(मंचाचा निर्णय: श्री मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 24/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 02.07.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, तो भारकस येथील रहीवासी असुन त्याने घरगुती उपयोगाकरीता टॅम्पो ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र.एम.एच.31/सी.एन.2934 ही गाडी खरेदी करण्यासाठी गैरअर्जदारांकडून रु.3,90,000/- चे कर्ज घेतले. तक्रारकर्त्याने, गैरअर्जदारांनी कर्ज देतांना त्याच्या इंगजीमध्ये असलेल्या को-या कागदांवर सह्या घेतल्या व सह्या केलेले 50 कोरे धनादेश घेतल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याचा गैरअर्जदारासोबत दि.23.01.2006 रोजी करार झाला असुन करारानुसार घेतलेल्या रु.3,90,000/- वर फायनान्स चार्जेस म्हणून रु.1,01,400/- व विम्याचे रु.30,000/- असे एकूण रु.5,21,400/- दि.21.11.2009 पर्यंत भरावयाचे होते. परंतु गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून रु.12,645/- जास्तीचे घेतले असतांना सुध्दा त्याला वाहनाची कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्र व कोरे धनादेश दिले नाही तसेच सदर वाहन गैरअर्जदारांचे हायपोथिकेशनवर असल्यामुळे त्याला वारंवार अडचणी निर्माण होतात. तक्रारकर्त्याने वारंवार गैरअर्जदारांना ना हरकत प्रमाणपत्र व कोरे धनादेशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.27.03.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली सदर नोटीसला दि.31.03.2010 रोजी उत्तर पाठविले व आणखी रु.21,791.35 पैसे बाकी असल्याचे कळविले. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्याने आजपर्यंत गैरअर्जदाराकडे रु.5,34,045/- भरले असुन रु.12,645/- जास्तीचे भरलेले आहेत. असे असतांनाही गैरअर्जदारांनी त्याला आवश्यक कागदपत्रे, ना हारकत प्रमाणपत्र व कोरे धनादेशांची पुर्तता केली नाही, म्हणून प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत गैरअर्जदाराने दिलेल्या दोषपूर्ण सेवेबद्दल रु.50,000/- ची, वाहनाची कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्र व कोरे धनादेश तसेच जास्तीचे भरलेल्या रु.12,645/- ची मागणी केलेली आहे तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या प्राथमिक आक्षेपात तक्रारकर्त्याची प्रस्तुत तक्रार पुराव्याविना व तक्रारकर्त्याची उलटतपासणी न करता निकाली काढणे शक्य नाही. तसेच त्यांचेमध्ये दि.25.01.2006 रोजी झालेल्या करारातील अट क्र.23 अन्वये कोणताही वाद हा आरबिट्रेंटरला वर्ग करण्यात यावा असे ठरलेले आहे, त्यामुळे सदर तक्रार मंचास चालविण्यांचा अधिकार नसल्याचे नमुद केले आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात त्यांनी तक्रारकर्त्यास टेम्पो ट्रॅक्स क्रुझर खरेदी करण्याकरता रु.3,90,000/-चे कर्ज दिले होते ही बाब मान्य केलेली आहे परंतु अनेक को-या कागदांवर व इंग्रजीमधे असलेल्या को-या करारपत्रांवर सह्या घेतल्याची बाब अमान्य केलेली आहे. गैरअर्जदारांनी नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास संपूर्ण कागदपत्र वाचुन व समजावून देऊन त्यावर जमानतदारांच्या सह्या घेतल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याकडून एकूण फायनान्स चार्जेस पैकी रु.12,645/- जास्तीचे घेतले असे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे असुन तक्रारकर्ता ठराविक वेळी रक्कम भरण्यांस असमर्थ ठरल्यामुळे व त्याने अनियमीतपणे रकमेचा भरणा केल्याबद्दल दंड स्वरुपात जास्तीची रक्कम घेणे असल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने संपूर्ण रकमेचा कराराप्रमाणे भरणा केलेला आहे हे म्हणणे अमान्य केले असुन गैरअर्जदार बँकेस त्याचेकडून रु.21,791.35 पैसे घेणे बाकी असल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे म्हटले आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्र करारांच्या अटीप्रमाणे तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम भरल्यास गैरअर्जदारास हरकत नसल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने कोणतीही रक्कम जास्तीची भरलेली नसल्यामुळे रु.12,645/- परत करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे नमुद केले आहे. 6. गैरअर्जदाराने आपल्या अधिकचे उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्ता हा दर वेळेस आपल्या मर्जीप्रमाणे विलंबाने रकमेचा भरणा करीत होता व कराराच्या कलम 2.9 (9) प्रमाणे दंडात्मक व्याज देणे आवश्यक आहे. तसेच तक्रारकर्त्याचे दोन धनादेश हे न वटता परत गेले त्याचा खर्च, इन्शुरन्समधील फरकाचे रु.1,028/- ही बाब तक्रारकर्त्याचे खाते उता-यात दाखविण्यांत आलेली आहे व उशिरा रक्कम भरल्यामुळे ए.एफ.सी खात्यामध्ये अधिकचे व्याज लावण्यांत आले असुन अशी एकूण रु.23,316.55 दि.31.08.2010 रोजी घेणे होते व ती तक्रारकर्त्याने न दिल्यामुळे त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यांत आले नाही. तसेच तक्रारकर्त्याने खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन ती खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.16.12.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर.उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 8. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून रु.3,90,000/- एवढे कर्ज घेतले होते व सदर कर्जाची संपूर्ण रक्कम रु.5,21,400/- परत करावयाची होती, ही बाब दोन्ही पक्षांच्या कथनावरुन व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. म्हणून तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक/सेवाधारक ठरतो असे मंचाचे मत आहे. सदर कर्ज घेते वेळी तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांच्यामधे दि.13.01.2006 रोजी करार झाला होता, ही बाब सुध्दा उभय पक्षांनी मान्य केली आहे. सदर करारनाम्याची प्रत मंचासमक्ष दाखल दस्तावेज क्र.11 म्हणून दाखल केलेले आहे, त्याचे अवलोकन केले असता कर्जाच्या कालावधी हा चार वर्षांचा होता व कर्जाची परतफेड ही चार वर्षांमध्ये करणे गरजेचे होते, ही बाब स्पष्ट होते. 9. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने कर्ज घेतेवेळी गैरअर्जदाराला 50 कोरे धनादेश सह्या करुन दिले होते परंतु गैरअर्जदाराने सदर बाब अमान्य केलेली असुन आपल्या उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याचे दोन धनादेश आवंटीत झाले नाही, यावरुन तक्रारकर्ता हा काही रकमेचा भरणा धनादेशाव्दारे करीत असल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीतील धनादेशांच्या पृष्ठयर्थ दिलीप रामदासजी खेकारे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्रात सुध्दा तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला कोरे सह्या केलेले धनादेश दिले होते, असे नमुद केले आहे. सदर प्रतिज्ञालेखाला गैरअर्जदारांनी कोणताही प्रतिज्ञालेख दाखल केला नाही किंवा सदर प्रतिज्ञार्थीची उलट तपासणी करण्याबद्दल पावले उचलली नाही. यावरुन सदर प्रतिज्ञालेखाचा आलेख ग्राह्य धरण्यांत येतो व तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला 50 कोरे धनादेश सह्या करुन दिले होते ही बाब स्पष्ट होते. ग्राहकांनी कोरे धनादेश दिले असतांना ते दिले नाही असे कथन करणे गैरअर्जदारांसारख्या व्यावसायीक बँकेला अशोभनिय बाब आहे व यातून गैरअर्जदारांच्या कथनातील विश्वासार्थता कमी होते. 10. तक्रारकर्त्याने करारातील अटी व शर्ती या इंग्रजीत असल्यामुळे समजल्या नाही व त्याच्या को-या दस्तावेजांवर सह्या घेतल्या असे तक्रारीत कथन केले आहे व त्या पृष्ठयर्थ त्याने प्रतिज्ञालेख सुध्दा दाखल केलेला आहे. प्रतिज्ञालेख व तक्रारीतील कथन जरी सत्य असले तरी ग्राहकांना किंवा तक्रारकर्त्याला मजकूर समजला नसेल अशा अवस्थेत सह्या करणे ही योग्य बाब नाही व त्यामुळे त्याचा आधार घेऊन गैरअर्जदाराला दोषी ठरविणे योग्य नाही. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात आक्षेप घेतला आहे की, करारनाम्यामध्ये आरबीट्रेशनचा उल्लेख असल्यामुळे ही तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार नाही. परंतु राष्ट्रीय आयोगाने अनेक न्याय निवाडयात आरबीट्रेशनचा क्लॉज असुन सुध्दा मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार पोहचतो, असे नमुद केले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांचा सदर आक्षेप अमान्य करण्यांत येतो. 11. मंचाने कर्जाच्या करारनाम्याचे अवलोकन केले असता प्रत्येक पानावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे, ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार यांचेनुसार तक्रारकर्त्यांना अटी व शर्तीं बंधनकारक आहेत. मंचाचे मते अटी व शर्ती या उभय पक्षाला बंधनकारक आहेत. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला कर्जाच्या मासीक हप्त्याच्या स्वरुपात कोरे धनादेश दिले होते, हि बाब सिध्द होते. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने मासिक हप्ते दर महिन्याचे 21 तारखेला भरणे गरजेचे होते, तसे त्यांनी केले नाही. मंचाच्या मते सदर बाब ग्राह्य धरण्यायोग्य नाही, कारण तक्रारकर्त्याचे कोरे धनादेश गैरअर्जदाराकडे होते. जर ते धनादेश वटविल्या गेले नसते तर त्यावर दंडात्मक व्याज लावण्याचा पूर्ण अधिकार गैरअर्जदारांना आहे. परंतु गैरअर्जदाराने धनादेश वटविण्यासाठी प्रयत्न केले नाही, त्यामुळे ते तक्रारकर्त्याकडून दंडात्मक व्याजाची प्रत्येक हप्त्याला मागणी करु शकत नाही. सदर प्रकरणात गैरअर्जदारानी तक्रारकर्त्याचे फक्त दोनच धनादेश वटविण्याकरीता टाकले व ते परत आले अश्या परिस्थितीत गैरअर्जदार फक्त त्या धनादेशांचे संदर्भात दंड आकारु शकतात. परंतु सदर प्रकरणात दाखल करारनामा (निशाणी क्र.11) चे अवलोकन केले असता त्यामध्ये दंड किती आकारावा याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही, अश्या परिस्थितीत एकतर्फी दंड गैरअर्जदार स्वतः ठरवू शकत नाही. 12. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यानुसार त्यानी जास्तीची रक्कम भरली आहे, असे नमुद केले आहे. परंतु सदर रक्कम का जास्त भरली ? याबद्दल कोणताही खुलासा केला नाही. तसेच रक्कम भरत असतांना तक्रारकर्त्यानी कोणताही उजर दाखल केल्याचे स्पष्ट स्पष्ट होत नाही. 13. उपरोक्त सर्व निष्कर्षांच्या आधारे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्यानी कर्जाची संपूर्ण परतफेड केलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला वाहन क्र. एमएच-31/सीएन-2934 ची एन.ओ.सी., रजिस्ट्रेशन पर्टिकुलर, इन्श्युरन्स कॉपी, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, लोन ऍग्रीमेंट आणि उर्वरित कोरे धनादेश द्यावेत. 14. वाहन कर्जाची रक्कम दिली असतांना दस्तावेज न देणे ही सेवेतील त्रुटी असुन गैरअर्जदारांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- तक्रारकर्त्याला द्यावे असे मंचाचे मत आहे. 15. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास वाहन क्र. एमएच- 31/सीएन-2934 ची एन.ओ.सी., रजिस्ट्रेशन पर्टिकुलर, इन्श्युरन्स कॉपी, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, लोन ऍग्रीमेंट आणि उर्वरित कोरे धनादेश द्यावेत. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |