मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा अकोला येथील रहिवासी आहे व विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही जागतिक दर्जाची इंटेक्स मोबाईल हॅण्डसेटची उत्पादक व विक्रेता कंपनी असून त्यांचा जगामध्ये चांगला नावलौकिक आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 कंपनीचे अकोला येथील विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे अधिकृत विक्रेता असून विरुध्दपक्ष क्रमांक 3 हे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. तक्रारकर्ता स्वत:च्या वापराकरिता व खाजगी कामासाठी मल्टीमिडीया मोबाईल फोन घेऊ इच्छित होता म्हणून त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याकडून दिनांक 18-12-2014 रोजी इंटेक्स एक्वा पॉवर, ईएमआय क्रमांक 911429060438936 चा बिल क्रमांक 647 नुसार एकूण ₹ 8,300/- मध्ये विकत घेतला असून तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदयान्वये विरुध्दपक्ष यांचा ग्राहक झाला आहे.
सदरचा मोबाईल विकतांना विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे प्रतिनिधीने सांगितले व हमी दिली की, सदरहू मोबाईल हॅण्डसेट उच्च प्रतीचा असून संपूर्णत: दोषमुक्त आहे. तसेच सदर मोबाईल हा अत्याधुनिक असून उत्तम दर्जाचा विरुध्दपक्ष क्रमांक 1 कंपनी द्वारे निर्मित आहे आणि तो वापरण्याकरिता सोयीस्कर व हाताळण्यास खूप सोपा आहे तसेच सदरहू मोबाईलची वॉरंट/गॅरंटी ही विकत घेतल्याच्या दिनांकापासून एक वर्षाची राहणार आहे म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून सदरचा मोबाईल ₹ 8,300/- अदा करुन विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर काही दिवसांनीच सदर मोबाईल हॅण्डसेटचा टच स्क्रीन पॅड म्हणजे डिस्प्ले हा काम करीत नव्हता आणि तो आपोआप बंद झाला म्हणून तक्रारकर्त्याने सदर मोबाईल हॅण्डसेट दोन तीन वेळा चालू बंद केला असता सदर मोबाईल हॅन्डसेटचा टच स्क्रीन पॅड सुरु झाला. त्यानंतर दिनांक 15-01-2015 ला पुन्हा सदर मोबाईल हॅण्ड सेटचे टच स्क्रीन पूर्णत: काम करणे बंद चालू होत होते, यावरुन तक्रारकर्त्याला असे कळले की, सदरच्या मोबाईलचे सेंसर काम करत नाही व सदर अप्लीकेशन व्यवस्थित काम करत नाहीत. तक्रारकर्ता त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या दुकानावर गेला आणि त्यांना सदर मोबाइल हॅण्डसेटबाबत तक्रार केली. त्यावेळेस विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे प्रतिनिधीने सदर मोबाईल हॅण्डसेटच्या तक्रारीबाबत विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे पाठविले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या सांगण्यानुसार दिनांक 19-01-2014 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे गेले असता विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने सांगितले की, सदर मोबाईल हॅण्डसेटचा बिघाड आम्ही दुरुस्त करु शकत नाही कारण आमच्याकडे सॉफ्टवेअर सुध्दा उपलब्ध नाही व अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे देवून तक्रारकर्त्याला परत पाठविले व तक्रारकर्त्याला जॉबशिट सुध्दा दिली नाही.
तक्रारकर्त्याने मोठी रक्कम खर्च करुन मोठया आशेने सदरचा महागडा मोबाईल विकत घेतला आहे. तक्रारकर्त्याला व्यवसायानिमित्त नेहमी महत्वाचे फोन कॉल येत असतात याशिवाय तक्रारकर्ता हा सदरच्या मोबाईलद्वारे इंटरनेट व सोशल नेटवर्किंग चा वापर करत असतात. परंतु, सदरच्या दोषयुक्त हॅन्डसेटमुळे तक्रारकर्त्याचा भ्रमनिराश झाला असून त्यांना मोबाईलचा वापर व उपभोग घेता आला नाही व सदरचा मोबाईल हा बंद स्थितीत पडलेला आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने मोबाईल हॅण्डसेट खराब झाल्याची खोटी कारणे नमूद करुन मोबाईल हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला नाही म्हणून शेवटी नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने ई-मेलद्वारे सर्व्हिस सेंटरला दिनांक 24-02-2015 रोजी ई-मेल तक्रार करुन सदरच्या हॅण्डसेटची तक्रार नोंदविली. परंतु, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्याचा मोबाईलचे दुरुस्तीकरिता स्विकारला नसून कुठलेही जॉबशिट तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला कंपनीकडे त्यांनी मागितलेली माहिती पुरविता आली नाही. एकंदरीत विरुध्दपक्ष यांनी या ना त्या कारणाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे समाधान केले नाही. यास्तव, तक्रारकर्त्याची प्रार्थना अशी की, 1) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्याचा इंटेक्स एक्वा पॉवर मोबाईल हॅण्डसेट, मोफत, कोणतेही शुल्क न आकारता पूर्णपणे दुरुस्त करुन दयावा किंवा शक्य नसल्यास तो बदलून त्याच किंमतीचा नवीन मोबाईल हॅण्डसेट तक्रारकर्त्याला दयावा किंवा मोबाईल हॅण्डसेटची किंमत ₹ 8,300/- तक्रारकर्त्याला व्याजासह परत दयावी. 2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्तरित्या किंवा वैयक्तिकपणे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईची रक्कम ₹ 25,000/- व्याजासह दयावे. 3) आदेशित रकमेवर दर साल दर शेकडा 18 टक्केप्रमाणे व्याज देण्यात यावे. 4) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्तरित्या किंवा वैयक्तिकपणे या तक्रारीचा खर्च ₹ 10,000/- तक्रारकर्त्याला दयावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 03 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 यांचा संयुक्त लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 यांनी प्रस्तुत प्रकरणात त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहूतांश विधाने अमान्य करुन आपल्या जवाबात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार मोबाईलच्या टच स्क्रिन मध्ये बिघाड आला, हे म्हणणे कबुल नाही. त्यांच्या मोबाईल मध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला असल्यास त्यांनी त्यांचा मोबाईल हा कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राला दुरुस्तीकरिता देणे जरुरी आहे. त्यांनी सेवा केंद्राला मोबाईल दुरुस्तीला दिला व त्यांना सेवा केंद्राने जॉबशिट दिली नाही, हे म्हणणे कबूल नाही. तक्रारकर्त्याने जर मोबाईल सेवा केंद्राला दिला असता तर विना जॉबशिट देता, सेवा केंद्राने मोबाईल घेतला नसता. म्हणजे, तक्रारकर्त्याने सेवा केंद्राला मोबाईल दुरुस्तीकरिता दिला नसेल, म्हणून त्यांना जॉबशिट मिळाली नसेल, यामध्ये सेवा केंद्राने कुठल्याही प्रकारचा, कर्तव्यामध्ये कसूर केलेला नाही.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार, त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहूतांश विधाने अमान्य करुन अधिकच्या जवाबात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने ज्या मोबाईल हॅण्डसेटची मागणी केली तो हॅण्डसेट विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्यास दाखविला. त्यानंतर तक्रारकर्त्याने हॅण्डसेटच्या बॉक्सवरील विवरण पाहून विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून मोबाईल हॅण्डसेट विकत घेतला आहे तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून मोबाईल हॅण्डसेट विकत घेतांना विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे सर्व्हिस सेंटरची माहिती विचारली विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला सर्व्हिस सेंटर बद्दल माहिती दिली. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून तक्रारकर्त्याने मोबाईल संच विकत घेतल्यानंतर बॉकसमधून संच काढून त्यामध्ये तक्रारकर्ता यांनी त्यांचे सिमकार्ड लावून व मोबाईल संच सुरु करुन पाहिला व त्यानंतर तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून मोबाईल संचाचे बिल व मोबाईल संच बॉक्स सहित घेऊन गेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना तक्रारकर्ता यांचेकडून मोबाईल संच विकल्याची किंमत मिळाली आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 2 हे केवळ मोबाईल संच विक्रेते आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 2 हयांना तक्रारकर्ता हयांनी कोणतेही कारण नसतांना केवळ औपचारिक पक्षकार म्हणून सदरहू तक्रारीमध्ये पक्ष केले आहे. वास्तविकत: विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना तक्रारीमध्ये पक्ष करण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून मोबाईल संच विकत घेतांना मोबाईल संचाचा तपशील, गुणवत्ता व सेवा केंद्राची उपलब्धता, वॉरंटी कालावधी या सर्व बाबींची चौकशी करुन, वाचून व समजून, मोबाईल संच विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून विकत घेतला आहे. तक्रारकर्त्याची तक्रार ही विरुध्दपक्ष क्रमांक 2 विरुध्द खारीज करण्यात यावी, ही विनंती.
:: का र णे व नि ष्क र्ष ::
सदर प्रकरणात तक्रारकर्ते सतत गैरहजर असून त्यांनी संधी देऊनही युक्तीवाद केला नाही, त्यामुळे दाखल तक्रार व कागदपत्रे विचारात घेऊन तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 चा संयुक्त लेखी जवाब, विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा स्वतंत्र लेखी जवाब, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने दाखल केलेली पुरसीस व विरुध्दपक्ष क्रमांक 2 तर्फे युक्तीवादाची पुरसीस यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याकडून, विरुध्दपक्ष क्रमांक 1 उत्पादित इंटेक्स एक्वा पॉवर मोबाईल हॅण्डसेट दिनांक 18-12-2014 रोजी ₹ 8,300/- मध्ये विकत घेतला होता ही बाब वादातीत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त दिनांक 24-02-2015 रोजीची विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या कंपनीवर दिलेली ई-मेल तक्रार प्रत व त्यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून आलेले ई-मेल उत्तर यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांची सदर मोबाईल बद्दल तक्रार होती व त्याबद्दल विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याला जॉब शिट क्रमांक ( if any ) रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक व आयएमईआय क्रमांक याबद्दल विचारणा केलेली दिसते. विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांनी जवाबात तक्रारकर्त्याची मोबाईलबद्दल तक्रार नाकारलेली आहे. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 सदर मोबाईलची उत्पादक कंपनी यांनी दिनांक 17-07-2015 रोजी रेकॉर्डवर पुरसिस दाखल करुन मंचाला असे कळविले की, “ तक्रारकर्ता श्री. प्रदीप ललीतकुमार शर्मा यांची तक्रार क्रमांक CC/138/2015 अनुसरुन तक्रारकर्ता आणि कंपनीच्या ग्राहक सेवा टिम सोबत झालेल्या बोलण्यानुसार तक्रारकर्त्याने त्यांचा मोबाईल दुरुस्तीकरिता कंपनीच्या सेवा केंद्रावर जमा करणे आवश्यक होते. पण तक्रारकर्ते फक्त फोनवरच बोलले. त्यांनी आलेल्या अडचणींकरिता मोबाईल सेवा केंद्रावर जमा केला असता तर त्यांना त्याच वेळेस दुरुस्त करुन मिळाला असता.
कंपनी, ग्राहकाच्या समाधानाकरिता व सेवेकरिता कंपनीकडून जे काही सहकार्य करता येते, ते कंपनी करावयास तयार आहे. तक्रारकर्त्याचा मोबाईल ॲक्वा पॉवर त्यांच्या सांगण्यानुसार कंपनी त्यांना नवीन हॅण्डसेट ॲक्वा पॉवर किंवा त्यापेक्षा अद्यावत मोबाईल हॅण्डसेट देण्यास तयार आहे. तरी विदयमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच यांना नम्र विनंती की, तक्रारकर्त्याला नवीन हॅण्डसेट देवून तक्रारीचा निपटारा करण्यात यावा.” विरुदपक्ष क्रमांक 1 च्या सदर पुरसीस मधील कथनाला अनुसरुन विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याचा वादातीत मोबाईल हॅण्डसेट बदलून त्याच किंमतीचा नवा मोबाईल हॅण्डसेट तक्रारकर्त्यास दयावा किंवा त्याच किंमतीचा वादातील मोबाईलपेक्षा अद्यावत मोबाईल हॅण्डसेट दयावा, असे आदेश मंच पारीत करत आहे. तक्रारकर्त्याच्या ईतर मागण्या मात्र फेटाळण्यात येतात. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 इन्टेक्स टेक्नॉलॉजी इंडिया यांनी तक्रारकर्त्याचा इंटेक्स ॲक्वा पॉवर मोबाईल हॅण्डसेट बदलून त्याच किंमतीचा नवीन मोबाईल हॅण्डसेट तक्रारकर्त्यास दयावा किंवा त्याच किंमतीत वादातीत मोबाईलपेक्षा अद्यावत मोबाईल हॅण्डसेट तक्रारकर्त्यास दयावा.
सदर आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आदेश प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
तक्रारकर्त्याच्या ईतर मागण्या फेटाळण्यात येतात.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.