Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/64/2022

SUBRAMANIAN RAMAKANTAN - Complainant(s)

Versus

INDIAN BANK - Opp.Party(s)

ADV AUSGRE CARVALVO

30 Apr 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
MUMBAI SUBURBAN ADDITIONAL
Administrative Building, 3rd Floor, Near Chetana College
Bandra (East), Mumbai-400 051
 
Complaint Case No. CC/64/2022
( Date of Filing : 24 Mar 2022 )
 
1. SUBRAMANIAN RAMAKANTAN
B-1 504 SHREE SARASWATI CHS LTD NEAR ACHARYA COLLAGE CHEMBUR MUMBAI 400071
...........Complainant(s)
Versus
1. INDIAN BANK
71-C SUNDER BUILDING GOVANDI ROAD CHEMBUR MUMBAI 400071
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. PRADEEP G. KADU PRESIDENT
 HON'BLE MR. S.V.KALAL MEMBER
 HON'BLE MRS. KANCHAN S. GANGADHARE MEMBER
 
PRESENT:
Shri Ausgre Carvalho-Advocate
......for the Complainant
 
Exparte
......for the Opp. Party
Dated : 30 Apr 2024
Final Order / Judgement

श्रीमती कांचन एस. गंगाधरे, मा.सदस्‍या यांच्‍या व्‍दारे

               तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे ः-

1)          तक्रारदार हे विविटार बॅकप्‍स या नावाने 301, सिम्‍फोनी, प्‍लॉट नं.549, 11 वा रस्‍ता, चेंबूर, मुंबई येथे व्‍यवसाय करतात. तक्रारदार मागील अनेक वर्षापासून सामनेवाले बॅंकेकडून रु.15 लाखपर्यंत कॅश क्रेडिट व रु.15 लाखपर्यंत मुदत कर्ज या सुविधेचा लाभ घेत होते. दिनांक 29 ऑगस्‍ट, 2016 रोजी सामनेवाले बॅंकेने तक्रारदारास रु.15 लाख मुदत कर्ज मंजूर झाल्‍याचे पत्र दिले होते ज्‍यावेळी मुदत कर्ज मंजूर झाले होते त्‍या दरम्‍यान तक्रारदार यांचा कारखाना दूकान नं.7, प्‍लॉट नं.3, सेक्‍टर-6, आराधना को-ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी, सानपाडा, नवी मुंबई-400 705 या पत्‍त्‍यावर होता. सदर कर्जावरील सुरक्षेसाठी सामनेवाले बॅंकेने तक्रारदाराच्या कारखान्यातील उपलब्ध माल व यंत्रसामग्री ई. गहाण ठेऊन घेतले होते. सामनेवाले बॅंकेने त्‍यांचेकडे गहाण असलेल्‍या  तक्रारदारांच्या कारखान्‍यातील उपलब्‍ध माल व यंत्रसामग्रीसाठी यूनायटेड इंडिया इन्‍श्‍युअरन्‍स कंपनी लिमीटेड या विमा कंपनी कडून स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स या पॉलीसीव्‍दारे दोन विमा पॉलीसी घेतल्‍या  होत्‍या. यासाठीच्‍या विमा हफ्त्‍याची रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यातून दरवर्षी कपात करुन घेतली जात होती. पॉलीसी क्र.1202001119P114731628 अन्‍वये इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंच्‍या साठयावर विमा संरक्षण घेतले होते. त्‍याची विमा संरक्षित रक्‍कम रु.15 लाख होती. त्‍यासाठी विमा हफ्ता रु.3,911/- होता. तसेच विमा पॉलीसी क्र.1202001119P114751833 अन्‍वये यंत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते. ज्‍याची विमा संरक्षित रक्‍कम रु.19,89,000/- व त्‍याचा विमा हफ्ता रु.5,187/- होता. दोन्‍ही पॉलीसींचा कालावधी दिनांक 31 जानेवारी, 2020 ते 30 जानेवारी, 2021 असा होता. सदर विमा पॉलीसीमध्‍ये एजन्‍टचे नांव इंडियन बॅंक, चेंबूर, बॅंकेचा एजन्‍ट कोड BKA 92020090000011 असा नमूद आहे.

2)          दिनांक 1 सप्‍टेंबर, 2016 रोजी तक्रारदार यांनी त्‍यांचा कारखाना वर नमूद पत्त्यावरून प्‍लॉट नं.डी-178/2, टीटीसी इंडस्‍ट्रीयल एरिया, एम.आय.डी.सी., नेरुळ, नवी मुंबई-400 706 या नवीन पत्‍त्‍यावर स्‍थलांतरीत केला होता. तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेकडे भाडे करार व उदयोग आधार ई. कागदपत्रे जमा करुन त्‍यांच्‍या बॅंक खात्‍यावरील जूना पत्‍ता बदलून नवीन पत्‍ता अदययावत करुन घेतला होता. नवीन पत्‍ता अदययावत करण्‍यापूर्वी सामनेवाले बॅंकेने नवीन पत्‍त्‍यावर जावून तक्रारदाराच्या कारखान्‍यातील उपलब्‍ध मालाची अनेकवेळा तपासणी सुध्‍दा केली होती तसेच  तक्रारदाराच्‍या खात्‍यातून पत्‍ता बदलाबाबत निरीक्षण शुल्‍क सुध्‍दा कपात केलेले होते. सामनेवाले बॅंकेकडे बदललेल्या पत्त्याबाबत नोंद असताना देखील दोन्ही पॉलीसीत नवीन पत्‍ता नमूद न  करता त्‍यांनी 2017 पासून जून्‍या पत्‍त्‍यावर विमा संरक्षण घेतले होते व विमा पॉलीसीच्‍या मूळ प्रती सामनेवाले बॅंकेकडून तक्रारदार यांना कधीही पुरविल्या गेल्या नव्हत्या.   

3)          दिनांक 30 ऑगस्‍ट, 2020 रोजी तक्रारदार यांच्‍या नवीन पत्‍त्‍यावरील कारखान्‍याला मोठी आग लागली होती व त्‍या आगीत तक्रारदाराच्‍या कारखान्‍यातील काही मालाचे व यंत्राचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. सदर आगीच्‍या घटनेची सूचना तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिनांक 31 ऑगस्‍ट, 2020 रोजी दिली होती. तसेच तुर्भे पोलीस स्‍टेशनला सुध्‍दा सदर घटनेबाबत कळविण्‍यात आले होते. दिनांक 1 सप्‍टेंबर, 2020 रोजी सामनेवाले बॅंकेने सदर आगीच्‍या घटनेबाबत विमा कंपनीला कळविले होते.

4)          विमा कंपनीने आगीच्‍या घटनेची माहिती मिळाल्‍यावर आगीत झालेल्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन करण्‍यासाठी मे.भाकूनी इन्‍श्‍युरन्‍स सर्व्‍हेअर अॅन्‍ड लॉस असेसर प्रायव्‍हेट लिमीटेड या कंपनीची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली होती. दिनांक 3 सप्‍टेंबर, 2020 रोजी सदर सर्व्‍हेअर कंपनीने आगीची घटना घडल्‍या ठिकाणची प्राथमिक पाहणी केली होती व प्राथमिक पाहणीच्‍या अनुषंगाने सर्व्‍हेअरने त्‍यांचा प्राथमिक अहवाल विमा कंपनीकडे सादर केला होता. सदर अहवालामध्‍ये नमूद आहे की, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंचे अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. प्राथमिक अहवालाला जोडलेल्‍या यादीनुसार रु.25,32,488/- इतक्‍या रकमेचा माल कारखान्‍यात होता व सदर मालाचे रु.22,82,120/- रकमेचे नुकसान झाले होते.

5)          सर्व्‍हेअरने दिनांक 14 सप्‍टेंबर, 2020 रोजी ईमेलव्‍दारे विमा कंपनी कडून तक्रारदाराच्‍या  सदर कारखान्‍याच्‍या बदललेल्‍या पत्‍त्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण मागविले होते. विमा कंपनीने त्‍या ईमेलला दिनांक 15 सप्‍टेंबर, 2020 रोजी उत्‍तर देत कळविले होते की सदर पॉलीसीव्‍दारे विमा संरक्षण हे जून्‍या पत्‍त्‍यावरील कारखान्‍यासाठी घेतलेले होते. या उत्‍तराच्‍या  अनुषंगाने सर्व्‍हेअरने ‘No Claim’ म्‍हणून सदर आगीच्‍या घटनेची फाईल बंद केली होती. सदर फाईल पॉलीसी क्र.1202001119P114731628 च्‍या आधारे बंद केली गेली व दूसरी पॉलीसी देखील जून्‍या  पत्‍त्‍यावर असल्‍याने तिचा विचार केला गेला नव्‍हता. हा ईमेल प्राप्त होताच तक्रारदाराने सामनेवाले व सर्व्‍हेअर यांना ईमेलव्‍दारे स्पष्ट केले की, सदर कारखाना नवीन पत्त्यावर स्थलांतरित झाल्यावर पत्ता अदययावत करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तक्रारदाराने सामनेवाले बँकेकडे देऊन पत्ता बदलून घेतला होता.

6)          सामनेवाले बॅंकेने दिनांक 17 सप्‍टेंबर, 2020 रोजी सर्व्‍हेअरला पाठविलेल्या ईमेलव्‍दारे  मान्य केले होते की, आमच्‍या चूकीमुळे कारखान्‍यासाठी विमा संरक्षण हे जून्‍या पत्‍त्‍यावर घेतले गेले होते. तक्रारदार यांनी पत्‍ता बदलल्‍यासंबंधीची सर्व आवश्‍यक कागदपत्रे पुरविली होती. त्‍यामुळे सदर विमा दाव्‍याचा विचार करण्‍याची विनंती सामनेवाले बॅंकेने सर्व्‍हेअरकडे केली होती.

7)          सामनेवाले बॅंकेच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदाराचे 24 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्‍यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 8 मार्च, 2021 व 12 जुलै, 2021 रोजी वकीलामार्फत सामनेवाले बॅंकेस नोटीस पाठविली होती. त्‍यास उत्‍तर देण्‍याची तसदी सुध्‍दा सामनेवाले बॅंकेने घेतली नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी विमा दाव्‍याची नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराने विमा दाव्‍याची नुकसान भरपाई म्‍हणून रु.22,82,000/-, मानसिक त्रास म्‍हणून रु.5,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,00,000/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे.    

8)          सामनेवाले बॅंक यांना नोटीसची रितसर बजावणी होऊनही ते आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्यात आला. सामनेवाले बॅंक सदर प्रकरणात हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढण्यात येतो.  

9)          तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्र, तक्रारदारातर्फे दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे व तक्रारदारातर्फे वकील श्री.ऑस्‍ग्रे कर्व्‍हालो यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेता आमच्‍यासमोर खालील मुद्दे निर्णयासाठी येतात.

मुद्दे

अ.क्र.

मुद्दे

उत्‍तर

1)

याप्रकरणी सामनेवाले बॅंकेने तक्रारदार यांच्‍या कारखान्‍याच्‍या पत्‍त्‍यातील बदलाची नोंद घेण्‍याबाबत विमा कंपनीस न कळवून सेवेत त्रुटी व निष्‍काळजीपणा केला असल्‍याचे सिध्‍द होते काय ?

होय

2)

याप्रकरणी आगीच्‍या घटनेत तक्रारदाराचे नुकसान झाल्‍याचे सिध्‍द होते काय ?

होय

 

3)

याप्रकरणी तक्रारदार हे सामनेवाले बॅंकेकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र ठरतात काय ?

होय, अंतिम आदेशाप्रमाणे

आमच्‍या निर्णयाची कारणे

10) मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदाराने दाखल केलेला बॅंक खातेउतारा यावरुन तक्रारदार खाते क्रमांक 6337637148 या खाते क्रमांकाचे सामनेवाले बॅंकेचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

11)         तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले बॅंकेने 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते व त्‍या  कर्जाच्‍या सुरक्षेसाठी सामनेवाले बॅंकेने तक्रारदाराच्‍या कारखान्‍यातील उपलब्‍ध माल व यंत्रसामग्री गहाण (Hypothecation) ठेवून घेतले होते. त्यावेळी तक्रारदारांचा कारखाना दूकान नं.7, प्‍लॉट नं.3, सेक्‍टर-6, आराधना को-ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी, सानपाडा, नवी मुंबई-400 705 या जुन्या पत्‍त्‍यावर होता. याच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदाराने नि.क्र.A वर कर्ज मंजूर पत्र दाखल केले आहे. या पत्रामध्‍ये सामनेवाले बॅंकेकडे गहाण असलेल्‍या कारखान्‍यातील उपलब्‍ध माल व यंत्रसामग्रीची याची यादी दिलेली आहे. सामनेवाले बॅंकेने गहाण असलेल्या मालमत्तेसाठी युनाईटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनी लिमीटेड या विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेतले होते. तक्रारदाराने नि.क्र.C व नि.क्र.C1 यावर स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलीसीच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्याचे अवलोकन केले असता सामनेवाले बॅंक विमाधारक (Insured) व एजन्‍ट असल्याचे  दिसून येते. एजन्‍ट च्या नावापुढे इंडीयन बॅंक, चेंबूर आणि एजन्‍ट कोड BKA 92020090000011 असे दोन्‍ही पॉलीसीवर नमूद आहे. पॉलीसी क्र.1202001119P114731628 अन्‍वये इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंच्‍या साठयावर विमा संरक्षण घेतले होते. त्‍याची विमा संरक्षित रक्‍कम रु.15 लाख होती. त्‍यासाठी विमा हफ्ता रु.3,911/- होता. तसेच विमा पॉलीसी क्र.1202001119P114751833 अन्‍वये यंत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते. ज्‍याची विमा संरक्षित रक्‍कम रु.19,89,000/- व त्‍याचा विमा हफ्ता रु.5,187/- होता. दोन्‍ही  पॉलीसींचा कालावधी दिनांक 31 जानेवारी, 2020 ते 30 जानेवारी, 2021 असा होता.  या दोन्‍ही  पॉलीसी सामनेवाले बॅंकेने तक्रारदारासाठी काढलेल्‍या होत्‍या हे स्पष्ट होते. यासाठीच्‍या विमा हफ्त्‍याची रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यातून दरवर्षी कपात करुन घेतली जात होती. सदर दोन्‍ही  पॉलीसीमध्‍ये  सामनेवाले बॅंकेने तक्रारदारच्या कारखान्याचा वर नमूद जूना पत्‍ता नमूद केल्याचे दिसून येते. सामनेवाले बॅंकेने वर नमूद दोन्ही पॉलीसीत नवीन पत्‍ता नमूद न करता 2017 पासून जून्‍या  पत्‍त्‍यावर विमा संरक्षण घेतले होते व विमा पॉलीसीच्‍या मूळ प्रती सामनेवाले बॅंकेकडून तक्रारदार यांना कधीही पुरविल्या गेल्‍या नव्हत्या.

12)         तक्रारदाराने 1 सप्टेंबर 2016 मध्‍ये त्‍यांचा कारखाना वर नमूद जून्‍या पत्‍त्‍यावरुन प्‍लॉट नं.डी-178/2, टीटीसी इंडस्‍ट्रीयल एरिया, एम.आय.डी.सी., नेरुळ, नवी मुंबई या नवीन पत्त्यावर स्‍थलांतरीत केला होता. तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेकडे भाडे करार व उदयोग आधार ई. कागदपत्रे जमा करुन त्‍यांच्‍या बॅंक खात्‍यावरील जूना पत्‍ता बदलून नवीन पत्‍ता अदययावत करुन घेतला होता. याच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी खाते क्रमांक 6337637148 चा खातेउतारा पृष्‍ठ क्र. 30 ते 35 वर दाखल केला आहे ज्यात कारखान्याचा नवीन पत्ता नमूद आहे. तसेच नवीन पत्‍ता अदययावत करण्‍यापूर्वी सामनेवाले बॅंकेने नवीन पत्‍त्‍यावर जावून तक्रारदाराच्या कारखान्‍यातील उपलब्‍ध मालाची अनेकवेळा तपासणी सुध्‍दा केली होती तसेच त्यासाठी दि. 21 मार्च, 2020 रोजी निरीक्षण शुल्‍क म्‍हणून रक्कम रु.1041/- सुद्धा आकारले होते. याच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी नि.क्र.B वर दाखल केले आहे. परंतु सदर अहवालाची प्रत तक्रारदारास देण्‍यात आलेली नव्‍हती.

13)         दिनांक 30 ऑगस्‍ट, 2020 रोजी तक्रारदार यांच्‍या नवीन पत्‍त्‍यावरील कारखान्‍यामध्‍ये  मोठी आग लागली होती. त्‍या आगीच्‍या घटनेत त्‍यांच्‍या कारखान्‍यात ठेवलेल्‍या मालाचे व यंत्राचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. सदर आगीच्‍या घटनेबाबत तक्रारदाराने सामनेवाले बॅं‍केस व तुर्भे पोलीस स्‍टेशन येथे कळविले होते. त्‍याच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदाराने अनुक्रमे दिनांक 31 ऑगस्‍ट, 2020 रोजीच्‍या पत्राची प्रत नि.क्र.D वर दाखल केली आहे व नि.क्र.E वर तुर्भे पोलीस स्‍टेशन, ठाणे, नवी मुंबई यांचा पंचनामा दाखल आहे. पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर आगीची सुरुवात स्टोअर रूम मधून झाली होती व तेथून ती वेगवेगळ्या विभागात पसरून इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू व यंत्रांचे नुकसान झाले होते.

14)         सदर आगीच्‍या घटनेची माहिती सामनेवाले बॅंकेने युनाईटेड इंडिया इन्‍शुअरन्‍स कंपनी लिमीटेड येथे दिली होती. विमा कंपनीने मे. भाकूनी इन्‍श्‍युअरन्‍स सर्व्‍हेअर अॅन्‍ड लॉस असेसर प्रायव्‍हेट लिमीटेड या कंपनीची आगीमध्‍ये झालेल्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन करण्‍यासाठी नेमणूक केली होती. दिनांक 3 सप्‍टेंबर, 2021 रोजी  सदर सर्व्‍हेअर कंपनीने आगीची घटना घडलेल्‍या ठिकाणाची प्राथमिक पाहणी केली होती व त्‍यांचा प्राथमिक अहवाल विमा कंपनीकडे दिला होता. तक्रारदाराने सर्व्‍हेअरचा प्राथमिक अहवाल नि.क्र.G वर दाखल केला आहे. सदर अहवालाचे अवलोकन केले. त्यामध्ये पुढील गोष्टी नमूद आहेत. सदर आगीच्या घटनेमध्ये इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंचे अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच प्राथमिक पाहणी दरम्यान सर्व्‍हेअर यांच्या निदर्शनास आले की, ज्‍या कारखान्‍यासाठी विमा संरक्षण घेतले होते त्या कारखान्याचा पत्ता व आगीची घटना घडली तो पत्‍ता ही दोन्‍ही वेगळी ठिकाणे आहेत. ज्‍या  कारखान्‍यास आग लागली होती त्‍या कारखान्‍यासाठी सामनेवाले बॅंकेने विमा संरक्षण घेतले नव्‍हते. त्‍यासंदर्भातील स्‍पष्‍टीकरणाची सर्व्‍हेअरने विमा कंपनीकडे व तक्रारदाराकडे ईमेलव्‍दारे मागणी केली होती. सदर ईमेलची प्रत तक्रारदाराने पृष्‍ठ क्र.75 व 76 वर दाखल केली आहे. त्याअनुषंगाने विमा कंपनीने उत्तरादाखल सर्व्‍हेअर यांना ईमेलव्‍दारे प्रपोजल फॉर्म पाठविला होता व कळविले होते की, विमा पॉलीसीवर नमूद असलेल्‍या जुन्या पत्‍त्‍यावरील कारखान्यासाठी विमा संरक्षण घेतले गेले होते. कारखान्‍याच्‍या नवीन पत्‍त्‍याबाबत सामनेवाले बॅंकेने विमा कंपनीस कधीही कळविले नव्‍हते व त्‍याबाबतची नोंद कधीही घेतलेली नव्‍हती. सदर बाब  पृष्ठ क्र.72 वरील ईमेलमध्ये नमूद आहे. विमा  कंपनीच्‍या या उत्‍तराच्‍या अनुषंगाने सर्व्‍हेअरने दिनांक 15 सप्‍टेंबर, 2020 रोजी आगीची घटना घडलेल्या ठिकाणासाठी विमा संरक्षण घेतलेले नव्हते त्यामुळे तक्रारदार विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. सबब, विमा दाव्‍याची फाईल बंद करत आहोत अशा आशयाचा ईमेल तक्रारदार, सामनेवाले व विमा कंपनी यांना पाठविला होता. सदर ईमेलची प्रत तक्रारदाराने पृष्ठ क्र.72 वर व ‘No Claim’ अहवाल नि. क्र. K वर दाखल केला आहे.

15)         ‘No Claim’ चा ईमेल प्राप्त होताच तक्रारदाराने सर्व्‍हेअर व सामनेवाले बॅंक यांना ईमेलव्‍दारे स्पष्ट केले की, चार वर्षापूर्वी त्यांनी सामनेवाले यांना पत्ता बदलल्याची बाब कळविली होती. सदर ईमेल पृष्ठ क्र.71 वर दाखल आहे.    

16)         तसेच सामनेवाले बॅंकेने देखील No Claim अहवाल प्राप्त होताच सर्व्‍हेअर कंपनीस नवीन पत्याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी पाठविलेल्‍या दिनांक 17 सप्‍टेंबर, 2020 रोजीच्‍या ईमेल ची प्रत पृष्ठ क्र.70 वर दाखल केली आहे. सदर ईमेलचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये पुढील गोष्‍टी नमूद आहेत.      

Our customer M/s. Vivitar Backups has reported fire incidence at their premises which we have intimated to you via Email dated 01.09.2020. The customer had submitted rent agreement regarding change of address in 2016 which we had updated in our Bank whereas inadvertently, the same could not be intimated to the Insurance Company and the policy was renewed on the existing old address. We therefore recommend to consider the settlement of claim with respect to the Nerul address.               

17)         सर्व्‍हेअरच्‍या No Claim रिपोर्टच्‍या अनुषंगाने विमा कंपनीने तक्रारदार व सामनेवाले बॅंक यांना दिनांक 21 सप्‍टेंबर, 2020 रोजी विमा संरक्षण घेतलेल्‍या कारखान्‍याच्‍या पत्‍त्‍यावर आगीची घटना घडलेली नसून नवीन पत्‍त्‍यावरील कारखान्‍यामध्‍ये आगीची घटना घडली होती व त्‍याबाबतचे विमा संरक्षण आमच्‍या विमा कंपनीकडे घेतलेले नाही. सबब, तक्रारदार कोणत्‍याही विमा दाव्‍याच्‍या  रकमेस पात्र ठरत नाही अशा आशयाचा ईमेल पाठवून विमा दावा नाकारला होता. त्‍या  ईमेलची प्रत तक्रारदाराने नि.क्र.L, पृ्ष्‍ठ क्र.68, 69 वर दाखल केली आहे. सदर ईमेलचे अवलोकन केले असता विमा कंपनीने सामनेवाले बँक 2016 पासून घेत असलेल्या पॉलिसीचे तपशील दिले आहेत ज्यात 2016 ते 2021 पर्यन्तच्या पॉलिसी कारखान्याच्या जून्या पत्यावर घेतल्याचे दिसून येते. तसेच कारखान्याचा नवीन पत्ता सामनेवाले यांनी त्यांना कधीच कळविला नसल्याचे खालील ईमेल मधील मजकूरावरून दिसून येते.

Change of address of the Insured was not informed by the Bank to the Insurer till date.

Since 2016 the Insured covered their property situated at Shop No.7, Aradhana CHSL, Plot No.03, Sector-06, Sanpada, Navi Mumbai State Maharashtra Pin-400 075

As per the proposal form attached the Insured property was stored &/or lying above address. All the above policies are sent to the bank.

तसेच कलम क्र.16 मधील नमूद बॅंकेने सर्व्‍हेअरला पाठविलेल्‍या ईमेलच्‍या मजकूराचा उल्‍लेख देखील  सदर मेल मध्‍ये केला आहे. वरील सर्व ईमेल (mail trail) मधील मजकूरावरुन हे स्पष्ट होते की,  सामनेवाले यांना 2016 मध्येच तक्रारदाराच्‍या बदललेल्या पत्त्याबाबत माहिती होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्याकडे पत्ता अदययावत केला होता. परंतु युनाईटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीला सदर बदलाबाबत  माहिती न देऊन अत्‍यंत त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली होती. तसेच विमा पॉलिसीच्‍या प्रती  तक्रारदारास मिळाल्‍या असत्‍या तर नवीन पत्‍ता अदययावत केला नसल्‍याची बाब तक्रारदाराच्‍या  लक्षात आली असती यामध्‍येही सेवा पुरविण्‍यात निष्‍काळजीपण केल्‍याचे आमच्‍या निदर्शनास आले.

18)         प्राथमिक पाहणीच्‍या अनुषंगाने सर्व्‍हेअरने त्‍यांचा प्राथमिक अहवाल विमा कंपनीकडे जमा केला होता. त्‍याची प्रत तक्रारदाराने माहितीच्‍या अधिकारात अर्ज करुन मिळविली होती. सदर अहवाल तक्रारदाराने नि.क्र.G वर दाखल केला आहे. सदर अहवालामध्‍ये नमूद आहे की, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू व यंत्र सामग्रीचे अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. प्राथमिक अहवालाला जोडलेल्‍या  यादीनुसार रक्‍कम रु.25,32,488/- इतक्‍या रकमेचा माल कारखान्‍यात होता व सदर मालाचे रु.22,82,120/- इतक्‍या रकमेचे नुकसान झाले होते. प्राथमिक अहवालाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, अहवालास जोडलेल्या यादीमध्ये नमूद नुकसानीची यादी तक्रारदार यांनी तयार करून दिलेली आहे. त्यापुष्टयर्थ तक्रारदाराने झालेल्या नुकसानीबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सर्व्‍हेअरने त्यांच्या प्राथमिक अहवालामध्ये अंदाजे रक्कम रु. 15,00,000/- चे नुकसान झाल्याचा  अहवाल दिला आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो.

19)         याप्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेला मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिव्‍हील अपील क्र.4645/2019 कॅनरा बॅंक –विरुध्‍द– मे.लेदरॉईड प्‍लास्टिक्‍स प्रायव्‍हेट लिमीटेड या प्रकरणी दिनांक 20 मे, 2020 रोजी पारीत केलेला आदेश आमच्‍यासमोरील प्रकरणात पूर्णपणे लागू होतो असे आमचे मत आहे. सदर प्रकरणात बॅंकेने त्‍यांचेकडे गहाण असलेल्‍या मालाचे विमा संरक्षण घेतले नव्‍हते. सबब, मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने बॅंकेला दोषी ठरवले होते. त्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविण्‍यात आलेला आहे

Complainant had suffered loss because of inaction and negligence on the part of the Bank. This constituted deficiency in service.

20)         वरील सर्व विवेचनावरुन आमचे मत आहे की, सामनेवाले बॅंकेने तक्रारदार यांना कर्ज मंजूर केले होते व त्‍याच्‍या कारखान्‍यातील माल स्‍वतःकडे गहाण ठेवून घेतला होता. त्‍यावेळी तक्रारदार यांचा कारखाना दूकान नं.7, प्‍लॉट नं.3, सेक्‍टर-6, आराधना को-ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी, सानपाडा, नवी मुंबई-400 705 या जून्‍या पत्‍त्‍यावर होता. दिनांक 1 सप्टेंबर 2016 रोजी तक्रारदार यांनी त्‍यांचा कारखाना प्‍लॉट नं.डी-178/2, टीटीसी इंडस्‍ट्रीयल एरिया, एम.आय.डी.सी., नेरुळ, नवी मुंबई या नवीन पत्‍त्‍यावर स्‍थलांतरीत केला होता. याबाबत सामनेवाले बॅंकेस आवश्‍यक त्‍या  कागदपत्रांसह कळविले होते व त्‍या अनुषंगाने सामनेवाले बॅंकेने नवीन पत्‍ता तक्रारदाराच्‍या बॅंक खात्‍यावर अदययावत केला होता. परंतु सामनेवाले बॅंकेने सदर नवीन पत्‍ता बदलाची अदययावत नोंद तक्रारदार यांच्‍यासाठी घेतलेल्‍या विमा पॉलीसी क्र.1202001119P114731628 व 1202001119P114751833 मध्‍ये घेण्‍याबाबत युनाईटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनीस न कळवून सेवेत त्रुटी केली होती. दिनांक 30 ऑगस्ट, 2020 रोजी तक्रारदाराच्या नवीन पत्‍त्‍यावरील कारखान्‍यास आग लागली व त्यात कारखान्यातील मालाचे व यंत्राचे बरेच नुकसान झाले होते. परंतु विमा कंपनीकडे तक्रारदाराच्या नवीन कारखान्‍यासाठी विमा संरक्षण नव्हतेच. त्यामुळे विमा कंपनीने त्यांच्याकडे नवीन पत्‍त्‍यावरील कारखान्‍यासाठी विमा संरक्षण नसल्याचे कळवून विमा दावा नाकारला होता. विमा कंपनीने नेमलेल्‍या सर्व्‍हेअरने तक्रारदाराचे रु.15,00,000/- इतक्‍या रकमेचे नुकसान झाल्‍याचा अहवाल दाखल केला. त्‍यावर आम्‍ही विश्‍वास ठेवतो व सामनेवाले बॅंक तक्रारदारास नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार आहे असे आमचे मत आहे. या सर्व घटनेमध्ये सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी व निष्‍काळजीपणा केलेला आहे व त्‍यामुळे तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सामनेवाले बॅंक यांना नोटीसची बजावणी होऊनही त्‍यांनी आयोगासमोर हजर होऊन प्रस्‍तूतच्‍या तक्रारीत त्‍यांचा प्रतिवाद दाखल केला नसल्‍याने तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा अबाधीत राहतो. सबब, आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.     

23) मुद्दा क्र.3 ः- तक्रारदार यांनी विमा दाव्‍याची नुकसान भरपाईपोटी रु.22,82,120/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे. तथापि, सर्व्‍हेअर यांनी त्‍यांच्‍या मुल्‍यांकन अहवालात नमूद केलेली रक्‍कम रु.15,00,000/- नुकसान भरपाई म्‍हणून व त्‍यावर तक्रारदाराचा विमा दावा नाकारल्‍याच्‍या  तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 15 सप्‍टेंबर, 2020 पासून द.सा.द.शे. 9% दराने व्‍याजासह प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत तक्रारदार सामनेवाले बॅंकेकडून मिळण्‍यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदार यांनी विमा दावा नाकारला गेल्‍याने मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे. सदर रक्‍कम अवास्‍तव असल्‍याचे आमचे मत आहे. सबब, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.50,000/- इतकी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार यांना त्‍यांच्‍या विमा दाव्‍याच्‍या  मागणीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागल्‍याने ते तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.15,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी दंडात्‍मक नुकसान भरपाईपोटी रु.5,00,000/- व व्‍यापाराच्‍या झालेल्‍या नुकसानीपोटी रु.10,00,000/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे. आमच्‍या मते नुकसान भरपाईची रक्‍कम व्‍याजासह देण्‍याबरोबर सदर मागणी मान्‍य करणे योग्‍य होणार नाही.

      वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

  1. तक्रार क्र.CC/64/2022 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. सामनेवाले इंडियन बॅंक शाखा चेंबूर यांनी तक्रारदारास विमा दाव्‍याच्‍या नुकसान भरपाईपोटी  रक्‍कम रु.15,00,000/- (अक्षरी रु.पंधरा लाख फक्‍त) त्‍यावर तक्रारदाराचा विमा दावा नाकारल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 15 सप्‍टेंबर, 2020 पासून द.सा.द.शे. 9% दराने व्‍याजासह प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत दयावेत.
  3. सामनेवाले इंडियन बॅंक शाखा चेंबूर यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- (अक्षरी रु.पन्‍नास हजार फक्‍त) व प्रकरणाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.15,000/- (अक्षरी रु.पंधरा हजार फक्‍त) दयावेत.
  4. वरील आदेशाची पूर्तता सामनेवाले बॅंक यांनी या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून साठ दिवसांत करावी.
  5. या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्‍य पाठविण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. PRADEEP G. KADU]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. KANCHAN S. GANGADHARE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.