नि.70 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 01/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि. 1/1/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि. 16/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या 1) श्री आसिफ अब्बास नाडकर, 2) श्री. हाजी यासीन सुलेमान होडेकर दोन्ही रा. अलरज्जाक कॉम्प्लेक्स झारणी रोड, प्लॅट नं.16 दूसरा मजला बाजार पेठ रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1) श्रीम. जुलेखा अब्दुल रज्जाक पावसकर तर्फे मुखत्यार इकबाल अहमद फोडकर 2) श्री इकबाल अहमद फोडकर दोन्ही रा.घर नं.2393 कॉन्व्हेंट स्कूल जवळ, रत्नागिरी ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री. वाय. पी. गुरव सामनेवालेतर्फे : एकतर्फा -: नि का ल प त्र :- द्वारा : मा. अध्यक्ष, श्री अनिल गोडसे 1) तक्रारदार यांनी सदरची तक्रार त्यांच्या सदनिकेबाबतच्या सदोष सेवेबाबत दाखल केली आहे. 2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खलीलप्रमाणे ः- तक्रारदार यांनी दि.03/05/2006 रोजीच्या खरेदीखताने सामनेवाला यांनी मौजे रत्नागिरी येथे बांधलेल्या अलरज्जाक कॉम्प्लेक्स मधिल निवासी सदनिका खरेदी केली. सदर सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना सन 2007 रोजी मिळाला. तक्रारदार यांनी ताबा स्विकारल्यानंतर सदनिकेतील बरीचशी कामे अपूर्ण होती. तसेच केलेल्या कामामध्ये अनेक दोष दिसून आले. तसेच विदयूत मिटरसाठी रक्कम रु.15,000/- स्विकारुनही सामनेवाला यांनी विदयूत जोडणी घेऊन दिली नाही त्यामूळे तक्रारदार यांनी स्वतः खर्च करुन विदयुत कनेक्शन घेतले. सामनेवाला यांचेकडे वारंवार दोष दूर करुन देणेसाठी व अपूर्ण कामाची पूर्तता करुन देणेसाठी मागणी करुनही सामनेवाला यांनी त्याकडे दूर्लक्ष केले त्यामुळे तक्रारदार यांनी बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन देणेसाठी तसेच बांधकामातील दोष दूर करुन देणेसाठी तसेच विदयुत जोडणीसाठी घेतलेली रक्कम रु.15,000/- परत मिळणेसाठी व इतर अन्य मागण्यांसाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.2 वर शपथपत्र व नि.5 च्या यादीने एकुण 3 कागद दाखल केले आहेत. तसेच तक्रारदार यांनी नि.14 च्या यादीने एकुण 5 कागद दाखल केले आहेत. व नि.18 च्या यादीने एकुण 3 कागद दाखल केले आहेत. 3) सामनेवाला क्र.1 यांना या कामी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवूनही ते याकामी हजर राहीले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुद्ध प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश नि.1 वर करण्यात आला. तक्रारदार यांनी नि.12 वरील अर्जान्वये प्रस्तुतच्या तक्रारअर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केल्याने तक्रारदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे नि.1 वर दुरुस्ती करण्यात आली. तक्रारदार यांनी नि.53 वर दुरुस्तीचा अर्ज देऊन प्रस्तुत कामी सामनेवाला क्र. 2 यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील करुन घेण्यात यावे अशी मागणी केल्याने तक्रारदार यांचा सदरचा अर्ज मंजूर करण्यात आला व त्याप्रमाणे सामनेवाले क्र. 2 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. तथापी नोटीस मिळूनही सामनेवाले क्र. 2 याकामी हजर झाले नाहीत त्यामुळे सामनेवाला क्र. 2 विरुद्ध प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश नि. 1 वर करण्यात आला. 4) तक्रारदार यांनी नि.20 वर कोर्टकमिशनर नेमणूकीचा अर्ज सादर केला. त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, रत्नागिरी यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याप्रमाणे कोर्ट कमिशनर यांनी आपला अहवाल नि. 43 वर दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.47 वर सदरचा अहवाल मान्य असल्याचे म्हणणे दिले आहे. तक्रारदार यांनी नि.67 वर प्रस्तुत तक्रार हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरशीस सादर केली आहे. 5) तक्ररदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तसेच तक्रारदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आल्यावर खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1) | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? | होय. | 2) | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय? | अंशतः मंजूर | 3) | तक्रारदार यांच्या तक्रारअर्जास मुदतीची बाधा येते काय? | काही मागण्या मुदतबाहय असल्याने नामंजूर. | 4) | सदर प्रकरणी होणारा आदेश सामनेवाला क्र.1 व 2 यांचेवर वैयक्तिक रित्या अथवा संयुक्तिक रित्या बंधनकारक आहे का? | नाही. | 5) | काय आदेश? | अंतिम आदेशाप्रमाणे |
विवेचन 6) मुद्दा क्र.1 ः- सामनेवाला यांनी सदनिकेचा ताबा देऊनही सदर सदनिकेमध्ये अनेक कामे अपूर्ण ठेवली तसेच केलेल्या बांधकामामध्येही अनेक त्रुटी ठेवल्या हे नि.क्र.43 वर दाखल कमीशन अहवालावरुन दिसून येते. तसेच सदनिकेचा ताबा देऊनही त्यामध्ये विदयुत कनेक्शन घेऊन दिले नाही. तक्रारदार यांना स्वतःच्या खर्चाने विदयुत कनेक्शन घ्यावे लागले. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी दुर्लक्ष केले व प्रस्तुत प्रकरणी गैरहजर राहीले. यासर्व बाबी सामनेवाला यांचे दोषपूर्ण सेवेच्या द्योतक आहेत. त्यामुळे तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 7) मुद्दा क्र. 2 व 3 एकत्रित ः- तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन देण्यासाठी आदेश करावेत, वीज मीटरसाठी घेतलेली रक्कम रु.15000/- परत मिळावेत, पाण्याची व्यवस्था योग्य रित्या उपलब्ध करुन देण्यासाठी आदेश व्हावा, सदनिकेचे रंगकाम करुन देण्याबाबत योग्य ते आदेश व्हावेत, तसेच सदनिकेच्या गॅलरीजना ग्रिल्स बसवून मिळाव्यात, खराब दरवाजे बदलून मिळावेत, किचनमधील ओटयाला पूर्ण टाईल्स बसूवून मिळाव्यात, तसेच शारीरीक-मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळावी, तक्रारअर्जाचा खर्च मिळावा इत्यादी मागण्या केल्या आहेत. सामनेवाला यांनी कबूल करुनही सर्व गोष्टीची पूर्तता कराराप्रमाणे करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करावा लागला असे तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. तसेच कोर्ट कमीशनर यांनी नि.43 वरील अहवालामध्येही सदनिकेमध्ये असणा-या त्रुटी व त्याचे निराकरण करण्यासाठी येणा-या खर्चाबाबतचा अहवाल सादर केला. सामनेवाला यांनी प्रस्तुत कामी आपले म्हणणे सादर केले नाही अथवा ते याकामी हजर झाले नाहीत तसेच सामनेवाला क्र.2 इक्बाल फोडकर यांनी दि.30/4/2010 रोजी नि.31 वर अर्ज देऊन प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केल्याचे दिसून येते. यासर्व बाबीचे अवलोकन करता सामनेवाला हे जाणूनबुजून याकामी हजर राहीले नसल्याचे त्यांचेविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढण्यात यावा असा युक्तिवाद तक्रारदार यांचे विधिज्ञांनी केला. 8) तक्रारदार यांनी विनंती कलम 16 मध्ये नमूद केल्याप्रमाणे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन दयावे त्यामध्ये त्यांनी प्लास्टरचे व रंगकामाचे काम अपूर्ण आहे तसेच इतर अन्य मागण्या केल्या आहेत. सदरच्या मागण्या हया सामाईक स्वरुपाच्या असल्याने तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 13 (6) अन्वये तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी योग्य ती परवानगी घेतली नाही अथवा त्याप्रमाणे पूर्तता केली नाही. त्यामुळे त्याबाबत कोणताही आदेश करणे योग्य ठरणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. 9) तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये सामनेवाला यांनी केलेल्या कामामध्ये त्रुटी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खराब दरवाजे बदलून द्यावेत, दरवाज्याचे कडीकोयंडे व्यवस्थित नाहीत इत्यादी बाबींचा उल्लेख केला आहे. तक्रारदार यांनी दि.8/2/2006 रोजी खरेदीखत करुन घेतले आहे व 2007 मध्ये सदनिकेचा ताबा घेतला असे तक्रारदार याने आपल्या तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सदरची तक्रार दि.1/1/2010 रोजी दाखल केली आहे त्यामुळे तक्रारदार यांच्या सदरच्या मागण्या मुदतबाहय झाल्या असल्याने नामंजूर करण्यात येत आहेत. 10) तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये सामनेवाला यांनी वीज मिटरसाठी रक्कम रु. 15000/- स्विकारुनही विदयुत मिटर दिला नाही त्यामुळे तक्रारदार यांना स्वःखर्चाने विदयुत मिटर घ्यावा लागला त्यासाठी रक्कम रु.4000/- खर्च आला त्यामूळे सदरची रक्कम परत मिळावी अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदार यांच्या मागणीच्या पुष्टर्थ स्वतःचे शपथ दाखल केले आहे. सामनेवाला यांनी आपले म्हणणे दाखल केले नसल्याने याकामी त्यांचेविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढण्यात येऊन तक्रारदार यांच्याकडून विदयुत जोडणीपोटी स्विकारलेले रक्कम रु.15000/- परत करणेबाबत आदेश करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. 11) तक्रारदार यांनी पाण्याची व्यवस्था योग्यरित्या उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. कमीशनर यांनी आपल्या अहवालामध्ये प्रत्येक सदनिकाधारकांनी स्वतंत्र पाण्याची मोटर बसवून सदनिकेत पाणीपुरवठा व्यवस्था केली आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे त्याबाबत कोणताही आदेश करण्यात येत नाही. तक्रारदारांनी सदनिकेला आतून रंगकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे. कमीशनर यांनी आपल्या अहवालामध्ये सदनिकेला रंगकाम केले आहे परंतू ते आता खराब झाले आहे. कमीशनर यांनी दिलेला अहवाल व तक्रारदार यांनी सदनिकेचा ताबा सन 2007 मध्ये घेतला असल्याचे लक्षात घेता तक्रारदार यांची सदरची मागणी अमान्य करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी ग्रिल्स बसवून देण्याबाबत व किचनमधील ओटयाला पूर्ण टाईल्स बसवून मिळण्याबाबत मागणी केली आहे. सामनेवाला यांनी त्याबाबत आपले कोणतेही म्हणणे सादर न केल्याने कोर्ट कमीशनर यांनी याबाबत सुचविलेला खर्च अनुक्रमे रक्कम रु.8000/- व रु.5000/- मंजूर करण्यात येत आहे. 12) तक्रारदार यांनी शारीरीक-मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रारअर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. सामनेवाला यांच्या सदोष सेवेमुळे तक्ररदार यांना झालेल्या शारीरीक-मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- मंजूर करणे योग्य होईल असे मंचाचे मत झाले आहे. 13) मुद्दा क्र.4 ः- तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र. 2 यांना याकामी सामील करुन त्यांचेविरुद्ध संयुक्तिक रित्या आदेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी आपल्या अर्जामध्ये सामनेवाला क्र. 2 यांनी विकासक म्हणून काम पाहीले आहे असे नमूद केले आहे. वस्तुतः सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 यांचे मुखत्यार आहेत. सामनेवाला क्र. 2 यांनी विकासक म्हणून काम पाहीलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणलेला नाही त्यामुळे याकामी होणा-या आदेशाची पूर्तता करण्यासाठी सामनेवाला क्र. 2 यांना संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी वर विवेचनात नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.28,000/- अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 3) तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी शारीरीक-मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 4) वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी दि. 31/12/2010 पर्यंत करण्याचे आहे. 5) सामनेवाला क्र.1 यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 16/11/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |