य पध्द्तीने स्पष्टीकरण केलेले नाही. तक्रारदाराच्या शेतातील मल्लिका बीजी या वाणाच्या कापसाच्या पानाचा आकार भेसळयुक्त झाडांच्या पानापेक्षा वेगळा कसा आहे याबाबतचा काहीही खुलासा पंचनामा करणा-या अधिका-याने केलेला नाही. मल्लिका बीजी या वाणाच्या कापूस बियाणाचे गुणधर्म कोणते आहेत आणि भेसळयुक्त कापूस झाडे मल्लिका बीजी या वाणाच्या कापसाच्या झाडापेक्षा वेगळे कसे आहेत या बाबतचा तपशील पंचनामा करणा-या अधिका-याने दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सादर केलेला पंचनामा पूर्णत: विश्वासपात्र ठरत नाही आणि पंचनामा करणा-या अधिका-यांनी भेसळीबाबत केलेले निरीक्षण अर्धवट आणि अस्पष्ट असल्यामुळे मल्लिका बीजी या वाणाच्या कापूस बियाणामधे भेसळ असल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा.
- दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |