Dated the 30 Nov 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून कार्बन मोबाईल कंपनीचा मॉडेल Titanium S/9 हा ता.03.09.2014 रोजी रक्कम रु.8,690/- एवढया किंमतीचा विकत घेतला. तक्रारदार यांना मोबाईलचा Sim 1 Slot हा खराब असल्याचे विकत घेतल्याचे दुस-याच दिवशी लक्षात आल्याने सदर मोबाईल सामनेवाले यांचेकडे परत दिला.
2. सामनेवाले यांनी सदोष मोबाईलची विक्री करुन तक्रारदार यांना त्रुटीची सेवा दिली. सामनेवाले यांनी अदयापपर्यंत तक्रारदार यांना सदोष मोबाईल बदलून दिला नाही, अथवा मोबाईलची रक्कमही परत दिली नाही.
3. तक्रारदार यांनी यासंदर्भात सामनेवाले यांचेकडे ई-मेलव्दारे माहिती दिली, तसेच ता.13.09.2014 रोजी वकीलामार्फत नोटीसही पाठविली. परंतु अदयापपर्यंत सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
4. सामनेवाले यांना जाहिरप्रगटनाव्दारे नोटीसची बजावणी करुनही सामनेवाले हे गैरहजर राहिल्याने सामनेवाले यांचे विरुध्द ता.24.10.2016 रोजी “ एकतर्फा ” आदेश पारित करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद, ता.24.10.2016 रोजी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र तसेच लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा यासंदर्भात दाखल केलेली पुरसीस यासर्वांचे अवलोकनार्थ प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
6. उपरोक्त तक्रारीतील कागदपत्रांचे सखोल वाचन करुन मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
7.कारण मिमांसा-
अ. तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 “Electronic Mega Mall Croma” यांचेकडून Karboon Titanium S/9, Black मोबाईल ता.03.09.2014 रोजी रक्कम रु.8,690/- क्रेडिट कार्डव्दारे रक्कम अदा करुन “Infinity Retail Limited Trading as Croma Sales Invoice ” दहिसर येथून विकत घेतल्याबाबतची पावती अभिलेखात दाखल आहे.
ब. तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल दोषयुक्त असल्यामुळे सामनेवाले नं.2 यांचेकडे ता.05.09.2014 रोजी माहिती दिली. Infinity Care यांचे कर्मचारी संध्या पवार यांनी तक्रारदार यांच्या पावतीवर Sim 1 Slot is damage it doesn’t cover in warranty असे नमुद केल्याचे दिसुन येते.
क. तक्रारदार यांनी ता.06.09.2014 रोजी ई-मेलव्दारे सामनेवाले यांना मोबाईलच्या दोषा संदर्भात माहिती दिली. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले नं.2 यांनी मोबाईल विकत घेतल्यापासुन 07 दिवसात काही दोष आढळून आल्याबाबतची वॉरंटी दिली होती. सामनेवाले नं.2 यांचेवर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी उपरोक्त मॉडेलचा मोबाईल क्रेडिट कार्डव्दारे मोबदला देऊन विकत घेतला. परंतु दुस-याच दिवशी सदर मोबाईलमध्ये अचानकपणे बिघाड झाल्याने, सामनेवाले नं.2 यांचेकडे मोबाईलच्या दोषाबाबत तोंडी तक्रार केली, तसेच ता.05.09.2014 रोजी लेखी तक्रार क्रमांक-534332 व क्रोमा सर्व्हिस नंबर-एसआर05091400200 तक्रारदार यांचा मोबाईल व इन्व्हाईस नंबर देऊन केली.
ड. तक्रारदार यांनी ता.09.09.2014 रोजी ई-मेल पत्राव्दारे पुन्हा सामनेवाले यांचेकडे दोषयुक्त मोबाईल संदर्भात तक्रार दिली असता, कस्टमर केअर यांचेकडे हॅन्ड सेट व आयएमईआय नंबर आणि जॉबशीट पत्र पाठविण्याची सुचना ई-मेलव्दारे तक्रारदार यांना प्राप्त झाली.
इ. सामनेवाले यांनी ता.29.09.2014 रोजीच्या ई-मेलव्दारे तक्रारदार यांचा मोबाईल डिलेव्हरी करीता तयार असल्याचे तक्रारदार यांना कळविले, तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलबाबत “ कार्बन सर्व्हिस सेंटर यांचेकडे पाठविला, नंतर कंपनीचे टेक्नीशिअन यांनी मोबाईलची तपासणी केली असता, मोबाईल Physically Damage असल्याचे निष्पन्न झाले असुन, कंपनीने विकलेला मोबाईल दुरुस्ती केल्याचे तक्रारदार यांना पत्राने कळविल्याचे दिसुन आले.” तसेच तक्रारदार यांनी सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर 07 दिवसाचे आंत मोबाईलची डिलेव्हरी घेऊन जाण्याच्या सुचना दिल्या.
ई. तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन, तक्रारदार यांचा मोबाईल विकत घेतल्यानंतर लगेचच दुस-याच दिवशी खराब झाल्याचे दिसुन येते. सदर बाब सामनेवाले यांनी मान्य केल्याबाबतचा पुरावा अभिलेखात दाखल आहे. “ याचा अर्थ असाच की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष मोबाईलची विक्री केल्याचे स्पष्ट होते.” सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1. तक्रार क्रमांक-645/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष मोबाईलची विक्री करुन, तक्रारदार यांना त्रुटीपुर्ण
दिल्याची बाब मंच जाहिर करीत आहे.
3. सामनेवाले नं.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना मोबाईलची किंमत रु.8,690/- (अक्षरी रुपये आठ हजार सहाशे नव्वद) तक्रारदार
यांना ता.03.09.2014 पासुन ता.31.12.2016 पर्यंत दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याज
दराने परत दयावी. सदर रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास ता.01.01.2017 पासुन
आदेशाच्या पुर्ततेपर्यंत दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याज दराने दयावी.
4. सामनेवाले नं.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे) दयावी.
5. तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त अंतिम आदेश क्रमांक-3 व 4 मधील
आदेशांची पुर्तता सामनेवाले यांनी केल्यानंतर 08 दिवसांत जुना मोबाईल (उपरोक्त नमुद
Titanium S/9) सामनेवाले यांना परत दयावा.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.29.11.2016
जरवा/