निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/05/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 16/05/2011
तक्रार निकाल दिनांकः- 20/06/2013
कालावधी 02 वर्ष.01 महिने. 04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अंगद पिता हनुमान मुंढे. अर्जदार
वय 24 वर्षे. धंदा.शेती. अड.डि.यु.दराडे.
रा.पारधवाडी ता.सोनपेठ जि.परभणी.
विरुध्द
1 जे सी बी इंडीया लि. गैरअर्जदार.
23/7 मथुरा रोड,बालाबगढ.. अड.एस.आर.भुतडा.
हरियाणा.
2 गद्रे इंजिनीअरींग.
मुर्तिजापूर रोड.शिवनी अकोला.
3 श्रिराम इक्युपमेंट फायनांन्स लि. Deleted ( Exh.No.15 Dated. 01/06/2012)
वसमत रोड.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द अर्जदारास झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार पुढील प्रमाणे आहे. अर्जदार हा शेतकरी असून शेती सपाटी करणासाठी त्याने गैरअर्जदार कंपनीची J.C.B. मशीन गैरअर्जदार क्रमांक 2 जे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे वितरक आहेत.त्याच्याकडून विकत घेतली.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमाक 2 यांच्याकडून जे.सी.बी. मशीन विकत घेण्याचे ठरवले. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरची J.C.B. मशीन ची किंमत 21,60,000/- सांगीतले ज्यामध्ये शोरुम किंमत व विमा रक्कम अंतर्भुत आहे असे सांगीतले व आर.टी.ओ. टॅक्स हा अर्जदाराने भरावायचे आहे वरील अटी मान्य करुन अर्जदाराने दिनांक 03/02/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे रुपये 51,000/- नगदी जमा केले व तसेच रुपये 3,59,000/- चा डी.डी. गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या नांवे काढुन पाठवुन दिला सदरचे J.C.B. मशीन घेण्यासाठी गैरअर्जदाराने 17,50,000/- ईतके अर्थसहाय्य दिले.ती रक्कम त्यानी परस्पर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे जमा केली.अर्जदार याचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांने ठरल्या प्रमाणे पहिल्या वर्षीचा विमा काढुन देणार होता.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरची J.C.B. मशीन विक्रम ट्रॅव्हल्सव्दारे पाठवली, ती अर्जदारास दिनांक 04/03/2011 रोजी मिळाली. सदर J.C.B. मशीन उतरवुन घेत असतांना अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना फोन करुन विचाराणा केली की, सदरच्या J.C.B. मशीनचा विमा उतरवला काय ? त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास असे सांगीतले की, सदर J.C.B. मशीनचा विमा काढला असून पॉलिसी बजाज अलायंझ कंपनीची घेतली आहे व प्रत 2 दिवसांत पाठवतो त्यामुळे अर्जदाराने त्याची J.C.B. मशीन हि विमाकृत आहे असे समजून त्याचा वापर सुरु केला.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक 14/03/2011 रोजी J.C.B. मशीन नि शेतात काम करीत असतांना इंजिनला खालुन दगडाचा मार लागल्यामुळे सदर J.C.B. मशीनचे चेंबर फुटले व इंजिन ऑईल सांडले सदरची घटना गैरअर्जदार क्रमांक 2 यांना फोनवर लगेचच कळवली, त्यावेळी त्यांनी सांगीतले की, सदरची बाब ही वारंटी मध्ये सामाविष्ट नाही, म्हणून अर्जदाराने स्वतःच व्यवस्था करावी. गैरअर्जदार क्रमांक 2 हे फक्त पार्टफिट करुन देतील, म्हणून अर्जदाराने स्वतः पाटर्स आणले व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे इंजिनियर सुदीप आठवले यांनी ते बसवुन दिले. व इंजिनीची कोणतीही तपासणी न करता इंजिन सुरु केले व त्यावेळी इंजिन पुर्णतः ब्लॉक झाले व त्यावेळी सदर इंजिनियरने J.C.B. मशीन सोलापूर येथे किर्लोस्कर कंपनीच्या वर्कशॉपमध्ये नेण्यास सांगीतले व म्हणून अर्जदाराने सदरची J.C.B. मशीन किर्लोस्कर यांच्या वर्कशॉप, सोलापुरला नेले व तेथे दुरुस्त केले अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदारास रु. 80,000/- रुपये इतका खर्च आला व अर्जदारास एकुण नुकसान 2,70,000/- रुपये इतका झाला ज्याचा तपशिल तक्रार अर्जाच्या परीच्छेद 7 मध्ये दिलेला आहे.
अर्जदाराने सदर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे विमा पॉलिसीची मागणी केली तेव्हा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पॉलिसीची प्रत न देता पॉलिसी नंबर कळवला जो की, MC – 1001287866 असा आहे.अर्जदाराने झालेल्या नुकसानीचे क्लेम करण्यासाठी बजाज अलायंझ कंपनीस संपर्क केला असता सदर कंपनीकडून कळाले की, वरील नंबरची पॉलिसी हि 07/04/2011 रोजी काढण्यात आली त्यामुळे 14/03/2011 रोजीचा अपघात पॉलिसी अंतर्गत येत नाही.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदारास J.C.B. मशीनचा ताबा 04/03/2011 रोजी देण्यात आला तेव्हा त्याच दिवसापासून सदर J.C.B. मशीनला विमा संरक्षण देणे गैरअर्जदार क्रमांक 2 चे कर्तव्य होते, परंतु त्याने तसे न केल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई मिळाली नाही.व म्हणून झालेल्या नुकसानीस गैरअर्जदार हे जबाबदार आहेत व त्यांनी सेवेत त्रुटी दिली आहे.
अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्यांत यावा की, त्यांनी अर्जदारास झालेल्या नुकसानापोटी 2,70,000/- रुपये द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 30,000/- रुपये व तक्रारीचा खर्च 20,000/- रुपये अर्जदारास द्यावे.
अर्जदाराने आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि. क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रमांक 4 वर कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केली आहेत. ज्यामध्ये टॅक्स इन्व्हॉइस रिसिट व सर्व्हिस व्हिझीट रिपोर्ट यांचा समावेश आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढण्यांत आले असता गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे आपल्या वकिला मार्फत हजर होवुन आपले म्हणणे नि.क्रमांक 12 वर शपथपत्रासह दाखल केले आहे.तसेच नि.क्रमांक 13 वर कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे जोडली आहेत ज्यात अधिकारपत्र, पावती, विमा कव्हरनोट, विमा पॉलिसी व 28/07/ 2011 आणि 01/08/2011 चे पत्र यांचा छायांकित प्रतीचा सामावेश आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे पुढील प्रमाणे आहे. अर्जदार हा शेतकरी आहे हे म्हणणे गैरअर्जदार यांस मान्य नाही व अर्जदार हा ग्राहक या सदरांत येत नाही. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराने 21,60,000/- रुपये हे त्यांच्याकडे जमा केलेले आहेत पण त्याने हे नाकारले आहे की,या रक्कमेत विमा रक्कम अंतर्भुत होते, व त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा विमा रक्कमेच्या अर्धी रक्कम भरल्यानंतर गैरअर्जदार हा स्वतःची अर्धी रक्कम त्यात टाकुन विमा काढणार होता व तसेच ठरले होते. गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने झालेला खर्च हा अवास्तव दाखवलेला आहे.कोठलीही चुक कबुल न करता अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की,जर विमा अपघातापुर्वी काढला असता तरी अर्जदारास विमादावा मिळाला नसता त्याचे ह्या म्हणणे पुष्टयर्थ त्यांने इंशुरन्स सर्व्हेअर श्री अरविंद ए लखदिव यांचे ओपिनियन दाखल केलेले आहे जे नि.क्रमांक 13/6 वर दाखल केलेले आहे एकंदरीत गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांनी J.C.B. मशीनचा पहिल्या वर्षीचा विमा काढून देण्याचे ठरलेले नव्हते तर अर्जदाराने विम्याची अर्धी रक्केम भरल्यावर गैरअर्जदाराने त्यांत अर्धी रक्कम भरुन पॉलिसी काढावयाची होती व म्हणून दिनांक 07/04/2011 रोजी अर्जदाराने त्यांच्याकडे रु. 14,000/- भरल्यावर उर्वरित रक्कम 13,954/- हि गैरअर्जदाराने भरुन 07/04/2011 रोजी विमा पॉलिसी घेतलेली आहे. तसेच गैरअर्जदार हा ग्राहक या सदरांत येत नाही म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यांत यावा.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारांनी वेळेत J.C.B. मशीनची पॉलिसी न काढून अर्जदारास
सेवेतत्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने असे म्हंटले आहे की, त्यांने गैरअर्जदाराकडून J.C.B. मशीन विकत घेतली आहे व त्या संबंधीचे टॅक्स इनव्हॉईस नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेले आहे.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे वितरक आहेत. त्यामुळे अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, तो गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचा ग्राहक आहे.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराकडून सदर जे.सी.बी.मशीन विकत घेतांना असे ठरले होते की, गैरअर्जदारांनी सदर जे.सी.बी.मशीनचा पहिल्या वर्षीचा विमा काढुन घ्यावयाचे अर्जदाराने दाखल केलेल्या कोठल्याही कागदपत्रावरुन सिध्द केलेले नाही, अर्जदाराने त्याबद्दलचे कोटेशन अथवा व इतर पुरावा / कागदपत्रे दाखल केलेले नाही,म्हणून अर्जदाराचे हे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही.
अर्जदारांचे म्हणणे की, J.C.B. मशीन उतरवुन घेत असतांना अर्जदाराने गैरअर्जदार यांना सदरच्या J.C.B. मशीनच्या विम्या बद्दल फोनवर चौकशी केली असता गैरअर्जदाराने विमा उतरवलेला आहे व पॉलिसी बजाज अलायंझ कंपनीची आहे असे सांगीतले आहे व म्हणून J.C.B. मशीन विमाकृत आहे असे समजून वापर केला, हे मंचास योग्य वाटत नाही. कारण आजच्या आधुनिक युगांत सदर पॉलिसीची कॉपी तासभरांत अर्जदाराच्या हाती पडू शकली असती पण अर्जदाराने तसा आग्रह अथवा प्रयत्न केलेले दिसत नाही, यावरुन विमा पॉलिसी हातातनसताना एव्हढया माहागडया J.C.B. मशीनचा वापर करणे हे निष्काळजीपणाच वाटते, तसेच अर्जदाराने सदर J.C.B. मशीनची आर.सी.बुक देखील मंचासमोर दाखल केलेली नाही. अर्जदार हा आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष