नि.11 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 29/2011 नोंदणी तारीख - 10/2/2011 निकाल तारीख - 27/4/2011 निकाल कालावधी - 77 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ शामराव भिवाजीराव वेणेगांवकर रा. वेणेगाव ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री अभिजित घोरपडे) विरुध्द जगन्नाथ बाबूराव कळसकर रा.वेणेगाव ता.जि.सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे मौजे वेणेगाव ता.जि.सातारा येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांनी त्यांचे मौजे वेणेगाव येथील घराभोवती कंपाऊंड करण्याचे योजले. जाबदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यामुळे कंपाऊंड बांधणेबाबत अर्जदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा होवून अर्जदार यांनी कंपाऊंड बांधणेचा ठेका जाबदार यांना दिला. सदरचे कामाचा मोबदला हा रु.50,000/- इतका ठरला. सदरचे बांधकामाबाबत जाबदार यांनी स्वतःचे हस्ताक्षरात मोजमापाचा नकाशा काढून अंदाजे खर्चाचा हिशोब वहीचे कागदावर लिहून दिलेला असून त्यावर जाबदार यांची सही आहे. अर्जदार यांची चेकद्वारे रक्कम रु.25,000/- जाबदार यांना अदा केलेले आहेत. सदरची रक्कम मिळालेनंतर जाबदार यांनी बांधकामास सुरुवात केली व काही काम केले परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा पैशाची मागणी केली म्हणून अर्जदार यांनी त्यांना पुन्हा रु.20,000/- चा चेक दिला. परंतु वारंवार संपर्क साधूनही जाबदार यांनी बांधकाम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना पत्र पाठविले परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाबदार यांनी काम अर्धवट ठेवल्यामुळे जाबदार यांचे नुकसान होत आहे. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलांचेमार्फत नोटीसही पाठविली परंतु तरीही जाबदार यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. सबब नुकसान भरपाईपोटी रु.70,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती नि. 8 ला दाखल आहे. परंतु जाबदार हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबत एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 3. सदरकामी अर्जदारतर्फे दाखल शपथपत्र नि.2 तसेच नि.5 सोबतची कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार व जाबदार यांचेमध्ये अर्जदार यांचे मालकीचे मौजे वेणेगाव येथील घराभोवती कंपाऊंड बांधणेबाबत चर्चा होवून करारनामा झाला. त्यानुसार जाबदार यांनी कंपाऊंडचे काम रु.50,000/- मध्ये करुन देण्याचे कबूल केले. सदरचा साध्या कागदावरील जाबदार यांची सही असलेला करारनामा नि.5 सोबत अ.क्र.1 ला अर्जदार यांनी दाखल केलेला आहे. सदरचे कागदावर कंपाऊंडचे बांधकामाच्या मोजमापांचा तपशील नमूद आहे. सदरचे बांधकामापोटी अर्जदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.25,000/- व रु.20,000/- असे एकूण रु.45,000/- चेकद्वारे अदा केलेले आहेत. सदरची रक्कम मिळाल्याची बाब जाबदार यांनी कोठेही नाकारलेली नाही. अर्जदार यांनी नि.5 सोबत अ.क्र.3 ला व अ.क्र.4 ला जाबदार यांना पाठविलेले पत्र व नोटीस दाखल केली आहे. सदरच्या पत्रास व नोटीसीस जाबदार यांनी उत्तर दिलेले नाही. अर्जदार यांनी कंपाऊंडचे अर्धवट बांधकामाचे फोटो दाखल केले आहेत. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीस मिळूनही ते याकामी मे.मंचासमोर हजर झालेले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केलेले नाही. 6. वर नमूद निर्विवाद बाबींची पाहणी केली असता असे स्पष्ट दिसून येते की, जाबदार यांनी बांधकामाचे मोबदल्यापोटी ठरलेली रक्कम रु.50,000/- पैकी रु.45,000/- स्वीकारुनही अर्जदार यांच्या कंपाऊंडचे काम अर्धवट सोडलेले आहे. अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेले पत्र व नोटीस मिळूनही जाबदार यांनी कंपाऊंडचे काम पूर्ण केले नाही अगर नोटीसीस उत्तर दिलेले नाही. सदरचे नोटीसीमध्ये अर्जदार यांनी उर्वरीत रु.5,000/- स्वीकारुन बांधकाम पूर्ण करुन द्यावे असे जाबदार यांना कळविले होते परंतु तरीही जाबदार यांनी अर्जदार यांना प्रतिसाद दिलेला नाही. तसेच अर्जदार यांनी याकामी मे. मंचासमोर हजर राहून अर्जदारचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन पुराव्यानिशी नाकारलेले नाही. अर्जदार यांनी दाखल केलेले त्यांचे घर व कंपाऊंडचे फोटो पाहिले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदारचे घराभोवतालचे कंपाऊंड बांधकाम पूर्ण केलेले नाही. अर्जदार यांचेकडून रु.50,000/- पैकी रु.45,000/- स्वीकारुनही जाबदार यांनी ठरलेप्रमाणे कंपाऊंडचे काम पूर्ण केलेले नाही ही बाब यावरुन स्पष्टपणे दिसून येते. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 7. तक्रारअर्जदार यांनी प्रस्तुतचे तक्रारअर्जाचे कामी सादर केलेली कथने पाहता असे दिसून येते की, तक्रारअर्जदार याने जाबदार यांस संबंधीत बंगल्याभोवतीचे संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी रु.50,000/- देण्याचे निश्चित केले होते व त्या रकमेपैकी तक्रारअर्जदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.45,000/- चेकद्वारे दिलेले आहेत. तक्रारअर्जदार यांचे प्रस्तुतचे तक्रारअर्जातील कथने अशी आहेत की, जाबदार यांनी संबंधीत संरक्षक भिंतीचे काम सुरु केले परंतु नंतर ते काम अर्धवट सोडलेले आहे व अर्धवट केलेल्या कामाची किंमत ही रक्कम रु.10,000/- ते 12,000/- इतकी होत आहे. वर नमूद केलेल्या निर्विवाद गोष्टींमध्ये महत्वाची बाब अशी आहे की, जाबदार यांनी तक्रारअर्जदार यास त्यांनी दिलेल्या नोटीसीस उत्तर देणे अपेक्षित होते अगर किमान प्रस्तुतचे तक्रारअर्जाचे कामी हजर राहून त्यांचे म्हणणे मांडणे जरुर होते परंतु जाबदार यांनी या दोन्ही गोष्टी केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारअर्जदार त्यांचे तक्रारअर्जात करीत असलेले कथन की, जाबदार यांनी संबंधीत संरक्षक भिंतीचे केलेल्या कामापोटीची रक्कम रु.10,000/- ते 12,000/- होत आहे ही बाब पुराव्यात ग्राहय धरणे योग्य व संयुक्तिक आहे. प्रस्तुतचा मंच सदरचे रु.10,000/- ते 12,000/- पैकी कमीची रक्कम रु.10,000/- ही जाबदारने अर्धवट केलेल्या बांधकामाची किंमत ग्राहय धरुन, संबंधीत सरंक्षक भिंतीचे बांधकामापोटी एकूण ठरलेली किंमत रु.45,000/- मधून सदरची रक्कम वजा करुन जी रक्कम जाबदार यांचेकडे शिल्लक रहात आहे, ती रक्कम रु.35,000/- जाबदार यांनी अर्जदार यांना तात्काळ परत द्यावी असा आदेश करणे योग्य व संयुक्तिक ठरणारे आहे. 8. वर कलम 7 मधील नमूद केलेल्या बाबींस अनुसरुन तक्रारअर्जदार हे जाबदार यांचेकडून रु.35,000/- संबंधीत बांधकामाची उर्वरीत रक्कम मिळणेस पात्र आहेत. तक्रारअर्जदार यांना प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करण्यापूर्वी त्याने जाबदार यांना पाठविलेले पत्र, नोटीस याचा खर्च, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करणेस झालेला खर्च व प्रस्तुत न्यायनिर्णय मिळेपर्यंत झालेला मनःस्ताप या सर्व बाबींपोटी जाबदार यांनी तक्रारअर्जदार यांना रक्कम रु.10,000/- देणे योग्य व संयुक्तिक ठरणारे आहे असे या मंचाचे मत आहे. 9. तक्रारअर्जदार व जाबदार यांचेमध्ये तक्रारअर्जदार यांचे घराभोवतीचे संरक्षक भिंतीचे काम करण्याबाबतचा करारनामा दि.15/9/2009 रोजी झाला असून त्यास अनुसरुन जाबदार यांनी संबंधीत संरक्षक भिंतीचे बांधकाम गेटसह दि.15 ऑगस्ट 2010 पर्यंत पूर्ण करुन द्यावयाचे होते. जाबदार यांनी निर्विवादपणे सदरहू संरक्षक भिंतीचे बांधकाम अर्धवट ठेवलेले आहे, पूर्ण करुन दिलेले नाही. आता दि.15 ऑगस्ट 2010 पासून 15 ऑगस्ट 2011 पर्यंतचे एक वर्षाचे कालावधीत वीटा, डबर, सिमेंट, वाळू, मजुरीचे दर या सर्व गोष्टींचे किंमतीत निश्चितपणे वाढ झालेली आहे व या सर्व वस्तूंचे किंमतीत झालेल्या वाढीची न्यायीक नोंद भारतीय पुराव्याच्या कायद्यानुसार याकामी विचारात घेण्यात येत आहे. सबब तक्रारअर्जदार याबाबत मागणी करीत असलेली रक्कम रु.20,000/- ही रक्कम जाबदार यांनी तक्रारअर्जदार यांना देणे योग्य व कायदेशीर ठरेल असे या मंचाचे मत आहे. 10. वर कलम 7, 8 व 9 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारअर्जदार हे जाबदारकडून नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.35,000/-, रु.10,000/- व 20,000/- अशी एकूण 65,000/- मिळणेस अर्जदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 11. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे व खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.65,000/- द्यावेत. 3. जाबदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.45,000/- वर दि.15/8/2010 पासून दि. 27/5/2011 पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. 4. जाबदार यांनी अर्जदार यांना वर नमूद केलेल्या रकमा या न्यायनिर्णयाचे तारखेपासून 30 दिवसांचे आत म्हणजे दि. 27/5/2011 पर्यंत दिल्या नाहीत तर दि. 27/5/2011 रोजी देय असणा-या रकमेवर त्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 27/4/2011 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |