न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि प क्र.1 कंपनी ही वेगवेगळया शहरांमध्ये कॅम्पचे आयोजन करुन त्यांच्या मेंबर्सना आवडीनुसार सहलीचे आयोजन करुन त्यामध्ये हॉटेल, क्लब, रिसॉर्ट इतयादीची सोय उपलब्ध करुन देऊन सहलीचे पूर्णपणे नियोजन करुन देते. मार्च-2018 मध्ये वि प क्र.1 कंपनीने हॉटेल मराठा रिजन्सी, न्यु शाहूपुरी, कोल्हापूर येथे कॅम्पचे आयोजन केले होते. त्या कॅम्पमध्ये तक्रारदारास निमंत्रीत करुन वि प क्र.4 यांनी वि प क्र.1 कंपनीतर्फै देत असलेल्या सेवांची माहिती देऊन वि प क्र.1 कंपनीची मेंबरशिप घेण्याकरिता आकर्षित केले. तक्रारदार क्र.1 व 2 हे रिटायर्ड पती-पत्नी आहेत. वि प कंपनीतर्फै देत असलेल्या सेवा पाहून वि प क्र.4 यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वि प कंपनीला बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा ताराबाई पार्क,कोल्हापूर वरील दि.27/03/2018 रोजी रक्कम रु.25,000/-, दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक, शाखा नागाळा पार्क, कोल्हापूर वरील दि.27/03/2018 रोजी रु.10,000/- व भारतीय स्टेट बॅंक, शाखा राजारामपूरी वरील दि.27/03/2018 रोजी रक्कम रु.50,000/- असे एकूण रक्कम रु.85,000/- डेबीट कार्ड स्वाईप करुन अदा केलेले आहेत. वि प क्र.1 कंपनीचे PRO या नात्याने वि प क्र.4 यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारुन त्याच दिवशी म्हणजे दि.27/03/2018 रोजी तक्रारदारांबरोबर करार करुन वि प क्र.1 कंपनीचे मेंबर करुन घेतले. या कराराची मुदत 3 वर्षे इतकी ठरलेली असून त्या करारानुसार तक्रारदार यांना तयांचे कुटूंबातील दोन मोठी माणसे व दोन लहान मुले यांना प्रत्येक वर्षी 6 रात्री व 7 दिवस कोठेही (National अथवा International) तक्रारदारांच्या आवडीनुसार सहलींचे नियोजन करुन त्यामध्ये राहण्याची, जेवण्याची, क्लब, रिसॉर्ट इत्यादी सुविधांचे बुकींग कंपनीमार्फत करुन देण्यात येईल असे नमुद केलेले आहे.
त्यानंतर तक्रारदार यांनी दि.17/05/2018 रोजी विप कंपनीला ई-मेल करुन लोणावळा, महाबळेश्वर येथे 26 व 27 मे, 2018 या दिवशीच्या सहलीचे आयोजन करण्याबाबत कळविले असता वि प क.1 यांनी 15 दिवस अगोदर कळवावे लागेल असे सांगून ती सहल आयोजित करुन दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.03/09/18 ते 08/09/18 किंवा 24/09/18 ते 30/09/18 या कालावधीत केरळा, कन्याकुमारी येथे सहलीचे आयोजन करण्याबाबत विनंती केली, परंतु तेथे भरपूर पाऊस असलयाचे कारण सांगून वि प यांनी ती सहलदेखील रद्द केली. त्यानंतर पुन्हा तक्रारदारांनी दि.27/08/18 रोजी वि प क्र.1 यांना डिसेंबर-2018 ते मे-2018 या कालावधीत काश्मिर सहलीचे नियोजन करण्याबाबत ई-मेल पाठवून विनंती केली. परंतु सदर ई-मेलला वि प क.1 कंपनीकडून कोणतेही उत्तर आले नाही अगर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी वि प यांचेशी फोनव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. परंतु वि प यांचा फोन पूर्णपणे स्विच ऑफ असल्याने तक्रारदारांचा वि प कंपनीशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. दि.07/05/19 रोजी तक्रारदारास वि प कंपनीचा नवीन पत्ता समजला. तक्रारदारांनी दि.25/05/19 व 17/02/2020 रोजी सदर पत्त्यावर भेट देणेसाठी पुणे येथे गेले असता दोन्हीही वेळेस सदर कंपनीच्या पत्त्यावर कोणीही इसम मिळून आला नाही. तक्रारदार यांनी कंपनीबाबत जवळपास अधिक चौकशी केली असता वि प कंपनीवर अन्य मेंबर्सकडून त्यांची फसवणूक झाली असल्याने वि प कंपनी व त्यांचे डायरेक्टर्स यांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर या पोलीस स्टेशनला गु.र.नं.281/2019, भारतीय दंड संहिता कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हे नोंद झालेचे समजून आले. तक्रारदार यांनी कोल्हापूर येथे शाहुपूरी पोलीस स्टेशनला दि.20/02/2020 रोजी वि प कंपनीविरुध्द फिर्याद दाखल केली. तसेच दि.13/07/2020 रोजी अॅड.अश्विनी पळसुले यांचेमार्फत वि प यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली. परंतु सदरची नोटीस नॉट नोन शे-याने परत आली. अशाप्रकारे वि प यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी करुन तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास दिेलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास वि प यांचेविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
तक्रारदाराने वि प यांनी तक्रारदाराकडून भरुन घेतलेली मेंबरशीप फी रु.85,000/-, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि प यांचेकडून वसूल होऊन मिळावे तसेच सदर सर्व रक्कमेवर रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याज वि प क्र.1 ते 4 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार व वि प यांचेदरम्यान झालेला करार, तक्रारदाराने वि प यांना अदा केलेल्या रक्कमांचे एटीएम च्या पावत्या, बॅंकेंच्या बचत खातेवरील स्टेटमेंटची प्रत, तक्रारदाराने वि प यांना पाठविलेले मेल,वि प यांनी तक्रारदारास पाठविलेले मेल, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांनी तक्रारदारास दिलेली माहिती, तक्रारदाराने शाहुपूरी पोलीस स्टेशनला दिलेला तक्रार अर्ज, तक्रारदाराने वि प यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, त्याची रिसीट व नोटीस परत आलेला लखोटा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराच्या बँक ऑफ महाराष्ट्र, दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि. भारतीय स्टेट बँक कडील बचत खात्याचे सहीशिक्क्याचे स्टेटमेंट दाखल केले. पुराव्याचे शपथपत्र, व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. वि.प. क्र.1 ते 4 यांना सदर कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर न झालेने प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर दि.21/09/2021 रोजी पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून मेंबरशिपची भरलेली रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
मुद्दा क्र.1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 कडे दाखल केलेल्या तक्रारदार व वि प यांचेदरम्यान झालेला करारपत्राचे अवलोकन करता तक्रारदार व वि प यांचेदरम्यान मेंबरशीपबाबत करार झालेला असून त्यापोटी तक्रारदार यांनी वि प यांना रक्कम रु.85,000/- अदा केले असलेचा उल्लेख आहे. तसेच वि प यांनी प्रस्तुत कामी हजर होऊन सदरचा करार नाकारलेला नाही. यावरुन तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तक्रारदार व वि प यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेने स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांचे कथनानुसार, वि प क्र.1 कंपनी ही वेगवेगळया शहरांमध्ये कॅम्पचे आयोजन करुन त्यांच्या मेंबर्सना आवडीनुसार सहलीचे आयोजन करुन त्यामध्ये हॉटेल, क्लब, रिसॉर्ट इत्यादीची सोय उपलब्ध करुन देऊन सहलीचे पूर्णपणे नियोजन करुन देते. तक्रारदार क्र.1 व 2 हे रिटायर्ड पती-पत्नी आहेत. वि प कंपनीतर्फै देत असलेल्या सेवा पाहून वि प क्र.4 यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वि प कंपनीला बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा ताराबाई पार्क,कोल्हापूर वरील दि.27/03/2018 रोजी रक्कम रु.25,000/-, दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक, शाख नागाळा पार्क,कोल्हापूर वरील दि.27/03/2018 रोजी रु.10,000/- व भारतीय स्टेट बॅंक, शाखा राजारामपूरी वरील दि.27/03/2018 रोजी रक्कम रु.50,000/- असे एकूण रक्कम रु.85,000/- डेबीट कार्ड स्वाईप करुन अदा केलेले आहेत. वि प क्र.1 कंपनीचे PRO या नात्याने वि प क्र.4 यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारुन त्याच दिवशी म्हणजे दि.27/03/2018 रोजी तक्रारदारांबरोबर करार करुन वि प क्र.1 कंपनीचे मेंबर करुन घेतले. या कराराची मुदत 3 वर्षे इतकी ठरलेली असून त्या करारानुसार तक्रारदार यांना त्यांचे कुटूंबातील दोन मोठी माणसे व दोन लहान मुले यांना प्रत्येक वर्षी 6 रात्री व 7 दिवस कोठेही (National अथवा International) तक्रारदारांच्या आवडीनुसार सहलींचे नियोजन करुन त्यामध्ये राहण्याची, जेवण्याची, क्लब, रिसॉर्ट इत्यादी सुविधांचे बुकींग कंपनीमार्फत करुन देण्यात येईल असे नमुद केलेले होते. तक्रारदार यांनी दि.17/05/2018 रोजी विप कंपनीला ई-मेल करुन लोणावळा, महाबळेश्वर येथे 26 व 27 मे, 2018 या दिवशीच्या सहलीचे आयोजन करण्याबाबत कळविले असता वि प क.1 यांनी 15 दिवस अगोदर कळवावे लागेल असे सांगून ती सहल आयोजित करुन दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.03/09/18 ते 08/09/18 किंवा 24/09/18 ते 30/09/18 या कालावधीत केरळा, कन्याकुमारी येथे सहलीचे आयोजन करण्याबाबत विनंती केली, परंतु तेथे भरपूर पाऊस असल्याचे कारण सांगून वि प यांनी ती सहलदेखील रद्द केली. त्यानंतर पुन्हा तक्रारदारांनी दि.27/08/18 रोजी वि प क्र.1 यांना डिसेंबर-2018 ते मे-2018 या कालावधीत काश्मिर सहलीचे नियोजन करण्याबाबत ई-मेल पाठवून विनंती केली. परंतु सदर ई-मेलला वि प क.1 कंपनीकडून कोणतेही उत्तर आले नाही अगर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वि प कंपनीवर अन्य मेंबर्सकडून त्यांची फसवणूक झाली असल्याने वि प कंपनी व त्यांचे डायरेक्टर्स यांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर या पोलीस स्टेशनला गु.र.नं.281/2019, भारतीय दंड संहिता कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हे नोंद झालेचे समजून आले. तक्रारदार यांनी त्यांचीही वि प यांनी फसवण्सूाक केलेचे लक्षात आलेनंतर कोल्हापूर येथे शाहुपूरी पोलीस स्टेशनला दि.20/02/2020 रोजी वि प कंपनीविरुध्द फिर्याद दाखल केली.
तक्रारदाराने कागदयादीमध्ये अ.क्र.3 ते 5 कडे दाखल केलेल्या बँक पासबुकाचे स्टेटमेंट पाहता तक्रारदाराचे खातेवरुन वि प यांना एकूण रक्कम रु.85,000/- अदा केलेचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार व वि प यांचेदरम्यान झालेला करार पाहता त्यामध्ये वि प यांना तक्रारदाराकडून मेंबरशीपसाठी रक्कम रु.85,000/- मिळालेचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने वि प यांना पाठविलेल्या ई-मेलचे अवलोकन करता तक्रारदारांनी मागणी केलेल्या सहलींना वि प यांनी काही ना काही कारण सांगून सदर सहली रद्द केल्याचे दिसून येते. यावरुन वि प कंपनीने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेचे सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण वि प यांनी प्रस्तुत प्रकरणात हजर राहून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने नाकारलेली नाहीत किंवा त्याचा पुरावा देखील नाकारलेला नाही. त्यामुळे वि.प. यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. यावरुन तक्रारदार यांचेकडून मेंबर्सशीपसाठी रक्कम रु.85,000/- घेऊनही तक्रारदारास सेवा देणेमध्ये वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8. तक्रारदार यांनी वि प यांचेकडे मेंबर्सशीपसाठी भरलेली रक्कम रु.85,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच सदर रक्कमेवर मेंबरशिपसाठी रक्कम वि प यांचेकडे जमा केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्कके व्याज वि प क्र.1 ते 4 यांचेकडून मिळाणेस तक्रारदार पात्र आहेत असा या आयोगाचा निष्कर्ष आहे. परंतु तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी मागितलेली रक्कम रु.50,000/- ही अवाजवी व अवास्तव वाटते. परंतु प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता तक्रारदाराला मानसिक व आर्थिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करणे न्यायाचित वाटते. म्हणून हे आयोग मुद्दा क्र.3 चे उत्तर होय अंशत: असे देत आहोत.
सबब प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श –
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराकडून मेंबरशीपसाठी घेतलेली रक्कम रु.85,000/- (रक्कम रुपये पंच्याऐंशी हजार फक्त) अदा करावी. तसेच सदर रक्कमेवर मेंबरशिपसाठी रक्कम भरले तारखेपासून ते रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 % व्याज तक्रारदारास अदा करावे.
3) वि.प.क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 कलम 71 व 72
प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.