::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 24/08/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ते हे शेतीचा व्यवसाय करीत असून त्यांच्या मालकीची विझोरा येथे शेट गट क्र. 172 ही शेती आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कंपनीचे सोयाबीन जे.एस. 335, लॉट नं. 2017, 2015, 1771, 1856 व 1876, एकूण 20 नग, दि. 20/6/2014 रोजी रु. 47,500/- ला खरेदी केले. ज्याचा बिल नं. 2222 आहे. तक्रारकर्त्याने पेरणीपुर्व शेतीची चांगली मशागत केली व त्यानंतर दि. 25/7/2014 रोजी लॉट नं. 1771 च्या 5 बँग्ज सोयाबिन बियाण्याची 2 हेक्टर शेतीमध्ये पेरणी केली. बियाण्याची पेरणी योग्य वातावरणात व पाऊस पुरेश्या प्रमाणात असतांना केली होती, परंतु सदर बियाणे पुर्णपणे उगवले नाही व ते सदोष निघाले. तक्रारकर्त्याने दि. 2/8/2014 रोजी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, बार्शिटाकळी, यांच्याकडे बिज न उगवल्याबाबत तक्रार अर्ज सादर केला, त्यानुसार तालुका स्तरीय तक्रार निवारणसमिती, कृषी अधिकारी यांनी दि. 8/8/2014 रोजी प्रत्यक्ष पिकाची पाहणी करुन त्या आधारे अहवाल दिला. सदर अहवालामध्ये सोयाबिनचे बिज सदोष असल्याबाबत व तक्रारकर्त्याचे दोन हेक्टर क्षेत्राचे 100 टक्के नुकसान झाले असल्याबद्दल समितीने स्पष्ट केले. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला लॉट नं. 1771 ची मुळ विक्री किंमत रु. 2220/- प्रमाणे पाच बँग्ज चे रु. 11,100/- परत दिलले आहेत. परंतु तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुन सुध्दा, तक्रारकर्त्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई दिलेली नाही. विरुध्दपक्षाने सदोष बियाण्याचे उत्पादन करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारकर्त्याने दि. 27/11/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली, सदर नोटीस विरुध्दपक्षाला मिळून सुध्दा विरुध्दपक्षाने नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्याला बिज न उगविल्यामुळे झालेले 75 क्विंटल सोयाबिनचे नुकसान, बाजार भावानुसार रु. 2,62,500/- व शेतीच्या मशागती करिता व पेरणीकरिता लागलेला खर्च रु. 50,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्यावे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे प्रत्येकी रु. 1,50,000/- व सदरहू तक्रारीचा खर्च रु. 20,000/- द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेले बियाणे विरुध्दपक्ष 1 च्या दुकानातून खरेदी केले होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर माल शहा एजंसीज, अकोला येथून दि. 20/6/2014 रोजी खरेदी केलेला आहे व त्याच दिवशी तक्रारकर्त्यास विकलेले आहे, त्यामुळे बियाणे सदोष असल्याबाबतची कोणतीही जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 वर येत नाही. सदर प्रकरणात शहा एजंसी यांना पार्टी बनविणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष क्र. 1 हे किरकोळ विक्रेते असून सदरहू मालाचे उत्पादक नाहीत, त्यामुळे वादग्रस्त बियाण्यासंबंधीची नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सदर प्रकरणातून वगळण्यात यावे.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, सदर बियाणे काहीच उगवले नाही, परंतु ज्या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी केली, त्यांनी 25 टक्के उगवण झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. सदरहु प्रकरणात तालुका समितीने पाहणी केलेली आहे व त्यांनी दिलेला पंचनामा किंवा अहवाल हा फक्त शेतकरी यांच्या सांगण्यानुसार बनविण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने या लॉट नंबर शिवाय अजुन बियाणे खरेदी केले होते, तसेच दुसऱ्या कंपनीचे सुध्दा बियाणे खरेदी केले होते. फक्त लॉट क्र. 1771 बद्दल काही तक्रार प्राप्त झाली असल्यामुळे तक्रारकर्त्याचे सुध्दा बियाणे सदोष असल्याचे समितीने निष्कर्ष काढला आहे. सदोष निघालेले बियाणे हे दुसऱ्या कंपनीचे सुध्दा असु शकते. बियाण्याची उगवण ही अनेक बाबींवर अवलंबुन असते, जसे की, पेरणीची पध्दत, मातीतील आद्रता, पाऊस, पाणी इत्यादी, अशा परिस्थितीत 25 टक्के उगवण हे फक्त बियाण्याच्या सदोष असल्यामुळे झाली असा निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारकर्त्याने आपली तक्रार साबित करण्यासाठी अधिकृत प्रयोगशाळेत बियाण्याची तपासणी करुन घ्यावयाला पाहीजे होती, तसे करण्यात आलेले नाही. वरील कारणांमुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला, तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 ने लेखी युक्तीवाद दाखल केला. उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणात तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत, ही बाब वादात नाही. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क. 1 कडून, विरुध्दपक्ष क्र. 2 या कंपनीचे सोयाबीन बियाणे स्वत:च्या शेतात पेरणी करण्याकरिता, लॉट नं. 2017,2015, 1771, 1856, व 1876 नुसार खरेदी केले होते व त्यापैकी फक्त लॉट नं. 1771 या लॉटचे बियाणे कमी प्रकरणात उगवले होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती बार्शिटाकळी यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला होता, ही बाब सुध्दा उभय पक्षाला कबुल आहे. उभय पक्षाला हे देखील मान्य आहे की, तालुका तक्रार निवारण समितीने दि. 8/8/2014 रोजी तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेताची पाहणी केली होती. सदर तालुका स्तरीय निवारण समितीच्या पाहणी अहवालात असा निष्कर्ष आहे की, तक्रारकर्त्याच्या गट क्र. 172 मधील 2 हेक्टर मधील सोयाबीन महाबीज कंपनीचे लॉट नं. 1771 च्या बियाण्याची उगवण फक्त 25 टक्के झाल्यामुळे बियाणे सदोष आहे.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 ने सोयाबिन बियाण्याचे फक्त रु. 11,100/- इतकी रक्कम परत केली. परंतु नुकसान हे एकरी 15 क्विंटल सोयाबीन उत्पादनाचे झाले, हिशोबाप्रमाणे रक्कम रु. 2,62,500/- विरुध्दपक्षाकडून मिळायला पाहीजे, तसेच पेरणीचा खर्च व शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई, तसेच प्रकरणाचा खर्च विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून देण्यात यावा.
विरुध्दपक्ष्ा क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे कथन नाकारुन, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी रेकॉर्डवर तक्रारकर्त्याला सदर सोयाबीन बियाण्याच्या तक्रारीबद्दल मोबदला म्हणून रु. 11,100/- इतकी रक्कम दिली होती, त्या बद्दलची पावती दाखल केली आहे. त्यातील कथन असे दर्शविते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून ही तक्रार दाखल करण्यापुर्वीच, वादातील बियाण्याच्या तक्रारीचा मोबदला म्हणून रु. 11,100/- इतकी रक्कम स्विकारुन, या प्रकरणी त्यांची कोणतीच तक्रार राहीलेली नसून, या पुढे या बियाणे संदर्भात ते कोणत्याही न्यायालयात / ग्राहक मंचात विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द तक्रार / केस दाखल करणार नाही, असे विरुध्दपक्ष क्र. 2 ला या पावतीत लिहून दिले होते, तक्रारकर्त्याने सदर पावती रेकॉर्डवर दाखल केली नाही व हे प्रकरण त्यानंतर मंचात दाखल केले. शिवाय ही तक्रार मंचासमोर प्रलंबीत असतांना विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याला दि. 26/10/2015 रोजी असे पत्र पाठविले की, तक्रारकर्त्याने वादातील बियाणे बाबत तक्रार अर्ज, बिल व जिल्हा तक्रार निवारण समितीने दिलेला अहवाल त्यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 2 तक्रारकर्त्याला पुन्हा रु. 28,860/- ईतकी रक्कम वादातील तक्रारीबाबत देतील, त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रारकर्ते यांची प्रार्थनेतील नुकसान भरपाई मंचाला मान्य करता येणार नाही, कारण तक्रारकर्ते यांनी हे प्रकरण मंचात दाखल करण्यापुर्वीच काही रक्कम विरुध्दपक्ष क्र. 2 कडून स्विकारुन, आता तक्रार राहीली नाही, असे स्वखुशीने लिहून दिले होते. त्यामुळे पुन: जास्त मागणी करणे, कायद्याला धरुन नाही. म्हणून तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 2 च्या दि. 26/10/2015 च्या पत्रानुसार नुकसान भरपाईपोटी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून फक्त रु. 28,860/- घेण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच एकमताने आले आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला, तो खालील प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 2 / व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला, यांनी तक्रारकर्त्यास वादातील बियाणे बाबत नुकसान भरपाईपोटी रु.28,860/- ( रुपये अठ्ठाविस हजार आठशे साठ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
- विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.