निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. वरील सर्व प्रकरणात गैरअर्जदार हे एकच असून अर्जदाराने गैरअर्जदार यांचेविरुध्द केलेली मागणी ही एकाच प्रकारची असल्याने वरील सर्व प्रकरणात मंच एकत्रितरीत्या निकाल देत आहे. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदारने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठी व प्लॉटचा ताबा मिळणेबाबतची आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हे नांदेड येथील रहिवासी आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सर्व्हे नं.43,गट नं.37 मौजे गोपाळ चावडी तालुका व जिल्हा नांदेड स्थित जमीनीत प्लॉट पाडून विक्री करण्याचे ठरविले, त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेशी विचार विनिमय करुन व व्यवहार ठरवून सन 1983 साली वरील मिळकतीमधून 40 X60 फुट क्षेत्रफळ असलेला एक प्लॉट खरेदी केला,त्याचा क्रमांक,चतुःसिमा, इत्यादीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहेः-
तक्रार क्रमांक | अर्जदाराचे नांव | प्लॉट क्र. | चतुःसिमा |
पुर्वेस | पश्चिमेस | उत्तरेस | दक्षिणेस |
169 | दिलीप शंकरराव देशमुख | 5 | रोड | प्लॉट नं.8 कानगुडवार | प्लॉट नं.1 आणि 2 हजारी | प्लॉट नं.6 राहेगांवकर |
170 | वसंत सिताराम गोळेगांवकर | 9 | रोड | प्लॉट नं.8 | प्लॉट नं.6 | प्लॉट नं.10 |
171 | किशन रंगनाथ राहेगांवकर | 6 | रोड | प्लॉट नं.7 कानगुडवार | प्लॉट नं.5 दिलीप शंकर | प्लॉट नं.6 वसंत सिताराम |
अर्जदार यांनी सदर प्लॉट घेणेकामी आवश्यक असलेली रक्कम दिनांक 03.07.1983 व दिनांक 04.07.1983 रोजी संस्थेकडे रोखीने जमा केली,त्याप्रमाणे गैरअर्जदार संस्थेने अर्जदारास पावती दिलेली आहे. सदर पावतीच्या आधारे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक व सभासद झालेले आहेत. गैरअर्जदार यांना रक्कम प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराचे हक्कात मालकी व हक्काचे प्रमाणेपत्र दिलेले आहे. सदर प्लॉटचा खरेदी-विक्री व्यवहार होत असतांना संस्थेच्या अधिका-याने अर्जदाराचा प्लॉट हा सदर ठिकाणी आहे असे केवळ कागदोपत्री दर्शविले होते. प्रत्यक्षात मात्र प्लॉट दाखविलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे प्लॉटचा ताबा मोजणी करुन देणेबाबत तसेच बेबाकी प्रमाणपत्र देणेबाबत तसेच सदर जागेवर बांधकाम करावयाचे असल्यामुळे त्याविषयीचे प्रमाणपत्र देणेबाबत विनंती वेळोवेळी केली. त्यामुळे 1988 साली गैरअर्जदार संस्थेच्या अधिका-यांनी केवळ बेबाकी प्रमाणपत्र दिनांक 27.12.1988 रोजी दिले. परंतु प्लॉटची मोजणी करुन ताबा दिलेला नाही. अर्जदाराने प्लॉटची मोजणी करुन ताबा देणेविषयी विनंती केली असता गैरअर्जदार यांनी गैरअर्जदार संस्थेच्या मालकी व ताब्यातील जागा मोठया प्रमाणावर असल्याने व सदर जागेवर मोठया प्रमाणावर प्लॉट पाडले असल्याने प्रत्येक प्लॉटचे वैयक्तीकरीत्या मोजणी करणे अशक्य आहे. इतर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गैरअर्जदार व्यस्त असल्याने एकत्रित मोजणी करतेवेळी अर्जदाराच्या प्लॉटची मोजणी करण्यात येईल असे सांगितले. त्यावेळी अर्जदाराने हजर राहावे अशी सुचनाही दिली. गैरअर्जदार यांचे म्हणणेवर अर्जदाराने संपूर्ण विश्वास ठेवला व गैरअर्जदार अर्जदारास ताबा देतील या आशेवर विसंबून राहिला. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या प्लॉटचा ताबा दिलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या विनंतीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. सरतेशेवटी संस्थेच्या कार्यालयीन कर्मचा-याने अर्जदार यांना त्यांचे प्लॉटवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले व अतिक्रमण काढून टाकून कोर्टाच्या आदेशा आधारे मोजणी करुन ताबा देणे सोपे आहे असे आश्वासन दिले. परंतु गैरअर्जदार यांनी आपला शब्द पाळला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास आजतागायत प्लॉटचा ताबा दिलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेशी प्रत्यक्ष व दुरध्वनीव्दारे संपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज हा continuous cause of action या सदरात येतो. त्यामुळे अर्जदाराचे तक्रार दाखल करणेस विलंब झालेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वारंवार विनंती करुनही अर्जदाराच्या प्लॉटचा ताबा दिलेला नसल्याने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून सर्व्हे क्रमांक 43,गट क्रमांक 37 स्थित मौजे गोपाळ चावडी नांदेड मधील प्लॉट क्रमांक 5,6 व 9 ची मोजणी करुन त्याच्या चतुःसिमा आखून उपलब्ध असलेल्या रोडासह ताबा देऊन ग्रामपंचायत नमुना क्र.8 ला अर्जदाराचे नांव नोंदणी करुन देण्याचा आदेश गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना देण्यात यावा. तसेच अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना देण्यात यावा इत्यादी मागणी अर्जदार यांनी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील होऊनही गैरअर्जदार क्र. 2 व 3 तक्रारीत हजर झालेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारमध्ये प्राथमिक हरकतीचे मुद्ये म्हणून खालील बाबी नमुद केलेल्या आहेतः-
अर्जदार हा ग्राहक संरक्षण अधिनियम,1986 च्या ग्राहक कलम 2(1)(डी) या व्याखेत बसत नाही. अर्जदाराची तक्रार ही मुदतीबाह्य कालावधीनंतर दाखल केलेली असल्याने खारीज होणेस पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 1 हा गोकुळनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत गोपाळ चावडी तालुका व जिल्हा नांदेड यांचा अध्यक्ष आहे. सदरील संस्थेचे वर्गीकरण भाडेकरुन मालकी हक्क गृहनिर्माण संस्था असे आहे. उपरोक्त संस्थेने सर्व्हे नं.43,गट नं.37 मौजे गोपाळ चावडी तालुका व जिल्हा नांदेड येथील क्षेत्रफळ 1 हेक्टर 61 आर जमीन नोंदणीकृत खरेदीखताव्दारे सखाराम गणपती शिंदे यांचेकडून विकत घेतली व सदरील जमीनीमध्ये प्लॉट पाडून संस्थेच्या सभासदांना घरे बांधण्यासाठी वाटप करण्यात आले. संस्थेच्या सभेमध्ये ठराव करुन घेतल्यानंतर जमीनीची कागदपत्रे सक्षम अधिका-याकडून ले-आऊट तयार करणेसाठी सादर केला व प्लॉटचा ले-आऊट सक्षम अधिका-याने तयार केल्यानंतर सभासदांना ले-आऊटप्रमाणे प्लॉटची आखणी करुन सभासदांमध्ये प्लॉटची वाटणी केली. अर्जदार हा उपरोक्त संस्थेचा सभासद असल्या कारणाने सदरील प्लॉट हा त्यांना सभासद या नात्याने वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदार हा संस्थेचा ग्राहक होऊ शकत नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता हे नाते दर्शवून अर्जदार यांनी मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या संस्थेने अर्जदारास सभासद या नात्याने उपरोक्त प्लॉटचे मालकी व हक्काचे प्रमाणपत्र दिलेले आहे व त्या प्रमाणपत्रा आधारे अर्जदार सदरील प्लॉटचा कब्जेदार झालेला आहे. त्यामुळे सदरील प्लॉटविषयीचे उत्तरदायित्व अर्जदार यांचेच आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मालकी व हक्काचे प्रमाणपत्र दिल्यानंतर सदरील प्लॉटचा कब्जा दिला होता. सदरील संस्था ही गृहनिर्माण संस्था असल्याने अर्जदारास प्लॉट घर बांधणेसाठी दिला होता. परंतु अर्जदाराने सदरील प्लॉटवर घर बांधकाम केलेले नाही किंवा घर बांधणेची संस्थेकडे तसेच सदरील प्लॉट ज्या हद्दीत येतो तेथील स्वायत्त संस्थेकडे बांधकाम परवानगी मागीतलेली नाही. अर्जदारास मालकी व हक्काचे प्रमाणपत्र पारीत करतेवेळी उपरोक्त प्लॉटचा ताबा मोजणी करुन देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा मोजणी करण्याचा प्रश्न येत नाही. अर्जदाराचे तक्रारीतील मागणी ही अयोग्य व अवाजवी असल्या कारणाने अर्जदारास गैरअर्जदार यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराची तक्रार ही कालमर्यादेत दाखल करण्यात आलेली नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार ही खारीज होणेस पात्र आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे गोकुळनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत गोपाळ चावडी तालुका व जिल्हा नांदेड या संस्थेचे अध्यक्ष व सचिव आहेत. सदरील संस्था ही नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या नोंदणीच्या प्रमाणपत्रावरुन ही बाब दिसून येते. अर्जदाराने दाखल केलेल्या गट क्रमांक 37 च्या 7/12 चे उता-यावरुन गैरअर्जदार संस्थेची जमीन गट क्रमांक 37 मध्ये असल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.4255/- सभासद प्रवेश फी, सभासद शेअर व प्लॉटबाबत अनामत रक्कम यासाठी दिलेली असल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास सदरील प्लॉटचे मालकी व हक्काचे प्रमाणपत्र दिलेले आहे. सदरील प्रमाणपत्र अर्जदाराने तक्रारीसोबत मंचासमोर दाखल केलेले आहे. दिनांक 27.12.1988 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराने सदरील प्लॉटवर बांधकाम केलेले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र दिलेले आहे. यावरुन अर्जदाराने सदरील प्लॉटवर 1988 पर्यंत कुठलेही बांधकाम केलेले नसल्याचे दिसून येते. अर्जदाराने तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांचेकडे गैरअर्जदार यांनी प्लॉटचा ताबा दिलेला नसल्या संदर्भात तक्रार दाखल केली होती. सदरील तक्रारीवर तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांनी गैरअर्जदारास आदेशीत केलेले आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉटचा ताबा देणेबाबत निर्णय घ्यावा. अर्जदाराने सदरील आदेशाची प्रत तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांनी दिनांक 10.09.2013 रोजी गैरअर्जदार संस्थेस आदेश दिलेला असल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. याचाच अर्थ गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास प्लॉटचा ताबा सन 2013 पर्यंत दिलेला नवहता व सदरील प्लॉटचा ताबा गैरअर्जदाराने द्यावा म्हणुन अर्जदार वारंवार प्रयत्न करीत असल्याचे तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांचे आदेशावरुन दिसून येते. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य आहे असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास 1988 साली बांधकाम करण्याची परवानगी करणे संदर्भात पत्र दिलेले आहे. तसेच प्लॉटचा ताबा देण्याचा आदेशही तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांनीही सन 2013 मध्ये अर्जदारास दिलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस तामील होऊनही त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमोर दाखल केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदाराचे तक्रारीतील कथन मान्य असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 3 , तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांना तक्रारीत पक्षकार केलेले आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडून तक्रारीमध्ये कुठलीही मागणी केलेली नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराची तक्रार ही कालबाह्य असून अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध नाही,त्यामुळे अर्जदाराची तक्रार मंचास चालविणेचा अधिकार नाही असे नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांचेकडून दिनांक 10.09.2013 रोजी प्लॉटचा ताबा देणे संदर्भात गैरअर्जदार यांचेविरुध्द आदेश घेतलेला आहे. आदेश देऊनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉटचा ताबा दिलेला नसल्याने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांचे म्हणणेनुसार अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता हे संबंध नाही. परंतु सहकारी गृहनिर्माण संस्था यांचेविरुध्द ग्राहक मंचात दाद मागता येईल असे निर्णय वरिष्ठ न्यायालयांनी वेळावेळी दिलेले असल्याने अर्जदाराची तक्रार मंचास चालविणेचा अधिकार आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सदरील प्लॉट विक्री केलेला असून अर्जदारास ताबा दिलेला असल्याचे कथन केलेले आहे. परंतु अर्जदारास प्लॉटचा ताबा दिला असल्या संदर्भात कुठलेही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदार यांनी मंचासमोर दिलेला नाही. याऊलट अर्जदाराने तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,नादेड यांचा प्लॉटचा ताबा देणेसंदर्भातील आदेश तक्रारीसोबत दाखल केलेला असल्याने अर्जदारास प्लॉटचा ताबा गैरअर्जदार यांनी दिलेला नाही ही बाब सिध्द होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉट विक्री करुन प्लॉटचा ताबा न देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे अर्जदारास निश्चितच मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागलेला आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सर्व्हे नं.43,गट नं.37 मौजे गोपाळ चावडी तालुका व जिल्हा नांदेड येथील स्थित असलेल्या प्लॉटपैकी – तक्रार क्र.169/2013 मधील अर्जदार दिलीप शंकरराव देशमुख यांना प्लॉट क्र. 5, तक्रार क्र.170/2013 मधील अर्जदार वसंत सिताराम गोळेगांवकर यांना प्लॉट क्र.9 व तक्रार क्र.171/2013 मधील अर्जदार किशन रंगनाथ राहेगांवकर यांना प्लॉट क्र.6 चा ताबा आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत द्यावा.
किंवा
गैरअर्जदार यांना प्लॉट देणे शक्य नसल्यास गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील प्लॉटची किंमत शासकीय मुल्यांकन (Government Valuation) प्रमाणे आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
5. मुळ निकालपत्र प्रकरण क्रमांक 169/2013 मध्ये ठेवावे व निकालाच्या सत्य प्रती उर्वरीत प्रकरणांमध्ये ठेवाव्यात.
6. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
7. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.