Final Order / Judgement | (पारित दिनांक २५/०४/२०२४) आयोगाचे आदेशान्वये, श्रीमती वैशाली आर. गावंडे, मा. अध्यक्ष - तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १४ सह कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक १ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे कडून एलपीजी गॅस सिलेंडर विरुद्ध पक्ष क्रमांक २ कर्मचारी ग्राहक संस्था, ऊर्जानगर यांचे माध्यमातून घेतले. त्याचा ग्राहक क्रमांक ०७२७६ हा आहे. तक्रारदारानुसार दिनांक १८/०१/२०१७ रोजी तक्रारकर्त्याचे गॅस सिलेंडरला आग लागली आणि या आगीत घराची एक खोली जळून सामानाचे नुकसान झाले. तक्रारदारानुसार त्याचे सुमारे २,००,०००/- रुपयांचे नुकसान झाले. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, सदरहू आगीची प्रथम खबर त्याने दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे दिली त्यानंतर पोलिसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा सह तक्रारदाराने विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांना सदर घटनेची माहिती कळवली.
- तक्रारदारानुसार सदरहू आगीबाबत तज्ज्ञांचा तपासणी अहवाल देण्याची विनंती तक्रारदाराने विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे केली असता सदरचा तपासणी अहवाल त्यांनी न दिल्याकारणाने तसेच सिलेंडर विमाकृत केलेल्या विमा कंपनी बाबत माहिती न मिळाल्याने तक्रारकर्ता संबंधित विमा कंपनीकडे नुकसान भरपाई करिता दावा करू शकला नाही.
- तक्रारदार पुढे नमूद करतो की, विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ यांचे सदरचे कृत्य ग्राहकास दिलेली सेवा न्यूनता तसेच अनुचित व्यापार पद्धती असल्या कारणाने तक्रारदाराने दिनांक ०९/०८/२०१७ रोजी आयोगासमोर दावा दाखल करून तक्रार अर्जात नमूद प्रार्थनेनुसार मागणी केलेली आहे.
- तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या समर्थनार्थ तक्रारी समवेत निशाणी क्रमांक ४ वरील यादीनुसार एकूण 15 दस्तऐवज दाखल केले आहेत.
- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराची तक्रार व दस्त पडल्यानंतर विरुद्ध पक्षाला सूचनाप्रत्र बजावण्याकरिता पाठविण्यात आले. प्रस्तुत तक्रार प्रकरणाची सुनावणी विरुद्ध पक्षाला सूचना पत्राची बजावणी झाली. विरुद्ध पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी प्रकरणांमध्ये हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला.
- विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांचे नुसार त्यांना सदरचा दावा अमान्य असून तो खारीज होण्यास पात्र आहे कारण की तक्रारदाराने सदरचे सिलेंडर दिनांक ०८/०९/२०१६ रोजी घेतले होते परंतु त्या सिलेंडरची उचल करून ४ महिने होउन गेले असल्यामुळे घटनेतील सिलेंडर तक्रारदाराने दुसरीकडून आणलेले असावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ पुढे नमूद करतात की, गॅस सिलेंडरचा पॉलिसी क्रमांक १६०१०२८११६००००००१२९१ हा दिनांक ०७/०५/२०१६ ते ०६/०५/२०१७ पर्यंत वैध होता तसेच सदर घटनेबाबत त्यांनी इन्शुरन्स कंपनीला सूचना दिली होती व योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. गॅस सिलेंडर बाबत विमा कंपनीला योग्य ती कार्यवाही बाबत त्यांनी जबाबदारी पूर्ण केलेली आहे असे नमूद करत दिनांक १८/०१/२०१७ रोजी गॅस सिलेंडर मध्ये लिक असल्यामुळे सिलेंडरचा फडका उडाला आणि तक्रारकर्त्याच्या घरात आग लागली असावी परंतु सिलेंडर मध्ये लिकेज असल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. कारणाने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी कोणतीही अनुचित सेवा तसेच अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला नाही. सबब त्यांचे विरुद्ध चा दावा फेटाण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ सिटी पी एस कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड, ऊर्जा नगर, चंद्रपूर असून त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या परिसरातील नागरिकांच्या सोयीकरिता इंडियन गॅस एजन्सी घेतलेली आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांचे नुसार तक्रारकर्ता हा त्यांच्याकडून ३ महिन्यातून एकदा गॅस सिलेंडर ची उचल करतो. तक्रारदाराने दिनांक ८/०९/२०१६ रोजी शेवटचे गॅस सिलेंडर विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांचेकडून घेतले होते. सदरची घटना दिनांक १८/०१/२०१७ रोजी घडली कारणाने दिनांक ०९/०९/२०१६ ते घटनेच्या दिनांकापर्यंत तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून गॅस सिलेंडरची उचल केलेली नाही. विरुध्द पक्ष क्रमांक दोन पुढे सांगतात की घटनेच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी तक्रारदाराने त्यांचेकडे तत्काळ मध्ये गॅस सिलेंडरची मागणी केलेली होती परंतु गॅस सिलेंडर उचल करण्याकरिता ऑनलाइन नंबर लावणे गरजेचे असल्याने तक्रारदाराला गॅस सिलेंडर उपलब्ध करून देता येऊ शकले नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे नुसार तक्रारदाराने त्यांचेकडे गॅस सिलेंडरसाठी नंबर लावलेला नव्हता. कारणाने तक्रारदाराने बाहेरून गॅस सिलेंडर आणले असावे तसेच गॅस सिलेंडर लावताना ओव्हरिंग नसल्याकारणाने अपघात होऊ शकतो. विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांचे नुसार त्यांचे एजन्सी मधून उचललेल्या गॅस सिलेंडर बाबत योग्य ती तपासणी करून ते गॅस सिलेंडरचे वितरण करतात. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे नुसार तक्रारदाराने गॅस सिलेंडर त्यांच्याकडून घेतल्याबाबत कोणताही पुरावा पावती दाखल केलेला नाही. कारणाने सदरचे सिलेंडर तक्रारदाराने इतर ठिकाणाहून घेतले असावे. विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांनी सदरहू गॅस सिलेंडर आगी बाबत घटनेची माहिती त्यांना होताच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा चंद्रपूर यांना त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविलेले आहे व तसे विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारदाराला देखील कळविले आहे सबब विरूद्ध पक्ष क्रमांक २ यांचे नुसार त्यांचे विरुद्धचा सदरचा दावा खारीज होण्यास पात्र आहे.
- तक्रारदाराने दिनांक ३०/१०/२०१८ रोजी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा चंद्रपूर आणि आय सी आय सी आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना मूळ अर्जात दुरुस्ती करुन समाविष्ट करण्याबाबत आयोगास विनंती केली. तक्रारदारांची दुरुस्ती तक्रार अर्ज स्वीकृत करून आयोगाने विरुद्ध पक्ष क्रमांक ३ व ४ यांना नोटीस बजावणी केली.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांनी प्रकरणात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचेनुसार तक्रारदाराकडे एकूण दोन इंडियन ऑइल एलपीजी सिलेंडर असल्याने मागणी केल्यानंतरच रिकामे सिलेंडरच्या बदलीत नवीन भरलेले सिलेंडर चेक करून डिलिव्हरी दिल्या जाते. कारणाने वितरकाने दिलेल्या सिलेंडर मुळेच आग लागली असे म्हणता येऊ शकत नाही. तसेच गॅस सिलेंडरची नळी विशिष्ट वेळानंतर बदली करणे तसेच योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते तसे न केल्यास सिलेंडरला आग लागणे सारखी घटना घडू शकते.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ३ पुढे नमूद करतात की, तक्रारदाराने दस्त क्रमांक २ पोलीस स्टेशन दुर्गापुर यांना दिनांक १९/०१/२०११ रोजी मागावलेला दुर्घटनेबाबतचा चौकशी अहवाल पत्रात स्पष्ट नमूद आहे की, तक्रारकर्त्याच्या घरात सदरहू आगीमुळे झालेले नुकसान किरकोळ स्वरूपाचे आहे.
- विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांनी विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांचे कडे सदरहू सिलेंडर बाबत काढलेली विमा पॉलिसी व त्यानुसार विरुद्ध पक्ष क्रमांक २ च्या गोदामातील सिलेंडर बाबत नुकसान रिस्क कव्हर केलेली राहते परंतु सदरहू पॉलिसी नुसार घरी झालेल्या गॅस सिलेंडरच्या दुर्घटनेबाबत व सामानाच्या नुकसानाबाबत रिस्क कव्हर दिले जात नाही. तसेच तक्रारदाराने विरुद्ध पक्ष क्रमांक २ विमा कंपनीला सदर घटनेबाबत माहिती दिली नसल्याकारणाने सदरचा दावा खारीज होण्यास पात्र आहे.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ४ आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नुसार ते व्यवसाय व ग्राहकांचे हित जोपासण्याकरिता गॅस सिलेंडरचा विमा उतरवतात त्यांचेनुसार तक्रारदाराने दिलेल्या पॉलिसी क्रमांक नुसार विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी कोणतीही विमा पॉलिसी विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांचे कडे उतरवली नाही कारण तक्रारदार किंवा विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी पॉलिसी बाबत अचूक माहिती दिली असल्यास विमा कालावधीत विमा नुकसान भरपाई दिली जाते. सदरहू कारणामुळे या दुर्घटनेबाबत विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांच्याकडे कोणत्याही विमा नुकसान मागणीबाबत कागदपत्रे जमा केले गेलेले नाहीत किंवा तशी मागणी ही प्रलंबित नाही. कारणाने मागणी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच सदरहू गॅस सिलेंडर बाबत अपघात दिनांक १८/०१/२०१७ च्या अनुषंगाने नुकसान भरपाई दावा व कागदपत्र नसल्याने त्यांना या प्रकरणात जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही. सबब त्यांचे विरुद्धचा दावा खारीज करण्यात यावा.
- तक्रारदार यांनी आपले मूळ तक्रार अर्जात दुरुस्ती करून अपघात झालेल्या गॅस सिलेंडरच्या पॉलिसी नंबर व विमा दावा मागणीसाठी आवश्यक त्या पक्षांच्या जोडणीबाबत पूर्तता केली.
- विरुद्ध पक्ष क्रमांक चार यांनी सदरचे दुरुस्ती अर्जातील मागणी ही घटित अपघाताबाबत माहिती व गॅस सिलेंडर विमा दावा अर्ज प्राप्त न झाल्याने त्यांना नुकसान भरपाई निश्चित करता आली नाही असे सांगितले.
- तक्रारदारांचा तक्रार अर्ज व त्यासोबत दाखल केलेल्या दस्तऐवज दुरुस्ती तक्रार अर्ज व त्या समर्थनार्थ दाखल दस्तऐवज तसेच विरुद्ध पक्ष १ ते ४ यांनी दाखल केलेले लेखी जबाब व उभय पक्षाने आपल्या अधिवक्त्यामार्फत आयोगासमक्ष केलेल्या लेखी व तोंडी युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन करून त्या अनुषंगाने आयोग पुढीलप्रमाणे कारणमीमांसा सह निष्कर्ष पारित करीत आहे.
कारणमीमांसा - तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व सलग्न दस्तऐवजांचे तसेच विरुद्ध पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी प्रकरणात हजर होऊन दाखल केलेले लेखी जबाब व दस्तऐवजांचे तसेच उभयपक्षांचा युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन केले असता तक्रारदार हा विरुद्ध पक्ष क्रमांक १ ते ४ यांचा ग्राहक असून तक्रारदाराचे गॅस सिलेंडरला स्फोट होऊन झालेल्या आगीत तक्रारदाराचे नुकसान झाले, ही बाब वादातीत नाही.
- विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी सदरहू प्रकरणात आपला लेखी जबाब दाखल करून युक्तिवाद न करण्याचे स्वीकृत केले. विरुद्ध पक्ष क्रमांक १ हे नाकारत नाहीत की, तक्रारदाराने सदरहू विमा दावा विरुद्ध पक्ष यांच्याकडे सादर केला आणि विरुद्ध पक्ष क्रमांक १ आणि २ यांचे हे कर्तव्य आहे की सदरहू विमा दावा त्यांनी संबंधित विमा कंपनी जसे की विरुद्ध पक्ष क्रमांक ३ आणि ४ यांचेकडे निर्देशित करणे आवश्यक आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक २ हे स्थानिक गॅस सिलेंडर पुरवठादार असून तक्रारदाराने त्यांच्याकडून गॅस सिलेंडर प्राप्त केले आणि विरुद्ध पक्ष क्रमांक २ आणि ३ यांची जबाबदारी ज्यावेळी तक्रारदारास गॅस सिलेंडर सुस्थितीत सुपूर्द केले त्यावेळी संपुष्टात येते आणि याबाबत तक्रारदाराचा कोणताही वाद नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांनी विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांचेकडे गॅस सिलेंडरची वीमा पॉलिसी काढली असून त्यामध्ये फक्त विरुद्ध पक्ष क्रमांक २ चे गोदामात असलेले सिलेंडरचे झालेले नुकसानीची रिस्क कवर केलेली आहे व गोदामामध्ये झालेल्या अपघाताची किंवा मरण पावलेल्या कामगारांची रिस्क कवर केली आहे. याचा अर्थ असा की विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांची जबाबदारी ही केवळ गॅस सिलेंडर तक्रारदारास सुपूर्द करण्यापर्यंतची आहे. सदरहू प्रकरणात गॅस सिलेंडर विरुद्ध पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारदारास कोणतेही लिकेज नसताना पोहोचविलेले आहे आणि या कारणाने विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांची तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याबाबतची जबाबदारी उद्भवू शकत नाही कारणाने विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांनी विशेषतः कथन केले आहे की त्यांना तक्रारदाराचे विमा दावाबाबत कुठेही सूचना प्राप्त झाली नाही तसेच विमा दावा त्यांचेकडे दाखल केलेला नाही आणि या कारणाने त्यांना त्यावेळी घटनास्थळ निरीक्षण करून त्याबाबत पडताळणी करण्याची संधी प्राप्त होऊ शकली नाही आणि गॅस सिलेंडर अपघातासंबंधित माहिती तक्रारदाराने त्यांना दिली नसल्याकारणाने त्यांचेवर नंतर होऊन जबाबदारी निश्चित केल्या जाऊ शकत नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक ४ विशेषतः नमूद करतात की सदरहू गॅस सिलेंडर अपघातात तक्रारदार यास किरकोळ नुकसान झाले असल्याकारणाने सदरहू विमा रक्कम रुपये २,००,०००/- विमा लाभाकरिता तक्रारदार हा पात्र ठरू शकत नाही. कारणाने नुकसान भरपाई ही तक्रारदारास झालेल्या वास्तविक नुकसानाकरिता दिल्या जाते आणि सदरहू प्रकरणात तक्रारदाराने गॅस सिलेंडर भडका होऊन झालेल्या नुकसानी संदर्भात कोणताही घटनास्थळावरील सर्व्हे रिपोर्ट सादर केलेला नाही. विरुद्ध पक्ष यांना तक्रारदारास झालेल्या प्रत्यक्ष नुकसान भरपाईबाबत निष्कर्षाप्रत पोहोचता येऊ शकलेले नाही.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुढील प्रकरणांचा हवाला दिला आहे.
- First Appeal No. A/05/1459, Vilas Pandurang Kukade Vs. Indian Oil Corporation, passed by the Hon’ble State Commission, Circuit Bench, Nagpur
- Atul Anant Rane & Ors. Vs. Lourdes Gas Service & Ors., II (1998) CPJ 438
- Bharti Jat Vs. Devi Gas Service & Ors, III (2005) CPJ 407
वर उल्लेखित प्रकरणांचे अवलोकन केले असता आयोगाचे असे मत आहे की, विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांनी संदर्भित केलेल्या प्रकरणांचा सदरहू प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती सोबत साधर्म्य आढळून येत नसल्याकारणाने त्यांना अंतिम आदेश देण्याकरिता लक्षात घेतले जाऊ शकत नाही. - उभय पक्ष्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगास विरुद्ध पक्ष यांच्या युक्तिवादात कोणतीही त्यांची बाजू सिद्ध करणारी बाब आढळून न आल्याकारणाने आयोग पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते
- विरुद्ध पक्ष क्रमांक १ आणि ४ यांनी तक्रारकर्त्याप्रती सेवान्युनता तसेच अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे आयोग घोषित करीत आहे.
- विरुद्ध पक्ष क्रमांक १ आणि ४ यांना निर्देशित केले जाते की, त्यांनी रुपये २,००,०००/- विमा दावा रक्कम तक्रारदारास ९ टक्के व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १०/०८/२०१७ ते प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती विमा रक्कम पडेपर्यंत आदेशाचे दिनांकपासून ४५ दिवसाचे आत अदा करावे
- विरुद्ध पक्ष क्रमांक २ आणि ३ यांचे विरुद्धचा दावा खारीज करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ आणि ४ यांना निर्देशित केले जाते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये २५,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी.
| |