Maharashtra

Bhandara

CC/19/42

SUNITABAI S. NANHE - Complainant(s)

Versus

INDUBAI R.GONDANE - Opp.Party(s)

KU.SUBHANGI NANDANWAR

08 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/42
( Date of Filing : 16 Feb 2019 )
 
1. SUNITABAI S. NANHE
DONGARGAO TAH MOHADI DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. INDUBAI R.GONDANE
ANDHARAGAO PO ANDHARAGAO TAH.MOHADI DIST.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Dec 2021
Final Order / Judgement

                          (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                                    (पारीत दिनांक-08 डिसेंबर, 2021)

 

01.     तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष इंदुबाई राधेश्‍यामजी गोंडाणे, सोने चांदीचे दागीने गहाणाचे व्‍यापारी/सावकार हिचे कडे कर्ज रकमेच्‍या मोबदल्‍यात गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत मिळावे तसेच आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.  या ठिकाणी नमुद करणे आवश्‍यक वाटते की, तक्रारी मध्‍ये तक्रारकर्तीचे नाव सुनिताबाई असे नमुद केलेले आहे परंतु तिचे आधारकार्ड वरुन तिचे नाव सुमत्रा गोविंदा नान्‍हे (Sumatra Govinda Nanhe) असे असल्‍याने तक्रारकर्ती म्‍हणून तिचे नाव सुमत्रा गोविंदा नान्‍हे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे नमुद करण्‍यात येते.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      यातील विरुध्‍दपक्ष इंदुबाई राधेशामजी गोंडाणे हिचा सावकारीचा व्‍यवसाय असून ती संबधित ग्राहका कडील  सोन्‍याचे दागीने गहाण ठेऊन   व्‍याजाने कर्ज पुरविते. कर्ज रकमेची  व्‍याजासह संपूर्ण परतफेड केल्‍या नंतर ती गहाण ठेवलेले सोन्‍याचे दागीने ग्राहकास परत करते. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष इंदुबाई गोंडाणे (विरुध्‍दपक्ष हिचा उल्‍लेख यापुढे निकालपत्रात सोईचे दृष्‍टीने “विरुध्‍दपक्ष सावकार” असा करण्‍यात येईल) हिचे कडून दिनांक-28.12.2005 रोजी रुपये-2000/- कर्ज घेतले होते व त्‍या मोबदल्‍यात तिने विरुध्‍दपक्ष सावकार हिचेकडे सोन्‍याचे मंगळसूत्र गहाण ठेवले होते. सदर व्‍यवहाराची दिनांक-28.12.2005 रोजीची पावती क्रं 756  विरुध्‍दपक्ष सावकार हिने तक्रारकर्तीचे नावे दिली होती. सदर गहाण पावती प्रमाणे सोन्‍याचे मंगळसूत्राचे वजन हे 15.200 ग्रॅम होते व सदर मंगळसूत्राची सन-2005 मधील बाजारभावा प्रमाणे किम्‍मत रुपये-3000/- होती. अशाप्रकारे तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष सावकार हिची ग्राहक होते.

     तिने पुढे असे नमुद केले की, तिची आर्थिक परिस्थिती अत्‍यंत गरीबीची व हलाखीची असल्‍याने ती कर्जाची रक्‍कम परतफेड करु शकली नाही म्‍हणून तिचे विनंती वरुन विरुध्‍दपक्ष सावकार हिने कर्ज परतफेडीची मुदत वाढवून दिली व शासनाच्‍या नियमा प्रमाणे व्‍याजाचा दर आकारुन  कर्ज रकमेची  वसुली करण्‍यात येईल असे मान्‍य केले होते. सन-2018 मध्‍ये  ती कर्जाची  रक्‍कम रुपये-2000/- विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडे भरण्‍यास तयार होऊन तिने गहाण ठेवलेले मंगळसूत्र परत करण्‍याची मागणी केली होती परंतु विरुध्‍दपक्ष सावकार हिने गहाण मंगळसूत्र परत करण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्तीने शेवटचा प्रयत्‍न म्‍हणून दिनांक-01.01.2018 रोजी विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडे आणखी रुपये-2000/- कर्ज रक्‍कम परतफेड करुन गहाण ठेवलेले मंगळसूत्र परत करण्‍याची मागणी केली होती (जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे येथे स्‍पष्‍ट करणे आवश्‍यक आहे की, तक्रारकर्तीने शेवटचा प्रयत्‍न्‍ म्‍हणून दिनांक-01.01.2018 विरुध्‍दपक्षाकडे मंगळसूत्र परत करण्‍याची मागणी केली होती असे जे तक्रारीत नमुद केलेले आहे तो नमुद दिनांक चुकीचा आहे याचे कारण असे आहे की, तिचे वकीलांनी विरुध्‍दपक्षास जी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे त्‍यामध्‍ये सदरचा दिनांक-09.09.2018 असा नमुद आहे त्‍यामुळे सदरचा दिनांक-09.09.2018 असा वाचावा) परंतु  विरुध्‍दपक्ष सावकार हिने हेतुपूर्वक तिचे कडून कर्ज परतफेडीची रक्‍कम स्विकारली नाही व गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत केले नाही. तक्रारकर्तीचे असेही म्‍हणणे आहे की, तिने वारंवार विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडे जाऊन कर्ज परतफेडीची रककम भरण्‍याची तयारी दर्शविली होती परंतु  विरुध्‍दपक्ष सावकार हिने कर्ज परतफेडीची रक्‍कम स्विकारली नाही आणि गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत देण्‍यास  नकार दिला त्‍यामुळे तिने विरुध्‍दपक्ष सावकार हिला वकीलांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस सुध्‍दा पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्ष सावकार हिचे विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

  1. तक्रारकर्तीचे विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडे गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र विरुध्‍दपक्ष हिने तिला परत करावे असे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,0,000/- व झालेल्‍या आर्थिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष हिने तिला अदा करावे असे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्तीला आलेला तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्ष हिचे कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.   सदर प्रकरणात जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष सौ.इंदुबाई गोंडाणे, सोना चांदी गहाणाचे व्‍यापारी/सावकार हिला रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली असता तिने उपस्थित होऊन आपले लेखी उत्‍तर दाखल केले. तिने लेखी उत्‍तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीने दिनांक-28.12.2005 रोजी तिचे कडून रुपये-2000/- कर्ज घेतले होते आणि त्‍या कर्जाचे मोबदल्‍यात तिने सोन्‍याचे मंगळसूत्र गहाण ठेवले होते व त्‍या कालावधीत सदर मंगळसूत्राची अंदाजे बाजार भावाने किम्‍मत रुपये-3000/- होती. सदर गहाण पावती प्रमाणे 06 महिन्‍याचे आत कर्ज रकमेची परतफेड करुन सोन्‍याचे मंगळसूत्र गहाणमुक्‍त करावयास हवे होते परंतु तिने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र सोडविले नाही. तसेच तक्रारकर्तीने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार ही तब्‍बल 13 वर्षा नंतर दाखल केलेली आहे, त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-24 (अ) प्रमाणे तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणाने खारीज होण्‍यास पात्र आहे.

      परिच्‍छेद निहाय उत्‍तरे देताना तक्रारकर्तीने दिनांक-28.12.2005 रोजी विरुध्‍दपक्ष हिचे कडे सोन्‍याचे मंगळसूत्र गहाण ठेवले होते व त्‍या बाबत गहाण
पावती दिली होती ही बाब मान्‍य केली मात्र तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्षाची ग्राहक असल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्तीची आर्थिक स्थिती हलाखीची व गरीबीची असल्‍याने ती कर्ज रकमेची परतफेड करु शकली नाही, तसेच तिचे विनंती वरुन विरुध्‍दपक्ष हिने कर्ज परतफेडीची मुदत वाढवून दिली होती व शासनाचे नियमा प्रमाणे व्‍याज आकारुन कर्जाची रक्‍कम परत  घेण्‍याची तयारी दर्शविली होती या बाबी नामंजूर केल्‍यात. तसेच सन-2018 मध्‍ये तक्रारकर्तीने कर्ज परतफेडीची रक्‍कम जमवून ती रुपये-2000/- भरण्‍यास तयार होती व ती  विरुध्‍दपक्ष हिचे कडे गेली असता विरुध्‍दपक्ष हिने मंगळसूत्र देण्‍यास टाळाटाळ केली हे विधान नामंजूर केले. दिनांक-01.01.2018 रोजी आणखी रुपये-2000/- कर्ज रक्‍कम भरुन मंगळसूत्र परत करण्‍याची मागणी विरुध्‍दपक्ष हिचे कडे तिने केली होती  परंतु विरुध्‍दपक्ष हिने हेतूपुर्वक कर्ज परतफेडीची रक्‍कम स्विकारली नाही व गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत केले नाही या बाबी नामंजूर केल्‍यात. त्‍यामुळे तक्रारकर्तीला  विरुध्‍दपक्ष हिला कायदेशीर नोटीस दयावी लागली ही बाब सुध्‍दा नामंजूर केली.

          आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष सावकार हिने असे नमुद केले की, ती आंधळगाव येथे सावकारीचा व्‍यवसाय करीत होती व तिचे कडे कायदया अनुसार लायसन्‍स क्रं -181 होते.  सावकारी अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्‍या नियमा नुसार कर्ज घेणा-याने दागीने गहाण ठेवल्‍यास फार्म नं.8 आणि 10 (रुल नं.16) कर्ज अटीचे स्‍पष्‍टीकरण पत्रका अंतर्गत पावती देऊन कर्ज दयावयाचे असते, त्‍या अनुषंगाने विरुध्‍दपक्ष हिने दिनांक-28.12.2005 रोजी तक्रारकर्तीला पावती क्रं 756 अनुसार रुपये-2000/- कर्ज दिले होते. सदर कर्जाचे मोबदल्‍यात तक्रारकर्तीने  विरुध्‍दपक्ष हिचे कडे गहुमणी पदक असलेले मंगळसूत्र ज्‍याचे मूळ वजन 15.200 ग्रॅम व अ. वजन 8.500 ग्रॅम होते ते गहाण ठेवले होते. सदर कर्ज पावती मधील ठरलेल्‍या अटी नुसार सदर कर्जाची मुदत 06 महिने ठेवण्‍यात आली होती व सदर गहाण ठेवलेल्‍या मंगळसूत्राची अंदाजे बाजारभावा प्रमाणे किम्‍मत रुपये-3000/- होती. गहाण पावती अनुसार तक्रारकर्तीने कर्ज रकमेची परतफेड 06 महिन्‍यात करुन गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र सोडवावयास हवे होते परंतु तक्रारकर्ती ही गहाण ठेवल्‍यानंतर कधीही विरुध्‍दपक्ष हिचे कडे आली नाही वा कर्ज रकमे बाबत तसेच गहाण साहित्‍या बाबत विचारणा सुध्‍दा केली नाही. या उलट विरुध्‍दपक्ष
हिचे दिवाणजी वेळोवेळी तक्रारकर्तीला गहाण मंगळसूत्र सोडविण्‍यास सांगत होते परंतु तिने दिलेल्‍या मुदतीत सदर गहाण मंगळसूत्र सोडविले नाही. सदर गहाण वस्‍तुची बाजारभाव किम्‍मत व दिलेले कर्ज व त्‍यावरील व्‍याज हे दुप्‍पट, तिप्‍पट, चौपट वाढत गेल्‍याने त्‍याची माहिती वेळोवेळी तक्रारकर्तीला देऊन सुदा तिने गहाण मंगळसूत्र सोडविले नाही व उलट गहाण ठेवलेल्‍या सोन्‍याचे दागीन्‍या पेक्षा कर्ज रकमेवरील व्‍याजाची रक्‍कम जास्‍त झाल्‍याने तक्रारकर्तीने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र सोडविण्‍याचे नाकारले. तक्रारकर्तीला कर्ज देताना विरुध्‍दपक्ष हिचे दिवाणजीने फार्म नंबर 8 व 10 मध्‍ये नमुद असलेल्‍या संपूर्ण अटी  व शर्ती समजावून सांगितल्‍या होत्‍या व त्‍या कबुल केल्‍या नंतरच सदर पत्रकावर/पावती वर तक्रारकर्तीने आंगठा केला. तक्रारकर्तीला  सदर पत्रकात दिलेल्‍या अटी व शर्तीची माहिती असताना सुध्‍दा तिने हेतू पुरस्‍पर विरुध्‍दपक्षा कडून गैरकायदेशीररित्‍या रक्‍कम हडप करण्‍याचे दुष्‍ट हेतूने खोटी व बनावट तक्रार दाखल केलेली असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे विरुध्‍दपक्ष हिने नमुद केले.

 

04.   प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये विरुध्‍दपक्ष हिचे वकील श्री पी.एम.रामटेके यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तक्रारकर्ती तर्फे कोणीही मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित नव्‍हते.

 

05.   तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर तसेच उभय पक्षांचा शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद आणि प्रकरणातील  दाखल दस्‍तऐवज याचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन केले असता खालील मुद्दे न्‍याय निवारणार्थ जिल्‍हा  ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ती ही   विरुदपक्ष हिची  ग्राहक होते काय?

-होय-

02

तक्रारकर्तीची तक्रार मुदती मध्‍ये आहे काय?

-होय-

03

तक्रारकर्तीने प्रलंबित कर्ज रक्‍कम सरकारी व्‍याज दराने भरण्‍याची तयारी दर्शवूनही विरुध्‍दपक्ष हिने कर्जाची व्‍याजासह येणारी रक्‍कम स्विकारली नाही व तिने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत न करुन  अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

04

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

                                                                                           -कारणे व मिमांसा-

मुद्दा क्रं 1 ते 4

 

06.  विरुध्‍दपक्ष सौ.इंदुबाई राधेशामजी गोंडाणे ही परवानाधारक सावकार असल्‍याची बाब तिने स्‍वतःच आपल्‍या लेखी उत्‍तरातून मान्‍य केलेली आहे.  तसेच तिने तक्रारकर्ती हिचे कडील सोन्‍याचे गहूमनी पदक मंगळसूत्र दिनांक-28.12.2005 रोजी गहाण ठेऊन तिला रुपये-2000/- एवढे कर्ज दिल्‍या बाबत जी पावती तक्रारकर्ती सुमत्राबाई गोविंदा नान्‍हे हिचे नावे दिलेली आहे, त्‍यावर सावकार सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे, आंधळगाव असे नमुद असून सदर गहाण पावतीचा क्रं-756, दिनांक-28.12.2005  असा आहे. तसेच सदर गहाण पावती मध्‍ये सावकारी लायसन्‍स क्रं-2002/2003/181  नमुद असून  सदर गहाण पावतीवर फार्म नं.8 आणि 10 (रुल नं.16) कर्जाचे अटीचे स्‍पष्‍टीकरण करणारे पत्रक असे  देखील नमुद आहे. सदर गहाण पावतीवर आजचे बाजार भावाने किम्‍मत अंदाजे-3000/- असे नमुद आहे. सदर गहाण पावतीवर तक्रारकर्ती हिचा आंगठा तर विरुध्‍दपक्ष हिची सही आहे. सदर गहाण पावतीवर छापील स्‍वरुपात कर्ज परतीची मुदत 6 महिने असे छापलेले आहे तसेच व्‍याज दर द.सा.द.शे.सरकारी कायदया प्रमाणे असे छापील नमुद आहे. सदर सोन्‍याचे  गहूमनी पदक मंगळसूत्र याचे जु. वजन ग्राम 15/200 तसेच अ वजन ग्राम-8/500 असे पावतीवर नमुद आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिचे कडे गहूमनी पदक मंगळसूत्र गहाण ठेवल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष हिला मान्‍य आहे तसेच तिने तक्रारकर्तीचे नावे दिलेली गहाण पावती सुध्‍दा नाकारलेली नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ती कडील सोन्‍याचे मंगळसूत्र गहाण ठेऊन विरुध्‍दपक्ष हिने कर्ज दिलेले आहे व सदर कर्ज रकमेवर ती व्‍याज आकारत आहे आणि त्‍यामुळे  प्रकरणातील  दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष यांची “ग्राहक” असल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

7.    विरुध्‍दपक्ष हिने आपले लेखी उत्‍तरा मधून असा आक्षेप घेतलेला आहे की, तक्रारकर्तीने तिचे कडे सोन्‍याचे मंगळसूत्र दिनांक-28.12.2005 रोजी गहाण ठेऊन कर्ज घेतले होते आणि त्‍या कर्ज परतफेडीची मुदत 06 महिने होती. तसेच तक्रारकर्तीने प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-16.02.2019 रोजी जवळपास तब्‍बल 13 वर्ष उशिराने दाखल केलेली आहे आणि त्‍यामुळे ग्राहक सरंक्षण कायदा-1986 चे कलम-24-ए अनुसार सदर तक्रार मुदतबाहय असल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍दपक्ष हिने कर्ज परतफेड करण्‍याची मुदत ही 06 महिने होती यावर जोर देऊन सदर गहाण पावतीवर सुध्‍दा कर्ज परतीची मुदत 6 महिने असे नमुद असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आम्‍ही दिनांक-28.12.2005 चे विरुध्‍दपक्ष हिने दिलेल्‍या गहाण पावतीचे अवलोकन केले असता त्‍यावर कर्ज परतफेड करण्‍याची मुदत ही 06 महिने असे छापील स्‍वरुपात नमुद केलेले आहे. परंतु तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष हिने सदर कर्ज परतफेडीची मुदत वाढवून दिली होती तर विरुध्‍दपक्ष हिने ही बाब नाकारलेली आहे. या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की,तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिचे कडे गहाण ठेवलेले सोन्‍याचे गहूमनी पदक मंगळसूत्र विशीष्‍ट मुदतीत सोडविले नाही तर ते विरुध्‍दपक्ष हिला पचीत (Forfeit) होईल अशी कोणतीही अट पावतीवर नमुद केलेली नाही.  दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष हिने सदर गहाण पावतीवर फार्म नं.8 आणि 10 (रुल नं.16) कर्जाचे अटीचे स्‍पष्‍टीकरण करणारे पत्रक असा जो छापील मजकूर नमुद आहे त्‍यावर भिस्‍त ठेवली परंतु कर्जाचे अटीचे स्‍पष्‍टीकरण करणारे पत्रक तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष हिने पुरविले होते व त्‍यातील अटी व शर्ती तिला समजावून सांगितल्‍याचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष हिने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष सादर केलेला नाही. जो पर्यंत तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडे कर्ज रकमेच्‍या मोबदल्‍यात तिचे  गहाण ठेवलेले सोन्‍याचे गहूमणी पदक मंगळसूत्र  गहाणातून सोडवित नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत आहे आणि त्‍यामुळे सदर तक्रारीला मुदतीची बाधा येत नाही म्‍हणून सदर तक्रार ही मुदतीत आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

08.    तक्रारकर्तीने आपले तक्रारी मध्‍ये असे नमुद केले की, सन-2018 मध्‍ये तिने कर्जाची रक्‍कम जमवली व ती कर्ज रक्‍कम रुपये-2000/- भरण्‍यास तयार झाली परंतु विरुध्‍दपक्ष हिने कर्ज रक्‍कम स्विकारली नाही व गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत केले नाही. तसेच दिनांक-01.01.2018 रोजी तक्रारकर्तीने लोनची रककम जमवली व रुपये-2000/- भरण्‍यास तयार झाली परंतु विरुध्‍दपक्ष हिने मंगळसूत्र वापस देण्‍यास टाळाटाळ केली. विरुध्‍दपक्ष हिने या सर्व बाबी आपल्‍या लेखी उत्‍तरातून नामंजूर केल्‍यात.  विरुध्‍दपक्ष हिचे असे म्‍हणणे आहे की, दिनांक-28.12.2005 रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिचे कडे सोन्‍याचे मंगळसूत्र गहाण ठेऊन रुपये-2000/-कर्ज उचलले होते परंतु त्‍यानंतर ती तिचे कडे कधीही आलेली नाही व तिने कर्ज रक्‍कम व्‍याजासह परतफेड करुन सोन्‍याचे मंगळसूत्र गहाणमुक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केलेला नाही.     या संदर्भात तक्रारकर्तीने आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ तिने विरुध्‍दपक्ष हिला तिचे वकील श्री श्‍याम बी. चव्‍हाण यांचे व्‍दारा जी दिनांक-17.09.2018 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली होती त्‍या नोटीसची प्रत पुराव्‍या दाखल सादर केलेली आहे, त्‍या नोटीस मध्‍ये असे नमुद आहे की, तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिचे कडे दिनांक-28.12.2005 रोजी तिचे सोन्‍याचे मंगळसूत्र वजन 15.200 ग्रॅम आणि त्‍यावेळेची बाजारभावाची किम्‍मत रुपये-3000/- गहाण ठेऊन रुपये-2000/- चे कर्ज घेतले होते. तक्रारकर्तीची आर्थिक स्थिती हलाखीची असल्‍यामुळे ती कर्ज रकमेची परतफेड करु शकली नसल्‍याने तिने विरुध्‍दपक्ष हिला विनंती केल्‍या नंतर कर्ज रक्‍कम सरकारी दरा नुसार व्‍याजासह परतफेड करण्‍याची मुदत वाढवून दिली होती. सन-2018 मध्‍ये तक्रारकर्तीने वेळोवेळी विरुध्‍दपक्ष हिचेशी संपर्क साधून कर्ज रकमेची परतफेड करण्‍याची तयारी दर्शवून सोन्‍याचे मंगळसूत्र परत करण्‍याची मागणी केली होती परंतु विरुध्‍दपक्ष हिने टाळाटाळ केली होती. शेवटी तिने दिनांक-09.09.2018 रोजी सुध्‍दा कर्ज रकमेची परतफेड करण्‍याची तयारी दर्शवून गहाण मंगळसूत्राची मागणी विरुध्‍दपक्ष हिचे कडे केली होती परंतु विरुध्‍दपक्ष हिने त्‍यास नकार दिला होता. तक्रारकती ही कर्जाची रक्‍कम रुपये-2000/- आणि शासकीय दरा प्रमाणे त्‍यावरील व्‍याज देण्‍यास तयार आहे त्‍यामुळे तिचे गहाण ठेवलेले मंगळसूत्र परत करावे असे नोटीस मध्‍ये नमुद आहे. सदर दिनांक-17.09.2018 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्‍दपक्ष हिला दिनांक-24.09.2018 रोजी मिळाल्‍याची रजिस्‍टर पोच अभिलेखावर दाखल आहे.

       तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिला रजिस्‍टर पोस्‍टाने कायदेशीर नोटीस पाठवून तिने विरुध्‍दपक्ष सावकार हिचे कडून घेतलेले कर्ज रुपये-2000/- आणि सदर कर्ज रकमेवर सरकारी दरा प्रमाणे येणा-या व्‍याजाची रक्‍कम परतफेड करुन तिने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र सोडविण्‍याची तयारीदर्शविली होती आणि त्‍या बाबत कोणत्‍या तारखेला तिने विरुध्‍दपक्ष हिचे कडे यावे या बाबत लेखी कळवावे असे सुध्‍दा नोटीस मध्‍ये नमुद केलेले होते. अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्ष हिचे कर्तव्‍य होते की, तिने तक्रारकर्तीला तसे लेखी कळविणे जरुरीचे होते परंतु विरुध्‍दपक्ष हिने तक्रारकर्तीला तसे लेखी कळविल्‍याचे दिसून येत नाही किंवा तसा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष हिने दाखल केलेला नाही किंवा तसे कळविल्‍याचे विरुध्‍दपक्ष हिचे म्‍हणणे सुध्‍दा नाही. सर्वसाधारण व्‍यवहारात कर्जाचे मोबदल्‍यात गहाण ठेवलेले सोन्‍याचे दागीने हे कर्ज रकमेची व्‍याजासह संपूर्ण वसुली झाल्‍या नंतर सावकारा कडून संबधित ग्राहकास परत केल्‍या जाते परंतु तक्रारकर्तीने कर्जाची रक्‍कम सरकारी दराप्रमाणे व्‍याजासह परतफेड करण्‍याची तयारी दर्शवूनही तिचे कडून कर्जाची व्‍याजासह येणारी रक्‍कम विरुध्‍दपक्ष सावकार हिने स्विकारलेली नाही व तिने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र परत केलेले नाही. असे दिसून येते की, तक्रारकर्ती ही अशिक्षीत/निरक्षर ग्रामीण भागातील स्‍त्री असून तिला सही सुध्‍दाकरता येत नाही असे गहाण पावती वरील तसेच तक्रारी वरील तिने सही ऐवजी केलेल्‍या अंगठयाचे निशाणी वरुन दिसून येते आणि तिचे अज्ञानी आणि निरक्षरतेचा गैरफायदा विरुध्‍दपक्ष हिने उचललेला आहे आणि तिने गहाण ठेवलेले सोन्‍याचे मंगळसूत्र लंपास करण्‍याचा विरुध्‍दपक्ष हिचा हेतू असल्‍याची बाब उपलब्‍ध दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द झालेली आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष हिने तक्रारकर्ती कडून कर्ज आणि सरकारी दराने व्‍याजाची रक्‍कम न स्विकारता तिचे गहाण ठेवलेले सोन्‍याचे गहूमणी पदक मंगळसूत्र परत न करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे आणि तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उततर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

09    उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे मुद्दा क्रं 1 ते 3 यांचे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष हिचे विरुध्‍द अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे त्‍यामुळे मुद्दा क्रं 4 अनुसार तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष हिला  व्‍याजाची रक्‍कम रुपये-2000/- आणि त्‍यावर सरकारी दराने (The Bombay Money-Lenders Rules, 1959) येणारी व्‍याजाची रक्‍कम अदा करावी आणि अशी कर्जाची व्‍याजासह रक्‍कम परत मिळाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष हिने दिनांक-28.12.2005 रोजीचे पावती क्रं-756 प्रमाणे नमुद असलेले तक्रारकर्तीचे गहाण असलेले गहूमनी पदक मंगळसूत्र जु.वजन ग्राम 15/200 अ. वजन ग्राम 8/500 तक्रारकर्तीला परत करावे असे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष हिने अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केल्‍याने तक्रारकर्तीला जो शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्‍याबद्दल विरुध्‍दपक्ष हिने तक्रारकर्तीला नुकसान भरपाई रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- अशा रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित हाईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

10.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                        ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ती श्रीमती सुमत्राबाई गोविंदा नान्‍हे हिची विरुध्‍दपक्ष सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे, आंधळगाव सावकारी लायन्सन्‍स क्रं- 2002/2003/181 ही सावकारी फर्म आणि सदर फर्मची चालक/ मालक श्रीमती सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे यांचे विरुध्‍दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे, आंधळगाव सावकारी लायन्सन्‍स क्रं- 2002/2003/181 ही सावकारी फर्म आणि सदर फर्मची चालक/ मालक श्रीमती सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे यांना आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्ती कडून  विरुध्‍दपक्षास  कर्जाची रक्‍कम रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) आणि सदर कर्ज रकमेवर सरकारी दराने (The Bombay Money-Lenders Rules, 1959) येणारी व्‍याजाची रक्‍कम परत मिळाल्‍या नंतर विरुध्‍दपक्षाने त्‍यांचे तक्रारकर्तीचे नावे निर्गमित दिनांक-28.12.2005 रोजीचे पावती क्रं-756 प्रमाणे नमुद असलेले तक्रारकर्तीचे गहाण असलेले गहूमनी पदक मंगळसूत्र जु.वजन ग्राम 15/200 अ. वजन ग्राम 8/500 तक्रारकर्तीला परत करावे व गहाण पावती अनुसार गहाण ठेवलेले सोन्‍याचे गहूमनी पदक मंगळसूत्र तिला परत मिळाल्‍या बाबत लेखी पोच म्‍हणून  तक्रारकर्तीची सही म्‍हणून तिचा निशाणी अंगठा घ्‍यावा.

            किंवा

 

  1. तक्रारकर्ती कडून  विरुध्‍दपक्षास कर्जाची रक्‍कम रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त)  आणि सदर कर्ज रकमेवर सरकारी दराने (The Bombay Money-Lenders Rules, 1959) येणारी व्‍याजाची रक्‍कम परत मिळाल्‍या नंतर जर विरुध्‍दपक्षास तक्रारकर्तीचे दिनांक-28.12.2005 रोजी पावती क्रं-756 अनुसार गहाण ठेवलेले सोन्‍याचे गहूमनी पदक मंगळसूत्र परत करणे अशक्‍य असल्‍यास ज्‍या दिवशी विरुध्‍दपक्ष तक्रारकर्तीला मंगळसूत्राची रक्‍कम परत करेल त्‍या दिवशी गहाण पावती क्रं 756 मध्‍ये नमुद असलेल्‍या गहूमनी पदक मंगळसूत्राची मान्‍यता प्राप्‍त बाजारभावा प्रमाणे येणारी किम्‍मत तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष फर्म आणि सदर फर्मची चालक/मालक सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे हिने परत करावी असे विरुध्‍दपक्षास आदेशित करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्षाचे अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा विरुध्‍दपक्ष सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे, आंधळगाव सावकारी लायन्सन्‍स क्रं- 2002/2003/181 ही सावकारी फर्म आणि सदर फर्मची चालक/ मालक श्रीमती सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्तीला परत कराव्‍यात.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे, आंधळगाव सावकारी लायन्सन्‍स क्रं- 2002/2003/181 ही सावकारी फर्म आणि सदर फर्मची चालक/ मालक श्रीमती सौ.इन्‍दुबाई राधेशामजी गोंडाणे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत विरुध्‍दपक्षांनी आदेशाचे अनुपालन न केल्‍यास  अंतीम आदेशातील परिच्‍छेद क्रं 4 प्रमाणे नमुद नुकसान भरपाई आणि तक्रारीची रक्‍कम मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्षाची राहिल.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षांतर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.