जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :15/03/2010 आदेश पारित दिनांक :15/10/2010 तक्रार क्रमांक :- 165/2010 तक्रारकर्ता :– अशोककुमार व्यंकटराव एल मनचिली उर्फ, वाय अशोककुमार राव, वय अंदाजेः 59 वर्षे, व्यवसायः सेवानिवृत्त फौजी, राह. गोरा बाजार, कामठी, नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. इन्डस इंड बँक, श्री स्वामी प्लाजा, 97, पूर्व हायकोर्ट रोड, रामदासपेठ, नागपूर. 2. इन्डस इंड बँक, पंजीकृत कार्यालयः थिम्मय्या रोड (ईस्ट स्ट्रीट), केन्टोनमेंट, पुणे-411 001. 3. इन्डस इंड बँक, कार्पोरेट कार्यालयः रिटेश सुदर्शन बिल्डींग, 92, (जूने क्र.86) चेमियर्स रोड, चेन्नई-600018. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. ए. आर. कलरिया. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. आर.आर. जोहरापुरकर. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 15/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 15.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार ही बँक असुन ते वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करतात व त्यांनी काही वाहनांना कर्ज पुरवठा केलेला आहे. सदर वाहनांच्या कर्जाची परतफेड करण्यात गैरअर्जदारांची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी तीन ट्रक (अशोक लेलँड टिप्पर मॉडेल 2214 ज्याचा नोंदणी क्रमांक एमएच-40/5680, एमएच-40/5681 व एमएच-27/एक्स-622) विकण्याचे ठरविले. त्यानुसार गैरअर्जदार क्र.2 चे अधिका-यांसोबत तक्रारकर्त्याने तीनही वाहनांची पाहणी केली व रु.5,80,000/- या दराने निविदा दाखल केली. गैरअर्जदार क्र.1 चे अधिका-यांनी सदर कोटेशन मंजूर झाल्याचे तक्रारकर्त्याला कळविले व प्रत्येक ट्रकच्या खरेदीपोटी रु.10,000/- जमा करण्यांस सांगितले. त्यानुसार दि.16.09.2009 रोजी तक्रारकर्त्याने रु.30,000/- गैरअर्जदार क्र.1 कडे जमा केले. सदर रक्कम प्रत्येकी रु.10,000/- याप्रमाणे पावती क्र.102216, 102217 व 102218 नुसार दिल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केलेले आहे व उर्वरित रक्कम एक आठवडयाचे सुमारास भरण्याची तक्रारकर्त्याला सुचना केली. दि.24.09.2009 रोजी गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास कळविले की उर्वरित रक्कम रु.17,10,000/- भरावी. परंतु काही ना काही कारण सांगुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून रक्कम स्विकारली नाही. अखेरीस दि.29.03.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 चे अधिकारी श्री. अजय माहुळे ह्यांनी तक्रारकर्त्यास कळविले की, सदर ट्रकचे संदर्भात तडजोड झाली असुन सदर ट्रक विकायचा नाही त्यामुळे आपले रु.30,000/- परत घेऊन जावे. सदर सुचना प्राप्त झाल्यामुळे तक्रारकर्ता आश्चर्यचकीत झाला व त्याने कर्जदार श्री.सुरेश फुलझेले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही तडजोड झाली नसल्याचे सांगितले. 3. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याचेकडून रु.10,000/- ट्रकच्या खरेदीपोटी स्विकारल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यासोबत धोकाधडी केली आहे व सेवेत त्रुटी दिली असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी आपले परिच्छेद निहाय उत्तर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने खोटे व निरर्थक आरोप लावलेले असुन तक्रारकर्ता हा त्यांचा ‘ग्राहक’ नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे जावई ट्रकव्दारा माल परिवहनाचा व्यवसाय करतात व सून वाय. शितल हीच्या खासगी व्यवसायासाठी ट्रक खरेदी करावयाचे होते याबाबत नोटीसमध्ये नमुद केलेले नव्हते आणि प्रथमतः मंचासमक्ष उपस्थित केल्या गेल्याचे गैरअर्जदारांनी नमुद केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात पुढे असे नमुद केले आहे की, अटी व शर्तींचे पालन करणा-या खरेदीदारांना वाहन विकल्या जाते व तक्रारकर्त्याची निविदा मंजूर झाली नव्हती. तसेच तक्रारकर्त्याने ज्या दिवशी रु.30,000/- भरले त्याच दिवशी उर्वरित रक्कम भरावयास पाहिजे होती. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार ही काल्पनिक व खोटी असल्यामुळे खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 5. गैरअर्जदारांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यास त्याची निविदा गैरअर्जदारांनी मान्य केल्याप्रमाणे त्याला निविदाची पूर्ण रक्कम भरावयास सांगितली होती. परंतु तक्रारकर्त्याने त्याचेजवळ असलेले रु.30,000/- आता भरुन घ्या व उर्वरित रक्कम दिवसभरात खरेदीची पूर्ण रक्कम भरेल असे कबुल केले होते. परंतु तक्रारकर्त्याने दिवसभरात संपूर्ण रक्कम न भरल्यामुळे त्याची निविदा खारिज करण्यांत आली. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, त्याच दिवशी निविदा आल्यामुळे तक्रारकर्त्याला त्याबाबत सांगण्यांत आले. परंतु तक्रारकर्त्याने पैसे भरण्यांस अवधी पाहिजे अशी विनंती केली व त्यावेळेस तक्रारकर्त्याने जमा केलेले रु.30,000/- त्याला परत नेण्यास सांगितले व 20 लक्ष रुपयात जर तो वाहने घेण्यांस तयार असेल तर त्याला वाहने देण्याचे सुध्दा सांगितले. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने नोटीसमध्ये 3 दिवसांत देऊ केलेली रक्कम सुध्दा दिली नाही व सदर तक्रार ही खोटी असल्यामुळे खारिज करण्यांची विनंती केली आहे. 6. सदर तक्रार ही मंचापुढे दि.03.09.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला, तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यांचे सुक्ष्म निरीक्षण केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. गैरअर्जदारांनी जप्त केलेले तिन ट्रक खरेदी करण्या करीता निविदा दिली होती, ही बाब दोन्ही पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते व त्या अनुषंगाने तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे तीन ट्रकच्या खरेदीकरता पार्ट पेमेंट म्हणून दि.16.09.2009 रोजी प्रत्येकी रु.10,000/- याप्रमाणे रु.30,000/- जमा केले होते ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1,2 व 3 वरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदारांच्या वकीलांनी युक्तिवादाचे वेळी सांगितले की, तक्रारकर्त्याने तीन ट्रक खरेदी करण्याकरता जी निविदा दिली त्यामध्ये कोणासाठी खरेदी करीत आहे याचा उल्लेख केलेला नव्हता. त्यांनी तक्रारीमध्ये प्रथमच मुलगी, जावई व स्वतःसाठी ट्रक खरेदी करीत असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे सदर व्यवहार हा व्यावसायीक स्वरुपाचा असल्यामुळे मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचा आक्षेप घेतलेला आहे. म्हणून तक्रारकर्त्याने जरी ही निविदा भरली असली तरी ती आपल्या मुलगी, जावई व त्याच्याकरता भरल्याचे तक्रारीत प्रतिज्ञेवर म्हटले आहे. परंतु पार्ट पेमेंट देत असतांना तीनही ट्रककरता तक्रारकर्त्याने स्वतःच्या नावाने प्रत्येकी रु.10,000/- भरले असल्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने तीनही ट्रक स्वतःच्याच नावाने खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे व त्यामुळे तक्राराकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्याचे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाही. 8. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना तीनही ट्रककरीता निविदा दिली होती ही बाब गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 पान क्र.38 वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने सदर वाहनाची उर्वरित रक्कम तो घेऊन गेला असता गैरअर्जदारांनी ती घेतली नाही असे आपल्या तक्रारीत नमुद केलेले आहे. तर गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने त्याच दिवशी संपूर्ण उर्वरित रक्कम द्यावयास पाहिजे होती, ती न दिल्यामुळे त्याची निविदा रद्द करण्यांत आली व रु.30,000/- परत घेऊन जाण्यांस सांगितले. तक्रारकर्ता त्याच दिवशी गैरअर्जदारांकडे संपूर्ण रक्कम घेऊन गेला होता ही बाब स्पष्ट करणारा कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल नाही तसेच गैरअर्जदाराने सुध्दा तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम त्याच दिवशी भरावयास पाहिजे होती अशा अटी व शर्ती असलेला कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. दोन्ही पक्ष त्यांचे कथन सिध्द करणारा कोणताही पुरावा दाखल करण्यांस अपयशी ठरले आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- ख् 1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |