तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले क्र 1 ः- एकतर्फा/प्रतिनीधी श्री. संजय महाडिक
सामनेवाले क्र 2 व 3 ः- एकतर्फा
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 11/12/2017 रोजी घोषीत )
1. तक्रारदारानी मोबाईल फोन विकत घेतला परंतू त्यामध्ये लगेच दोष आढळून आल्यामूळे व दुरूस्ती करून मोबाईल परत न केल्यामूळे ही तक्रार दाखल केली. उत्पादक कंपनी विक्रेता व सेवाकेंद्र यांना नोटीस पाठविण्यात आली. परंतू ते मंचात उपस्थित झाले नाही.तसेच, लेखीकैफियत न दाखल केल्यामूळे त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात येत आहे. सामनेवाले क्र 1 व 3 यांना नोटीस प्राप्त झाल्याबाबत ट्रॅक रिपोर्ट सादर आहे व सामनेवाले क्र 2 यांना नोटीस प्राप्त झाल्याबाबत ट्रॅक रिपोर्ट तसेच पोचपावती संचिकेत दाखल आहे.
2. तक्रारदारानूसार त्यांनी दि. 11/10/2014 ला सामनेवाले क्र 2 यांचे दुकानातुन सामनेवाले क्र 1 यांनी उत्पादित केलेला मोबाईल रू. 4,250/-,अदा करून विकत घेतला. त्याबाबतची पावती तक्रारीसोबत दाखल करण्यात आली आहे. चार पाच माहिन्यानंतर मोबाईलमध्ये त्रृटी जाणवू लागल्या. त्यामुळे दि. 30/03/2015 ला सामनेवाले क्र 1 यांच्या अधिकृत सेवाकेंद्र सामनेवाले क्र 3 यांच्याकडे दुरूस्तीकरीता नेला. सामनेवाले क्र 3 यांनी एक आठवडयानंतर येण्यास सांगीतले. परंतू, तक्रारदाराना याप्रकारे पाच सहा वेळा मोबाईलकरीता जावे लागले. परंतू त्यांना आजपर्यंत मोबाईल दुरूस्ती करून मिळाला नाही.किंवा त्याबदल्यात दुसरा मोबाईल मिळाला नाही. तक्रारदारानी सामनेवाले यांना त्याबाबत पत्र पाठविले. परंतू, सतत पाठपुरावा करून सुध्दा त्यांना योग्य प्रतिसाद प्राप्त झाला नाही. सबब, तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून मोबाईलची रक्कम व्याजासह तसेच मानसिक, शारीरीक त्रासासाठी व तक्रारीचा खर्च अशी मागणी केली.
3. तक्रारदारानी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सादर केले व त्यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. पुराव्यावरून हे सिध्द होते की, तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 यांचा उत्पादित मोबाईल सामनेवाले क्र 2 यांचेकडून रक्कम अदा करून विकत घेतला व तीन चार महिने वापरल्यानंतर त्यामध्ये दोष निर्माण झाल्यामूळे तो सामनेवाले क्र 3 यांचेकडे दुरूस्तीकरीता देण्यात आला. परंतू तो तक्रारदाराना आजपावेतो प्राप्त झालेला नाही व त्याचा मोबदला सुध्दा त्यांना परत देण्यात आलेला नाही. मोबाईल हा वारंटी कालावधीत असल्यामूळे हि सामनेवाले यांची जबाबदारी ठरते की, त्यांनी तो दुरूस्त करावा. परंतू सामनेवाले ती सेवा देण्यात अपयशी ठरले. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदाराना मोबाईलबाबत सेवा देण्यात कसुर केला. तक्रारदार यांना वारंवार फे-या माराव्या लागल्या.
5. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
6. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 358/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसुर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र 1,2 व 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारदाराना मोबाईलचे मुल्य रू. 4,250/-(चार हजार दोनशे पन्नास ) दि. 29/01/2018 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 29/01/2018 पासून द.सा.द.शे 15 टक्के व्याज लागु राहिल.
4. सामनेवाले क्र 1,2 व 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारदार यांना मानसिक व शारीरीक त्रासाकरीता रू.4,250/-(चार हजार दोनशे पन्नास) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 3,000/-,(तीन हजार )दि. 29/01/2018 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 30/01/2018 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याज लागु राहिल.
5. आदेशाची प्रत उभयपपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
6. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
npk/-