द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) तक्रारदार स्टेट बँक ऑफ म्हैसूर या बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. तक्रारदारांची मुंबईवरुन हुबळी येथे बदली झाली. तक्रारदारांनी त्यांची सॅन्ट्रो हुंडाई कार क्र.DL 03, CP 6595 मुंबई बोरीवली येथून हुबळी येथे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जाऊन सामनेवाला याची सेवा घेतली. त्यासाठी सामनेवाला यांनी इनव्हॉईस क्र. 26/179 तयार करुन तक्रारदारांना दिला. सदरच्या कारची डिलीव्हरी ‘’डोअर टू डोअर’’ या बेसीसवर करायची होती. तक्रारदारांनी सामनेवाला यांना वाहतूकीचा आवश्यक तो खर्च कन्सायमेंट नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे दिला. कन्सायमेंट नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांची कार 203, संदीप अपार्टमेंट, दुसरा मजला, पहिला मुख्य, तिसरा क्रॉस, देशपांडे नगर, हुबली, कर्नाटक येथे पोच करायची होती. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत कन्सायमेंट नोटची छायांकित प्रत सादर केली आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांची कार सिंघल कार कॅरिअर्स (MBI) सामनेवाला 3 मार्फत पाठविली. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सिंघल कार कॅरिअर्सच्या लोकांनी त्यांच्या कारची पाहणी करुनच नंतर त्यांची कार डिलीव्हरीसाठी ताब्यात घेतली व तसा रिपोर्ट त्यांनी तक्रारदारांना दिला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे वरील सिंघल कार कॅरिअर्सचे एक कर्मचारी मनिष कुमार हे सदरची कार बोरीवली येथून वाशीला घेऊन गेले. त्यावेळी तक्रारदारांची कार सुस्थितीत होती. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कारचा त्यावेळेच्या वस्तुःस्थितीच्या रिपोर्टची प्रत तक्रार अर्जासोबत जोडलेली आहे.
3) दि.19/06/2006 रोजी सादिक नावाच्या मुलाने तक्रारदारांना दूरध्वनी करुन हुबळी-बँगलोर बायपास(गब्बुर) येथून त्यांची कार घेवून जावी असे सांगितले. तसेच, त्या मुलाने त्याला कार चालविता येत नाही असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदार त्यांची कार आणण्यासाठी हुबळी-बँगलोर रोडवर गेले असता त्या मुलाने तक्रारदारांच्या कारच्या चाव्या तक्रारदारांना दिल्या व तो तेथून निघून गेला. तो मुलगा कार तक्रारदारांच्या ताब्यात दिली अशी लेखी पोच न घेताच निघून गेला. तक्रारदारांनी कारमध्ये बसल्यानंतर कार सुरु करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कार सुरु होत नाही असे आढळून आल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला. तक्रारदारांनी अनेक वेळा प्रयत्न करुनही कार सुरु झाली नाही. तक्रारदारांनी कारची पाहणी केली त्यावेळी त्यांच्या कारच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे कारच्या इंजिनचे नुकसान झाले आहे असे त्यांच्या लक्षात आले. संपूर्ण कार त्यातील सीटसहित पाण्यात भिजली होती. तक्रारदारांनी नंतर एका मॅकेनिकलला बोलावून कार टोईंग करुन बसावा सर्व्हिस मोटर्स, हौसुर, हुबळी यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेली. वरील सर्व्हिस सेंटरमध्ये कारची पाहणी केली आणि दुरुस्तीसाठी रु.55,000/- लागतील असे अंदाजपत्रक तक्रारदारांना दिले. त्या अंदाजित पत्रकाची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी ‘सी’ ला दाखल केलेली आहे.
4) तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाला यांच्याशी संपर्क साधून कारची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधी पाठवावा अशी विनंती केली. तक्रारदारांनी पुन्हा पुनः दूरध्वनी केल्यानंतर सामनेवाला यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठविण्याचे फक्त आश्वासन दिले. प्रत्यक्षःत त्यांचा प्रतिनिधी कारची पाहणी करण्यासाठी आला नाही. तक्रारदारांनी दि.21/06/2006 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून त्यांच्या कारच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करावी अशी विनंती केली. पत्र मिळूनसुध्दा सामनेवाला यांचा प्रतिनिधी कारची पाहणी करण्यासाठी आला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांना त्यांच्या कारची दुरुस्ती करुन घेण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही म्हणून तक्रारदारांनी दि.26/06/2006 रोजी बसावा सर्व्हिस सेंटरकडे कार दुरुस्त करण्याची विनंती केली. बसावा सर्व्हिस सेंटरने तक्रारदारांच्या कारचे स्पेअर पार्ट बदलण्यासाठी एकूण रु.64,569/- व कामगारांच्या मजूरीपोटी रु.11,880/- लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी त्यांच्या कारच्या दुरुस्तीसाठी एकूण रु.76,449/- खर्च केले. सदर बिलाची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी ‘इ’ ला दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.19/07/2006 रोजी पत्र पाठवून कारच्या आवश्यक त्या दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधी पाठवावा असे कळविले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.05/08/2006 रोजी उत्तर पाठवून कारच्या झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडे क्लेम सादर करावा असे सांगितले. सदरच्या पत्राची छायांकित प्रत निशाणी ‘जी’ ला दाखल केलेली आहे.
5) तक्रारदारांनी दरम्यानच्या काळात विमा कंपनीकडे कारची नुकसान भरपाई मिळावी म्हणून क्लेम सादर केला. विमा कंपनीने काही मुद्दे उपस्थित केले. सरतेशेवटी विमा कंपनीने तक्रारदारांना त्यांच्या कारच्या नुकसान भरपाईपोटी रु.19,550/- दिले.
7) तक्रारदारांनी दि.28/05/2007 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून नुकसान भरपाई रक्कम रु.1,35,044/- ची मागणी केली. सामनेवाला यांनी दि.02/07/2007 च्या पत्राने तक्रारदारांची मागणी नाकारल्यानंतर तक्रारदारांनी वकिलांमार्फत दि.16/08/2007 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली. सामनेवाला यांनी त्या नोटीसीस काहिही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे त्यांच्या कारचे नुकसान झाले व नुकसान झालेल्या कारची नुकसान भरपाईसुध्दा सामनेवाला यांनी दिली नाही ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
8) तक्रारदारांनी त्यांना झालेला कार दुरुस्तीचा एकूण खर्च रु.1,35,044/- सामनेवाला यांनी 18 टक्के दराने व्याजासहित द्यावे असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी विनंती केलेली आहे. तक्रारदारांनी या अर्जाच्या खर्चाची मागणी सामनेवाला यांच्याकडून केलेली आहे. तक्रारदारांनी यादीप्रमाणे कागदपत्रांच्या छायांकित प्रती तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या आहेत.
9) सामनेवाला 1 ते 3 यांनी एकत्रितपणे कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी नाकारलेली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी केलेली मागणी कपोकल्पित असून त्यास कसलाही आधार नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे वाहतूकीसाठी दिलेली सॅन्ट्रो हुंडाई कार क्र.DL 03, CP 6595 जुनी व वापरलेली होती. त्या कारमध्ये पाणी शिरल्यामुळे अगोदरच नुकसान झाले होते. सामनेवाला यांनी दि.14/06/2006 रोजी कन्सायमेंट नोट तयार केली. त्या नोटमध्ये सामनेवाला 3 यांनी तक्रारदारांची कार चालू स्थितीत नसून पाणी शिरल्यामुळे कारचे नुकसान झाले आहे असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांची कार बंद स्थितीत असल्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदारांची कार वाहनामध्ये चढविताना चार कर्मचा-यांची मदत घ्यावी लागली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या कारच्या चाव्या तक्रारदारांकडेच होत्या त्या त्यांनी सामनेवाला यांना दिलेल्या नव्हत्या.
10) तक्रारदारांच्या कारमध्ये पाणी शिरल्यामुळे दि.14/06/2006 पूर्वीच तक्रारदारांचे कारचे नुकसान झाले होते. त्यामुळे सामनेवाला यांनी कारच्या नुकसानीसाठी विमा पॉलिसीकडे क्लेम सादर करावा असा योग्य सल्ला तक्रारदारांना दिला होता. तक्रारदारांची कार चालू स्थितीत नसल्यामुळे कन्सायमेंट नोटवर बोरीवली, मुंबई ते हुबळी बॅगलोर बायपास असे नमूद केले होते. कन्सायमेंट नोटमध्ये बसावा मोटर्स, हुबळी असे लिहिले आहे. तक्रारदारांनी मुद्दामहून सामनेवाला 3 यांनी दिलेली जी.सी. नोट 560 दाखल केलेली नाही. तक्रारदारांच्या कारची सामनेवाला 1 व 2 यांनी प्रत्यक्षः पाहणी न करता एक ऑपचारिकता म्हणून जी.सी. नोट दिली होती.
11) तक्रारदारांनी दि.14/06/2006 रोजी त्यांची कार हुबळीला पाठविण्यासाठी सामनेवाला यांची सेवा घेतली होती हे सामनेवाला यांना मान्य आहे. सुरुवातीस कारची डिलीव्हरी ‘’डोअर टू डोअर’’ करण्याचे ठरले होते परंतु सामनेवाला 3 हे तक्रारदारांच्या कारची डिलीव्हरी घेण्यासाठी गेले असता तक्रारदारांची कार दुरुस्त करणे आवश्यक असल्यामुळे सामनेवाला 3 यांनी जी.सी.नोट क्र.560 तयार केली व त्यावर तक्रारदारांनी सहीसुध्दा केलेली आहे. पूर्वीची जी.सी.नोट ही चुकीने तयार करण्यात आली होती असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
12) तक्रारदारांनी त्यांची कार ही बोरीवलीहून हुबळी येथे नेण्यासाठी आवश्यक ते भाडे दिले होत ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे त्याचा उल्लेख जी.सी.नोट क्र.560 मध्ये करण्यात आलेला आहे. कन्सायमेंट नोटप्रमाणे तक्रारदारांच्या कारची डिलीव्हरी 203, संदीप अपार्टमेंट, दुसरा मजला, पहिला मुख्य, तिसरा क्रॉस, देशपांडे नगर, हुबली, कर्नाटक येथे देण्याची ठरली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या कारची डिलीव्हरी हुबळी बँगलोर बायपासला देण्याचे ठरले होते व तसे जी.सी.नोट क्र.560 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
13) तक्रारदारांच्या कारची सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनी तपासणी करुन बोरीवली येथून दि.14/06/2006 रोजी वाशीला घेऊन गेले हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कारच्या अवस्थेबद्दल दि.14/06/2006 रोजी तयार केलेल्या रिपोर्टची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत जोडलेली आहे.
14) दि.19/06/2006 रोजी सादिक नावाच्या मुलाने दूरध्वनीवरुन तक्रारदारांना त्यांची कार हुबळी बँगलोर बायपासवरुन कार घेऊन जा असे सांगितले कारण त्या मुलाला कार चालविता येत नाही असे सांगितले हा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. सामनेवाला 3 यांनी तक्रारदारांच्या कारची डिलीव्हरी बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटर यांना दिली व तशा सूचना तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेल्या होत्या. हुबळी बँगलोर बायपासवर काम करणा-या सामनेवाला यांच्या मुलाने तक्रारदारांच्या कारच्या चाव्या तक्रारदारांना दिल्या व गाडी ताब्यात दिल्याची पावती न घेता तो मुलगा पळून गेला हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. तक्रार अर्ज परिच्छेद 5 मधील उर्वरित आरोप सुध्दा सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. तक्रार अर्जात केलेले इतर आरोप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटर यांनी तक्रारदारांच्या कारची पाहणी केल्यानंतर दुरुस्तीचा खर्च तक्रारदारांना सांगितला असावा. बसावा मोटर्सने तक्रारदारांच्या कारच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्टची अंदाजित रक्कम रु.64,569/- व मजूरी रु.11,880/- सांगितली होती हा आरोप नाकारलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना त्यांची कारची पाहणी करण्यासाठी बोलाविले होते हा ही आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. वाहतूकीच्या दरम्यान सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कारची योग्य ती काळजी घेतली नाही हा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सेवेत कसलीही कमतरता नाही. तक्रारदारांनी याकामी न्यु इंडिया अश्युअरन्स कंपनीस पक्षकार म्हणून सादर केलेले नाही. तसेच, बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटरलाही पक्षकार म्हणून सादर केलेले नाही म्हणून तक्रार अर्ज खर्चासहित रद्द होण्यास पात्र आहे.
15) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथत्र दाखल केलेले आहे. तसेच, यादीप्रमाणे कागदपत्रांच्या सत्य प्रती व छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. दि.15/07/2010 पासून सामनेवाला 1 ते 3 या मंचासमोर हजर न राहिल्यामुळे तक्रारदारांचे वकील मोझेस यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून तक्रार अर्ज निकालावर ठेवण्यात आला.
16) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात:-
मुद्दा क्र. 1 – तक्रारदार हे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रं. 2 – तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडून तक्रार अर्जात मागितलेली दाद मिळेल काय?
उत्तर – नाही.
कारण मिमांसा:-
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. मुंबईहून त्यांची बदली हुबळीला झाली. मुंबईहून त्यांची कार हुबळीला नेण्यासाठी त्यांनी सामनेवाला क्र.1 यांची सेवा घेतली होती. सामनेवाला 2 हे सामनेवाला 1 चे अधिकृत प्रतिनिधी आहेत. सामनेवाला 3 हे पब्लिक कॅरिअर असून त्यांचे ऑफीस ए.पी.एम.सी मार्केट, वाशी येथे आहे.
खालील गोष्टी उभय पक्षकारांना मान्य आहे.
तक्रारदारांनी दि.14/06/2006 रोजी हुबळी येथे बदली झाली असल्यामुळे त्यांची सॅन्ट्रो हुंडाई कार बोरीवली येथून हुबळी येथे नेण्यासाठी सामनेवाला 1 यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफीसमध्ये गेले. तेथे त्यांनी कन्सायमेंट बुक करुन इनव्हॉईस क्र.26/179 तयार केली. ट्रान्सपोर्टचे आवश्यक ते चार्ज तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिले. सामनेवाला यांनी तक्रारदारांची कार हुबळीला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सामनेवाला 3 मे.सिंघल कार कॅरिअर्समार्फत हुबळीला पाठविली. तक्रारदारांची कार हुबळी बँगलोर बायपासवर उतरविण्यात आली.
मुद्दा क्र. 1 - तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांची कार दि.14/06/2006 रोजी सामनेवाला यांच्याकडे ट्रान्सपोर्टसाठी दिली त्यावेळी त्यांची कार सुस्थितीत होती. सामनेवाला यांचे प्रतिनिधी मनिष यांनी बोरीवली येथे येऊन तक्रारदारांच्या कारची पाहणी केली व तसा कार कंडिशन रिपोर्ट दिला. मनिष यांनी तक्रारदारांची कार बोरीवली येथून वाशीला ड्राइव्ह करीत नेली. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.19/06/2006 रोजी सादिक नावाच्या मुलाने त्यांची कार हुबळी बँगलोर बायपास येथे त्यांची कार उतरविण्यात आलेली असून त्याला कार चालविता येत नाही असा निरोप दिला. त्यामुळे तक्रारदार हुबळी बँगलोर बायपास येथे गेले व त्या मुलाने तक्रारदारांच्या कारच्या चाव्या दिल्या व तो तेथून निघून गेला. तक्रारदार कारमध्ये बसल्यावर प्रयत्न करुनही कारचे इंजिन सुरु होत नव्हते त्यामुळे तक्रारदारांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कारची पाहणी केल्यानंतर त्यांच्या कारचे बरेचसे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण कारमध्ये पाणी शिरल्यामुळे कारमधील सीट देखील ओल्या झाल्या होत्या. तक्रारदारांनी मॅकेनिकलला कारची पाहणी करण्यासाठी बोलाविले व कार टोईंग करुन बसावा सर्व्हिस मोटर्स सेंटरमध्ये नेली. सर्व्हिस सेंटरमध्ये कारची पाहणी केल्यानंतर दुरुस्तीचा खर्च रु.55,000/- येईल असे सांगितले. तक्रारदारांनी ताबडतोब दूरध्वनीवरुन सामनेवाला यांना माहिती दिली. वेळोवेळी दूरध्वनी करुनसुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी बसावा सर्व्हिस सेंटरमध्ये कार दुरुस्त करण्याचे ठरविले. बसावा सर्व्हिस सेंटरने कार दुरुस्तीसाठी रु.64,569/- व मजूरीपोटी रु.11,880/- खर्च करावे लागेल असे सांगितले. तक्रारदारांनी कार दुरुस्तीसाठी बसावा सर्व्हिस सेंटरला रु.76,449/- दिले त्याची प्रत तक्रारदारांनी हजर केलेली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून व वकिलांमार्फत नोटीस पाठवूनसुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांना प्रतिसाद दिला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना कारच्या नुकसान भरपाईपोटी विमा कंपनीकडे अर्ज करावा असे सांगितले. तक्रारदारांच्या विनंतीना काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडून रु.1,35,044/- मागितले असून त्या खर्चाचा तपशील परिच्छेद 12 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये कारच्या दुरुस्तीचे बिलाची रक्कम, त्यांचा येण्या-जाण्याच्या खर्चापोटी रु.43,750/-, मानसिक त्रासापोटी रु.30,000/-, विमा कंपनीस भरलेल्या हफ्त्यांची रक्कम व त्यातून विमा कंपनीकडून मिळालेली रक्कम रु.19,550/- वजा करता उर्वरित रक्कम रु.1,35,044/- सामनेवाला यांच्याकडून मागितलेले आहेत.
सामनेवाला यांनी एकत्रितपणे कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांची सॅन्ट्रो हुंडाई कार जुनी होती. दि.14/06/2006 रोजी ज्यावेळी सदरची कार सामनेवाला यांच्या प्रत्यक्षः ताब्यात आली त्यावेळी सदरच्या कारचे नुकसान झाले होते व ती चालू स्थितीत नव्हती. आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कार कंडिशन रिपोर्ट कैफीयतीसोबत दाखल केलेला आहे. त्यामध्ये तक्रारदारांची कार जुनी व वापरलेली होती असे नमूद करुनच त्यांच्या कारचे बाहेरील बाजूचे पापुद्रे निघले होते, काही पृष्ठभाग चेपलेला होता व सदर कार चालू स्थितीत नव्हती. त्यांच्या इसमाने सदरची कार बोरीवलीहून वाशी येथे आणली हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे. तक्रारदारांची कार चालू स्थितीत नसल्यामुळे कंटेनरमध्ये चढविताना चार लोकांची मदत घ्यावी लागली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीस तक्रारदारांची कार दुस-या पत्त्यावर नेण्याचे कन्सायमेंटमध्ये लिहिले होते परंतु गाडीची परिस्थिती पाहिल्यानंतर हुबळी बँगलोर बायपासजवळ बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्याचे ठरले. मुंबईहून हुबळी येथे आणताना तक्रारदारांच्या कारचे नुकसान झाले हा आरोप सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे मुळातच तक्रारदारांची कार नादुरुस्त होती म्हणून तक्रारदारांच्या त्या कारच्या दुरुस्तीच्या खर्चाची सामनेवाला यांची जबाबदारी नाही. तक्रारदारांनी कारच्या दुरुस्तीच्या खर्चाची मागणी सामनेवाला यांच्याकडून केली त्यावेळी तक्रारदारांनी विमा कंपनीकडे क्लेम सादर करावा असा सल्ला सामनेवाला यांनी दिला. त्यावेळी तक्रारदारांनी न्यु इंडिया इन्शुअरन्स कंपनीकडे क्लेम सादर केला व विमा कंपनीने त्यांना रक्कम रु.19,550/- दिले.
तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केलेली सॅन्ट्रो हुंडाई कार कधी विकत घेतली, किती रुपयाला विकत घेतली व किती वर्ष वापरली ही माहिती तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केलेली नाही व या बद्दलचा काहीच पुरावा दाखल केलेला नाही. याकामी तक्रारदारांनी त्यांच्या कार कंडिशनची सत्य प्रत दाखल केलेली असून त्यातील काही भाग फाटलेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या कार कंडिशन रिपोर्टची छायांकित प्रतही यादीसोबत दाखल केलेली आहे. सदर छायांकित प्रतीमधील मजकूर मूळ कंडिशन रिपोर्टमधील मजकूराशी काही ठिकाणी मिळता जुळता नाही. मूळ कंडिशन रिपोर्टमधील कॉलम क्र. 15/16 पुढील Yes/No या अक्षरांवर आडव्या रेषा मारण्यात आलेल्या आहेत तर छायांकित प्रतीत त्या आडव्या रेषा अक्षरांच्या खाली आहेत. जर छायांकित प्रत ही मूळ कंडिशन रिपोर्टची असेल तर असा फरक येण्याचे कारण नाही. तसेच, मूळ कार कंडिशन रिपोर्टमध्ये मह-त्वाचा भाग फाटलेला आहे. सामनेवाला यांनी देखील कार कंडिशन रिपोर्टची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्या प्रतीमध्ये कार जुनी असल्याचे नमूद करुन कारमध्ये असलेल्या दोषाबद्दल जो कॉलम आहे त्यात “all body paint pilled off & damage” असे नमूद केलेले आहे. तसेच तक्रारदारांच्या कारमध्ये पाणी शिरल्यामुळे नादुरुस्त अवस्थेत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मिळाली असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सामनेवाला 1 व 2 यांनी तक्रारदारांच्या कारच्या डिलीव्हरीसाठी सामनेवाला 3 मे.सिंघल कार कॅरिअर्स यांना दिली व त्यांनी सदरची कार कंटेनरमधून हुबळीला आणली असे दिसते. सदर कंटेनरला रस्त्यात अपघात झाला किंवा पाण्यात बुडाला असा काहीच पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. कार कंडिशन रिपोर्टमध्ये कार डिलीव्हरीचे ठिकाण म्हणजेच मे.बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटर, हुबळी असे नमूद केलेले आहे. सदरचा मजकूर नंतर लिहिलेला आहे असे दिसते. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या कारची परिस्थिती पाहून तसा बदल करण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी त्यांच्या कारची पाहणी करावी अशी वेळोवेळी विनंती करुन सामनेवाला यांनी त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही उलट विमा कंपनीकडे क्लेम सादर करावा असा सल्ला दिला. तक्रारदारांनी क्लेम सादर केल्यानंतर विमा कंपनीने अनेक शंका उपस्थित करुन तक्रारदारांना क्लेमपोटी रक्कम रु.19,550/- दिले. तक्रारदारांनी याकामी विमा कंपनीस पक्षकार केलेले नाही. विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम मंजूर करण्यापूर्वी सर्व्हेअरची नेमणूक केली असली पाहिजे. सर्व्हे अहवालाशिवाय विमा कंपनी तक्रारदारांचा क्लेम मंजूर करणार नाही. तक्रारदारांनी याकामी सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांच्या कारच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.76,449/- खर्च केल्याचे बसावा मोटर्स सर्व्हिस सेंटरने दिलेल्या बिलावरुन दिसते. परंतु, तक्रारदारांना त्यांची कार मुंबईहून हुबळीला नेताना प्रवासाच्या दरम्यान सामनेवाला यांच्या हलगर्जीपणामुळे कारचे नुकसान झाले ही बाब तक्रारदारांना सबळ पुराव्यानिशी सिध्द करता आली नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विरुध्द केलेले आरोप, उपस्थित झालेल्या शंका इत्यादी वरील बाबींचा विचार करता सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे तक्रारदारांना सिध्द करता आले नाही असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. 2 –वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना सामनेवाला 1 ते 3 यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करता आले नाही. तसेच, त्यांच्या कारच्या नुकसानीसाठी विमा कंपनीकडे क्लेम सादर केलेला आहे व विमा कंपनीने रु.19,550/- तक्रारदारांना क्लेमपोटी दिलेले आहे. तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करता न आल्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडून काहीच रक्कम वसूल करता येणार नाही. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
वर नमूद केलेल्या कारणावरुन तक्रार अर्ज रद्द करण्यात होण्यास पात्र असल्यामुळे तक्रार अर्ज रद्द करण्यात येवून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
1) तक्रार अर्ज क्रं. 71/2008 रद्द करण्यात येतो.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देणेत यावी.