::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :24/03/2015 )
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा लातूर येथील रहिवाशी असून लघुउदयोजक आहे. त्यांनी सदर लघुउदयोगासाठी वैयक्तीक वापरासाठी सामनेवाला यांच्याकडून रु. 5,20,000/- चे कर्ज घेतले. त्याचा वाहन क्र. एम.एच. 23/ई-5994 असा असून, त्याचे कर्ज खाते क्र. MTAA 21053 आहे. सदर कर्ज हे दि. 25.08.2007 रोजी घेतले. तक्रारदारास सामनेवाला यांनी कर्ज घेण्याचे चार्जे व विमा हप्ता रु. 20,000/- भरुन घेतले. सामनेवाला व तक्रारदार यांच्यामध्ये कर्ज करारानुसार 36 हप्त्यामध्ये परतफेडीचे ठरले होते. तक्रारदाराने सदर कर्ज हे वेळेवर 35 हप्ते भरणा केले आहेत जे हप्ते वेळेत भरणा केले गेले नाहीत. ते हप्ते AFC चार्जेससह भरणा केले आहेत. तक्रारदाराने पुर्ण कर्ज दि. 30.06.2010 रोजी भरले आहे. दि. 30.06.2010 रोजी गैरअर्जदार यांनी सेटलमेंट स्टेटमेंट नुसार रु. 31,632.39 पैसे एैवजी रु. 27000/- भरणा करुन घेवुन तक्रारदारास सदर वाहनाची NOC दिली.
तक्रारदाराने दि. 23.04.2008 रोजी 19 वा हप्ता रक्कम रु. 19,000/- चा पावती क्र. RMUMT100/21993 द्वारे कर्ज खाते क्र. MTAA21053 मध्ये भरणा केली. सदर रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या भरणा केलेल्या खात्यात जमा न करता, तक्रारदाराचे दुसरे कर्ज खाते क्र. MTAA 20814 यामध्ये जमा केले जे की सदर कर्ज हे दि. 07.04.2008 रोजी बंद करण्यात आलेले होते. तक्रारदाराने दि. 23.04.2008 रोजी भरणा केलेली रक्कम रु. 19,000/- कर्ज खाते क्र. MTAA 21053 जमा न केल्यामुळे 3 टक्के दंडव्याज तक्रारदारास भरावा लागला.
तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे दंड व्याजापोटी एकुण रु. 14,820/- जमा केले. त्यापैकी रक्कम रु. 6820/- ही तक्रारदारास केवळ रु. 19,000/- सामनेवाला यांनी कर्जखाते क्र. MTAA 21053 या खात्यात जमा न केल्यामुळे सामनेवाला यांनी आकारले आहे. तक्रारदाराने सदर बाब ही दि. 30.06.2010 रोजी सामनेवाला यांना रजिष्टर्ड पोष्टाद्वारे निदर्शनास आणुन देऊन रक्कम मिळण्याची मागणी केली आहे, आणि दि. 02.08.2010 रोजी दुसरे पत्र देऊन रक्कम मिळण्याची मागणी करणारे पत्र सामनेवाला यांना तक्रारदाराने दिले आहे.
तक्रारदारास दंड व्याजापोटी लागलेली रक्कम व हप्ता रक्कम रु.19,000/- भरलेली असतांना मुळ कर्ज खात्यात जमा न करता अन्य खात्यात जमा केल्यामुळे तक्रारदारास NOC न मिळाल्या कारणाने तक्रारदाराने नाईलाजाने दि. 30.06.2010 रोजी सेटलमेंटनुसार रु. 27,000/- अतिरिक्त भरणा केली. तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 27.07.2010 रोजी नोटीस पाठवुन रक्कमेची मागणी केली. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने रक्कम रु. 27,000/- व त्यावर दि. 24.04.2008 पासुन 18 टक्के व्याज AFC चार्जेस पोटी भरणा केलेली रक्कम रु. 6880/- व त्यावर दि. 24.04.2008 पासुन 18 टक्के व्याज , मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारीचे खर्चापोटी रु 3000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 38 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 17.01.2012 रोजी दाखल झाले असून, सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्यात तक्रारदाराने 35 EMI भरले असल्या बद्दल व कर्ज घेतले असल्या बद्दलचे कोणतेही दुमत नाही, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने प्रत्येक उशीराचा हप्ता हा AFC चार्जेससह भरलेला आहे असेही म्हटले आहे. दि. 23.04.2008 रोजी तक्रारदाराने रक्कम रु. 19,000/- जमा केली आहे असे म्हटले आहे हे अमान्य केले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने दि. 27.08.2010 रोजी पाठवलेली नोटीस ही खोटी असल्यसाचे म्हटले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून घेतलेले एकुण AFC चार्जेस हे योग्य असून दि. 30.06.2010 रोजी तक्रारदाराने सेटलमेंटनुसार भरणा केलेली रक्कम रु. 27000/- ही त्याच्या मर्जीने भरली असल्याचे म्हटले आहे. तक्रारदार हा व्यावसायीक कर्ज घेतले असल्यामुळे तो ग्राहक होत नाही. त्यामुळे तक्रारदारास आम्ही दयावयाच्या सेवेत कोणताही कसुर केला नाही. म्हणुन तक्रारदाराची तक्रार रु. 10,000/- खर्चाह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्र व तक्रारदाराचे कर्ज खाते क्र. MTAA 20814 याचा खाते उतारा दाखल केला आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे याचे बारकाईने वाचन केले असता, तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीतील पावती क्र. RMUMT100/21993 दि. 23.04.2008 रोजीची रक्कम रु. 19,000/- याचे अवलोकन केले असता सदर पावतीवर सामनेवाला यांनी वाहन क्र. एम एच 23/5994 व खाते क्र. MTAA21053 असा उल्लेख केला आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदाराचे दाखल केलेला खाते क्र. MTAA 20814 याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने दि. 23.04.2008 रोजी भरणा केलेली रक्कम या खात्यात जमा केलेली दिसून येत आहे. हे सामनेवाला यांना मान्य आहे. याबाबत सामनेवाला यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन सिध्द होते. म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते.
सामनेवाला यांनी तक्रारदार व्यवसायीक कर्जदार असल्यामुळे ग्राहक होत नाही, असे म्हटले आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदारास सामनेवाला यांनी दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे. त्यामुळे सेवेतील त्रूटी या ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीनुसार तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो. म्हणुन तक्रारदाराने केलेली विनंती आणि दाखल केलेले पुरावे याचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून AFC चार्जेस पोटी रु. 6880/- जास्तीचे घेतले आहे, दि. 23.04.2008 रोजी जमा केलेली रक्कम ही योग्य खात्यात जमा न करुन तक्रारदारास जास्तीची रक्कम भरावी लागली आहे. हे दोन्ही बाजुंच्या कागदपत्रांच्या वाचना वरुन सिध्द होते. म्हणुन तक्रारदारास दि. 23.04.2008 रोजी भरणा केलेली रक्कम रु. 19,000/- व AFC चार्जेसचे 6880/- त्यावर दि. 24.04.2008 पासुन 9 टक्के व्याज, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- मंजुर करणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास रक्कम रु. 19,000/- व AFC चार्जेसची रक्कम रु. 6880/- त्यावर दि. 24.04.2008 पासुन 9 टक्के व्याजासह , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास , सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु. 5000/- दंड म्हणुन देण्यास जबाबदार राहतील.
- सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.