जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १७१/२०११
तक्रार दाखल दिनांक – २६/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३
(१)श्रीमती अनिता भ्र.वसंत पारधी. ----- तक्रारदार.
उ.व.२२,धंदा-घरकाम.
(२)कु.दिव्या वसंत पारधी.
उ.व.३,धंदा-काही नाही.
(३)कु.संध्या वसंत पारधी.
उ.व.१.५,धंदा-काही नाही.
अर्जदार नं.२ व ३ ची अ.पा.क.
अर्जदार नं.१
(४)सौ.लताबाई भ्र.शिवराम पारधी.
उ.व.५०,धंदा-घरकाम.
(५)शिवराम सुका पारधी.
उ.व.५५,धंदा-शेतमजूरी.
सर्व रा.ममाणे,पो.त-हाडी,
ता.शिरपूर,जि.धुळे.
विरुध्द
द न्यु इंडिया अॅशुरन्स कं.लि. ----- सामनेवाले.
यशोवल्लभ शॉपिंग कॉम्प्लेक्स,
महानगरपालिका जवळ,धुळे.ता.जि.धुळे.
(नोटीसीची बजावणी विभागीय शाखाधिकारी
न्यु इंडिया अॅशुरन्स कं.यांच्यावर करण्यात यावी)
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी.)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.सी.पी.कुलकर्णी.)
---------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार नं.१ यांचे पती मयत वसंत शिवराम पारधी हे शिरपुर तालूक्यातील मतदार संघात राहणारे होते. तेथील आमदार यांनी सर्व मतदारांचा अपघाती विमा काढला होता. मयत वसंत पारधी यांचे दि.१९-०१-२०१० रोजी मोटारसायकल अपघातात निधन झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून विमा क्लेमची रक्कम रु.१,००,०००/- मिळणेकामी कागदपञ सादर केले. सामनेवाले यांनी मयताच्या ड्रायव्हींग लायसन्सची तक्रारदारांकडे मागणी केली. परंतु अपघाताचे वेळी ते मोटार सायकल चालवित नव्हते व मयताकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही, असे अर्जदारांनी सामनेवाले यांना सांगूनही त्यांनी विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज तक्रारदार यांना दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.१,००,०००/- द.सा.द.शे १२ टक्के व्याजाने व शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु.५०,०००/- आणि अर्जाचा खर्च मिळावा
(३) सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, शिरपुर विधानसभा मतदारसंघातील जनता पर्सनल विमा सामनेवाले यांनी उतरविलेला आहे. मयत हा शिरपुर विधानसभा मतदारसंघात राहत होता. सदर मयताचा मृत्यू झाला त्याच्या अपघाताची नोंद शिरपुर पोलिस स्टेशनला आहे. त्यावरुन मयत व इतर दोन व्यक्ती असे तीघे मोटार सायकलने प्रवास करीत होते. अशा प्रकारे मयताने कायदेशीर तरतुदींचा भंग करुन अक्षम्य निष्काळजीपणा दाखविला आहे व स्वत:च्या निष्काळजीपणामुळे स्वत:चे मरण ओढवून घेतले आहे. त्यामुळे विमा पॉलिसीतील “एक्सक्ल्युजन क्लॉज” लागू होऊन मयताचा क्लेम देय राहिलेला नाही. तसेच मयताचे ड्रायव्हींग लायसन्सची मागणी करुनही तक्रारदार यांनी ते दाखल न केल्यामुळे नाईलाजाने सदर फाईल बंद करावी लागली आहे. सामनेवालेंच्या सेवेत ञृटी नाही, त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्याची सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.५, कागदपञ नि.नं.७ वर एकूण १ ते ५, पुराव्याचे शपथपञ नि.नं.१३ व पुरसीस नि.नं.१४ तसेच सामनेवाले यांची कैफीयत नि.नं. १२, शपथपञ नि.नं.११ व लेखी युक्तिवाद नि.नं.१५, नि.नं.१८ पॉलिसी प्रत पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – सामनेवाले यांनी रसिकलाल फौंडेशनच्या माध्यमातून शिरपुर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची जनता पर्सनल विमा पॉलिसी उतरविली आहे. मयत वसंत पारधी हे शिरपुर विधानसभा मतदारसंघात राहत होते. त्या मतदारसंघातील रहिवाशांना “ ग्रामिण व्यक्तीगत दुर्घटना विमा योजना” या योजने अंतर्गत विम्याचे संरक्षण दिले होते, हे या सामनेवाले यांनी मान्य केले आहे. सामनेवाले यांनी विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसी प्रमाणे विमेधारकाचा अपघातात मृत्यु झाल्यास रु.२५,०००/- चा लाभ दिलेला आहे. सामनेवाले यांनी सदर पॉलिसी नाकारलेली नाही व सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम पुर्तता करणेकामी पञव्यवहार केलेला आहे, याचा विचार होता मयत यांनी सदर पॉलिसी सामनेवाले यांच्याकडून घेतली असून मयत हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – मयताचे दि.१९-०१-२०१० रोजी मोटारसायकल अपघातात निधन झाले आहे, त्या बाबतची फीर्याद दस्तऐवज यादी नि.नं.६ वर दाखल केली आहे. त्याबाबत मयताचा विमा म्लेम मिळणेकामी तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे क्लमे दाखल करुन मागणी केलेली आहे परंतु सामनेवाले यांनी क्लेम दिलेला नाही. या बाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर क्लेमची पुर्तता करणेकामी आवश्यक कागदपञांची मागणी तक्रारदार यांच्याकडे पञ दि.०६-०५-२०१० व दि.२४-०६-२०१० अन्वये केलेली आहे. सदर पञ अनुक्रमे नि.नं.७/४ व ७/५ वर दाखल आहेत. सदर पञ पाहता, मयत वसंत पारधी हा अपघाताचे दिवशी मोटार सायकल हे वाहन चालवित होता त्यामुळे मयताचे क्लेमची पुर्तता करणेकामी मयताचे ड्रायव्हींग लायसन्सची आवश्यकता आहे या बाबतची मागणी पञाद्वारे सामनेवाले यांनी केलेली दिसत आहे. परंतु या बाबत तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, मयत स्वत: वाहन चालवित नव्हते व मयताकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही. त्यामुळे सदर कागदपञांची आवश्यकता नाही. या कामी ससदर फीर्याद पाहता मयत हे स्वत: वाहन चालवित होते असे कुठेही नमूद नाही. तसेच श्री.सुभाष शंभू पारधी यांचा दि.३१-०३-२०१० रोजीचा शिरपुर पोलिसस्टेशनमधील जबाब नि.नं.७/३ वर दाखल केलेला आहे. त्यातील कथन पाहता सदर व्यक्ती ही अपघाताचे वेळी मोटार सायकलवरुन प्रवास करीत होती व अपघातातील मोटार सायकल नंबर जी.जे.१५-इइ-८४०३ हे वाहन त्यांच्या स्वत:च्या मालकीचे असून अपघाताचे वेळी ते स्वत: सदर वाहन चालवित होते असे जबाबात नमूद केले आहे.
या दोन्ही कागदपञांचा विचार होता असे दिसते की, मयत हे अपघाताचे वेळी सदर वाहन चालवित नव्हते. सामनेवाले यांनी त्यांच्या पञात मयत हा स्वत: वाहन चालवित होता व त्यामुळे त्याचंकडे ड्रायव्हींग लायसन्सची आवश्यकता आहे असे कारण नमून केले आहे व त्यांच्या कैफीयतीमध्ये मयताचे ड्रायव्हींग लायसन्सची आवश्यकता आहे व एक्सक्ल्युजन क्लॉजमधील निष्काळजीपणाबाबत बचाव घेतला आहे. परंतु या बाबत सामनेवाले यांनी सदर बचाव कशाचे आधारे घेत आहे या कामी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदर अपघाताचा विचार होता पोलिस स्टेशनकडील कागदपञांवरुन असे दिसते की, सदर अपघात हा समोरुन येणा-या टेम्पोने धडक दिल्याने घडलेला दिसत आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सदर अपघात हा मयताचे निष्काळजीपणामुळे झालेला नाही. यावरुन सामनेवाले यांनी कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना क्लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवालेंच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत आहे.
या विवेचनावरुन मयत हे स्वत: वाहन चालवित नव्हते, त्यामुळे मयताच्या ड्रायव्हींग लायसन्सची आवश्यकता नाही हे तक्रारदारांचे म्हणणे रास्त वाटत आहे. परंतु तक्रारदार यांनी रु.१,००,०००/- ची मागणी केलेली आहे. परंतु दाखल केलेल्या पॉलिसीप्रमाणे विमेधारकाचा मृत्यु असल्यास रु.२५,०००/- एवढा लाभ नमूद केलेला आहे. याप्रमाणे तक्रारदार हे विमा क्लेमपोटी रु.२५,०००/- मिळण्यास पाञ आहेत. सदरची रक्कम विमा कंपनीने तक्रारदारास पञ पाठविल्याचा दि.२४-०६-२०१० पासून व्याजासह देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. सदर क्लेम हा वेळेत मंजूर न केल्यामुळे तक्रारदार यांना सदर तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे व मानसिक, शारीरिक ञास सहन करावा लागला आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्कम रु.१,०००/- मिळण्यास पाञ आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारांना विमा क्लेमची रक्कम २५,०००/- (अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) दि.२४-०६-२०१० पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारांना मानसिक ञासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः १३/०६/२०१३
(सौ.एस.एस.जैन.) (सौ.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.