(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचेकडून रक्कम रु.8750/- भरुन घेवून अर्जदार क्र.1 यांना तक्रार अर्ज परिच्छेद क्र.3 नुसार घेतलेले सर्व दहावी बारावी चे सर्टिफिकेट, मार्कशिट तसेच इतर अस्सल दस्तऐवल परत मिळावते तसेच नसिंग ट्रेनिंगमध्ये अर्जदार यांना मिळालेले प्रथमवर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष मार्कशिट व डिप्लोमा सर्टिफिकेट, नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र, इंटरशिप सर्टिफिकेट व इतर राहीलेले प्रमाणपत्र देण्याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश व्हावा, मानसिक शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- मिळावेत, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी पान क्र.18 लगत लेखी म्हणणे व पान क्र.19 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?- होय.
3) सामनेवाला हे अर्जदार यांचेकडून राहीलेली रक्कम मिळणेस पात्र आहेत
काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून योग्य ती कागदपत्रे व प्रमाणपत्रे
मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
6) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः
मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.25 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने अँड. धनंजय देशपांडे यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला संस्थेमध्ये अँडमिशन घेतले होते व काही प्रमाणात फिची रक्कम जमा केली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5, पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 लगत फी भरल्याच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे पान क्र.5, पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 च्या पावत्या यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “त्यांनी अर्जदार यांना आर.जी.एम.एस. या साडेतीन वर्षाच्या कोर्ससाठी सन 2007-2008 मध्ये प्रवेश दिला होता ही बाब मान्य केली आहे तसेच अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे किती रक्कम जमा केली त्याचा तपशील दिलेला आहे व अर्जदार यांचेकडून सामनेवाला यांना रक्कम रु.26,250/- इतकी रक्कम येणे होत आहे असे म्हटलेले आहे. याबाबतचे सविस्तर वर्णन सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 6 व 7 मध्ये दिलेले आहे. अर्जदार यांचेकडूनच रक्कम येणे असल्यामुळे कोणतेही कागदपत्र दिलेली नाही. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला यांचे लेखी म्हणण्याबाबत अर्जदार यांनी पान क्र.28 लगत प्रतिज्ञापत्र व पान क्र.29 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेली आहेत. तसेच सामनेवाला यांचेवतीने पान क्र.28 लगत श्री.पंडीत कारभारी उगले यांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे. पान क्र.28 चे श्री उगले यांचे प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार नं.1 हिच्याकडून संस्थेस अद्यापही रक्कम येणे असल्याने संस्थेने तिला ना हरकत दाखला जारी केलेला नाही.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी या कामी पान क्र.5, पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 लगत पैसे भरल्याच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. जरी सामनेवाला यांची त्यांचे लेखी म्हणणे कलम 7 चे शेवटी त्यांना अर्जदार यांचेकडून रक्कम रु.26,250/- येणे होत आहे असे म्हटलेले असले तरीसुध्दा या रकमेबाबतचा योग्य तो हिशेब सामनेवाला यांनी दिलेला नाही. पान क्र.9 चे सामनेवाला यांचे माहितीपत्रकामध्ये सब्जेक्ट टु चेंज (subject to change) असा उल्लेख आहे. परंतु फिच्या आकारणीमध्ये कोणता बदल झालेला होता व अर्जदार यांचेकडून नक्की किती फी येणे आहे याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा सामनेवाला यांनी या कामी दिलेला नाही. या उलट अर्जदार यांनीच ते सामनेवाला यांना रु.8750/- देणे लागत आहेत ही बाब मान्य केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.28 चे पंडीत कारभारी उगले यांचे प्रतिज्ञापत्र याचा विचार होता अर्जदार यांनी मागणी केल्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांना योग्य ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे परत केलेली नाहीत असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे यां मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचेकडून रक्कम रु.8750/- भरुन घेवून सामनेवाला यांनी अर्जदार यांना त्यांची सर्व मुळ अस्सल कागदपत्रे परत करावीत असेही या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून सर्व मुळ अस्सल कागदपत्रे परत मिळावीत या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे व तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.3500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्ंयानी दाखल केलेली सर्व कागदपत्रे वकिलाचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.8750/- जमा करावेत.
3) वर कलम 2 मध्ये लिहीलेप्रमाणे अर्जदार यांचेकडून सामनेवाला यांना रक्कम रु.8750/- मिळालेनंतर तेथून पुढे 3 दिवसाचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना त्यांची सर्व मुळ अस्सल कागदपत्रे दहावी व बारावीचे मार्कशिट व सर्टिफिकेटस, नर्सिंग ट्रेनिंगमध्ये मिळालेले प्रथमवर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष मार्कशिट व डिप्लोमा सर्टिफिकेट व नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र, इंटरशिपचे सर्टिफिकेट इतर राहीलेली प्रमाणपत्रे व दस्तऐवज परत करावेत.
4) आजपासून 30 दिवसांचे आत अर्जदार यांना सामनेवाला यांनी मानसिक त्रासापोटी रु.3500/- द्यावेत.
5) आजपासून 30 दिवसांचे आत अर्जदार यांना सामनेवाला यांनी अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.