(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 21/10/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.22.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदारांच्या इंदिरा गांधी इन्स्टिटयुट ऑफ एरोनॉटिक्स या संस्थेमधे इंटरनॅशनल एअर कार्गो मॅनेजमेंट या कोर्सकरीता दि.09.11.2009 रोजी रु.350/- देऊन प्रवेश अर्ज घेतला. तसेच दि.19.11.2009 रोजी प्रवेश शुल्कापोटी रु.10,500/- गैरअर्जदारांच्या कार्यालयात जमा केले. सदर कोर्सचे वर्ग सुरु झालेले नव्हते, तक्रारकर्ता बी.बी.ए. प्रथम वर्षात पुरवणी परिक्षेत नापास झाला, त्याला पुन्हा वार्षिक परिक्षा आवश्यकत होते व तयाकरीता त्याला अमरावतीला शिकवणी वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता. तसेच अस्थम्याचे त्रासामुळे दगदग सहन होणार नाही या कारणामुळे तो सदर कोर्स पूर्ण करु शकणार नाही असे त्याचे लक्षात आले. त्याची आर्थीक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तक्रारकर्त्याने दि. 02.12.2009 रोजी अर्जाव्दारे गैरअर्जदारांना त्याने अदा केलेल्या रु.10,500/- शुल्काची मागणी केली. त्यानंतर वकीलामार्फत नोटीस नोटीस पाठविली, ती गैरअर्जदारांनी परत पाठविली. मागणी करुनही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सदर रक्कम परत केली नाही. वास्तविक पाहता तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून कुठलीही सेवा घेतलेली नाही, गैरअर्जदारांची वरील कृति सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता गैरअर्जदारी मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपले कथन दाखल केले असुन त्यात तक्रारकर्त्याला दिलेली रसीद व प्रार्थनापत्रामध्ये स्पष्टपणे “Non Refundable & Non Transferable”, असे अंकीत केलेले आहे. त्यानुसार एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही अथवा कोणत्याही पक्षामधे स्थानांतरीत केल्या जाणार नाही. यासंबंधात तक्रारकर्त्याने गेरअर्जदारांना प्रार्थनापत्र तसेच शपथपत्र देखील दिलेले आहे, वास्तविक इन्स्टीटयूटव्दारा 15 विद्यार्थांची बॅच तयार करण्यांत येते व त्यानुसार औपचारिकता पूर्ण केल्या जाते. मधुनच तक्रारकर्त्याने सदरची इन्स्टीटयूट सोडल्यामुळे गैरअर्जदारांना आर्थीक हानी सोसावी लागली. इतकेच नव्हे तर तक्रारकर्त्याने शुल्काची उर्वरीत रक्कम रु.21.527/- सुध्दा गैरअर्जदारांना दिलेली नाही. तसेच आजारा संबंधी कुठलेही प्रमाणपत्र सादर केले नाही, जर तक्रारकर्ता बी.बी.ए. कोर्स करत होता तर त्याने सदर इन्स्टीटयूटमधे प्रवेश घ्यावयाचा नको होता, तसेच विवादक्षेत्र गाजियाबाद असे स्पष्टपणे लिहीलेले असल्यामुळे या मंचास सदरची तक्रार चालवीता येणार नाही. गैरअर्जदाराला नोटीस तक्रारीसोबत मिळाली, त्यापूर्वी तक्रारकर्त्यामार्फत कुठल्याही प्रकारची सुचना देण्यांत आलेली नव्हती.
4. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 8 च्या छायांकीत प्रती पान क्र.7 ते 16 वर जोडलेल्या आहेत.
5. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.14.11.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला गैरअर्जदार गैरहजर. तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थीती व दाखल दस्तावेज बघता निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांच्या ‘इन्स्टीटयूटमधे इंटरनॅशनल कार्गो मॅनेजमेंट’, या कोर्सच्या प्रशिक्षणाकरीता प्रवेश घेतला होता. तक्रारकर्त्याने एकंदर शुल्क रु.31,527/- पैकी दि.19.11.2009 रोजी रु.9,500/-, तसेच रजिस्टेशन फी पोटी रु.500/- व फॉर्मचे फी पोटी रु.300/- गैरअर्जदारांना अदा केले होते. तक्रारकर्त्यास बी.बी.ए. ची पुरवणी परिक्षा द्यावयाची होती, तसेच प्रकृतीच्या कारणवरुन त्यास सदर कोर्स करणे शक्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना लगेच पत्राव्दारे दि. 02.12.2009 रोजी सदर रक्कम परत द्यावी म्हणून मागणी केली. परंतु गैरअर्जदारांनी त्यांच्या इन्स्टीटयूटच्या अटी व शर्तीनुसार सदर रक्कम परत करणे शक्य नाही म्हणून सदर रक्कम परत करण्यांस नकार दिला.
7. प्रकरणातील पान क्र.30 वर दाखल दस्तावेजावरुन असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याने सदर कोर्स करीता प्रवेश घेतेवेळी फॉर्मवरील Declaration वर सही केलेली होती, त्यामध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, एकदा भरलेले शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केल्या जाणार नाही. सदर Declaration वर तक्रारकर्त्याचे वडीलांनी व तक्रारकर्त्याची सही केलेली दिसते. म्हणजेच तक्रारकर्त्याने सुध्दा दिलेले शुल्क परत घेणार नाही अशी हमी गैरअर्जदारांनी दिली होती. गैरअर्जदारांची सदरची अट तक्रारकर्त्याने तसेच त्याच्या वडीलांनी स्वतःहुन मान्य केली होती, तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निवारडयाप्रमाणे “one sided condition”, नव्हती. असे असतांना भरलेले शुल्क स्वतःहुन प्रवेश रद्द करुन परत करण्याची तक्रारकर्त्याची मागणी मान्य करणे हे योग्य होणार नाही. त्यामुळे मंच या निष्कर्षाप्रत येते की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निवाडयातील वस्तुस्थिती व सदर प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न असल्यामुळे सदरचा निवाडा या प्रकरणास लागु होत नाही. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश देत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.