आदेश पारीत व्दारा - श्री अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य -
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम – 12 अंतर्गत विरुध्दपक्षाकडून मोबाईल फोन खरेदी आणि सेवेत दिलेल्या त्रुटीसंबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याच्या कथनानुसार विरुध्दपक्ष क्र.1 हे इनटेक्स टेक्नॉलजी लिमिटेड कंपनी असून INTEX मोबाईल फोनचे निर्माते आहेत. विरुध्दपक्ष क्र.2 हे मोबाईल फोन विक्रेते आहे व विरुध्दपक्ष क्र.3 हे विरुध्दपक्ष क्रं 1 चे अधिकृत सर्विस सेंटर चालवितात.
3. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 कडून इनटेक्स कंपनीचे दोन मोबाईल हॅन्डसेट दिनांक 5.2.2015 ला Intex Aqua Styled Vx 911404150435355 व 5.3.2015 रोजी Intex Aqua Styled Vx 911404150540237 खरेदी केले ज्याची किंमत रुपये 6,150/- होती. दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेला मोबाईल हॅन्डसेट 10-12 दिवसानंतर बंद पडला त्यामुळे सदर फोन विरुध्दपक्ष क्र.1 च्या सर्व्हीस सेंटरला देण्यात आला, परंतु दोन महिने उलटूनही सर्व्हीस सेंटरने तक्रारकर्त्यास फोन परत केला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 5.3.2015 रोजी खरेदी केलेला मोबाईल हॅन्डसेट 5-7 दिवसानंतर बंद पडला, सदर फोन विरुध्दपक्ष क्र.1 च्या सर्व्हीस सेंटरकडे जमा केला असता त्याने नवीन मोबाईल हॅन्डसेट तक्रारकर्त्यास दिला. दिनांक 5.2.2015 रोजी विकत घेतलेला मोबाईल हॅन्डसेट तीन-चार महिने उलटून गेल्यावरही सर्व्हीस सेंटरकडून परत मिळाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 17.10.2015 रोजी वकीला मार्फत विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना कायदेशिर नोटीस पाठविला. परंतु, विरुध्दपक्षाने सदर नोटीसची कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या सेवेत त्रुटी असल्याचे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करून दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेल्या मोबाईल ऐवजी त्याच कंपनीचा नवीन मोबाईल हॅन्डसेट देण्याचे व नवीन मोबाईल हॅन्डसेट देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दिलेल्या रु 6,150/-, द.सा.द.शे. 18 % व्याजासह परतीचे आदेश, तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 8,000/- देण्याचे मागणीसह प्रस्तुत तक्रार दाखल केली.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्षांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली. परंतु, विरुध्दपक्ष नोटीस मिळूनही मंचासमक्ष हजर झाले नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आले.
5. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद सादर केला नाही व त्याची तक्रार व शपथपत्र हाच युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. मंचासमोर अभिलेखावर दाखल केलेली तक्रार, दस्ताऐवजाचे अवलोकन केले, त्यानुसार खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं.2 कडून दोन मोबाईल हॅन्डसेट दिनांक 5.2.2015 ला Intex Aqua Styled Vx 911404150435355 व 5.3.2015 रोजी Intex Aqua Styled Vx 911404150540237 खरेदी केल्याचे निवेदन दिले.
a) तक्रारकर्त्याने (दस्ताऐवज क्रं.1) दिनांक 5.3.2015 रोजी खरेदी केलेल्या मोबाइल फोनचा टॅक्स ईनवॉईस क्रं. 24324 (Intex Aqua Styled VX 911404150540237) मंचासमोर सादर केला. सदर मोबाइल हँडसेट 5-7 दिवसात नादुरुस्त झाल्याने विरुध्दपक्ष क्रं. 1 च्या अधिकृत सर्विस सेंटरला जमा केला असता त्याबदल्यात नवीन मोबाइल हँडसेट मिळाल्याचे मान्य केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं. 1 च्या अधिकृत सर्विस सेंटर बाबत किंवा फोन जमा केल्यासंबंधी माहिती सादर केली नाही तसेच तक्रारीचे प्रार्थनेमध्ये त्याबाबत कुठलीही मागणी नसल्याने सदर (Intex Aqua Styled VX 911404150540237) मोबाइल हँडसेट बाबत कुठलेही आदेश पारित करण्याची गरज नसल्याचे मंचाचे मत आहे.
b) दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेल्या मोबाईल फोनकरीता (Intex Aqua Styled Vx 911404150435355) खरेदी इनवॉईस दाखल केला नाही. तसेच, दोन्ही हॅन्डसेट खराब झाल्याचे निवेदन दिले असले तरी (दस्ताऐवज क्रं. 2) दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेला मोबाईल दुरुस्तीकरीता/नवीन मोबाईल मिळण्यासाठी निलावार मोबाईल शॉपी, यवतमाळ यांचेकडे दि. 03.03.2015 रोजी जमा केल्याचे दिसते. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेला मोबाईल नंबर 911404150435355 हा दिला असला तरी (दस्ताऐवज क्रं. 2 – Service Request) मधील फोनचा क्रं 911404150435255 वेगळा असल्याचे दिसतो. सदर बाब जरी टंकलेखनातील चूक म्हणून दुर्लक्ष केली तरी निलावार मोबाईल शॉपी, यवतमाळ यांना प्रस्तुत तक्रारीत प्रतिपक्ष म्हणून सामील केल्याचे दिसत नाही व निलावार मोबाईल शॉपी विरुध्दपक्ष क्रं.1 चे अधिकृत सर्विस सेंटर असल्याबाबत कुठलाही पुरावा मंचासमोर सादर केला नाही.
c) तक्रारकर्त्याने नादुरुस्त मोबाइल फोन विरुध्दपक्ष क्रं. 3 कडे जमा केल्याचे निवेदन दिले असले तरी प्रत्यक्ष तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं. 3 म्हणजे प्रथमेश सर्व्हीस सेंटर, रामदासपेठ, नागपुर यांचेकडे फोन जमा केल्याबाबत कुठलाही पुरावा/दस्तऐवज मंचासमोर सादर केला नाही. तसेच निलावार मोबाईल शॉपी, यवतमाळ आणि विरुध्दपक्ष क्रं.3 यांचा काही संबंध असल्याबाबत निवेदन अथवा पुरावा मंचासमोर सादर केला नाही. त्यामुळे तक्रारीतील विरुध्दपक्ष क्रं. 3 प्रथमेश सर्व्हीस सेंटर, रामदासपेठ, नागपुर विरुध्द कोणताही आदेश पारीत करणे शक्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विकत घेतलेले दोन मोबाईल बद्दल असली तरी विरुध्दपक्ष क्रं.2 कडून नविन मोबाईल विकत घेतल्यासंबंधी दि. 05.03.2015 रोजीचा एकच टॅक्स इनवॉइस (दस्ताऐवज क्रं.1) मंचासमोर सादर केला आणि तक्रारीचे प्रार्थनेमध्ये त्याबाबत कुठलीही मागणी नसल्याने सदर (Intex Aqua Styled VX 911404150540237) मोबाइल हँडसेट बाबत कुठलेही आदेश पारित करण्याची गरज नसल्याचे मंचाचे मत आहे.
8. दिनांक 5.2.2015 रोजी खरेदी केलेल्या मोबाईल फोनकरीता (Intex Aqua Styled Vx 911404150435355) खरेदी इनवॉईस दाखल केला नाही तसेच प्रार्थना विरुध्दपक्ष क्रं. 3 कडे जमा केलेल्या नादुरुस्त मोबाइल फोनसंबंधी आहे. परंतु, विरुध्दपक्ष क्रं. 3 कडे मोबाईल हँडसेट जमा केल्याबाबत कुठलाही पुरावा मंचासमोर सादर केला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं. 2 बाबत कुठलीही तक्रार असल्याचे अथवा त्यांचा थेट संबंध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं. 2 यांचे विरुध्द तक्रारकर्त्याचे मागणीनुसार आदेश पारीत करणे शक्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
9. तक्रारकर्त्याने सादर केलेल्या दस्ताऐवजांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता व वरील संपूर्ण वस्तुस्थिती लक्षात घेता विरुध्दपक्ष क्रं.1 यांचे विरुध्द देखील कोणताही आदेश पारीत करणे शक्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने तक्रार मंजूर करण्यासाठी असलेले आवश्यक दस्तऐवज सादर केले नाहीत. तसेच सादर दस्तऐवजात व निवेदनात विसंगती असुन तक्रार मंजूर करण्या योग्य नाहीत त्यामुळे तक्रारकर्त्याबद्दल सहानुभूती असली तरी तक्रार मंजुर करणे शक्य नसल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यालायक आहे. सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतात.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.