Exh.No.36
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 01/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 01/03/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 31/01/2014
श्री प्रकाश रामचंद्र जांभेकर
उ. व. सु.47, धंदा- शेती,
रा.पोंभूर्ले, ता.देवगड,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) जागृत मोटर्स,
व्यवसाय- वाहन विक्री
बी.के.जी. रोड, उद्यमनगर,
कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
2) मारुती सुझुकी इंडीया लि.
व्यवसाय- वाहन विक्री व उत्पादन
क्षेत्रीय कार्यालय, सातवा मजला,
नॉर्थ ब्लॉक, स्केअर्ड वर्ल्ड,
वाणूवारे, पुणे 411 040 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारतर्फे विधिज्ञ - श्री दत्तात्रय सातवळेकर
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्रीमती रुची महाजनी
निकालपत्र
(दि.31/01/2014)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून गाडीच्या किंमतीपेक्षा जादा रक्कम घेऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून सदर रक्कम व भरपाई मिळणेसाठी सदर तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांना विरुध्द पक्ष क्र.2 मारुती सुझूकी इंडिया लि. (यापूढे संक्षिप्ततेसाठी ‘कंपनी’ असे संबोधण्यात येईल) यांनी उत्पादित केलेली 8 आसनी ओमनी गाडी खरेदी करावयाची होती. त्यासाठी त्यांनी कंपनीचे सिंधुदुर्गचे विक्रेते विरुध्द पक्ष क्र.2 जागृत मोटर्स यांचेशी संपर्क साधला व दि.26/07/2012 रोजी सिल्व्हर रंगाची गाडी खरेदी करण्याकरीता नोंदणी केली. त्यावेळी जागृत मोटर्स यांनी नोंदणी पुस्तकात गाडीची किंमत रु.2,58,574/-, नोंदणी शुल्क करासहीत रु.25,304/-, एक्सटेंडेड वॉरंटी रु.2183/-, टेंपररी रजिस्ट्रेशन फी रु.300/- इंश्युरंस पॉलिसी रु.8828/- एकूण रुपये 2,95,189/- असा तपशील दिला.
3) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, जागृत मोटर्स यांनी विमा पॉलिसीची रक्कम रु.8828/- ची सूट देण्यात येईल असे त्यात नमूद केले. तसेच प्रत्यक्ष गाडी खरेदीचे दर लागू राहतील असेही त्यात नमूद केले. तक्रारदार यांनी नोंदणीकरीता रु.5,000/- जमा केले.
4) तक्रारदार यांनी दि.30/07/2012 रोजी गाडी खरेदी केली. त्यावेळी खालीलप्रमाणे किंमती दर्शवण्यात आल्या. गाडीची किंमत रु.2,48,904/-, नोंदणी शुल्क करासहीत रु.22,513/-, विमा हप्ता रु.8428/-, अॅक्सेसरीज व इतर चार्जेस रु.2,483/-, प्रशासनीक खर्च रु.1091/-, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन चार्जेस रु.950/-, आर.टी.ओ. पासिंग चार्जेस रु.750/- असे एकूण रु.2,85,119/- परंतु प्रत्यक्षात एकूण रु.286,361/- जागृत मोटर्सकडे जमा केले व गाडी ताब्यात घेतली.
5) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, जागृत मोटर्स यांनी नोंदणीचे वेळी गाडीची किंमत रु.2,58,574/- दर्शवली, परंतू प्रत्यक्ष गाडीची नोंदणीचेवेळी किंमत रु.2,48,904/- होती. मात्र जागृत मोटर्स यांनी रु.9670/- जादा घेतलेले स्पष्ट झाले. तसेच रजिस्ट्रेशन खर्च रु.25,304/- दाखवण्यात आला; परंतु प्रत्यक्षात रु.23,002/- झाल्याचे दिसते. त्यातही रु.2302/- जादा घेतलेचे दिसले. तसेच विमा मोफत असतांना रु.8428/- घेण्यात आले. तसेच प्रशासनिक खर्च रु.1091/- व अॅक्सेसरीज घेतली नसतांना त्याची रक्कम रु.2483/- घेण्यात आली असे एकूण रु.23,974/- जागृत मोटर्स यांनी जादा घेतले आहेत.
6) तक्रारदार यांनी जागृत मोटर्स यांना सदर माहिती दिली व जादा घेतलेली रक्कम परत करणेची मागणी केली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. जागृत मोटर्स यांनी तक्रारदार यांची फसवणूक केलेली आहे व मागणी करुनही रक्कम परत केली नाही त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले.
7) तक्रारदार यांनी शेवटी विरुध्द पक्ष यांचेकडून जादा घेतलेली रक्कम रु.23,974/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व त्यावर 18% दराने व्याज तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
8) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.4 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.4/1 वर डॉकेट, नि.4/2 वर विमा प्रमाणपत्र, नि.4/3 वर नोंदणी प्रमाणपत्र, नि.4/4 वर पावती, नि.4/5 वर टॅक्स भरल्याची पावती, नि.4/6 वर इन्व्हॉईस नं.व्ही.एस.एल.12030 व रक्कमा दिलेल्या पावत्या तसेच नि.20 सोबत अॅक्सेसरीज खरेदीच्या पावत्या दाखल केल्या आहेत.
9) जागृत मोटर्स यांनी आपला खुलासा नि.10 वर दाखल करुन तक्रारदार यांचे आक्षेप नाकारले आहेत व तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.
10) जागृत मोटर्स यांनी आपल्या म्हणण्यात असेही म्हटले आहे की, तक्रारदार यांनी गाडीची नोंदणी केली होती त्यावेळी त्यांना त्या दिवशीच्या प्रचलित दराप्रमाणे़ गाडीची अंदाजे किंमत सांगितली जाते. त्यानंतर मारुती कंपनीकडून ग्राहकाला ज्या ऑफर्स वा सवलती घोषित केलेल्या असतात, त्याची तपशीलवार माहिती दिली जाते. तसेच गाडीचे रजिस्ट्रेशन, इन्शुरंस, अॅक्सेसरीज, स्मार्टकार्ड, पासींग या सर्व मुद्दयांबाबत ग्राहकाला माहिती दिली जाते. अशा प्रकारे प्रस्तुतच्या तक्रारदाराला देखील दि.26/07/2012 रोजी गाडीच्या किंमतीबाबत व वर नमूद मुद्दयांबाबत माहिती विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे देण्यात आली होती.
11) जागृत मोटर्स यांनी पूढे असे म्हटले आहे की, विरुध्द पक्ष क्रमांक 2 तर्फे ग्राहकांना विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत इंश्युरंस फ्री ही ऑफर दिली जाते. त्या तरतूदीचा लाभ प्रस्तुत ग्राहकाला देण्यात आला आहे. मात्र ग्राहकाकडून जरी इंश्युरंसची रक्कम घेतली नाही, तरी विरुध्द पक्ष क्रमांक 1 ला इंश्युरंस कंपनीकडे ती रक्कम भरावीच लागते. त्याच कारणाने ज्यावेळी ग्राहकाला गाडीचा इन्व्हॉईस दिला जातो, त्यावेळी गाडीच्या किंमतीमधून इंश्युरंस कंपनीला भरणा केलेली किंमत वजा करुन उरणारी किंमत ही गाडीची किंमत म्हणून दर्शवली जाते.
12) तक्रारदाराने तक्रारीच्या परिच्छेद क्रमांक 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे गाडीची किंमत दि.26/07/2012 रोजी रु.2,58,574/- ही होती. दि.30/07/2012 रोजी तक्रारदाराला दिलेल्या Invoice मध्ये ती रु.2,50,146/- दर्शवणेत आली होती व इंश्युरंस किंमत रु.8428/- दर्शवणेत आली होती.
13) इंशुरंस जरी ग्राहकाकरीता विरुध्द पक्ष क्र.1 कडून मोफत असला तरी विरुध्द पक्ष क्र.1 ला तो प्रत्यक्षात इंश्युरंस कंपनीकडे भरावा लागत असतो. त्याच कारणाने इन्व्हॉईसमध्ये इंश्युरंसची विरुध्द पक्ष क्र.1 ने भरलेली रक्कम गाडीच्या प्रत्यक्ष खरेदी किंमतीमधून वजा करुन उर्वरित रक्कम गाडीची किंमत म्हणून दर्शविली जाते.
14) प्रस्तुत प्रकरणी देखील गाडीची किंमत रु.2,58,574/- मधून इंश्युरंस रु.8,428/- ही रक्कम वजा करुन Invoice मध्ये ती 2,50,146/- ही किंमत दर्शवणेत आली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने कोणतीही जादाची रक्कम तक्रारदाराकडून घेतली नाही. तसेच इंश्युरंसची रक्कमही घेतली नाही. इंश्युरंसची रक्कम स्वतः विरुध्द पक्ष क्र.1 ने भरली असून केवळ अकाऊंटच्या सोयीसाठी Invoice मध्ये ती इंश्युरंस रक्कमेच्या समोर दर्शवली आहे व गाडीची किंमत त्या दिवशीच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा रु.8,428/- ने कमी करुन दर्शवली आहे.
15) याबाबत विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडील दि.30/07/2012 रोजीची price list या कामी विरुध्द पक्ष हजर केली आहे.
16) जागृत मोटर्स यांनी पूढे असे म्हटले आहे की, तक्रारदार याला गाडी खरेदीवेळी जे व्हॉउचर्स नं.065 देणेत आले त्यामध्ये देखील गाडीची invoice amount रु.2,50,146/-, RTO Tax रु.22513/-, RTO Registration Charges रु.950, RTO passing charges रु.750/-, इंश्युरंस रु.8428/-, Accessories & Other Charges रु.2483/-, Admin. & Department Charges रु.1091/- असे एकूण रु.2,86,361/- मूल्य दर्शवण्यात आले आहे. सदर invoice वरील RTO Tax + RTO Registration charges + RTO Passing Charge + Admin. And Department charges याचे एकत्रित मूल्य हे रु.25,304/- होत असून हे मूल्य दि.26/07/2012 रोजी तक्रारदाराला दिलेल्या Order Booking Commitment मध्ये दर्शविण्यात आले आहे. तक्रारदार यांनी त्याचे तक्रारीमध्ये देखील विरुध्द पक्ष क्र.1 यांना गाडीपोटी वाहनाची असलेली योग्य रक्कम रु.2,86,361/- दिल्याचे मान्य व कबूल केले आहे.
17) जागृत मोटर्स यांनी पूढे असे म्हटले आहे की, त्यांनी एक्स शोरुम किंमत रु.2,58,574/- दर्शवली त्यापेक्षा एकही रुपयाही जास्त घेतलेला नाही. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन खर्च रु.25,304/- दर्शवला होता, त्यापेक्षा एकही रुपया जास्त घेतलेला नाही. केवळ इन्व्हॉईसमध्ये सदरची रक्कम रु.25,304/- ही रजिस्ट्रेशन खर्च म्हणून दर्शवलेली रक्कम विरुध्द पक्ष यांनी इन्व्हॉईसमध्ये RTO Tax रु.22513/-, RTO Registration Charges रु.950, RTO passing charges रु.750/-, Admin. & Department Charges रु.1091/- अशी फोड करुन नमूद केली आहे. या सर्व स्वतंत्र घटकांची बेरीज करण्याची तसदी तक्रारदार याने घेतली असती तर तक्रारदाराला रु.25304/- या रक्कमेपेक्षा एकही रुपया जास्त घेतला नाही हे कळू शकले असते. मात्र तशी कोणतीही तसदी न घेता तक्रारदार याने पुर्णतः खोटी व खोडसाळ तक्रार दाखल केली आहे.
18) गाडी नोंदणीचे वेळी जागृत मोटर्सने इंश्युरंस रक्कम रु.8828/- एवढी दर्शवली होती. मात्र प्रत्यक्षात इंश्युरंससाठी रु.8828/- ची रक्कम जागृत मोटर्सने भरली असून त्याचीच माहिती तक्रारदार यांस दिली आहे. तसेच सदरची रक्कम ही मी स्वतः भरली असून तेवढी रक्कम गाडीच्या एक्स शोरुम किंमतीमधून वजा करुन ती कमी केलेली किंमत ही गाडीची किंमत म्हणून दर्शवली आहे. प्रत्यक्षात सदर गाडीची दि.30/07/2012 रोजी एक्स शोरुम किंमत रु.2,58,574/- एवढीच होती व त्याबाबतचा माझेकडील पुरावा या कामी मी दाखल केला आहे.
19) तक्रारदार यांने तक्रारीसोबत इन्व्हॉईस रक्कम करांसह रु.2,48,904/- छापलेली एक इन्व्हॉईस प्रत हजर केली आहे. सदर इन्व्हॉईसमध्ये जागृत मोटर्सच्या संबंधीत कर्मचा-याने सिल्व्हर रंगाच्या मारुती कारच्या किंमतीच्या ऐवजी पांढ-या रंगाच्या मारुती कारची किंमत लिहिली होती. आमच्या कर्मचा-याची झालेली चूक लक्षात आल्यावर जागृत मोटर्स यांनी ताबडतोब तक्रारदार याला इनव्हॉईसमध्ये सिल्व्हर रंगाच्या गाडीच्या ऐवजी चुकून पांढ-या रंगाच्या गाडीची किंमत दिल्याचे कळविले होते. त्या किंमतीमधला फरक पटल्यानंतरच तक्रारदार याने सदर गाडीची खरेदी दि.30/07/2012 रोजी माझेकडून केली होती आणि सिल्व्हर रंगाच्या गाडीची किंमत रु.2,50,146/- ही पटल्यानेच गाडी खरेदी केली होती. गाडीची किंमत ही रंगानुरुप बदलते व त्याबाबतची pricelist विरुध्द पक्ष प्रस्तुत म्हणण्यासोबत दाखल करीत आहे.
20) तक्रारदार म्हणतो त्याप्रमाणे जागृत मोटर्स यांनी रु.20,400/- जादाचे तक्रारदार यांचेकडून घेतलेले नाहीत. तसेच प्रशासनीक खर्च म्हणून रु.1091/- जागृत मोटर्सने तक्रारदार यांचेकडून जास्तीचे घेतलेले नाहीत. सदर रु.1091/-चा अंतर्भाव जागृत मोटर्सने तक्रारदार यांस दिलेल्या कोटेशनमध्ये नोंदणी शुल्क करासहीत या मुद्दयांमध्ये समाविष्ट केलेला होता. सबब याबाबत तक्रारदार याने तक्रारीत नमूद केलेला सर्व मजकुर खोटा व खोडसाळ असून मे.कोर्टाची दिशाभूल करणारा आहे.
21) तक्रारदार याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अॅक्सेसरीजसाठी जागृत मोटर्सने रु.2483/- एवढी रक्कम जादा घेतलेली नाही. सदरची रक्कम ही मी एकदाच घेतलेली असून ती इन्व्हॉइर्समध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे.
22) जागृत मोटर्स यांनी शेवटी तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी व त्यांना रु.1,00,000/- तक्रारदार यांचेकडून वसूल करुन दयावेत अशी विनंती केली आहे.
23) जागृत मोटर्स यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र, नि.9 वर दरपत्रक व नि.28 वर प्रिमियम भरल्याची पावती दाखल केली आहे.
24) विरुध्द पक्ष क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोस्टाने खुलासा पाठवला आहे परंतु एकतर्फा आदेश रद्द करणेसाठी अर्ज दिला नाही. त्यामुळे तो वाचण्यात आलेला नाही.
25) तक्रारदार यांनी नि.15 वर शपथपत्र दाखल केले. विरुध्द पक्ष यांनी उलटतपासासाठी प्रश्नावली नि.18 वर दिली. त्याची उत्तरावली नि.19 वर आहे. जागृत मोटर्स यांनी पुराव्याचे शपथपत्र नि.23 वर दिले. तक्रारदार यांनी उलटतपासासाठी प्रश्नावली नि.26 वर दिली व जागृत मोटर्स यांनी नि.27 वर उत्तरावली दिली आहे.
26) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता तसेच संबंधीत वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून जादा रक्कम घेऊन तक्रारदार यांस दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार अनुतोष मिळणेस पात्र आहे व कोणता ? | होय.अंतीम आदेशाप्रमाणे |
27) मुद्दा क्रमांक 1 – तक्रादार यांनी जागृत मोटर्स यांच्याकडून सिल्व्हर रंगाची 8 आसनी ओमनी गाडी खरेदी केली व त्यासाठी रु.2,86,361/- अदा केले आहेत, याबाबत वाद नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी दि.26/07/2012 रोजी गाडीची नोंदणी केली त्यावेळी जागृत मोटर्स यांनी नोंदणी पुस्तकात गाडीची किंमत रु.2,58,574/-, नोंदणी शुल्क करासहीत रु.25,304/-, एक्सटेंडेड वॉरंटी रु.2183/-, टेंपररी रजिस्ट्रेशन फी रु.300/- इंश्युरंस पॉलिसी रु.8828/- एकूण रुपये 2,95,189/- असा तपशील दिला आहे.
28) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, जागृत मोटर्स यांनी विमा पॉलिसीची रक्कम रु.8828/- ची सूट देण्यात येईल असे त्यात नमूद केले. तसेच प्रत्यक्ष गाडी खरेदीचे दर लागू राहतील असेही त्यात नमूद केले. तसेच प्रत्यक्ष गाडी खरेदीचे दर लागू राहतील असेही यात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी नोंदणीकरीता रु.5,000/- जमा केले.
29) तक्रारदार यांनी दि.30/07/2012 रोजी गाडी खरेदी केली. त्यावेळी खालीलप्रमाणे किंमती दर्शवण्यात आल्या. गाडीची किंमत रु.2,48,904/-, नोंदणी शुल्क करासहीत रु.22,513/-, विमा हप्ता रु.8428/-, अॅक्सेसरीज व इतर चार्जेस रु.2,483/-, प्रशासनीक खर्च रु.1091, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन चार्जेस रु.950/-, आर.टी.ओ. पासिंग चार्जेस रु.750/- एकूण रु.2,85,119/- परंतु तक्रारदार यांनी रु.2,86,361/- जागृत मोटर्सकडे जमा केले व गाडी ताब्यात घेतली.
30) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, जागृत मोटर्स यांनी नोंदणीचे वेळी गाडीची किंमत रु.2,58,574/- दर्शवली, परंतू प्रत्यक्ष गाडीची नोंदणीचेवेळी किंमत रु.2,48,904/- होती. जागृत मोटर्स यांनी रु.9670/- जादा घेतलेले स्पष्ट झाले. तसेच रजिस्ट्रेशन खर्च रु.25,304/- दाखवण्यात आला; परंतु प्रत्यक्षात रु.23,002/- झाल्याचे दिसते. त्यातही रु.2302/- जादा घेतलेचे दिसले. तसेच विमा मोफत असतांना रु.8428/- घेण्यात आले. तसेच प्रशासनिक खर्च रु.1091/- व अॅक्सेसरीज घेतले नसतांना त्याची रक्कम रु.2483/- घेण्यात आली असे एकूण रु.23,974/- जागृत मोटर्स यांनी जादा घेतले आहेत.
31) विरुध्द पक्ष यांनी आपल्या खुलाशामध्ये तक्रारदार यांची तक्रार चुकीची व खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्यावेळी तक्रारदार यांनी गाडी बूक केली होती त्यावेळी त्यांना त्या दिवशीच्या प्रचलित दराप्रमाणे़ गाडीची अंदाजे किंमत सांगितली जाते. त्यानंतर मारुती कंपनीकडून ग्राहकाला ज्या ऑफर्स वा सवलती घोषित केलेल्या असतात, त्याची तपशीलवार माहिती दिली जाते. तसेच गाडीचे रजिस्ट्रेशन, इन्शुरंस, अॅक्सेसरीज, स्मार्टकार्ड, पासींग या सर्व मुद्दयांबाबत ग्राहकाला माहिती दिली जाते. अशा प्रकारे प्रस्तुतच्या तक्रारदाराला देखील दि.26/07/2012 रोजी गाडीच्या किंमतीबाबत व वर नमूद मुद्दयांबाबत माहिती देण्यात आली होती.
32) तसेच जागृत मोटर्स यांनी तक्रारदार यांना फ्री इंश्युरंस ही ऑफर दिली होती व त्या तरतूदीचा लाभ प्रस्तुत ग्राहकाला देण्यात आला आहे. मात्र ग्राहकाकडून जरी इंश्युरंसची रक्कम घेतली नाही, तरी विरुध्द पक्ष क्रमांक 1 ला इंश्युरंस कंपनीकडे ती रक्कम भरावीच लागते. त्याच कारणाने ज्यावेळी ग्राहकाला गाडीचा इन्व्हॉईस दिला जातो, त्यावेळी गाडीच्या किंमतीमधून इंश्युरंस कंपनीला भरणा केलेली किंमत वजा करुन उरणारी किंमत ही गाडीची किंमत म्हणून दर्शवली जाते, असे म्हटले आहे. त्यानुसार तक्रारदार यांच्या गाडीची किंमत रु.2,58,574/- मधून इंश्युरंस रु.8,428/- ही रक्कम वजा करुन Invoice मध्ये ती 2,50,146/- ही किंमत दर्शवणेत आली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने कोणतीही जादाची रक्कम तक्रारदाराकडून घेतली नाही. तसेच इंश्युरंसची रक्कमही घेतली नाही. इंश्युरंसची रक्कम स्वतः विरुध्द पक्ष क्र.1 ने भरली असून केवळ अकाऊंटच्या सोयीसाठी Invoice मध्ये ती इंश्युरंस रक्कमेच्या समोर दर्शवली आहे व गाडीची किंमत त्या दिवशीच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा रु.8,428/- ने कमी करुन दर्शवली आहे असे म्हटलेले आहे.
33) जागृत मोटर्स यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदार याला गाडी खरेदीवेळी जे व्हाउचर्स नं.065 देणेत आले त्यामध्ये देखील गाडीची invoice amount रु.2,50,146/-, RTO Tax रु.22513/-, RTO Registration Charges रु.950, RTO passing charges रु.750/-, इंश्युरंस रु.8428/-, Accessories & Other Charges रु.2483/-, Admin. & Department Charges रु.1091/- असे एकूण रु.2,86,361/- मूल्य दर्शवण्यात आले आहे. सदर invoice वरील RTO Tax + RTO Registration charges + RTO Passing Charge + Admin. And Department charges याचे एकत्रित मूल्य हे रु.25,304/- होत असून हे मूल्य दि.26/07/2012 रोजी तक्रारदाराला दिलेल्या Order Booking Commitment मध्ये दर्शविण्यात आले आहे व तक्रारदार यांनी ते तक्रार अर्जात मान्य केले आहे. विरुध्द पक्ष यांनी प्रिमियमपोटी भरलेली रक्कम तसेच ओम्नी व्हाईट कलरच्या गाडीची डिस्काऊंट वजा जाता दि.04/01/2013 पर्यंत किंमत रु.2,48,904/- होती हे दर्शवणारे मारुती सुझूकीच्या मुंबई कार्यालयाचे पत्र नि.34 सोबत दाखल केले आहे.
34) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून दि.26/07/2012 रोजी जी सिल्व्हर रंगाची 8 आसनी मारुती सुझूकी गाडीची नोंदणी केली त्याची एक्स शोरुम किंमत रु.2,58,574/- आहे यासंबंधाने विरुध्द पक्ष यांनी नि.9/1 वर किंमतीची यादी दाखल केली आहे. विरुध्द पक्ष यांचे म्हणण्यानुसार त्यांचेकडून गाडी खरेदीवर व्यावसायीक योजनेनुसार विमा हप्त्याची सूट देण्यात आलेली होती. विरुध्द पक्ष यांनी दाखल नि.क्र.28/1 वर दाखल केलेल्या पावतीप्रमाणे विमा हप्ता रु.8428/- वजा झाल्याची नोंद आहे. म्हणजेच रु.2,58,574/- मधून रु.8428/- वजा जाता शिल्लक रक्कम रु.2,50,146/- राहते. तक्रारदार यांनी अॅक्सेसरीज त्याच दिवशी विरुध्द पक्षाकडून खरेदी केल्या आहेत. त्याची स्वतंत्र रोखीची पावती (कॅश मेमो) दि.28/07/2012 रक्कम रु.18055/- ची तक्रारदार यांनी नि.21/1 वर दाखल केली आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी जी रक्कम रु.2,86,361/- चे बील दिले आहे त्यामध्ये अॅक्सेसरीज व इतर मध्ये रु.2483/- चा उल्लेख केला आहे. विरुध्द पक्ष यांचे वकीलांनी तोंडी युक्तीवादामध्ये त्यासंबंधाने स्पष्टीकरण दिले असून ती रक्कम जरी त्या कॉलममध्ये नोंदली असली तरी त्यामध्ये एक्सटेंडेड वॉरंटीची रक्कम रु.2183/- चा समावेश आहे व त्यामध्ये इतर खर्चासाठी ती रक्कम नोंदलेली आहे; त्यांच्या स्पष्टीकरणाने मंचाचे समाधान झाले आहे. तक्रारदाराने फ्लोअर पेंट बील रककम रु.2359.56 दि.28/07/2012 रोजी भरल्याची रोखीची पावती नि.21/2 वर दाखल केली आहे.
35) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस गाडीच्या आर.टी.ओ.कडील नोंदणीसंबंधाने ज्या पावत्या दिल्या आहेत त्या नि.क्र.4/4, 4/5 व 4/7 वर आहेत. त्याप्रमाणे एकूण रक्कम रु.23,002/- (रु.250 + रु.22402 + रु.350) येते. परंतु विरुध्द पक्ष यांनी ती रक्कम वेगवेगळी दर्शवून रक्कम रु.24213/- तक्रारदाराकडून स्वीकारली आहे. म्हणजे येथे देखील रक्कम रु. 1211/- विरुध्द पक्षाने जादा स्वीकारल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन वर विवेचन केल्याप्रमाणे सदर वादातीत गाडीच्या किंमतीपोटी विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.2,50,146/- + नोंदणी फी एकत्रात रु.23002/- + एक्स्टटेंडेड वॉरंटी व इतर खर्च मिळून रु.2483/- + अॅडमिनिस्टेशन व डेपोट चार्जेस रु.1091/- मिळून एकूण रु.2,76,722/- (रुपये दोन लाख शहात्तर हजार सातशे बाबीस मात्र) स्वीकारणे आवश्यक होते. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून एकूण रक्कम रु.2,86,361/- स्वीकारल्याचे तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.क्र.4/8 व 4/9 वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी एकूण स्वीकारलेली रक्कम रु.2,86,361/- मधून रक्कम रु.2,76,722/- वजा जाता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु. 9639/- (रुपये नऊ हजार सहाशे एकोणचाळीस मात्र) जादा स्वीकारलेली असल्याने तक्रारदाराला दयावयाच्या सेवेत विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली असल्याचे सिध्द झाले आहे असे मंचाचे मत आहे.
36) मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून जादा घेतलेली रक्कम रु.23,974/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व त्यावर 18% दराने व्याज तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. परंतू जागृत मोटर्स यांनी जादा रक्कम रु.9639/- घेतल्याचे सिध्द झालेले आहे, त्यामुळे तक्रारदार तक्रार अर्जाचा खर्च मिळणेस पात्र आहे. या संपूर्ण तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांचेविरुध्द कोणताही आरोप सिध्द झालेला नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द कोणताही आदेश करणे उचित होणार नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 जागृत मोटर्स यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्ज खर्च रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे आम्हास योग्य व न्यायाचे वाटते. त्या दृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून कारच्या किंमतीपोटी जादा स्वीकारलेली रक्कम रु.9,639/- (रुपये नऊ हजार सहाशे एकोणचाळीस मात्र) दि.27/07/2012 पासून पूर्ण फेड होईपर्यंत 12% व्याजदराने अदा करावी.
3) विरुध्द पक्ष क्र.1 जागृत मोटर्स यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- असे एकूण रु.7,000/- (रुपये सात हजार मात्र) तक्रारदारास अदा करावेत.
4) उपरोक्त आदेश क्र.2 व 3 ची पूर्तता विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत करावयाची आहे.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 31/01/2014
Sd/- sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.