ग्राहक तक्रार क्र.263/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.01/12/2011
अंतीम आदेश दि.29/03/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्रीमती विठाबाई विठ्ठल ढोकणे, तक्रारदार
रा.सामनगाव, एकलहरे, ता.जि.नाशिक. (अॅड.के.एस.शेळके)
विरुध्द
भारतीय जीवन विमा निगम, सामनेवाला
जीवन प्रकाश, गडकरी चौक, (अॅड.श्रीमती व्ही.व्ही.कुलकर्णी)
गोल्फ क्लब ग्राउंड, जुना आग्रा रोड,
नाशिक.
(मा.अध्यक्ष, श्री. आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.01/10/2008 पासून प्रत्यक्ष हातात रक्कम मिळेपावेतो दरमहा 15%दराने व्याज मिळावे, मानसिक शारिरीक आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, तक्रारीचा खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.25 लगत लेखी म्हणणे व पान क्र.25अ लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
तक्रार क्र.263/2011
2. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे काय? - होय.
3. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- होय
4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम व्याजासह मिळणेस
पात्र आहेत काय?- होय
5. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
भरपाई मिळणेस पात्र आहेत काय?- होय
6. अंतीम आदेश? - अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला विरुध्द अंशतः मंजूर
करणेत येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांचेवतीने अँड.श्री.के.एस.शेळके यांनी युक्तीवाद केला आहे. सामनेवाले यांचेवतीने अँड.श्रीमती व्ही.व्ही.कुळकर्णी यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये तक्रारदार यांचे मुलाने पॉलीसी क्र.966216547 घेतल्याची बाब मान्य केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनीच पान क्र.29 लगत विमापॉलिसीची प्रमाणीत प्रत सादर केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.29 ची विमापॉलिसी याचा विचार होता अर्जदार हया कै.समाधान विठ्ठल ढोकणे यांच्या वारस म्हणून सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी या कामी पान क्र.1 लगत विलंब माफी अर्ज व पान क्र.2 लगत विलंब माफी अर्जाबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा पान क्र.1 लगतचा विलंब माफी अर्ज दि.01/12/2011 रोजी मान्य करण्यात आलेला आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांच्या मुलाचे दि.01/10/2008 रोजी अकस्मात निधन झालेले आहे. सदर अकस्मात निधनाची खबर मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी बेसिक क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.27/11/2008 रोजी अदा केलेली आहे. विमेधारकाच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये General and specific chemical testing does not reveal any poision in Exh.No.1 & 2 या कारणास्तव विमापॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे विमेधारकास डबल
तक्रार क्र.263/2011
बेनिफिट देता येत नाही. विमा पॉलिसीच्या कलम II प्रमाणे अपघाती विमा हा खालील व्यक्तीस देण्यात येतो. “to pay an additional sum assured towards accident benefit, if the life assured shall sustain any bodily injury resulting solely directly from the accident caused by outward, violent and visible means and such injury shall within 180 days of its occurance solely, directly and independently of all other causes resulting into death of life assured.” सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कोठेही कमतरता केलेली नाही. ” असे म्हटलेले आहे.
या कामी पान क्र.13 लगत फॉरेन्सीक लॅबोरेटरीजचा दि.17/03/2009 रोजीचा अहवाल दाखल आहे या अहवालावरती समाधान विठ्ठल ढोकणे यांचे नाव लिहीलेले आहे. या अहवालामध्ये “Hydrogan Cynamide positive” असा उल्लेख आहे. व पत्रव्यवहाराचे ठिकाणी “पत्र क्र.7965/08 दि.04/10/08” असा उल्लेख आहे. पान क्र.14 लगत फॉरेन्सीक लॅबोरेटरीजचा दि.17/03/2009 रोजीचा अहवाल दाखल आहे या अहवालावरती समाधान विठ्ठल ढोकणे यांचे नाव लिहीलेले आहे. या अहवालामध्ये “Chemical testing does not reveal any poison.” असा उल्लेख आहे. व पत्रव्यवहाराचे ठिकाणी “पत्र क्र.1824/08 दि.01/10/08” असा उल्लेख आहे.
पान क्र.14 चे अहवालाचा विचार होता केमिकल टेस्टींग मध्ये विष आढळून आलेले नाही असे दिसून येत आहे व पान क्र.13 चे अहवालाचा विचार होता हायड्रोजन सायनामाईडचा उल्लेख दिसून येत आहें. परंतु अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्येच “कै.समाधान ढोकणे हे दि.01/10/2008 रोजी द्राक्ष बागेत काम करीत असतांना उंचावर टांगून ठेवलेले किटकनाशक हायड्रोजन सायनामाईड या बाटलीचे बुच उघडत असतांना त्यांतून किटकनाशक औषध तोंडात गेले.” असा उल्लेख केलेला आहे. पान क्र.8, पान क्र.9 पान क्र.10 चे पोलिसांचेकडील कागदपत्रांमध्ये अशाच प्रकारचा उल्लेख आहे.
कै.समाधान ढोकणे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्टपणे शाबीत करण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतीही कागदपत्रे दाखल कलेली नाहीत. पान क्र.13 व पान क्र.14 चा अहवाल व पान क्र.9 ते पान क्र.12 लगतची पोलिसांचेकडील कागदपत्रे यांचा एकत्रीतरित्या विचार होता कै.समाधान ढोकणे यांचा मृत्यु अपघाताने विष पोटात जावून झालेला आहे हेच स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम अयोग्य
तक्रार क्र.263/2011
व चुकीचे कारण देवून नाकारलेला आहे. व त्यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी त्यांचे अर्जामध्ये सामनेवाले यांचेकडून पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 01/10/2008 पासून व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे. पान क्र.29 चे विमा पॉलिसीमध्ये विमा जोखीम रक्कम रु.1,00,000/- असा उल्लेख आहे. विमा पॉलिसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- डेथ क्लेम व रु.1,00,000/- अॅक्सीडेंट बेनिफीट अशी रक्कम मिळण्यास अर्जदार हे पात्र आहेत. यापैकी रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम सामनेवाले यांनी अर्जदारांस दिलेली आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे पान क्र.20 चे दि.01/08/2011 रोजीचे पत्राप्रमाणे अर्जदार यांची विमा क्लेमची मागणी अमान्य केलेली आहे. यामुळे अर्जदार यांना रक्कम रु.1,00,000/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळी सामनेवाला यांचेकडून मिळालेली नाही. यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थिक त्रास सहन करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे मंजूर रक्कम रु.1,00,000/- या रकमेवर आर्थिक नुकसान भरपाई म्हणून पान क्र.20 चे पत्राची तारीख दि.01/08/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत म्हणून द.सा.दशे. 9% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी अर्जदार यांची विमा क्लेमची संपूर्ण रक्कम मंजूर केली नाही यामुळे अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वूसल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व
तक्रार क्र.263/2011
कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रक्कम दयावी:
3) (अ) विमा क्लेमपोटी उवरीत रक्कम रु.1,00,000/- दयावेत. व या रकमेवर
दि.01/08/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत आर्थिक नुकसान भरपाई
म्हणून द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज दयावे.
(ब) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- दयावेत.
(क) या अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- दयावेत.
( आर.एस. पैलवान) (अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक
दिनांकः-29/03/2012