द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.:-
1) सदरची तक्रार सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास दिलेल्या विम्याबाबत सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी दिल्याबाबत दाखल केलेली आहे
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणेः- तक्रारदार क्र.1 ही तक्रारदार क्र. 2 व 3 यांची आई आहे. तक्रारदार क्र.1 चे पती श्रीकात सोनू महाडीक यांचे सामनेवाला क्र.1 यांचे कान्हे ब्रॅन्च ऑफिसमध्ये क्र.992027 अन्वये बचत खाते होते. सामनेवाला क्र.2 चे वतीने सामनेवाला क्र.1 च्या सर्व प्रकारच्या खातेधारकांसाठी एक वर्षाचे अवधीकरिता फक्त रु.15/- चा प्रिमियम भरलेनंतर एक लाख रुपयांचा अपघाती विमा सुरु करणेत आलेला होता. ती जाहिरात सामनेवाला क्र. 1 व 2 तर्फे करण्यात आली होती. तसेच सदर योजनेचा फॉर्म दि.12/03/08 रोजी रक्कम रु.15/- भरुन तक्रारदार क्र.1 चे पती श्रीकांत महाडीक यांनी सदर अपघाती योजनेमध्ये भाग घेतलेला होता. तसेच श्रीकांत महाडीक यांनी सहमतीपत्र भरुन दिलेले होते. सदर सहमतीपत्रानुसार सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे खातेमधून दरवर्षी रक्कम रु.15/- कापुन घेणेस तयार असलेबाबत नमुद केलेले होते. त्यामुळे सदर विमा पॉलीसी दरवर्षी पुढे चालू ठेवणेसाठी दरवर्षी रक्कम रु.15/- भरणेची आवश्यकता नव्हती किंबहूना सदर पॉलीसी दरवर्षी पुढे चालू ठेवणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांनी स्विकारली होती. दि.12/03/08 रोजी श्रीकांत सोनु महाडीक यांनी सहमतीपत्र सामनेवाला क्र.1कडे सादर केले व फॉर्मचा उर्वरित भाग सामनेवाला क्र.1 यांची सही व शिक्का व सामनेवाला क्र.2 यांची छापील सही आहे तो भाग श्रीकांत महाडीक यांना पॉलीसी म्हणून देण्यात आला होता. सदरची बाब तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे पतीने सांगितली होती.
3) दि.03/05/2010 रोजी तक्रारदार क्र.1 चे पती श्रीकांत महाडीक यांचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. सबब अपघात विमा पॉलीसी नुसार तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे विमा योजनेनुसार खातेदाराचा अपघाती मृत्यू झालेस त्यांच्या वारसांना रक्कम रुपये एक लाख मिळण्याचा हक्क आहे. तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे अपघात विम्याबाबत वैयक्तिक संपर्क साधला असता तुम्ही खेर्डी सब पोष्ट ऑफीस किंवा चिपळूण मुख्य ऑफिसमध्ये चौकशी करावी असे उत्तर मिळाले. त्याप्रमाणे तक्रारदार क्र.1 हे दि.20/04/2011 रोजीचे पत्राने सामनेवाला क्र.1 यांचेकडे सदर योजनेनुसार एक लाख विम्याच्या रक्कमेची मागणी केली. सदर पत्र सामनेवाला यांचेकडे दि.23/04/11 रोजी हातपोच केले. त्याच्या प्रती खेर्डी सब पोष्ट ऑफिस व चिपळूण मुख्य ऑफिसमध्ये दिल्या. तसेच सामनेवाला क्र.2 यांचेकडे RPAD ने पाठविली. सबब सदरचा दि.20/04/11 चा अर्ज सामेनवाला यांना मिळालेला आहे. तथापि, सामनेवाला क्र.1 यांनी दि.24/04/11चे पत्राने श्रीकांत महाडीक यांचे खाते क्र.992027 वर दि.12/03/08 नंतर अपघाती विमा पॉलीसी नसलेचे खोटे व खोडसाळ उत्तर पाठवून आपली जबाबदारी पूर्णपणे नाकारली आहे. तर सामनेवाला क्र.2 यांचे दि.14/09/2011 चे पत्रानुसार सामनेवाला क्र.1 यांनी मागितलेली माहिती दिलेली नसलेने दावा फाईल पूर्णत: बंद करीत असलेचे कळविले आहे. तक्रारदार यांचे म्हणणेनुसार सामनेवाला क्र. 1 व 2 आपली कायदेशीर जबाबदारी एकमेकांवर ढकलून विम्याची रक्कम देणेस टाळाटाळ करीत आहे. म्हणून तक्रारदारांनी या अपघाती विम्याची होणारी रक्कम एक लाख व त्यावर दि.03/05/10 पासून द.सा.द.शे.12 %व्याज, तसेच सेवेतील त्रुटीबाबत रक्कम रु.25,000/- दंड करण्यात यावा व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावा म्हणून प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे.
4) सामनेवाला क्र.1 यांनी या कामी हजर होऊन नि.19 कडे त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारीतील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय उत्तर देऊन नाकारलेला आहे. तथापि, मयत खातेदाराचे कान्हे शाखा डाकघरामध्ये बचत खाते क्र.992027 हे चालू स्वरुपात होते. तसेच ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या विम्याची जाहिरातबाजी व विमा उतरविण्याचे काम भारतीय टपाल खाते मार्फत चालू होते ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. तसेच रु.15/- भरुन अपघाती विमा संरक्षण योजना चालू करण्यात आली होती हेदेखील मान्य केलेले आहे. त्यानंतर श्रीकांत महाडीक यांना दि.12/03/08 रोजी कान्हे डाकघर येथे रोखस्वरुपात रक्कम रु.15/- जमा करुन अपघाती विमा पॉलीसी स्विकारली ही बाब देखील मान्य केली आहे. भारतीय टपाल खाते व ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांचेमध्ये झालेल्या करारानुसार शाखा डाकपाल कान्हे यंनी सदरचे सहमतीपत्र त्यांच्या दैनिक लेख्यासोबत खेर्डी उपडाकघरास पाठविले. खेर्डी उपडाकघराने दि.13/3/08 रोजी ते ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यासाठी चिपळूण प्रधान डाकघराकडे पाठविले व प्रधान डाकघराने सदर खात्याची रक्कम चेकव्दारे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे जमा केली. सदरची रक्कम ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे हस्तांतरीत होत असताना ज्या ज्या खात्यांसाठीची ती रक्कम आहे त्या त्या खातेक्रमांकाची यादीही सोबत पाठविलेली असते. सदरची यादी व चेक ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झाल्यावर ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी त्या खात्यांसाठी पॉलीसी इश्यु करीत असे आणि अशा पॉलीसीची एक वर्षाची मुदत संपली की, त्याच्या नुतनीकरणाच्या नोटीसा पाठविण्याची जबाबदारी पूर्णपणे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीवर होती व ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने नोटीस पाठविल्यावरच रक्कम रुपये 15/- संबंधीत खात्यातून कापून घेण्याची जबाबदारी डाक खात्याची होती. असे असतानादेखील तक्रारदाराने त्यांना देण्यात आलेल्या सेवेतील त्रुटीबाबत सामनेवाला क्र.1 म्हणजेच टपाल खात्यास दोषी ठरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. सदरहू खात्याच्या बाबतीत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून नुतनीकरणाची नोटीस प्राप्त न झाल्यामुळे टपाल खात्याने संबंधीत खात्यातून पुढील वर्षासाठी रक्कम रु.15/- कापून घेतलेली नाही. त्यामुळे सदरची पॉलीसी पुनर्जिवित केली गेली नाही. याबाबत सामनेवाला क्र.1 यांना दोषी ठरवता येत नाही व त्यांनी दयावयाच्या सेवेत कमतरता राहिलेली नाही.
5) सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने नुतनीकरणाची नोटीस न पाठविलेमुळे सदरची विमा पॉलीसी बंद पडलेली आहे. म्हणून तक्रारदारने केलेल्या विमा क्लेमसाठी भारतीय डाकघर जबाबदार नाही. ती जबाबदारी सर्वस्वी सामनेवाला क्र.2 यांची आहे. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये झालेल्या करारानुसार विमा विषय पूर्णपणे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचा असलेने सामनेवाला क्र.1 यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमधील करारानुसार विम्याची जाहिरात करणेची, विमा रक्कम स्विकारणेची व सदर रक्कम सामनेवाला क्र.2 यांना देणे एवढीच जबाबदारी पोष्ट खात्याची होती. विमा संदर्भात उदभवलेल्या तक्रारीसाठी पोस्ट विभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जबाबदार नसलेने यासंदर्भात ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधावा असे ठरलेले होते. पुढे सामनेवाला क्र.1 यांचा असा बचाव आहे की सामनेवाला क्र.1 कडे बचत खातेदाराचा विम्याचा कालावधी हा दि.12/03/08 ते 11/03/09 या एक वर्षाकरिता होता. एक वर्षानंतर पुन्हा विमा अर्ज भरुन देणे क्रमप्राप्त होते. तथापि, तक्रारदाराचे पतीने त्यांचे मृत्यूच्या तारखेपर्यंत पुन्हा विमा अर्ज भरुन दिलेला नाही. वास्तविक सदर पॉलीसीचे दोन वेळा नुतनीकरण होणे जरुरीचे होते.
6) याबाबतची जबाबदारी सामनेवाला क्र.2 व विमाधारकाची होती. सबब या प्रकरणातील विम्याची कोणतीही जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांचेवर येत नाही. सबब भारतीय डाक घर यांची विम्याची कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देणेची जबाबदारी नाही. म्हणून तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे.
7) सामनेवाला क्र.2 यांनी प्रस्तुत कामी हजर होऊन नि.13 कडे त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रार अर्जातील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.2 चे म्हणणे नुसार सदरची पॉलीसी ही फक्त एक वर्षाकरिता होती. दरवर्षी रु.15/- भरुन सदर पॉलीसीचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. तथापि, सदरची पॉलीसीची मुदत ही दि.12/03/08 ते 11/03/09 पर्यंत होती. सदर पॉलीसीचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. तथापि, सदर खातेदाराचे दि.03/05/10 रोजी निधन झाले त्यादिवशी सदर पॉलीसी अस्तित्वात नव्हती. सबब सामनेवाला क्र.2 तक्रारदार यांची कोणतीही रक्कम देणेस जबाबदार नाहीत. सामनेवाला क्र.2 यांनी पॉलीसीचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही ही बाब पत्राने तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांना कळविलेली होती. तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये अपघात विमा योजनेबाबत करार करण्यात आलेला आहे. सदर कराराप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी विविध खातेदारांच्या खात्यामधुन रु.15/- एवढी रक्कम कापून घेऊन सामनेवाला क्र.2 यांचेकडे त्यांचा इन्शुरन्स काढावयाचा हाता. सदरहू खातेदारांनी रिन्युअल नोटीस सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.21/01/09 रोजी पाठविलेली होती. परंतु सामनेवाला क्र.1 ने सामनेवाला क्र.2 कडे सदरहू रिन्युअल नोटीसप्रमाणे प्रिमियम भरलेला नसल्यामुळे सदरहू पॉलीसी संपुष्टात आली आहे. त्यामध्ये सामनेवाला क्र.2 यांची कोणतीच चुक नाही. सदरहू सामनेवाला क्र.1 यास पाठविलेली रिन्युअल नोटीसची प्रत तसेच ती पाठविल्याबाबतची सामनेवाला क्र.2यांचे डाकघर वहीतील नोटीसची प्रत कागदपत्रांच्या यादीसोबत सामनेवाला क्र.2 यांनी हजर केली आहे. सबब सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा तसेच सामनेवाला क्र.2 यांना या कामी निष्कारण पक्षकार करणेत आलेमुळे सीपीसी कलम 35(ए) प्रमाणे रक्कम रु.3,000/- नुकसान भरपाई देणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे.
8) तक्रारदाराने त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र नि.2 कडे हजर केलेले आहे. तसेच नि.5 सोबत बचत खातेचा उतारा, नॉमिनेशन फॉर्म, सहमती पत्र, पोच पावती व श्रीकांत महाडीक यांचा मृत्यू दाखला दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेली नोटीसची पावती, त्यांचेकडून आलेले उत्तर, इन्शुरन्स कंपनीकडून आलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सतेच तक्रारदाराने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि.23 कडे दाखल केलेले आहे.
9) याउलट सामनेवाला क्र.1 यांनी पाठविलेली नोटीसची स्थळप्रत तसेच डाकघर वही यांच्या नक्कला नि.28 कडे हजर केलेल्या आहेत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी मागणी केलेनुसार काही कागदपत्रे नि.19 कडे हजर केलेली आहेत. त्यानंतर तक्रारदाराने त्यांचा लेखी युक्तीवाद नि.46 कडे, सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद नि.47 कडे तर सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद नि.48 कडे दाखल केलेला आहे.
10) एकंदरीत तक्रारीचा आशय, पुरावा, युक्तीवाद ऐकला असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असलेचे तक्रारदार शाबीत करतात का? | होय सामनेवाला क्र.1 यांनी अंशत: |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार अर्ज अंशतः मंजुर. |
7) मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत काय ?
स्पष्टीकरण ः- तक्रारदाराचे पती श्रीकांत महाडीक यांचे सामनेवाला क्र.1 यांचेकडे बचत खाते क्र.992027 उघडले होते. त्याचबरोबर सदर खातेचा उतारा या कामी दाखल केलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.2 च्या वतीने सामनेवाला क्र.1 यांच्या सर्व खातेदारांचा एक वर्षाचे अवधीकरिता रक्कम रु.15/- भरलेनंतर एक लाख रुपयांचा विमा सुरु करण्यात आला होता ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. तक्रारदाराचे पती श्रीकांत महाडीक हे सामनेवाला यांचे विमाधारक होते व सामनेवाला क्र.1 मार्फत विम्याचा हप्ता भरणेत आला होता. सबब तक्रारदार श्रीकांत महाडीक यांचे वारस असलेले तसेच मूळ विमाधारक मयत झालेनंतर विमा पॉलीसीची रक्कम सामनेवाला यांनी देणेस नकार दिलेला आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असा संबंध होतो. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
8) मुद्दा क्र.2 ः- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असलेचे तक्रारदार शाबीत करतात का?
स्पष्टीकरण ः- तक्रारदाराने दाखल केलेला एकूण पुरावा पाहता असे दिसून येते की श्रीकांत महाडीक यांचे बचत खाते क्र.992027 सामनेवाला क्र.1 यांचेकडे उघडणेत आले होते. तसेच त्यांचे सदर खातेवर रक्कम रु.16,665/- इतकी रक्कम दि.09/10/10 अखेर जमा होती असे दिसून येते. सबब मूळ खातेदाराचा मृत्यू होईपर्यंत त्यांचे खात्यात पुरेशी रक्कम जमा होती. नि.5/2 कडे ओरिएन्टल पोस्टल पर्सनल अॅक्सीडेन्ट पॉलिसी पाहता असे दिसून येते की, बचतपत्र धारकांसाठी व डाक जीवन व ग्रामिण डाक जीवन विमा धारकांसाठी एक वर्षाकरिता रु.15/- मध्ये एक लाख रक्कमेचा अपघाती मृत्यू विमा सामनेवाला कंपनीने उपलब्ध करुन दिलेला होता. सदर नि.5/2 कडील सहमतीपत्र पाहता खातेदाराचे या पत्राव्दारे अपघाती विम्यामध्ये स्वारस्य असून दरवर्षी रक्कम रु.15/- अकौन्टमधून कापून घेण्यास सहमती दिलेचे दिसून येते. दि.12/03/08 रोजीचे पोस्टमास्तर कान्हे यांचे सहीचे व इन्शुरन्स कंपनीच्या शिक्क्याचा नि.5/3 कडे दाखल केलेला आहे. नि.5/4 तसेच तक्रारदाराने दाखल केलेल मेडिकल सर्टीफिकेट पाहता श्रीकांत महाडीक यांचा अपघाती मृत्यू दि.03/05/10 रोजी झालेला आहे. ही बाब शाबीत होते.
9) सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार सामनेवाला क्र.2 यांनी पॉलीसीचे नुतनीकरणाबाबतचे पत्र पाठविले नाही. म्हणून खातेदाराच्या खात्यातून रक्कम रु.15/- विमा हप्ता पाठवणेत आलेला नाही. त्यापलीकडे सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेत असे दिसून येते की, सदरची बाब सामनेवाला क्र.2 व विमाधारक यांचेमधील असलेने तसेच सामनेवाला क्र.1 व सामनेवाला क्र.2 यांचेसोबत झालेल्या करारानुसार सामनेवाला क्र.2 यांनी नुतनीकरणाबाबत पत्र पाठविले नसलेने सदर पॉलीसीचा हप्ता खातेदाराच्या खातेमधून पाठविलेला नाही. सबब सदरची पॉलीसी एक वर्षानंतर पुढे चालू राहिलेली नाही. तथापि, सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना पॉलीसीच्या नुतनीकरणाबाबत पत्र दि.29/01/09 रोजी पाठविणेत आले होते. त्यासोबत डाकघर वहीचा उताराही पाठविणेत आला होता. सबब सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे की सामनेवाला क्र.2 यांनी रिन्युअलची नोटीस न पाठविलेने सदर खातेदाराचा विमा हप्त्या त्याचे खातेवरुन वसुल करुन पाठविला नाही या म्हणणेमध्ये कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेली मेमोरॅन्डम ऑफ अॅग्रीमेंट मधील नियम 3, 8 व 9 यावर सामनेवाला क्र.1 अवलंबून राहतात. तसेच ऑपरेटींग अॅन्ड अकौन्टीग प्रोसीजर यामधील रिन्युअल ऑफ पॉलीसीज या बाबीवर अवलंबुन राहतात. तथापि, सदर रिन्युअल पॉलीसीवर सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या अधिका-यांच्या सहया नाहीत. सबब सदरचे नियम त्यावेळी अस्तित्वात होते किंवा नाही याबाबत साशंकता उपस्थित होते. तसेच रिवाईज अकौन्टीग प्रोसीजर सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेला आहे. त्यानुसार कलम 21 - The renewal notices for the renewal of the policy in the year is the responsibility of the Company under IRDA Regulations and will be taken care of by Oriental insurance Co. तथापि, या कामी सामनेवाला क्र.2 यांनी रिन्युअल नोटीससोबत पत्र पाठवणेची विनंती केलेली आहे. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी त्याबाबत कोणताही खुलासा किंवा पुरावा दिलेला नाही. सबब एकंदरीत पुरावा पाहता असे दिसून येते की सामनेवाला क्र.1 यांनी विमा खातेदाराच्या खात्यावर पुरेशा रक्कम असतानादेखील तसेच सहमतीपत्र करुन दिलेले असूनदेखील रक्कम रु.15/- प्रतिवर्षी प्रमाणे हप्ता विमा कंपनीला पाठवणेत कसूर केली आहे. त्यामुळे सदरची पॉलीसी एक वर्षानंतर पुढे चालू झालेली नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे किंवा सदोष सेवा दिलेली आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
11) सामनेवाला क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, सामेनवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे विमा हप्ता पाठविला नसलेने सदरची अपघात विमा पॉलीसी ही दि.08/03/09 नंतर अस्तित्वात राहिलेली नाही. सबब इन्शुरन्स अॅक्ट कलम 64(व्ही)(बी) अनुसार जर एखादी पॉलीसीचा प्रिमियम मिळाला नसेल तर सदर पॉलीसीची रक्कम देणेची जबाबदारी विमा कंपनीकडे राहत नाही. तसेच सदरचा अपघात हा पॉलीसी सुरु केलेनंतर 2 वर्षानी झालेला आहे. सदरची पॉलीसी रिन्युअल करण्यात आली नसलेने सदरची पॉलीसी अस्तित्वात नव्हती म्हणून सामनेवाला क्र.2 विमा कंपनीची विमा रक्कम देण्याची जबाबदारी राहणार नाही या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
12) एकंदरीत पुराव्यावरुन असे दिसून येते की, सामनेवाला क्र.1 यांनी विमा बचतधारकांच्या पॉलीसी पुढे चालू ठेवण्याकरिता विमा हप्ता बचत खातेतून कापून घेणे विमा पॉलीसी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी होती. तथापि एक वर्षानंतरचे पॉलीसीचा हप्ता न भरलेने व सामनेवाला क्र.1 यांचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराने विमा पॉलीसीचे नुतनीकरण करणे तसेच पॉलीसीची रक्कम मिळालेपासून वंचीत रहावे लागले. सबब याबाबतची सर्वस्वी जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांचेवरच ठेवणेत येईल या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडून पॉलीसीच्या पूर्ण रक्कमेची मागणी केलेली आहे. तथापि, तक्रारदार क्र.1 चे पती, सामनेवाला यांचे बचत खातेदार श्रीकांत महाडीक हे दि.03/05/10 रोजी अपघातात मयत झालेने त्यादिवशी त्यांची विमा पॉलीसी अस्तित्वात नसलेने सामनेवाला क्र.2 हे कोणतीही रक्कम देणेस जबाबदार राहत नाहीत. तथापि, सामनेवाला क्र.1 यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांना आर्थिक, मानसिक नुकसान सहन करावे लागले. सबब, सामनेवाला क्र.1 हे सेवेतील त्रुटीबाबत व आर्थिक व मानसिक त्रासाबाबत रक्कम रु.50,000/- तसेच या तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सदरची नुकसानभरपाईची रक्कम देणेस सामनेवाला क्र.1 हेच सर्वस्वी जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. सबब हे मंच मुद्दा क्र.2 प 3 चे उत्तर होकारार्थी देत आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आणि पुढील आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-(रुपये पन्नास हजार फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.29/12/2011 पासून ते रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज अदा करावेत.
3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.5000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावे.
4) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द तक्रारदाराचा दावा फेटाळणेत येत आहे.
5) सदरचे आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी 60 दिवसांत करावी. तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकेल.
6) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात / पाठविण्यात याव्यात.