(आदेश पारित व्दारा - श्री नितीन घरडे, मा. सदस्य )
- आदेश -
( पारित दिनांक –31 जुलै 2015 )
1.तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
2.तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्द पक्ष क्रं.1 हे जमिन विकसित करुन त्यावर हाऊस व्हीला/डयुप्लेक्स व रहिवासी/व्यवसाईक बांधकाम करण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्रं.2 हे विरुध्द पक्ष क्रं.1 चे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त असुन त्यांना राहण्याकरिता घराची आवश्यकता असल्याने त्यांनी विरुध्द पक्षाची वर्तमान पत्रातील जाहिरात बघुन त्यांचे ‘ मार्व्हल ’ या स्किम मधील एक व्हीला/ डयुप्लेक्स, क्रं.-48,जी सेक्टर 12 मधे असुन, खसरा नं.31 व 32 प.ह.नं.1, मौजा पिंपरी, ता.कूही, जि. नागपूर घेण्याचे निश्चित केले. व्हीला/ डयुप्लेक्स खरेदीपोटी तक्रारकर्त्याने दिनांक 27/2/2010 रोजी 11,000/- रोख व दिनांक 2/3/2010 रोजी सिडींकेट बँक, गांधीबाग शाखेचा,धनादेश क्रं.061960, व दिनांक 12/3/2010 रोजी रुपये 2,65,885/-रोख असे एकुण रुपये 3,16,885/-तक्रारकर्त्यास अदा केले असता विरुध्द पक्षाने दिनांक 19/3/2010 रोजी तक्रारकर्त्यास (विभागणी पत्र ) अलॉटमेंन्ट पत्र व नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र दिले.‘ व्हिला ’ ची मुळ किंमत रुपये 15,84,425/-होती. व्हीला/ डयुप्लेक्स घेतल्याचे दिनांकापासुन सदर स्किम दोन ते अडीच वर्षात पुर्ण होईल असे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास आश्वासन दिल्याने व तक्रारकर्त्यास घराची आवश्यकता असल्याने तक्रारकर्ता ठरल्याप्रमाणे हप्ते देण्यास तयार झाला.
3.परंतु वर्षे 2011 मधे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला एक पत्र देऊन बांधकाम सुरु करण्यास बराच विलंब झाल्याचे लक्षात आणून दिले असता विरुध्द पक्षाने दुर्लेक्ष केले म्हणुन दिनांक 4/1/2013,26/8/2014 व 18/9/2014 रोजी तक्रारकर्त्यास पत्र देऊन कन्व्हेन्स डीड करुन देण्याची मागणी केली.परंतु विरुध्द पक्षाने एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. मध्यंतरीचे काळात तक्रारकर्त्याने बरेचदा विरुध्द पक्षाचे कार्यालयास प्रत्यक्ष भेट दिली परंतु विरुध्द पक्षाने दाद दिली नाही म्हणुन दिनांक 5/2/2015 रोजी विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस दिली. परंतु त्या नोटीसलाही विरुध्द पक्षाने उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मौजा पिंपरी,खसरा नं.31 व 32 प.ह.नं.1, येथील विरुध्द पक्षाचे मार्व्हल या स्किम मधील एक व्हीला/डयुप्लेक्स,क्रं.-48,सेक्टर-12, ता.कूही, जि.नागपूर, चे विक्रीपत्र करुन द्यावे. ते शक्य नसल्यास आजचे बाजारभावाप्रमाणे येणारी रक्कम परत करावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक/शारिरिक त्रासाबद्दल 50,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 20,000/-मिळावे अशा मागण्या केल्या आहेत.
4.तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत 8 दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यात पैसे भरल्याच्या पावत्या,अर्लाटमेंन्ट पत्राची प्रत, विरुध्द पक्षाला दिलेल्या पत्राची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
5.यात विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 2 यांना मंचातर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. परंतु नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष मंचामसमक्ष हजर झाले नाही व आपला बचाव केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
6.तक्रारकर्त्याने या तक्रारीत तक्रारदाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याबाबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज दिनांक 2 जुन 2015 चे आदेशान्वये विलंब माफ करुन निकाली काढण्यात आला.
7.तक्रारकर्त्याचे वकीलांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्द पक्ष एकतर्फी.
8.तक्रारीत दाखल कागदपत्रांचे,लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे..
9.तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत जे विभागणी पत्र (allotment letter) दाखल केले आहे त्यावरुन तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचे मधे मार्व्हल या स्किम मधील एक व्हीला/ डयुप्लेक्स, क्रं.-48,जी सेक्टर 12 मधे असुन, खसरा नं.31 व 32 प.ह.नं.1, एकुण क्षेत्रफळ 877.65 स्के.फुट. मौजा-पिंपरी, ता.कूही, जि. नागपूर एकुण मोबदला रुपये 15,84,425/-मधे घेण्याचे आपसात निश्चित केल्याचे स्पष्ट होते. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला रुपये 3,16,885/-अदा केले असुन उर्वरित रक्कम विभागणी पत्र (allotment letter) पत्रात नमुद केल्याप्रमाणे देण्याचे ठरले होते. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन व्हीला/डयुप्लेक्स विक्रीपोटी रक्कम स्विकारुन सदर जागेवर कुठल्याही प्रकारचे काम सुरु केले नाही व वारंवार विनंती करुनही तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन दिले नाही ही विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रुटी ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे
10.या तक्रारीत विरुध्द पक्षाला नोटीस देऊनही विरुध्द पक्ष हजर झाले नाही व आपला बचाव केला नाही म्हणुन तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व दस्तऐवज ग्राह्य मानुन हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करित आहे.
10. - अं ती म आ दे श -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन व्हीला/डयुप्लेक्स विक्रीपोटी,स्वीकारलेली रक्कम रुपये 3,16,885/-रक्कम स्विकारल्याचे दि.12/3/2010 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने मिळुन येणारी तक्रारकर्त्यास अदा करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) असे एकुण 10,000/- रुपये तक्रारकर्त्यास अदा करावे.
6. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या.