तक्रारदार : वकील श्रीमती.वारुंजीकर हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे बँकिंग विषयक कामे करणारी संस्था असून ग्राहकांना कर्ज देणे, ठेवी स्विकारणे, वगैरे कामे करत असतात. सा.वाले यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहे.
2. तक्रारदार जे भाईंदर येथे राहातात. त्यांनी सा.वाले यांचे कडून आपल्या मालकीच्या एम.एच. 04 ई. बी.5931 या चारचाकी वाहनासाठी रु.2,50,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्ज 45 समान मासीक हप्त्यात फेडावयाचे होते व सदर कर्जावर 10.1 टक्के व्याज द्यावयाचे तक्रारदारांनी कबुल केले होते. तक्रारदार यांचे असे देखील म्हणणे आहे की, सदर कर्जाचे व्यवहारा संबंधी त्यांनी सा.वाले यांचेकडे रु.30,000/- डिपॉझीटपोटी भरले होते. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी भरावयाचे रु.8,800/- चे मासीक हप्ते पूर्णपणे भरलेले आहेत. परंतु सा.वाले यांनी त्यांना विमा डिपॉझीटची रक्कम परत केलेली नाही. तसेच सा.वाले यांना वाहना संबंधी विम्याची पॉलीसी देखील दिलेली नाही. या संबंधी पत्र व्यवहार करुन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे सा.वाले यांचेकडून विमा डिपॉझीटपोटी भरलेले रु.30,000/- व तक्रारदार यांना सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.4,71,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- याची मागणी केलेली आहे.
3. सा.वाले यांना नोटीसची बजावणी होऊन देखील सा.वाले मंचासमोर गैर हजर राहील्यामुळे सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करुन सा.वाले यांचे कडून घेतलेल्या कर्जा संबंधी कर्ज परतफेडीचा तक्ता व कर्जा संबंधी कागदपत्रे तसेच सा.वाले यांना देण्यात आलेल्या नोटीसची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून कर्ज घेताना कर्जाच्या कराराची प्रत देखील दाखल केलेली आहे.
4. सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आल्यामुळे तक्रारदारांची कथने अबाधित राहातात. परंतु केवळ तक्रारदारांची कथने अबाधित राहील्यामुळे ती जशीच्या तशी स्विकारणे शक्य नाही. प्रस्तुतच्या तक्रारीत तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून घेतलेल्या कर्जापोटी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन कर्ज फेडीच्या परत फेडीचे हप्ते बघीतले असता तक्रारदार यांनी दिनांक 21.7.2011 पर्यत कर्ज परतफेड केल्याचे दिसून येते. परंतु पुढील कर्जफेडीची रक्कम तक्रारदार यांच्याकडे येणे असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे विमा डिपॉझीटपोटी रु.30,000/- भरल्या बाबत तक्रारदारांनी कोणतीही कागदपत्रे दाखल केली नाहीत. तसेच सदर विमा डिपॉझीटची रक्कम कर्ज रक्कमेशी कशी निगडीत होती व कर्जाच्या रक्कमेची परतफेड केल्यानंतर विमा डिपॉझीटची रक्कम तक्रारदारांना देय होती या बाबत तक्रारदारांनी कोणतेही समाधानकारक कागदपत्र दाखल केले नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कर्जाच्या कराराची प्रत अत्यंत अस्पष्ट असून त्याचे निरीक्षण केल्यानंतर विमा डिपॉझीटची रक्कम, त्या संबंधीचा उल्लेख तसेच सदरची रक्कम देय असल्याबाबतची अट करारात आढळून येत नाही. तसेच तक्रारदारांनी कर्जाची परतफेड केली या संबंधी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे सदर प्रकरण सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा करुन देखील सा.वाले यांचे विरुध्द सेवा सुविधा पुरविण्यात कसुर आढळून येत नाही. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 26/2013 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 04/08/2015