(मंचाचा निर्णय: श्री विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 11/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 25.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याची तक्रार मुख्यत्वे या कारणासाठी आहे की, गैरअर्जदारांचे अभिकर्त्याने वाहनाचा अपघाती विमा उतरविण्याकरीता पॉलिसी रु.800/- ते 850/- मध्ये मिळेल असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात पॉलिसी ही रु.1,015/- ला दिली. तक्रारकर्त्याचा दुसरा आक्षेप असा आहे की, पॉलिसीमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक नोंदविलेला नाही. म्हणूण तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन जास्त घेतलेली रक्कम व्याजासह परत मिळावी, पॉलिसीत दुरुस्ती करुन मिळावी, मानसिक व शारीरिक त्रासासाठी रु.10,000/-, भविष्यात मिळणा-या दाव्यापासुन वंचित ठेवण्याचे उद्देशासाठी नुकसानीचे रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.5,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे. 3. गैरअर्जदारांनी या प्रकरणात आपला लेखी जबाब दाखल करुन त्या व्दारे तक्रारकर्त्यास रु.850/- त पॉलिसी मिळेल असे त्यांचे अभिकर्त्याने सांगितले होते, ही बाब मान्य केलेली आहे. मात्र त्यांचे निवेदन असे आहे की, जुनी पॉलिसीची मुदत संपण्याचे आंत 3 महिनेपर्यंत जर नवीन पॉलिसी घेतली आणि आधीच्या पॉलिसीवर कोणताही दावा झालेला नसेल तर त्यावर ‘No Claim’, म्हणून 20% सुट मिळेल आशी तरतूद आहे. इतर विधान त्यांनी नाकबुल केले आणि तक्रारकर्त्याचे वाहन क्रमांका संबधी endorsement करण्यांत आले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची आहे व ती खारिज होण्यांस पात्र आहे असे म्हटले आहे. 4. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता सदर प्रकरणी गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तावेजांमध्ये जुनी पॉलिसी दाखल केलेली आहे ती दि.07.04.2008 ते 06.04.2009 या कालावधीसाठी आहे व तिचा प्रिमीयम रु.1,091/- एवढया रकमेचा आहे. तसेच तक्रारकर्त्याने घेतलेली विवादीत पॉलिसी ही दि.02.11.2009 ते 01.11.2010 या कालावधीची असुन तिचा प्रिमीयम र.1,015/- एवढा आहे. यावरुन उघडपणे असे दिसते की, तक्रारकर्त्याने ‘No Claim Bonus’, मिळण्याचे दृष्टिने सदर पॉलिसी घेतली नव्हती. पॉलिसींच्या तरतुदी प्रमाणे जुन्या पॉलिसीची मुदत संपण्याचे आंत 90 दिवसांचे आंत नवीन पॉलिसी घ्यावी लागते. मात्र तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी ही 90 दिवसांचे आंत काढली नाही, त्यामुळे ती ‘No Claim Bonus’, या तरतुदी अंतर्गत येत नसल्यामुळे तसेच जूने पॉलिसीचा प्रिमीयम रु.1,091/- दिलेला असल्यामुळे तक्रारकर्त्याची फसवणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 5. तक्रारकर्त्याचा दुसरा आक्षेप आहे की, पॉलिसीमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक दिलेला नाही. यावर गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने यासंबधी endorsement दिलेली आहे त्यामध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक नोंदविलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याचे असे म्हणणे प्रमाणे endorsement पश्चात बुध्दीने केलेले आहे. एक बाब स्पष्ट आहे की, पॉलिसीमध्ये वाहनाचा इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक नमुद आहे व तो तक्रारकर्त्याचे वाहनाचा आहे, ही बाब तक्रारकर्त्याने मान्य केली आहे. सदर प्रकरणी आमच्या मते गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिलेली आहे असे दिसुन येत नाही. यास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 6. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |