निकाल
(घोषित दि. 05.10.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याने दि.29.06.2015 रोजी चामुंडा मोबाईल शॉपी, सिंधी बाजार जालना येथून इन्टेक्स कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर अंदाजे दिड ते दोन महिने चांगला चालला. नंतर तो हॅंग होणे, बंद पडणे, चांगल्या स्थितीत न चालणे, त्याची बॅटरी नेहमी कमी होणे, टच पॅडने काम न करणे हे दोष निष्पन्न झाले. त्यानंतर एक दिवस सदर मोबाईल अचानक बंद पडला. प्रयत्न करुनही तो चालू झाला नाही. त्यामुळे तक्रारदार याने सदर मोबाईल स्मार्ट मोबाईल सोलूशन या सेवा केंद्रात दि.08.02.2016 रोजी दुरुस्तीकरता दिला. सेवा केंद्राने तक्रारदार यास दोन - तीन दिवसांनी येण्यास सांगितले व त्याप्रमाणे पावती दिली. दोन – तीन दिवसानी तक्रारदार त्याचा मोबाईल हॅण्डसेट घेण्याकरता सेवा केंद्रावर गेला तेव्हा त्याला त्याच्या मोबाईलमध्ये दोष आहे व योग्य त्या दुरुस्तीकरता तक्रारदार यास रु.1,000/- खर्च येईल असे सांगण्यात आले. तक्रारदार म्हणाला की, सदर मोबाईल वॉरंटीमध्ये आहे, त्यामुळे मोबाईलच्या दुरुस्तीचे पैसे सेवा केंद्रास मागता येणार नाहीत. तक्रारदार याने मोबाईलच्या उत्पादक कंपनीस फोन लावून त्याबाबत तक्रार केली, परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर तक्रारदार परत मोबाईलच्या सेवा केंद्रात त्याचा मोबाईल घेण्यास गेला परंतू तो मोबाईल दुरुस्त केलेला नव्हता. त्यावेळी पुन्हा तक्रारदार यास दुरुस्तीकरता रु.1,000/- भरण्यास सांगितले. वरील सर्व प्रकरणात तक्रारदार यास अंदाजे रु.1500/- ते 2000/- इतका खर्च झालेला आहे. वरील कारणास्तव तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदार याची अशी विनंती आहे की, त्याला झालेल्या मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई तसेच मोबाईलचे पैसे इत्यादी मिळून एकंदर रु.50,000/- चा मोबदला देण्यात यावा.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत चामुंडा मोबाईल शॉपी येथून दि.29.06.2015 रोजी मोबाईल विकत घेतला त्याबाबत पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. जालना येथील सेवा केंद्रातून त्याला जी पावती दि.08.02.2016 रोजी दिली, त्याची झेरॉक्स प्रत दाखल आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे विरुध्दचे प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचा लेखी जबाब दि.28.03.2016 रोजी नि.6 वर दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार याने मोबाईल विकत घेतल्यापासून अंदाजे आठ महिन्याच्या कालावधीत गैरअर्जदाराकडे तक्रार केलेली नाही. सदर मोबाईल खाली पडल्याने किंवा पाण्यात पडल्याने खराब झालेला आहे, सदर मोबाईल नवीन असल्याने त्याबाबत एखाद्या स्पेअरमध्ये खराबी असेल तर ताबडतोब सेवा केंद्रामध्ये तक्रार देणे आवश्यक असते. तक्रारदार याने मोबाईलच्या सेवा केंद्रात मोबाईल दिल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली आणि असे निष्पन्न झाले की, मोबाईल पाण्यात पडल्याने खराब झाला आहे त्यामुळे सेवा मिळण्याकरता तक्रारदार यास दुरुस्तीचा खर्च देणे आवश्यक आहे, परंतू सदर खर्च तक्रारदार याने दिलेला नाही. तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडून पैसे उकळण्याकरता हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तो नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेली आहे.
तक्रारदार व गैरअर्जदार यांना या प्रकरणात ग्राहक मंचासमोर येऊन युक्तीवाद करणे आवश्यक होते, परंतू पुरेसा वेळ देऊनही दोन्ही बाजुंचे पक्षकार ग्राहक मंचासमोर आले नाही. त्यामुळे आम्ही सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाल देण्याकरता ठेवले.
या प्रकरणातील तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.2 याचे लेखी जबाबाचे आम्ही अवलोकन केले. तसेच तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र आणि लेखी जबाबासोबत दाखल केलेली सेवा केंद्राची पावती याचे निरीक्षण केले. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने इन्टेक्स कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट दि.29.06.2015 रोजी चामुंडा मोबाईल शॉपी जालना यांचेकडून घेतला ही गोष्ट सत्य आहे. सदर मोबाईल हॅण्डसेट नादुरुस्त झाला त्या तारखेस वॉरंटीचे संरक्षण उपलब्ध होते. त्यामुळे तक्रारदार मोबाईल हॅण्डसेटच्या सेवा केंद्रामध्ये गेला व सदर मोबाईल दुरुस्तीकरता दिला. सदर मोबाईलची तपासणी केल्यानंतर सेवा केंद्रातून सांगण्यात आले की, मोबाईल हॅण्डसेटच्या दुरुस्तीकरता तक्रारदार याने रु.1,000/- भरणे आवश्यक आहे. तक्रारदार याने सदर रक्कम भरण्यास नकार दिला कारण त्यावेळी त्याचा मोबाईल हॅण्डसेट वॉरंटीच्या कालावधीमध्ये होता. या मुद्यावर गैरअर्जदार क्र.2 याचे असे म्हणणे आहे की, सेवाकेंद्रातून जी पावती तक्रारदार यास दि.08.02.2016 रोजी देण्यात आली आहे त्यामध्ये मोबाईलची वॉरंटी काही अटी व शर्तीला अधीन राहून असल्याचे लिहीले आहे. वॉरंटीच्या तिस-या कलमामध्ये खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
“If product is found to be tampered, misused, components removed, cracked or liquid damage then the product will NOT be considered under warranty”.
गैरअर्जदार यांनी असेही म्हटले आहे की, जर तक्रारदार याच्या हातून निष्काळजीपणाने त्याचा मोबाईल हॅण्डसेट पाण्यात पडला तर सदर मोबाईल हॅण्डसेटच्या दुरुस्तीकरता वॉरंटी छत्र उपलब्ध होणार नाही. या प्रकरणातील मोबाईल हॅण्डसेट तक्रारदार याच्या हातून निष्काळजीपणामुळे पाण्यात पडल्याने नादुरुस्त झाला, त्यामुळे मोबाईलमध्ये दोष निष्पन्न झाला असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. आमच्या मताने हे कथन सिध्द करण्याकरता गैरअर्जदार यांनी त्यांचे शपथपत्र दाखल केले नाही. सदर आरोप निर्विवादपणे सिध्द करण्याकरता ठोस पुरावा मंचासमोर दाखल नाही. त्यामुळे आम्ही सदर आरोपावर विश्वास ठेवू शकत नाही.
तक्रारदाराच्या हातून त्याचा मोबाईल हॅण्डसेट निष्काळजीपणाने पाण्यात पडून नादुरुस्त झाला हा आरोप सिध्द झालेला नाही, त्यामुळे तक्रारदार हा त्याचा मोबाईल हॅण्डसेट गैरअर्जदाराकडून विनामुल्य दुरुस्त करुन घेण्यास पात्र आहे.
तक्रारदार याने महागाचा मोबाईल हॅण्डसेट गैरअर्जदार चामुंडा मोबाईल शॉपी यांचेकडून विकत घेतला. तक्रारदार याला मुददाम त्याचा मोबाईल पाण्यात पाडून गैरअर्जदार यांचे विरुध्द खोटी केस दाखल करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे आम्ही तक्रारदार याच्या संपूर्ण कथनावर विश्वास ठेवतो आणि खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदाराचा
नादुरुस्त मोबाईल हॅण्डसेट, तक्रारदाराकडून कोणतेही पैसे न घेता दुरुस्त
करुन द्यावा. सदर दुरुस्ती या आदेशापासून 30 दिवसाचे आत करुन देणे
अपेक्षीत आहे.
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदार यास
झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई म्हणून
रु.3,000/- द्यावेत.
4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदार यास
या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना