जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 348/2011 ते 351/2011.
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-30/07/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 10/02/2014.
ग्राहक तक्रार क्र.348/2011.
सौ.उषाबाई देविदास देसाई,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.25, राजयोग, विद्यानगर, जळगांव,ता.जि.जळगांव.
ग्राहक तक्रार क्र.349/2011.
श्री.राजेश देविदास देसाई,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.25, राजयोग, विद्यानगर, जळगांव,ता.जि.जळगांव.
ग्राहक तक्रार क्र.350/2011.
श्री.देविदास यादवराव देसाई,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.25, राजयोग, विद्यानगर, जळगांव,ता.जि.जळगांव.
ग्राहक तक्रार क्र.351/2011.
श्री.योगेश देविदास देसाई,
उ.व.सज्ञान, धंदाः काही नाही,
रा.25, राजयोग, विद्यानगर, जळगांव,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. इंडीयन इंम्यू लाईफ प्रा.लि.,
2, जय हरीपत, ओमनगर, पंचवटी,नाशिक,
ता.जि.नाशिक.
2. हरीष जयप्रकाश दिक्षीत,
रा.इमू सहायक केंद्र जीवन संवर्धन संस्था,
शाकुंतल संकुल, औरंगाबाद नाका, पंचवटी,
नाशिक,ता.जि.नाशिक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.यज्ञेश एस.पाटील वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 एकतर्फा.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्षः उपरोक्त चारही तक्रार अर्जातील तक्रारदार हे एकाच कुटूंबातील व एकाच पत्यावरील रहीवाशी असुन उपरोक्त चारही तक्रार अर्जातील विरुध्द पक्ष हे एकसारखेच असल्याने उपरोक्त चारही तक्रार अर्जांचा या निकालपत्राव्दारे एकत्रीतपणे निकाल देण्यात येत आहे.
1. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडे ठेव मुदतीत ठेवलेल्या रक्कमा विरुध्द पक्षाने मुदत संपलेनंतरही अदा न केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतचे चारही तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेले आहेत.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
विरुध्द पक्ष ही कंपनी कायदा 1956 अन्वये नोंदणीकृत असुन तिचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक UI400MH2008PTC185303 असा असुन कंपनीचे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर कामकाज असुन कंपनी विभाग निहाय कामकाज करीत असते. विभाग रचनेनुसार व कंपनीचे नियमानुसार नाशिक विभागात रहीवास करते. विरुध्द पक्ष कंपनीचे मुख्य कार्य हे इम्यू प्रजातीचे संगोपन करणे, अंडी संकलन करणे, प्रशिक्षण देणे व त्यासाठी लागणारा पैसा जनतेकडुन ठेव म्हणुन घेणे, अंडी संकलनासाठी पैसे घेणे, तसेच इम्यु जोडी सांभाळण्यासाठी कंपनीकडे गुंतवणूक करणे यासाठी 1) इम्यू कॉलनी योजना, 2) इंडीयन ई-लाईफ योजना, 3) अंडी सहमालक योजना अशा योजनामार्फत ग्राहकांकडुन ठेवी घेऊन योजनेप्रमाणे मुदत संपलेनंतर व्याजासह रक्कम परत देणे व सदर योजनेनुसार रक्कम दिडपट, दुप्पट, तिनपट देणेची कंपनीची जबाबदारी होती. उपरोक्त चाही तक्रार अर्जातील तक्रारदारांनी कंपनीचे प्रतिनिधी विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सांगीतलेल्या इम्यु कॉलनी योजनेनुसार रक्कम गुंतवणूक केल्याचा ग्राहक तक्रार क्रमांक निहाय तपशिल खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | ग्राहक तक्रार क्रमांक | रक्कम रु. | गुंतवणूक केल्याचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | मुदतीनंतर देय रक्कम रु. |
1. | 348/2011 | 25,000/- | 29/01/2010 | 27/01/2011 | 75,000/- |
2. | 349/2011 | 25,000/- | 29/01/2010 | 27/01/2011 | 75,000/- |
3. | 350/2011 | 25,000/- | 29/01/2010 | 27/01/2011 | 75,000/- |
4. | 351/2011 | 25,000/- | 29/01/2010 | 27/01/2011 | 75,000/- |
3. तसेच तक्रारदारांनी इम्यु अंडी सहमालक योजनेअंतर्गत विरुध्द पक्षाकडे गुंतवणूक केलेल्या रक्कमांचा ग्राहक तक्रार क्रमांक निहाय तपशिल खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | ग्राहक तक्रार क्रमांक | रक्कम रु. | गुंतवणूक केल्याचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | मुदतीनंतर देय रक्कम रु. |
1. | 348/2011 | 1,00,000/- | 26/11/2010 | 26/02/2011 | 3,01,320/- |
2. | 349/2011 | 1,00,000/- | 26/11/2010 | 26/02/2011 | 3,01,320/- |
3. | 350/2011 | 2,70,000/- | 09/11/2010 | 10/02/2011 | 7,09,201/- |
4. | 351/2011 | 2,00,000/- | 09/11/2010 | 02/02/2011 | 6,00,000/- |
4. उपरोक्त सर्व रक्कमा हया तक्रारदार यांनी त्यांचे रहात्या घरी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे सुपूर्द केलेल्या आहेत. उपरोक्त रक्कम देय झालेनंतर तक्रारदार यांनी देय रक्कम घेण्यासाठी विरुध्द पक्ष यांचेकडे गेले असता विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारांकडुन मुळ रक्कमेच्या पावत्या घेऊन विरुध्द पक्ष क्र. 2 चे सही असलेले चेक दिले त्याचा तपशिल ग्राहक तक्रार क्रमांक निहाय खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | ग्राहक तक्रार क्रमांक | दिलेले एकुण चेक | चेकवर नमुद एकुण रक्कम रु. |
1. | 348/2011 | 6 | 10,68,000/- |
2. | 349/2011 | 9 | 18,00,000/- |
3. | 350/2011 | -- | -- |
4. | 351/2011 | 5 | 10,58,800/- |
5. यातील काही चेक तक्रारदाराने वटण्यासाठी टाकले असता विरुध्द पक्षाने खाते बंद केल्याने ते न वटता परत आले. अशा रितीने विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांकडुन वेळोवेळी वर नमुद योजनांनुसार रक्कमा स्विकारुन त्या मुदतीनंतर तक्रारदारांना अदा न करुन त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सबब ग्राहक तक्रार क्र.348/2011 मध्ये एकुण रक्कम रु.11,43,000/-, ग्राहक तक्रार क्र.349/2011 मध्ये एकुण रक्कम रु.19,31,320/-, ग्राहक तक्रार क्र.350/2011 मध्ये एकुण रक्कम रु.7,84,020/-, व ग्राहक तक्रार क्र.351/2011 मध्ये एकुण रक्कम रु.17,33,800/- रक्कम फीटेपावेतो सदरहु रक्कमांवर द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याजासह मिळाव्यात तसेच प्रत्येक तक्रार अर्जाचे खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- विरुध्द पक्षांकडुन मिळण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जाव्दारे केलेली आहे.
6. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे या मंचाची रजि.नोटीस स्विकारुनही गैरहजर राहील्याने व प्रस्तुत चारही तक्रारींकामी काहीएक म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
7. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, व तक्रारदार यांची युक्तीवाद पुरसीस इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. उपरोक्त चारही तक्रारदाराचे तक्रार अर्ज या
मंचासमोर चालण्यास पात्र आहेत काय? नाही.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
8.मुद्या क्र. 1 व 2 - इम्यु कॉलनी योजना व इम्यु अंडी सहमालक योजना या योजनेअंतर्गत तक्रारदारांकडुन वेळोवेळी तक्रारदाराचे जळगांव येथील वर नमुद पत्यावरुन रक्कमा स्विकारुन मुदतीनंतर त्या व्याजासह अदा न करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचे तक्रार अर्ज तक्रारदारांनी या मंचासमोर दाखल केलेले आहेत. विरुध्द पक्ष हे या मंचाची रजिष्ट्रर नोटीस मिळुनही याकामी गैरहजर राहीले व त्यांनी त्यांचे काहीएक म्हणणे दाखल न केल्याने तक्रार अर्ज एकतर्फा निकालासाठी घेतले. चारही तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्रे दाखल केलेली असुन तक्रारदाराचे वकीलांनी तक्रार अर्जासोबत दाखल शपथपत्र हे पुराव्याचे शपथपत्र समजण्यात येऊन तक्रार अर्जाप्रमाणे तक्रारदाराचा युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दि.18/01/2014 रोजी वर नमुद चारही तक्रार अर्जाचे कामी दिली.
9. तक्रारदाराने तक्रार अर्जातुन विरुध्द पक्ष क्र. 2 श्री.हरीष जयप्रकाश दिक्षीत यांनी कंपनीचे सांगीतलेल्या योजनांनुसार तक्रारदाराचे रहात्या घरी जळगांव येथे ठे रक्कमा स्विकारल्याचे तक्रार अर्जातुन शपथेवर नमुद केलेले आहे. तथापी उपरोक्त चारही तक्रार अर्जातील नि.क्र.3 लगत दाखल ठेव पावत्यांच्या छायाप्रतींचे बारकाईने अवलोकन करता इंडीयन इम्यु लाईफ प्रा.लि. हेड ऑफीस 1 ला मजला, शकुंतला कॉम्प्लेक्स, औरंगाबाद नाका, मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-3 हा पत्ता नमुद असलेल्या ठेव पावत्या दिसुन येतात. तसेच सदरच्या ठेव पावत्यांवरुन तक्रारदाराने जळगांव येथे विरुध्द पक्षाला रक्कम दिल्याचे कुठेही नमुद केलेले नाही. याशिवाय तक्रारदारांना विरुध्द पक्षाने दिलेल्या मुदतीनंतर देय रक्कमांचे चेक चे अवलोकन करता ते देखील आय.डी.बी.आय बँक नाशिक बँकेचे दिसुन येतात. केवळ तक्रारदाराचे शपथेवरील लेखी कथन विरुध्द पक्षास जळगांव येथील त्यांचे घरी रक्कम दिली यावरुन विरुध्द पक्षाने तक्रारदारांकडुन जळगांव येथे रक्कमा स्विकारल्याचे कोणतेही सबळ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे नाशिक येथे कंपनीचा व्यवसाय करीत असुन त्यांचे शाखा कार्यालय जळगांव येथे कार्यरतही नाही. त्यामुळे तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत झालेला व्यवहार हा नाशिक येथे झालेला असल्याचे निष्कर्षास्तव तक्रारदारांच्या तक्रारीस जळगांव येथे तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नसल्याचे स्पष्ट होते. उपरोक्त चारही तक्रारदारांच्या तक्रारीस या मंचाचे अधिकार क्षेत्रात कारण घडलेले नसल्याने तक्रारदारांच्या उपरोक्त चारही तक्रार अर्ज आम्ही फेटाळत आहोत. तक्रारदारांनी योग्य त्या अधिकार क्षेत्रासमोरील मंचासमोर सदरच्या तक्रारी दाखल कराव्यात व उपरोक्त चारही तक्रार अर्जाकामी या मंचासमोर व्यतीत केलेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरण्यात यावा असे नमुद करुन आम्ही उपरोक्त चारही तक्रार अर्जाचे कामी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. उपरोक्त चारही तक्रार अर्ज अनुक्रमे क्र.348/2011,349/2011, 350/2011 व 351/2011 हे फेटाळण्यात येतात.
2. उपरोक्त चारही तक्रारदारांनी योग्य त्या अधिकार क्षेत्रासमोरील मंचासमोर त्यांचे तक्रार अर्ज दाखल करावेत व या मंचासमोर व्यतीत केलेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरण्यात यावा.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 10/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.