तक्रारदार : वकील श्रीमती जान्हवी लांजेकर हजर. सामनेवाले क्र.1 : वकील श्रीमती स्मिता दंडीगे हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रारदार ही कंपनी कायद्याखाली नांदविलेली कंपनी आहे. तर सा.वाले क्र.1 हे आगबोटीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या सहलीचे/ प्रवासाचे नियोजन करणारी कंपनी आहे. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे एजंट आहेत. तक्रारदारांचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुरेश कारे व त्यांची पत्नी यांचे आगबोटीने सहलीचे प्रवासाकरीता तक्रारदार कंपनीने सा.वाले क्र.2 यांचेमार्फत “प्रिंसेस क्रुझ” या बोटीने प्रवास करणेकामी श्री.सुरेश कारे व त्यांच्या पत्नी यांच्या प्रवासाचे आरक्षण केले. बोट 9 जुलै, 2008 रोजी निघणार होती. तक्रारदार कंपनीने सहलीचे तिकिटाबद्दल सा.वाले क्र.2 यांचेकडे अमेरीकन डॉलर 8,614/- दिनांक 21.4.2008 रोजी जमा केले. व सा.वाले क्र.2 यांचे विनंतीवरुन तेवढयाच रक्कमेचे भारतीय चलन त्यानंतर सा.वाले क्र.2 याचंकडे जमा केले होते. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे रु.8,614/- अमेरीकन डॉलर या रक्कमेमध्ये प्रवास रद्द झाल्यास तिकिटाची रक्कम परतावा मिळण्याची तरतुद होती व त्या बद्दलचे शुल्क संम्मलीत करण्यात आले होते. 2. तक्रारदारांचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुरेश कारे हे काही आकस्मीत कारणाने प्रवासात जावू शकत नाही व त्या बद्दलची सूचना तक्रारदार कंपनीने सा.वाले क्र.2 यांना दिनांक 27.5.2008 रोजी दिली. त्यानंतर तक्रारदार कंपनीने सा.वाले 1 व 2 यांचेकडे तिकिटाची रक्कम परतावा मिळण्याची मागणी केली. परंतु सा.वाले क्र.2 यांनी त्यांचे वकीलामार्फत तक्रारदारांना दिलेली नोटीसीचे उत्तरामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी जमा केलेली रक्कम रु.8,614/- अमेरीकन डॉलर ज्याचे भारतीय रुपयामध्ये रु.3,60,926/- असे मुल्य होते. ती रक्कम तक्रारदारांनी जमा केली परंतु त्यामध्ये परताव्याचे शुल्क जमा नव्हते. त्या बद्दल सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे कर्मचा-यांना सूचना दिली होती व विनंती केली होती की, त्या बद्दल ज्यादा शुल्क जमा करावे म्हणजे प्रवास रद्द झाल्यास तक्रारदार कंपनी प्रवास आरक्षणाची रक्कम मागण्यास पात्र ठरु शकेल. परंतु तक्रारदारांनी ती रक्कम ज्यादा शुल्क जमा करण्यास नकार दिला. तक्रारदारांचे असे कथन आहे की, ते सा.वाले यांचे कथन खोटे असून ते शुल्क सम्मलीत होते. सा.वाले क्र. 1 व 2 यांना परतावा देण्यास नकार दिल्याने कंपनीने प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व सा.वाले यांनी तक्रारदारांना प्रवासाचे तिकिटाचा परतावा देण्यास नकार दिल्याने सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करुन मिळावे व मुळची रक्कम रुपये 3,60,926/- 12 टक्के व्याजासह अदा करण्याचा आदेश व्हावा असी विनंती केली. 3. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे एजंट नाहीत व सा.वाले 1 याचा तक्रारीशी कुठलाही संबंध नाही. तक्रारदार कंपनी ही कंपनी कायद्याखाली नोंदविलेली कंपनी असल्याने व त्यांचे व्यवस्थापका करीता सहलीचे नियोजन करण्यात आलेले असल्याने प्रस्तुतचा व्यवहार हा वाणीज्य व्यवसायाकामी केलेला व्यवहार ठरतो. व या वरुन ग्राहक तक्रार निवारण मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. त्या प्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी असे कथन केले की, तक्रारदारांचा जो काही व्यवहार झाला तो सा.वाले क्र.2 यांचेशी झाला व सा.वाले क्र.1 यांचेशी झाला नसल्याने तक्रारदार सा.वाले क्र1 यांचेकडून कुठलीही दाद मिळण्यास पात्र नाहीत. 4. सा.वाले क्र.2 यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चे एलंट आहेत हे तक्रारदाराचे कथनास नकार दिला. तसेच तक्रारदार ही कंपनी कायद्याखाली नोंदविण्यात आलेली कंपनी असल्याने प्रस्तुतचा व्यवहार हा वाणीज्य व्यवसायाकामी केलेला असल्याने ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे कथन केले. 5. प्रस्तुतचे कथनाचे संदर्भात सा.वाले क्र.2 यांनी आपली कैफीयतीचे परिच्छेद क्र.5 मध्ये हे मान्य केले आहे की, तक्रारदार कंपनीने त्यांचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुरेश कारे व त्यांची पत्नी यांचेकरीता “प्रिंसेस क्रुझ” या बोटीने सहलीचे आयोजन करणेकामी आरक्षण करावयाचे होते. व तक्रारदारांचे विनंतीनुसार तिकिटाच्या आरक्षणाच्या रक्कमेचे देयक तक्रारदारांकडे पाठविले. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 21.4.2008 रोजी अमेरीकन डॉलर रु.8,614/- येवढी रक्कम जमा केली. सा.वाले असे कथन करतात की, दिनांक 22.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना ई-मेल व्दारे पाठविलेल्या देयकामध्ये रक्कम रु.3,81,837/- जमा करण्याची विनंती केली होती व त्यामध्ये आरक्षण रद्द झाल्यास तिकिट आरक्षणाची रक्कम परत मिळण्याचे शुल्क संम्मलीत होते. परंतु तक्रारदारांनी ती रक्कम जमा करण्याचे ऐवजी केवळ अमेरीकन डॉलर रु.8,614/- चे भारतीय रुपयातील किंमत रु.3,60,926/- सा.वाले यांचेकडे जमा केले या प्रमाणे आरक्षण रद्द झाल्यास तिकिटाची रक्कम परत मिळविण्याचे शुल्क तकारदारांनी जमा न केल्याने तक्रारदार तिकिटाची रक्कम परत मिळण्यास पात्र नाहीत असे सा.वाले क्र.2 यांनी कथन केले. 6. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व त्यासोबत ई-मेल, पत्र व्यवहाराच्या तसेच कायद्याच्या नोटीसाच्या प्रती हजर केल्या. सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी शालीनी लांबा यांचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले क्र.2 यांनी वेगळे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले नाही. परंतु त्यांची कैफीयत प्रमाणीत आहे. 7. तक्रारदार तसेच सा.वाले क्र.2 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रारदार तसेच सा.वाले क्र.1 यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. 8. प्रस्तुत मंचाने तक्रार,कैफीयत,शपथपत्र,कागदपत्रं व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदार व सा.वाले 1 यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. सा.वाले क्र.2 हे गैरहजर होते. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | प्रस्तुत तक्रारीमध्ये सुनावणी घेवून निर्णय देण्याचा प्रस्तुत मंचास अधिकार आहे काय ? | होय. | 2 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे अधिकारी यांचे आरक्षण रद्द झाल्यानंतर तिकिटाचा परतावा परत देण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 3. | तक्रारदार हे मुळची रक्कम व्याजासह वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. रुपये 3,60,826/- 9 टक्के व्याजासह. | 4. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 9. तक्रारदारांनी त्यांचे वकीलामार्फत सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस दिली होती. सा.वाले क्र.2 यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले. परंतु सा.वाले क्र.1 यांनी मात्र तक्रारदारांची नोटीस दिनांक 3.7.2008 ला उत्तर दिले नाही. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांचे नोटीसीला उत्तर न देण्याचे वर्तन हे सा.वाले क्र.1 यांचे कथनाचे विरुध्द जाते. 10. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे मान्य केलेले आहे की, तक्रारदार ही कंपनी कायद्याखाली नोंदविलेली कंपनी असून तक्रारदारांचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुरेश कारे व त्यांची पत्नी यांचे सहलीचे प्रवासाचे आरक्षण करणेकामी सा.वाले यांचेशी पत्र व्यवहार केला होता. तक्रारदारांचे अधिकारी श्री.सुरेश कारे हे आपल्या व्यवसायाचे निमित्त प्रवास करणार नव्हते तर बोटीने केवळ सहल म्हणून विविध देशांचा 10 दिवसाचा ते दौरा करणार होते. व सहल 9 जुलै, 2008 रोजी सुरु होणार होती. तक्रारदार ही जरी कंपनी कंपनी कायद्याखाली नोंदविलेली कंपनी असलीतरी आरक्षण करण्याचा हेतू हा तक्रारदार कंपनीचे अधिका-याकरीता सहलीचे नियोजन हे असल्याने प्रस्तुतचा व्यवहार हा वाणीज्य व्यावसासाकामी केलेला व्यवहार होऊ शकत नाही. सहाजिकच ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1) (डी) चे परंतुकाची बाधा प्रस्तुतचे व्यवहारास पोहचत नाही. सबब सदर ग्राहक संरक्षण मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. 11. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तसेच पुराव्याचे शपथपत्रासोबत ई-मेल तसेच पत्र व्यवहाराची प्रत जोडलेली आहे. ती तक्रारीचे निशाणी अ येथे जोडलेली आहे. त्याचे वाचन केले असता असे दिसून येते की, दिनांक 17.4.2008 रोजी सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना 10 दिवसाचे बोटीच्या सहलीचे खर्चाचे अंदाजपत्रक पाठविले होते. व एकूण रक्कम रु.8,614/- अमेरीकन डॉलर त्याचे भारतीय मुल्य रु.3,60,926/- असे होते. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 18.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदार कंपनीला ई-मेल पाठविला व त्यामध्ये तिकिटाचे आरक्षणा बद्दल रक्कम लवकर म्हणजे दिनांक 21.4.2008 रोजी अदा करण्यात यावी अन्यथा दिनांक 21.4.2008 नंतर आरक्षण होणार नाही असे कळविले. या दोन्ही ई-मेलचे वाचन केल्यानंतर एक बाब स्पष्ट होते की, सा.वाले क्र. 1 व 2 हे एकत्रितपणे तक्रारदारांचे संपर्कात होते व सा.वाले क्र.1 यांनी प्रवासाच्या तिकिटाचे अंदाजपत्रक तक्रारदारांना पाठविले होते तर सा.वाले क्र. 2 यांनी तिकिटाची रक्कम दिनांक 21.4.2008 पूर्वी अदा करावी अशी विनंती केली होती. या दोन्ही बाबी हे स्पष्ट करतात की, सा.वाले क्र. 1 व 2 हे एकत्रितपणे म्हणजे थोडक्यात सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे एजंट म्हणून या प्रस्तुत व्यवहारात काम करीत होते. या प्रकारच्या निष्कर्षास सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दिनांक 24.4.2008 रोजी पाठविलेल्या ई-मेल मधील मजकुरा मधुन पुष्टी मिळते. तो ई-मेल तक्रारीच्या निशाणी क पृष्ट क्र.14 वर आहे. त्यामध्ये सा.वाले क्र.2 यांनी श्री.कारे यांना (तक्रारदार संचालक) यांना ई-मेल व्दारे अशी विनंती केली होती की, तक्रारदार कंपनीने रु.8,614/- अमेरीकन डॉलर येवढया रक्कमेचा ड्राप्ट सा.वाले क्र.2 यांचेंकडे पाठविला आहे. परंतु अमेरीकन डॉलरचा ड्राप्ट वटण्यास अंदाजे 21 दिवस लागतात व येवढया दिर्घ कालावधीकरीता मुख्य एजंट Enter glob (सा.वाले क्र.1) हे थांबू शकणार नाही. त्या ई-मेल व्दारे सा.वाले क्र.2 यांनी अशी विनंती केली की, रु.8,614/- येवढे अमेरीकन डॉलर या किंमतीचे भारतीय चलनामध्ये हस्तांतरण झाल्यास ते सुकर होईल. ई-मेलची भाषा अतीशय नम्रपणाची असून श्री.कारे यांनी सा.वाले क्र.2 यांचेवर कृपा करुन मदत करावी अशी याचना केलेली आहे. हा ई-मेल देखील प्रस्तुतचे मंचाचे निष्कर्षास पुष्टी देतो की, सा.वाले क्र.1 व 2 हे आपल्या सोबतीने व मिळून ( In tandom ) असे काम करीत होते. व सा.वाले क्र.2 यांनीच सा.वाले क्र.1 यांना मुख्य एजंट असे म्हटले होते. या वरुन सा.वाले क्र. 1 व 2 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये जे कथन केलेले आहे की, ते तक्रारदारांचे एजंट नाहीत. व त्यांचे एकमेकांशी काही संबंध नव्हते हे पश्चात बुध्दीचे कथन असून केवळ व्यवहाराला बगल देण्याचे हेतुने केलेले आहे हे स्पष्ट होते. 12. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना ई-मेल दिनांक 17.4.2008 व्दारे जे सहलीचे अंदाजपत्रक पाठविले होते त्याची प्रत निशाणी अ पृष्ट क्र.8 वर दाखल केले आहे. त्या ई-मेलव्दारे सा.वाले यांनी तक्रारदारांना एकत्रित रक्कम रु.8,614/- अमेरीकन डॉलर जमा करावयास सांगीतले होते. त्याची फोड पुढील प्रमाणे आहे. अ.क्र. | तपशिल(प्रति व्यक्ती) | रक्कम(अमेरीकन डॉलरमध्ये ) | 1 | प्रवास खर्च | 3,705/- | 2 | प्रवास रद्द होण्याचा शुल्क | 180/- | 3 | बंदराचे शुल्क | 260/- | 4 | कर | 111.89 | 5 | ज्यादा इंधन खर्च | 50/- | | एकूण | 4,306.89 | | | 4,306.89 X 2= 8613.78 8,614/- |
13. वरील तपशिलाचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिनांक 17.4.2008 रोजीच्या ई-मेलव्दारे जे अंदाज पत्रक पाठविले होते त्यामध्ये रु.180/- प्रती व्यक्ती हे आरक्षण रद्द झाल्यास तिकिटाची रक्कम परत मिळण्याचे शुल्क होते. व ते एकूण रक्कमेमध्ये संम्मलीत होते. या निष्कर्षास सा.वाले क्र.2 यांचे दिनांक 17.4.2008 च्या ई-मेल मधील मजकूर पुष्टी देतो. त्यामध्ये सा.वाले क्र.2 असे म्हणतात की, परताव्याचे शुल्क घेवून आरक्षण करण्याची “प्रिंसेस क्रुझ” या कंपनीची ही एक आकर्षक योजना असून या योजनेव्दारे बोट प्रवासात निघण्याचे 4 दिवस अगोदर पर्यत आरक्षण रद्द केले जावू शकते. व त्याचे शुल्क भरले असल्यास तिकिटाची रक्कम परत मिळू शकते. या प्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी आपल्या अंदाजपत्रकात केवळ आरक्षण रद्द केल्यास तिकिटाची रक्कम परत मिळण्याचे शुल्क रुपये 180/- अमेरीकन डॉलर प्रती व्यक्ती असे सम्मलीत केले नव्हते तर त्या अंदाजपत्रकाची माहितीसुध्दा तक्रारदारांना दिलेली होती. व तक्रारदारांनी त्या अंदाजपत्रकाप्रमाणे संपूर्ण रक्कम रु.8,614/- अमेरीकन डॉलर सा.वाले क्र.2 यांचेकडे डीमांड ड्राप्टव्दारे दिनांक 21.4.2008 रोजी जमा केलेत. ही रक्कम प्राप्त झाल्याबद्दल वाद नाही व सा.वाले क्र.2 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये ते मान्य केलेले आहे. त्यानंतर दिनांक 24.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी ई-मेलव्दारे निशाणी क, पृष्ट क्र.14 तक्रारदारांना पाठविला व डिमांड ड्राप्टची रक्कम रु.8,614/- अमेरीकन डॉलर याचे भारतीय चलनामध्ये अदा करावी व त्यांचे कोटक महिंद्रामध्ये खाते असून त्यामध्ये ती रक्कम जमा करावी व भारतीय रुपयाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांची अमेरीकन डॉलरची रक्कम रु.8,614/- परत करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तक्रारदारांनी आपल्या कंपनीमार्फत शपथपत्र त्यांचे कंपनी सचिव श्री.जगदीश सॅलीयन यांचे दाखल केले आहे. व त्यामध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 24.4.2008 रोजी पाठविलेल्या ई-मेल मधील विनंतीनुसार तक्रारदारांनी रु.3,60,926/- भारतीय रुपयामध्ये सा.वाले क्र.2 यांना दिनांक 24.8.2008 रोजी अदा केले. 14. तक्रारदारांनी सहल रद्द करण्याबद्दलचे पत्र सा.वाले क्र.2 यांना दिनांक 27.5.2008 रोजी दिले. प्रत तक्रारीसोबत निशाणी ड वर दाखल आहे. त्यानंतर दिनांक 28.5.2008 रोजी तक्रारदार कंपनीने सा.वाले क्र.2 यांना तिकिटाचे आरक्षण परतावा मिळणेकामी पत्र दिले व त्यामध्ये संपूर्ण तपशिल दिला. त्या पत्रास सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 9.6.2008 रोजी (निशाणी फ, पृष्ट क्र.17) उत्तर दिले व असे कळविले की, तक्रारदारांनी दिनांक 24.4.2008 रोजी रु.3,60,826/- जमा केले व त्यानंतर त्याच दिवशी सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे अधिकारी यांना आरक्षण रद्द झाल्यास परताव्याचे शुल्क रु.20,914/- पाठवून द्यावेत किंवा जमा करावेत अशी विनंती केली. त्या दिनांक 9.6.2008 च्या पत्रामध्ये सा.वाले असे म्हणतात की, तक्रादारांच्या अधिका-यांनी ज्यादा शुल्क भरण्यास नकार दिला व असे कळविले की, श्री.सुरेश कारे यांचा प्रवास दौरा निश्चीत असून आरक्षण रद्द शुल्क ज्यादा भरण्याची आवश्यकता नाही. या पत्रातील मजकुराप्रमाणे सा.वाले क्र.2 यांचे कैफीयतीमध्ये कथन असून थोडक्यात सा.वाले यांनी असे कळविले आहे की, तक्रारदारांचे आरक्षण रद्द झाल्यास तिकिटाची रक्कम परत मिळण्या बद्दलचे ज्यादा शुल्क रु.15,084/- भरण्यास नकार दिला व त्यामुळे तक्रारदारांचे आरक्षण रद्द झाल्याने परतावा मिळण्यास पात्र नाहीत. 15. या संबंधात एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदार क्र.2 यांनी श्री.सुरेश कारे यांना दिनांक 24.4.2008 रोजी (निशाणी क पृष्ट क्र.14) जो ई-मेल पाठविला त्यामध्ये अमेरीकन डॉलर रु.8,614/- चे भारतीय मुल्याप्रमाणे रक्कम अदा केल्यास ती खात्यात लवकर जमा होईल व या प्रकारे मदतीची याचना केली होती, त्या ई-मेलमध्ये कोठेही आरक्षण रद्द झाल्यास ज्यादा शुल्काची मागणी केलेली नाही. तक्रारदारांनी रु.8,614/- अमेरीकन डॉलर जे दिनांक 21.4.2008 रोजी सा.वाले यांचेकडे जमा केले तसेच सममुल्य भारतीय रुपयामध्ये तक्रारदारांनी दिनांक 24.4.2008 रोजी रु.3,60,926/- सा.वाले यांचेकडे जमा केले. वर नमुद केल्याप्रमाणे रु.8,614/- अमेरीकन डॉलर या रक्कमेमध्ये आरक्षण रद्द झाल्यास परतावा मिळण्याचे शुल्क अमेरीकन डॉलर रु.180/- प्रती व्यक्ती असे संम्मलीत होते. या प्रमाणे तक्रारदार कंपनीने रु.180/- अमेरीकन डॉलर प्रतिव्यक्ती आरक्षण रद्द झाल्यास परतावा मिळण्याबाबतचे शुल्क जमा केल्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे काही ज्यादा रक्कम जमा करण्याचा प्रश्नच नव्हता. दिनांक 24.04.2008 चे ई-मेलमध्ये सा.वाले क्र.2 यांनी त्या बद्दलचा कोठेही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे तक्रारदारांनी रु.8,614/- अमेरीकन डॉलरचे सममुल्य रुपये 3,60,926/- दिनांक 24.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांचे विनंतीप्रमाणे सा.वाले क्र.2 यांचेकडे जमा केले. 16. सा.वाले क्र.1 व 2 असे कथन करतात की, दिनांक 22.4.2008 च्या ई-मेलव्दारे सुधारीत अंदाजपत्रक तक्रारदारांना पाठविण्यात आलेले होते व त्याप्रमाणे तक्रारदारांनी रक्कम अदा करावयाची होती. सा.वाले क्र.2 हे आपल्या दिनांक 9.6.2008 चे पत्रामध्ये तसेच कैफीयतीमध्ये असे म्हणतात की, दिनांक 22.4.2008 रोजी सा.2 हयांनी सा.वाले क्र.1 यांना अशी विनंती केली होती की, सुधारीत अंदाजपत्रक तक्रारदारांना पाठवावे व त्या ई-मेल सूचनेप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी 3.14 मिनिटांनी सुधारीत अंदाजपत्रक ई-मेलव्दारे तक्रारदारांना पाठविले. येथे महत्वाची बाब म्हणजे दिनांक 22.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांना सुधारीत अंदाजपत्रकाची सूचना केल्या बद्दलच्या ईमेलची प्रत सा.वाले क्र.2 यांनी आपल्या कैफीयतीसोबत दाखल केलेली नाही. त्या नंतरही आपल्या युक्तीवादासोबत ती दाखल केलेली नाही. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीसोबत किंवा पुराव्याचे शपथपत्रासोबत तक्रारदारांना दिनांक 22.4.2008 रोजी सुधारीत अंदाजपत्रक पाठविल्या बद्दलच्या इ-मेलची प्रत दाखल केलेली नाही. दिनांक 22.4.2008 रोजी ही घटणा घडली असती तर निश्चीतच दिनांक 24.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना ई-मेलव्दारे भारतीय चलनात रक्कम जमा करण्याची जी विनंती केली होती त्यामध्ये या सुधारीत रक्कमेचा उल्लेख करण्यात आला असता परंतु तो उल्लेख केला नव्हता. या उलट अमेरीकन डॉलर केवळ रु.8,614/- याचे सममुल्य भरतीय चलनामध्ये जमा करण्यात यावे अशी विनंती तक्रारदारांना केली होती. व त्याप्रमाणे तक्रारदारांनी रक्कम अदा केली. 17. वरील चर्चेवरुन ही बाब सिध्द होते की, दिनांक 22.4.2008 चे सुधारीत अंदाजपत्रक तक्रारदारांना पाठविणे व तक्रारदारांनी त्या प्रमाणे रक्कम जमा करणे ही केवळ सा.वाले यांचे पश्चातबुध्दी असून त्या स्वरुपाचे कथन पुराव्याव्दारे सिध्द करु शकले नाहीत. या उलट तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचे दिनांक 17.4.2008 चे अंदाजपत्रकाप्रमाणे अमेरीकन डॉलर रु.8,614/- दिनांक 21.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांचेकडे जमा केले व त्यानंतर सा.वाले क्र.2 यांचे विनंतीप्रमाणे त्यांचेकडे भारतीय चलनात रुपये 3,60,926/- दिनांक 24.4.2008 रोजी जमा केले. अमेरीकन चलनात तसेच भारतीय चलनामध्ये रु.180/- अमेरीकन डॉलर येवढी रक्कम आरक्षण रद्द झाल्यास परतावा मिळणेबद्दल शुल्क म्हणून सम्मलीत होती. या प्रमाणे तक्रारदार कंपनी ही आरक्षण रद्द झाल्याने परतावा मिळण्यास पात्र होती. व तक्रारदारांची ती मागणी सा.वाले यांनी एकत्रितपणे खोटे कथन करुन विनाकारण फेटाळली. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. 18. प्रस्तुत प्रकरणामध्ये जो ई-मेल दाखल करण्यात करण्यात आलेला आहे, त्यावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचेकरीता सब एजंट म्हणून काम करीत होते. व सा.वाले क्र.1 हे दुय्यम प्रमुख एजंट होते. व मुख्य कंपनी “प्रिंसेस क्रुझ” होती. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दिनांक 24.4.2008 रोजी जो ई-मेल पाठविला व त्याव्दारे भारतीय चलनाव्दारे रक्कम जमा करण्याची विनंती केली त्यामध्ये एक कथन केले आहे की, सा.वाले क्र.1 हे फार दिवस रक्कमेकरीता थांबणार नाही व त्या दृष्टीने भारतीय चलनामध्ये रक्कम जमा करण्यात यावी. यावरुन असे दिसते की, ग्राहकांकडून प्राप्त झालेली रक्कम सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचेकडे पाठवित होते. व त्यानंतर सा.वाले क्र.1 आरक्षण पक्के करीत असत. तक्रारदारांचे विनंती प्रमाणे आरक्षण कायम करण्यात आलेले नव्हते असे सामनेवाले हयांचे असे कथन नाही म्हणजे सा.वाले क्र.1 यांना रक्कम प्राप्त झाली असेल कारण आरक्षण कायम करण्यात आले होते. तथापी सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे रक्कम पाठविल्या बद्दल किंवा जमा केल्याबद्दल पुरावा उपलब्ध नाही. व सा.वाले क्र.2 यांनी तो पुरावा दाखल केलेला नाही. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये कुठेही त्यांना रक्कम प्राप्त झालेली आहे असे कथन केलेले नाही. या उलट सा.वाले क्र.1 व 2 आप आपल्या कैफीयतीमध्ये एक मेकांशी संबंध नसल्याचे कथन करतात या वरुन तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांना अदा केलेली रक्कम नक्की कुणाकडे जमा आहे या बद्दल निष्कर्ष काढता येत नाही. सा.वाले क्र.2 हे सब सबएजंट व सा.वाले क्र.1 हे मुख्य एजंट अशी परिस्थिती असल्याने व सा.वाले क्र.2 यांना तक्रारदारांकडून रक्कम प्राप्त झालेली असल्याने सा.वाले क्र.1 व 2 यांचे विरुध्द वैयक्तिक अथवा संयुक्तीकपणे तक्रारदारांना रक्कम अदा करण्याचा आदेश करणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. जर सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांना रक्कम पोहचती केली नसेल तर सा.वाले क्र.1 हे सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द त्या रक्कमेच्या वसुलीची कायदेशीर कार्यवाही दिवाणी न्यायालयात करु शकतील. 19. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 416/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेंवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना सहलीच्या तिकिटाचे परताव्याची रक्कम परत करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते. 3. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तपणे तक्रारदारांना रु.3,60,926/- 9 टक्के व्याज दराने दिनांक 27.5.2008 पासून ती रक्कम अदा करेपर्यत अदा करावी असे निर्देश देण्यात येतात. त्या व्यतिरिक्त खर्चाबद्दल रु.10,000/- सा.वाले क्र.1 व 2 यांनी वरील प्रमाणे तक्रारदारांना अदा करावेत असे निर्देश देण्यात येत आहेत. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |