सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 53/2014.
तक्रार दाखल दि.05-04-2013.
तक्रार निकाली दि.10-07-2015.
श्री. जितेंद्र विठ्ठलदास दोशी,
व्दारा- मे. गोविंददास रामदास अँन्ड सन्स,
223, सोमवार पेठ, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. जी.के.सिस्टम्स प्रायव्हेट लिमीटेड,
नक्षत्र अपार्टमेंट, 150,केसरकर पेठ,
शाहू चौक, सातारा.
2. मे. कॉम्प्यूटर वर्ल्ड,
नक्षत्र अपार्टमेंट,
150, केसरकर पेठ,
शाहू चौक, सातारा
3. रेडींग्टन इंडिया लिमीटेड,
201,202,203 शितल प्लाझा,दुसरा मजला,
एफ.सी.रोडलगत, मॉडेल कॉलनी, अँम्बेसिटर हॉटेलजवळ,
शिवाजीनगर, पुणे.
4. हयूलेट्ट पॅकॉर्ड इंडिया सेल्स प्रा.लिमिटेड,
लेव्हल 6, पँटॉगॉन, पी-2, मगरमट्टा सिटी,
हडपसर, पुणे 411 028. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार क्र.1,2,4 तर्फे– एकतर्फा.
जाबदार क्र.3 तर्फे- प्रतिनिधी
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. दि. 15/11/2012 रोजी तक्रारदाराने बिल क्र.आर.एस.एल.1100033 ने एचपी कॉम्प्यूटर, 2 जीबी रॅम, 500 जीबी हार्डडिस्क,इंटेल डयूअल कोअर, डी.व्ही.डी. राईटर, माऊस, वायफाय, वेबकॅम, 20 इंची एलसीडी मॉनीटर सिरीयल नं. 4 सी.एस.232022 एम इत्यादी रक्कम रु.29,000/- ला जाबदारकडून खरेदी केले. प्रस्तुत मशिनच्या मॉनीटरवर काही ठिपके, धब्बे आले आणि त्याबाबत अनेकवेळा तोंडी कळविल्यावर दि.26/5/2013 रोजी लेखी तक्रार दिली. त्यानंतर ई-मेलने देखील तक्रार नोंदविली. त्यानंतर दि.2/12/2013 रोजी लेखी नोटीस अँड.श्रीधर घाडगे यांचेमार्फत दिली. या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, दि.23/8/2013 रोजी मुराद काझी नामे अभियंता जाबदार क्र. 3 कडून आला त्याने वर्क ऑर्डर क्र. पीसी/पीव्ही/13/00289 खाली ‘डिस्प्ले फ्लीक्रींग अँन्ड ग्रीन कलर व्हर्टीकल लाईन कमिंग’ असा रिमार्क दिला. तथापी, नोटीस मिळूनही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने व्यवसायासाठी उपयोगी पडेल म्हणून कॉम्प्यूटर जाबदार क्र. 1 कडून खरेदी केला. परंतू, सदरचा कॉम्प्यूटर सदोष होता व आहे. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदाराला कायदेशीर नोटीस देवूनही जाबदाराने कोणतीही दखल घेतली नाही व उत्तरही दिले नाही यामुळे तक्रारदार यास जाबदार यांनी सदोष सेवा दिलेने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज नुकसानभरपाई मिळावी म्हणून मे. मंचात तक्रारदाराने दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून सदोष सेवा मिळालेचे घोषीत होवून मिळावे तसेच तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून तक्रारीत नमूद केले कॉम्प्यूटरऐवजी नवीन व कार्यक्षम समान दर्जाचा कॉम्प्यूटर देण्याचे आदेश व्हावेत. दरम्यानच्या नुकसानीबाबत रक्कम रु.1,00,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत, तक्रारदार यांना तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- जाबदार यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदारानी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/5 कडे अनुक्रमे संगणकाचे खरेदी बील, जाबदाराने संगणक तपासलेचे फॉर्म, जाबदाराने पाठवलेला मेल, संगणकाचे फोटोची प्रत, तक्रारदाराने जाबदारांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, नोटीसीसची पोहोचपावती व लखोटे, नि.14 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 15 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1,2,4 यांना नोटीस लागू होवूनही प्रस्तुत जाबदार मे. मंचात गैरहजर असलेने व त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केले नसलेने प्रस्तुत जाबदारांविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. तर जाबदार क्र. 3 यांनी मे. मंचात हजर राहून त्यांची कैफियत/म्हणणे दाखल केले आहे. नि.16 कडे म्हण्ण्याचे मराठी रुपांतर तसेच नि. 18 कडे पुराव्याचे शपथपत्र व नि. 17 कडे लेखी युक्तीवाद, नि. 19 चे कागदयादीसोबत नि.19/1 ते 19/3 कडे अनुक्रमे सेवाभेट अहवाल, एल.सी.डी. फोटो, एल.सी.डी. डेस्कटॉपचे दृश्य भागावर उभ्या रेषा येत असलेबाबत अहवाल वगैरे कागदपत्रे मे मंचात दाखल केलेले आहेत. जाबदार क्र.3 चे त्यांचे म्हणणे/कैफीयतीत तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
तक्रारदाराचे अर्जातील कथन मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने प्रस्तुत डेस्कटॉप व्यवसायिक वापरासाठी खरेदी केला होता. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (ड) नुसार ग्राहक होत नाहीत त्यामुळे सदरची तक्रार रद्द होणेस पात्र आहे. डेस्कटॉपची खरेदी मे गोविंददास रामदास अँन्ड सन्स यांचे नावाने केली आहे. त्यांचेतर्फे विशिष्ट मुखत्यारपत्र घेतलेले नसतानाही प्रस्तुत तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज व त्यासोबत अँफीडेव्हीट दाखल केले आहे. हे बेकायदेशीर आहे. सदरील जाबदार असे नमूद करता की, जाबदार क्र. 4 यांनी उत्पादित केलेले व बाजारात विक्रीस आणलेली उत्पादने याबाबत अधिकृत सेवा पुरविण्याचे काम जाबदार क्र. 3 चे आहे. फक्त कोणताही मोबदला ग्राहकाकडून न स्विकारता दुरुस्ती सेवा पुरविणे एवढेच काम सदर जाबदाराचे आहे. सदरील उत्पादनामध्ये कोणतीही अंगीकृत खरेदी आढळून आलेस किंवा हमी कालावधी उलटून गेल्यास सदरील जाबदार सेवा केंद्र हे सदरील ग्राहक यांचेकडून दुरुस्ती व यंत्रसामग्रीची किंमत अदा केलेनंतर व सदरील उत्पादक यांनी नेमून दिले अटींचा अवलंब करुन सदरील उत्पादक यांनी सेवा हमी कालावधी बाबत अटी व शर्तींची पूर्तता केलेवरुन सदर जाबदार दुरुस्ती सेवा पुरवितात. म्हणजेच सदर जाबदार क्र. 3 हे नमूद डेस्कटॉप गुणवत्ता, कार्यप्रणाली किंवा उपयुक्तता याबाबत संबंधीत नाहीत. सदर डेस्कॉटॉपबाबत सेवा हमी कालावधी हा केवळ उत्पादक यांचेकडून देण्यात येतो. त्या सेवा हमी कालावधीच्या अटी व शर्ती बाबत सदर जाबदार क्र. 3 चा कोणताही सहभाग नसतो. प्रस्तुत जाबदार क्र. 3 ही स्वतंत्र कायदेशीर अभिव्यक्ती आहे ती हॅवलेट पॅकर्ड इंडिया सेल्स प्रा. लि. डस्कटॉपचे उत्पादक प्रतिनिधी नाही. तक्रारदार व जाबदार क्र. 1 यांचे दरम्यान झाले व्यवहाराबाबत जाबदार क्र. 3 ला कोणतीही माहिती नाही. प्रस्तुत तक्रारदाराने त्याचे डेस्काटॉप चमकत असलेबाबत व दृश्य भागावर हिरव्या रंगाच्या उभ्या रेषा येत असलेबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविली होती. सदर जाबदार यांचे सेवा अभियंता यांनी तक्रारदार यांचे रिमार्क दि.23/8/2013 रोजी भेट देवून प्रत्यक्षपणे सदरचा डेस्कटॉप तपासला होता. सदर सेवा अहवाल नि. बी 1 जोडला आहे. प्रस्तुत सेवा अभियंता यांना सदर संगणकाच्या डेस्कटॉपवर दृश्य एलसीडी भागावर खालच्या बाजूस उभ्या रेषा येत असलेचे आढळून आले आणि प्रस्तुत तक्रारदार हे सेवा हमी कालावधीत येत असलेचे जाबदार क्र. 4 यांना सांगितले. तथापी, प्रस्तुत डेस्कटॉपची खराबी ही ‘मुरा खराबी’ जी ग्राहकाकडील खराबी व नादुरुस्ती अंतर्गत येत असून ती उत्पादकांची खराबी नाही. यानुसार जाबदार क्र. 4 ने तक्रारदारांचे प्रकरण फेटाळले. प्रस्तुत खराबी ही उत्पादकाकडील सेवा खराबीमध्ये मोडत नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदार क्र. 3 ने तक्रारदाराला सेवा देण्यास कोणतीही कमतरता केलेली नाही त्यामुळे प्रस्तुत जाबदारविरुध्द सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशा स्वरुपाचे आक्षेप जाबदार क्र. 3 ने याकामी नोंदवलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व
सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांस सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण- तक्रारदार यांनी दि. 15/11/2012 रोजी बील नं. आर.एल.एल. 1100033 ने एच.पी. कॉम्प्यूटर, 2 जीबी रॅम, 500 जीबी हार्डडिस्क, इंटेल डयुअल कोअर, डीव्हीडी राईटर, माऊस वायफाय, वेबकॅम 20 इंची, एल.सी.डी. मॉनीटर सि.नं.4 सी.एस.232022 एम.इ. रुपये 29,000/- देवून खरेदी केलेची खरेदी बील तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केले आहे. तसेच जाबदार क्र. 3 ने ही बाब मान्य केली असून जाबदार क्र. 1,2, व 4 हे मे मंचात हजर राहीले नाहीत त्यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवाद सिध्द होते. प्रस्तुत कामी तक्रारदाराने खरेदी केले सदर कॉम्प्यूटरचे डेस्कटॉप/मॉनिटर चे स्क्रिनवर नीट डिस्प्ले होत नव्हता. हिरव्या रंगाच्या उभ्या रेषा येत होत्या. त्यामुळे तक्रारदाराने जाबदारांकडे तोंडी तक्रार केलेनंतर जाबदार क्र. 3 चे इंजिनियर येवून तपासणी करुन गेले परंतु त्यांनी दुरुस्तीसाठी किंवा इतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. व सेवेतील त्रुटी दुर केली नाही. म्हणून तक्रारदार यांनी जाबदाराला वकीलामार्फत नोटीस पाठविली आहे. व नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख केला की, दि.23/8/2013 रोजी मुराद काझी, अभियंता यांनी जाबदार क्र.3 मार्फत येऊन वर्क ऑर्डर क्र.पीसी/पीव्ही/13/00289 खाली ‘डिस्प्ले फ्लीकरींग अँन्ड ग्रीन कलर व्हर्टीकल लाईन कमिंग’ असा रिमार्क दिला. तथापी, जाबदारांना नोटीस पोहचूनदेखील त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा प्रस्तुत कॉम्प्यूटर डेस्कटॉपचे दुरुस्तीबाबत अथवा बदलून देणेबाबत कोणताच प्रतिसाद जाबदार यांनी दिलेला नाही. त्यामुळे जाबदारांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही बाब तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रांवरुन सिध्द होते. तसेच जाबदार क्र. 1,2 व 4 यांना नोटीस लागू होवूवनही ते मे.मंचात उपस्थित राहीले नाहीत किंवा तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन सदर जाबदारांनी खोडून काढलेले नाही तसेच सदोष कॉम्प्यूटरबाबत कोणतीही पूर्तता जाबदार यांनी केलेली नाही. सबब प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेचे स्पष्टपणे सिध्द होते म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वरील सर्व कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास करता तक्रारदाराने प्रस्तुत कामी सदर तक्रार अर्ज चालविणेचे अधिकारपत्र दाखल केलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराला प्रस्तुत तक्रार अर्ज चालवणेचा अधिकार आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार प्रस्तुत कामातील नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत कामातील जाबदार क्र. 1 ते 4 यांना याकामी तक्रारदाराचे नुकसानीसाठी जबाबदार धरणे न्यायोचीत होणार आहे. सबब प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारास वादातील सदोष कॉम्प्युटर ऐवजी नवीन व कार्यक्षम समान दर्जाचा कॉम्प्युटर देणे व तक्रारदाराने त्याचे ताबेतील सदोष कॉप्युटर जाबदार यांना परत करणे न्यायोचीत होणार आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना तक्रारीत नमूद कॉम्प्यूटरचे
बदल्यात नवीन, कार्यक्षम, समान दर्जाचा कॉम्प्यूटर द्यावा व तक्रारदाराने
त्याचे ताबेतील तक्रारीत नमूद कॉम्प्यूटर जाबदार यांना परत द्यावा.
3. तक्रारदाराचे दरम्यानचे नुकसानीसाठी रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास
हजार फक्त)जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारास अदा करावी.
4. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व तक्रार अर्जाचा
खर्च म्हणून रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) अदा करावेत.
5. वरील नमूद सर्व आदेशांचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत
करावे.
6. वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 10-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.