जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २५२/२०११ तक्रार दाखल दिनांक – ३०/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – ११/०९/२०१४
श्री. घनश्याम मुरार पाटील
उ.व. ३५, वर्षे, धंदा – शेतीकाम
रा.त-हाडी ता.शहादा जि.नंदुरबार . तक्रारदार
विरुध्द
युनायटेड इंडिया इन्शुं.कुं.लि.
शाखा शहादा करीता
शाखा धुळे, दिनेश शॉपिंग कॉम्प्लेक्स,
आग्रा रोड, नेहरू नगर, देवपुर, धुळे . सामनेवाला
(नोटीस बजावणी म.शाखाधिकारी, धुळे यांचेवर व्हावी)
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एस.के. महाजन/अॅड.एस.आर..वाघे)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.एस.एम.शिंपी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. अपघातग्रस्त वाहनाचा विमा दावा सामनेवाले यांनी मंजूर करावा या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. आपल्या तक्रारीत तक्रारदार यांनी म्हटले आहे की, त्यांनी दि.२५/०५/२००९ रोजी धुळे येथील उज्ज्वल ज्जल ज्वल ऑटोमोटिव्ह प्रा.लि. यांच्याकडून टाटा छोटा हत्ती हे वाहन खरेदी केले. त्याचा क्रमांक एम.एच.-३९/सी.६८०८ असा होता. या वाहनाचा त्यांनी सामनेवाले यांच्याकडून विमा उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्रमांक २३१००१/३१/१०/०१/०००००३६१ असा होता. तर पॉलिसीची मुदत दि.२७/०४/२०१० ते २६/०४/२०११ अशी होती. दि.२६/०५/२०१० रोजी तक्रारदार यांचे वाहन रावेर येथून शहाद्याकडे येत असतांना तांडे तालुका शिरपूर येथे समोरून येणा-या कंटेनरने हूल दिल्यामुळे तक्रारदार यांचे वाहन लिंबाच्या झाडास जावून धडकले. त्यात सुमारे रूपये १,२६,५१४/- एवढ्या रकमेचे नुकसान झाले. ही भरपाई सामनेवाले यांच्याकडून मिळावी यासाठी तक्रारदार यांनी विमा दावा दाखल केला. तथापि, वाहन चालक कांतीलाल सुभाष पाटील यांच्याकडे मालवाहू वाहन चालविण्याचा परवाना नव्हता असे कारण सांगून सामनेवाले यांनी विमा दावा फेटाळून लावला. त्यांची ही कृती सेवेत त्रुटी निर्माण करणारी असून दावा मंजूर करावा, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये १०,०००/- द्यावे. तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत तक्रारदार यांनी विमा कंपनीला अपघाताबाबत दिलेली माहिती, विमा दावा प्रपत्र, वाहन दुरूस्तीसाठी आलेल्या खर्चाबद्दल पावत्या, कर प्रपत्र, वाहन दुरूस्तीबाबतचे विवरण, मजुरीचे अंदापत्रक, क्रेनच्या पावत्या, सामनेवाले यांनी दावा नाकारल्याचे पत्र, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, सामनेवाले यांच्याकडे भरलेल्या विमा रकमेची पावती, चालक परवान्याची प्रत, आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सदरचा अपघात तक्रारदार यांच्या वाहनावरील चालकाच्या चुकीमुळे घडलेला आहे. सदर वाहनाच्या चालकाकडे असलेला परवाना मालवाहू वाहनासाठीचा नव्हता. तक्रारदार यांच्या वाहनातून माल वाहतूक केली जात होती. याचमुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे अपघाताची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची नाही. म्हणून सदरची तक्रार रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
५. खुलाशासोबत सामनेवाले यांनी अपघाताबाबत तक्रारदार यांच्याकडून प्राप्त झालेले माहितीपत्र, विमा दावा प्रपत्र, चालक कांतीलाल सुभाष पाटील यांच्या चालक परवान्याची प्रत, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
६. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
. मुददे निष्कर्ष
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? नाही
ब. सामनेवाले यांच्याकडून विमा दावा मंजूर
होण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी त्यांच्या छोटा हत्ती या वाहनाची विमा पॉलिसी सामनेवाले यांच्याकडून घेतली होती. त्याचा हप्ता भरल्याची प्रत तक्रारदार यांनी दाखल केली आहे. या मुद्यावर सामनेवाले यांचे काहीही म्हणणे नाही. याचाच अर्थ सामनेवाले यांना तक्रारदार यांची विमा पॉलिसी मान्य आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात हे सिध्द होते.
तक्रारदार यांच्या वाहनाला दि.२६/०५/२०१० रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी दि.११/०६/२०१० रोजी त्याबाबत सामनेवाले यांना माहिती कळविली. त्याचवेळी तक्रारदार यांनी विमा दावा मागणी प्रपत्र भरून पाठविले. त्यानंतर सामनेवाले यांनी दि.२३/११/२०१० रोजी तक्रारदार यांना विमा दावा नाकारीत असल्याचे पत्र पाठविले. तक्रारदार यांचे वाहन माल वाहतूक करणारे होते. अपघात घडला त्यावेळी वाहनावर चालक म्हणून असणारे कांतीलाल सुभाष पाटील यांच्याकडे एल.एम.व्ही.-एन.टी. या प्रकारचा वाहन परवाना होता. त्यांच्याकडे माल वाहतूक करणा-या वाहनासाठीचा परवाना नव्हता असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. त्यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या वरील पत्रात हे नमूद केले आहे.
तक्रारदार यांनी विमा दावा रकमेची मागणी केल्यानंतर सामनेवाले यांनी त्यांच्या मागणीला उत्तर दिले आहे. तक्रारदार यांनी विमा दावा मागणी प्रपत्रासोबत सादर केलेल्या माहितीवरून आणि कागदपत्रांवरूनच तक्रारदार यांनी वरील उत्तर त्यांना कळविले आहे. यात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असे दिसून येत नाही, असे आमचे मत आहे. तक्रारदार यांनी विमा दाव्याची मागणी केल्यानंतर सामनेवाले यांनी त्याला लगेच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली हे सिध्द होत नाही. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांच्याकडील वाहन हलक्या प्रकारातील होते आणि त्याचा उपयोग कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केला जात होता. माल वाहतुकीसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. अपघात घडला त्यावेळी वाहनात कोणताही माल नव्हता. त्यामुळे वाहन चालकाकडे माल वाहतूक करणा-या वाहनासाठीचा परवाना नव्हता या कारणावरून सामनेवाले यांनी घेतलेला विमा दावा नाकारण्याचा निर्णय संयुक्तिक नाही असा मुददा तक्रारदार यांच्या वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात उपस्थित केला.
तक्रारदार यांचे वाहन हलक्या प्रकारातील असले तरी माल वाहतूक करणारे व्यावसायीक वाहन आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात त्याची नोंदणी त्याच प्रकारात झालेली आहे. त्यामुळे अशा वाहनावरील चालकाकडे माल वाहतूक करणा-या वाहनासाठीचा परवाना असणे आवश्यक आहे. माल वाहतूक न करणा-या हलक्या प्रकारातील वाहनांसाठी वेगळया प्रकारचा तर माल वाहतूक करणा-या हलक्या प्रकारातील वाहनांसाठी वेगळया प्रकारचा परवाना दिला जातो. तक्रारदार यांच्या वाहनाला अपघात झाला त्यावेळी कांतीलाल सुभाष पाटील हे वाहन चालवित होते. त्यांच्याकडे एल.एम.व्ही.-एन.टी. या प्रकारचा परवाना होता. माल वाहतूक करणा-या वाहनासाठी हा परवाना वैध नाही. त्यामुळे याच कारणावरून तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्यात आला आहे. हा निर्णय सेवेतील त्रुटी ठरू शकत नाही, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात मंचाने या पूर्वी दाखल काही तक्रारी आणि त्यावर दिलेल्या न्यायनिवाडांचा आधार घेतला. ज्याप्रकारचे वाहन तक्रारदार यांच्याकडे होते. त्या वाहनावरील चालकाकडे त्या वाहनासाठी वैध ठरणारा परवाना असणे आवश्यक आणि अपेक्षित आहे. त्याच अनुशंगाने मंचाने स्वतः प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिल्या जाणा-या वाहन परवान्यांचेही अवलोकन केले. त्यावरून आमच्या असे निदर्शनास आले की, सदर तक्रारदाराकडील चालक कांतीलाल सुभाष पाटील यांच्याकडे एल.एम.व्ही.-एन.टी. या प्रकारचा वाहन परवाना होता. हा परवाना माल वाहतूक न करणा-या हलक्या वाहनांसाठी म्हणजेच घरगुती वापराच्या कारसाठी देण्यात येतो. तर माल वाहतूक करणा-या हलक्या वाहनांसाठी एल.एम.व्ही.- टी.आर. म्हणजेच हलक्या प्रकारच्या पण माल वाहतूक करणा-या (ट्रान्सपोर्ट) वाहनासाठी हा परवाना दिला जातो. सदर तक्रारीतील वाहन चालकाकडे एल.एम.व्ही.- टी.आर. हा परवाना नव्हता. यावरून तक्रारदार यांच्या चालकाकडे अपघात घडला त्यावेळी वैध परवाना नव्हता हे स्पष्ट होते.
तक्रारदार यांच्या वकिलांनी युक्तिवादासोबत मा.सर्वोच्च न्यायालयातील सिव्हील अपील नं.४८३४/२०१३ या दाव्याचा संदर्भ दाखल केला आहे. त्याचेही मंचाने अवलोकन केले. मात्र त्यातील घटना आणि वस्तुस्थिती निराळी असल्याने सदर तक्रारीत त्याचा आधार घेता येणार नाही असे आम्हाला वाटते.
वरील सविस्तर विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांनी विमा दावा मिळण्यासाठी दाखल केलेल्या प्रपत्रात दिलेली माहिती आणि त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या चालकाकडे माल वाहतूक करणा-या हलक्या वाहनासाठीचा परवाना नव्हता हे नमूद केले आहे. याच कारणावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. सामनेवाला यांचा तो निर्णय अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही. त्याचमुळे तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाहीत असे आमचे मत आहे. म्हणून मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘क’ – वरील मुद्याचा विचार करता तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे सामनेवाले यांच्याविरूध्द कोणतेही आदेश करणे अयोग्य ठरेल. म्हणूनच आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.