::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 16/06/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ता हा वर्ष 1991 पासून एलपीजी ग्राहक असून विरुध्दपक्ष क्र. 2 चे माध्यमातून प्रदान करण्यात येणा-या सेवेचा उपभोग घेत आला आहे. तक्रारकर्त्याचा ग्राहक क्र. 06017, कार्ड सिरीअल नं. IOC-5808463, एस.व्ही.नं/दिनांक 218604/26.08.1991, सिलेंडर संख्या –1, असून वितरकाचे नाव, मे. प्रगती एन्टरप्रायझेस, अकोला आहे. तक्रारकर्त्याने ऑनलाईन बुकींग दि. 11/09/2013 रोजी केली असता त्याला बुकींग क्र. 9 देण्यात आला. त्यानंतर रिफील प्राप्ती कधी पर्यंत होऊ शकेल, या बाबतची चौकशी केली असता विरुध्दपक्ष क्र. 2 द्वारे सांगण्यात आले की, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या आदेशानुसार त्यांचा ग्राहक क्रमांक, अन्य अनेक ग्राहकांसमवेत विरुध्दपक्ष क्र. 3 कडे ट्रान्सफर केला असल्यामुळे रिफीलची डिलीव्हरी आम्ही देऊ शकत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र. 3 कडे झालेल्या सदरील ट्रान्सफर विषयीची प्रभावशिल स्थिती आदी बाबतची कुठलीही पुर्वसुचना अथवा माहिती तक्रारकर्त्याला देण्यात आली नव्हती. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 कडील सूचना फलकावर देखील तशा प्रकारची सुचना लावलेली नव्हती. तसेच नियमाप्रमाणे त्यासंबंधीच्या ग्राहक तक्रारी आय.ओ.सी.एल. कडे नोंदविण्यासाठी नियत अधिका-याचे नांव, पदनाम व पत्ता आदीबाबतची माहिती सुध्दा सुचना फलकावर उपलब्ध नव्हती. विरुध्दपक्ष क्र. 3 कडे या बाबतची चौकशी केली असता, असे सांगण्यात आले की, अन्य ग्राहकांसोबतच त्यांचाही ग्राहक क्रमांक विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र 3 कडे ट्रान्सफर झाला आहे, परंतु ट्रान्सफरची प्रभावशिल स्थिती, ट्रान्सफर केलेल्या ग्राहकाचे नांव व ग्राहक क्रमांक, त्याच प्रमाणे ग्राहक तक्रार निवारार्थ आय.ओ.सी.एल. अधिका-याचे नाव, पदनाम व पत्ता आदीबाबत कुठलीही माहिती विरुध्दपक्ष क्र. 3 कडील सुचना फलकावर लावलेली नव्हती. ऑनलाईन बुकींगच्या प्रणालीतील संबंधीत वितरकांद्वारे करण्यात येणा-या ऑटोमॅटीक डाऊनलोडींग बाबत व तक्रारकर्त्यासोबत झालेल्या वरील घटनेबाबत तक्रारकर्त्याने दि. 20/9/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे ई-मेलद्वारे आपली तक्रार नोंदवीली. तक्रारकर्त्याकडे एक सिलेंडर असून तक्रारकर्त्याच्या दि. 11/9/2013 च्या रिफील बुकींग ऑर्डर क्र. 9 ची आपुर्ती विरुध्दपक्ष क्र. 2 कडून जवळजवळ साडे तीन महिण्यात आजपावेतो करण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास अन्य महागड्या वैकल्पीक इंधनाची व्यवस्था करावी लागली. ही बाब विरुध्दपक्षाची सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दती या सदरात मोडणारी आहे. या बाबत तक्रारकर्त्याने मान्यताप्राप्त ग्राहक संघटनेच्या माध्यमातून दि. 09/11/2013 रोजी तिनही विरुध्दपक्षांना रजिस्टर ए.डी. सह नोटीस पाठवून रिफील बुकींग ऑर्डर क्र. 9 नुसार गॅस रिफीलची डिलीव्हरी त्याच प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षाकडून सदरील नोटीसचे पालन करण्यात आलेले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, ऑनलाईन रिफील बुकीग क्र. 9 दि. 11/9/2013 चे पालन करुन तक्रारकर्त्याला त्वरीत गॅस रिफिल देण्याचे निर्देश विरुध्दपक्ष क्र. 2 ला देण्यात यावेत. मानसिक पिडा, शारीरिक कष्ट व गैरसोय तसेच आर्थिक क्षती बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 10,000/- विरुध्दपक्ष क्र. 2 कडून रु. 2,500/- व विरुध्दपक्ष क्र. 3 कडून रु. 500/- तसेच न्यायिक खर्चापोटी रु. 500/- देण्याचे आदेश देण्यात यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेल्या काही बाबी बरोबर असल्या तरीही विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या एजंसी विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी तक्रारकर्त्याला वेळोवेळी योग्य ती माहिती दिलेली होती, तसेच तक्रारकर्त्याला नविन ग्राहक क्रमांकानुसार गॅसचे बुकींग देखील करुन दिलेले होते. मात्र तक्रारकर्त्याने हे बुकींग नंतर रद्द केले, त्यामुळे जर तक्रारकर्त्याला दि. 11.9.2013 नंतर गॅस रिफील मिळाले नसेल तर त्यात त्यांचीच चुकी आहे. विरुध्दपक्षाच्या पॉलिसी प्रमाणे ज्यावेळी नविन भागामध्ये नविन एजंसी देण्यात येते, त्यावेळी नविन भागातील सर्व सामान्य ग्राहकांना गॅस रिफील प्राप्त करुन घेण्यास सुविधा व्हावी म्हणून त्यांची नावे नविन एजंसीकडे पाठविण्यात येत असतात, ज्यानुसार दि. 29/8/2013 रोजी गोरक्षण रोड या परिसरातील सर्व ग्राहकांचे क्रमांक विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून विरुध्दपक्ष क्र. 3 कडे ट्रान्सफर करण्यात आले व ज्याची योग्य ती सुचना दि. 06/09/2013 रोजीच स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आली होती. तसेच तक्रारकर्त्याला हवे असल्यास त्याचा ग्राहक क्रमांक पुन्हा विरुध्दपक्ष क्र. 2 कडे ट्रान्सफर करुन देण्यात येईल, ही बाब देखील स्पष्ट करण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या मार्फत नव्याने गॅसचे बुकींग करुन घेतले व नंतर ते कॅन्सल देखील केले, त्यामुळे तक्रारकर्त्याला आजतागायत त्याचे बुकींगच नसल्यामुळे गॅस सिलेंडर मिळू शकलेले नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदर लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला असून, त्यासोबत एकंदर 02 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना या प्रकरणाची नोटीस बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 2 गैरहजर असल्यामुळे, सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द “एकतर्फी” चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
विरुध्दपक्ष क्र.3 यांचा लेखीजवाब :-
सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा ग्राहक होता. विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या आदेशानुसार दि. 29/8/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडील 2130 ग्राहकांचे विरुध्दपक्ष क्र. 3 कडे स्थानांतरण करण्यात आले. या बाबत विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी स्थानिक वृत्तपत्रात सर्व ग्राहकां करीता जाहीर सुचना दिली होती. तक्रारकर्ता जेंव्हा विरुध्दपक्ष क्र. 3 कडे आला, त्यावेळी तक्रारकर्त्याला सर्व माहिती देण्यात आली होती. तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्र. 2 कडील ग्राहक क्र. 6017 हा दि. 29/8/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे स्थानांतरीत करण्यात आला व त्याला नविन ग्राहक क्रमांक 7142 हा देण्यात आला. हे सर्व क्रमांक दि. 29/8/2013 रोजी स्थानांतरीत झालेले असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या कडून नव्याने गॅसच्या रिफील करिता बुकींग देखील केले होते. मात्र, ह्या बुकींग प्रमाणे रिफील मिळण्या अगोदरच तक्रारकर्त्याने दि. 11/11/2013 रोजी स्वत: विरुध्दपक्ष क्र. 3 च्या कार्यालयात येऊन हे बुकींग रद्द करावयास लावले. त्यामुळे तक्रारकर्त्याला जर आज पर्यंत रिफील मिळाला नसेल तर त्या करिता केवळ तक्रारकर्ता स्वत: जबाबदार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र.3 यांनी सदर लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला असून, त्यासोबत एकंदर 03 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद तसेच न्यायनिवाडा दाखल करण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 3 तर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला व दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचा स्वतंत्र लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतीउत्तर, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले न्याय निवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
या प्रकरणात तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, ते विरुध्दपक्षाचे ग्राहक असून, विरुध्दपक्ष क्र. 2 चे माध्यमातून प्रदान करण्यात येणा-या सेवेचा उपभोग घेत आले आहे. तक्रारकर्ते यांनी दि. 11/9/2013 रोजी एल.पी.जी. रिफील प्राप्तीसाठी ऑनलाईन बुकींग केली असता, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून त्यांचा बुकींग क्र. 9 असल्याबाबतची सुचना तक्रारकर्ते यांना मिळाली होती, त्यानंतर रिफील प्राप्ती कधी पर्यंत होवू शकेल, या बाबतची चौकशी केली असता, त्यांना विरुध्दपक्ष क्र. 2 द्वारा असे सांगण्यात आले की, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या आदेशानुसार त्यांचा ग्राहक क्रमांक अन्य अनेक ग्राहकांसमवेत विरुध्दपक्ष क्र. 3 कडे ट्रान्सफर केला, त्यामुळे रिफीलची डिलेव्हरी होवू शकत नाही. परंतु ट्रान्सफर विषयीची पुर्व सुचना तक्रारकर्ते यांना दिली नव्हती, अथवा तशी सुचना विरुध्दपक्ष क्र. 2 कडील सुचना फलकावर लावलेली नव्हती किंवा त्याबद्दलचे ईतर नियम विरुध्दपक्ष क्र. 2 कडून पाळल्या गेले नव्हते. म्हणून तशी तक्रार, ई-मेल द्वारे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे नोंदविली होती. तक्रारकर्ते यांच्याकडे एकच सिलेंडर असल्यामुळे त्यांना अन्य महागड्या इंधनाची सोय करावी लागली, तसेच विरुध्दपक्षाच्या अपादरर्शक व्यवहारामुळे रिफील प्राप्तीसाठी अडचनींचा सामना करावा लागत आहे, म्हणून प्रार्थनेप्रमाणे न्याय मिळावा.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले, सबब त्यांच्या विरुध्द हे प्रकरण “एकतर्फी” चालविण्यात आले.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या युक्तीवादानुसार असे आहे की, तक्रारकर्ते यांनी दि. 11/9/2013 रोजी ऑनलाईन बुकींग केली असता, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे त्यांचा क्र. 9 असल्याबाबत त्यांना सुचना केली होती. परंतु विरुध्दपक्ष क. 1 च्या धोरण व नियमानुसार एखाद्या नवीन भागामध्ये नवीन एजन्सी देण्यात येते व त्यावेळेस त्या भागातील ग्राहकांना गॅस रिफील प्राप्त करुन घेण्यास सुविधा व्हावी म्हणून त्यांची नावे नवीन एजन्सीकडे पाठविण्यात येतात. त्यानुसार दि. 25/6/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 ही नवीन एजन्सी सुरु झाली होती व त्यामुळे दि. 29/8/2013 रोजी गोरक्षण रोड या परिसरातील सर्व ग्राहकांचे क्रमांक विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र. 3 कडे ट्रान्सफर करण्यात आले व त्या बद्दलची सुचना दि. 6/9/2013 च्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली होती, तसेच या सर्व 2130 ट्रान्सफर झालेल्या ग्राहकांची सुची त्यांच्या नवीन ग्राहक क्रमांकासह विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 कडे उपलब्ध होती. तक्रारकर्ते यांनी दि. 11/9/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे ऑनलाईन बुकींग केली, त्याच्या अगोदर त्यांचा नंबर विरुध्दपक्ष क्र. 3 कडे ट्रान्सफर झाल्यामुळे बुकींगची पुर्तता करण्यात आली नाही. मात्र तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 मार्फत नवीन ग्राहक क्र. 7142 नुसार रिफील बुकींग करुन घेतले होते व बुकींग प्रमाणे सिलेन्डर मिळण्या अगोदरच तक्रारकर्त्याने विनंती करुन हे बुकींग कॅन्सल केले होते, त्यामुळे तक्रारकर्त्याला दि. 11/9/2013 नंतर गॅस रिफील मिळाले नसेल तर त्यात विरुध्दपक्षाची कोणतीही सेवा त्रुटी नाही.
विरुध्दपक्ष क्र. 3 यांचा युक्तीवाद देखील काही प्रमाणात विरुध्दपक्ष क्र. 1 ने केलेल्या युक्तीवादासारखाच आहे.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्तऐवज जसे की, “विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र. 3 कडे स्थानांतरीत केलेली ग्राहकांची यादी”, “दैनिक लोकमत” या वृत्तपत्रातील जाहीरात व “तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गॅसचे रिफीलचे बुकींग रद्द केल्याबाबतचे दस्तऐवज” हे तपासता, विरुध्दपक्ष क्र. 1 व विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या युक्तीवादाला पुष्ठी मिळते, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या आदेशानुसार दि. 29/8/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडील 2130 ग्राहक ( तक्रारकर्त्यासहीत ) विरुध्दपक्ष क्र. 3 कडे स्थानांतरीत झाले होते व ह्या यादीत तक्रारकर्त्याचे नाव देखील आहे. या बद्दलची सुचना विरुध्दपक्षाने दैनिक लोकमत या वृत्तपत्रात दि. 6/9/2013 रोजी प्रसिध्द केल्याचे दिसते. अशी सुचना देण्यात काही गैर नाही, कारण एकट्या तक्रारकर्त्याचा हा प्रश्न नव्हता, त्याच्या सोबत इतर बरेच ग्राहक या यादीत दिसतात. त्यामुळे या बद्दलचा तक्रारकर्त्याचा आक्षेप गृहीत धरल्या जाऊ शकत नाही. तसेच याच यादीत तक्रारकर्त्याचा नवीन ग्राहक क्रमांक देखील नमुद आहे. विरुध्दपक्षाने दाखल केलेले कॉम्प्युटर दस्तावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याने बुकींग प्रमाणे गॅस रिफील मिळण्या अगोदरच दि. 11/11/2013 रोजी हे बुकींग रद्द केले होते. तक्रारकर्ते यांचे मते, हे बुकींग त्यांनी रद्द केले नाही तर ही विरुध्दपक्षातील गुप्त सहयोग व कपट संधीमुळे उद्भवलेली त्रासदायक परिस्थिती आहे. परंतु हे तक्रारकर्ते यांनी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्तऐवज तथा न्यायनिवाडे या परिस्थितीत हातातील प्रकरणात लागु पडत नाही व म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार मंजुर करता येणार नाही, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब, अंतिम आदेश पारीत करण्यात येतो, तो येणे प्रमाणे…..
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
( कैलास वानखडे ) (श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला