न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचा मुलगा श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी हे कपडयाचा व्यवसाय अथणी येथे करीत होते व सदर व्यवसायापासून अंदाजे वार्षिक रु. 5,00,000/- उत्पन्न मिळवित होते. तक्रारदार यांचा मुलगा श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांनी वि.प. यांचेकडे रक्कम रु.11,00,000/- ची विमा पॉलिसी क्र. 70939144 दि. 20/3/2019 रोजी घेतली होती. दि. 22/6/19 रोजी श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांचे छातीत अचानक दुखु लागले. त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच ते मयत झालेचे डॉक्टरांनी निदान केले. श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांनी विमा पॉलिसीमध्ये तक्रारदार यांचे नांव नॉमिनी म्हणून दाखविले आहे. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विमा क्लेम दाखल केला. तक्रारदाराचे मुलाने त्याचे आयकर पत्रकामध्ये सन 2017-18 चे वार्षिक उत्पन्न रु. 2,99,210/- व सन 2018-19 मध्ये रु. 3,25,000/- इतके नमूद होते. तथापि वि.प. यांनी दि. 31/10/2019 रोजीचे पत्राने पूर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर कारण देवून तक्रारदाराचा विमादावा नाकारला आहे. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 20/12/2019 रोजी नोटीस पाठविली. तसेच वि.प. यांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे तक्रारदारांचा क्लेम नाकारला, त्या कागदपत्रांची मागणी केली. तथापि वि.प. यांनी अशी कोणतीही कागदपत्रे तक्रारदारांना दिलेली नाहीत. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 11,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/-, नोटीस खर्च रु. 15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 9 कडे अनुक्रमे वि.प. चे पॉलिसी बाबतचे पत्र, क्लेम नामंजूरीचे पत्र, श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांचा मृत्यू दाखला, डॉ अन्सारी यांचा दाखला, श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांचे पॅनकार्ड, आयकरपत्रक, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीसच्या पावत्या व वि.प. यांनी नोटीसीस दिलेले उत्तर वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत वि.प. कंपनीने महादेव हिरामणी यांना पाठविलेले पत्र व पॉलिसी कागदपत्रे, महादेव हिरामणी यांचा मृत्यूचा दाखला, इनव्हेस्टीगेटरचा रिपोर्ट व अॅफिडेव्हीट, अन्य विमा कंपन्यांकडून आलेले मेल, क्लेम नामंजूरीचे पत्र, तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्तर वगैरे कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. या आयोगास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही.
iii) विमाधारकाने विमा प्रस्तावावेळी खोटे व चुकीचे भाष्य करुन पॉलिसी घेतलेली आहे. वि.प. यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल करतेवेळी विमाधारकाच्या नांवे रक्कम रु. 16,06,780/- इतक्या रकमेच्या रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी व पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनी यांच्या जीवन विमा पॉलिसी होत्या.
iv) विमाधारकाचे आयकर अहवालानानुसार विमाधारकाचे उत्पन्न क्रमशः रु. 2,72,480/-, रु. 2,99,210/- व रु. 3,25,000/- इतके होते. परंतु वि.प. यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल करतेवेळी तक्रारदाराने त्यांचे उत्पन्न रु.5 लाख असल्याचा खुलासा केला होता.
v) वि.प. कंपनीने केलेल्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की, विमाधारक हा रोजंदारीवर मजुरीचे काम करीत होता व त्याचे कोणतेही निश्चित काम नव्हते. तक्रारदार यांनी तपास अधिकारी यांना माहिती दिली की, विमाधारक हा कपडयाचे ठोक विक्रीचा व्यापार करीत होता व गावोगावी जावुन तो कपडे विक्री करत होता व सोबतच बांधकामाचा व्यवसाय करीत होता.
vi) अन्य विमा पॉलिसींची माहिती वि.प. यांना न देवून विमाधारकाने विमा कायदा 1015 चे लम 45(अ) चा भंग केला आहे. त्यामुळे विमाधारकाने परस्परविश्वास या तत्वाचा भंग केला आहे. सबब, तक्रारदार विमा क्लेम मिळण्यास पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचा मुलगा श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी हे कपडयाचा व्यवसाय अथणी येथे करीत होते व सदर व्यवसायापासून अंदाजे वार्षिक रु. 5,00,000/- उत्पन्न मिळवित होते. तक्रारदार यांचा मुलगा श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांनी वि.प. यांचेकडे रक्कम रु.11,00,000/- ची विमा पॉलिसी क्र. 70939144 दि. 20/3/2019 रोजी घेतली होती. सदर पॉलिसीची प्रत उभय पक्षांनी याकामी दाखल केलेली आहे. तक्रारदार या महादेव मुरुगप्पा हिरेमणी यांचा कायदेशीर वारस आहेत तसेच वादातील विमा पॉलिसीमध्ये त्या नॉमिनी आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचा मुलगा श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी याने वि.प. यांचेकडे पॉलिसी घेताना त्याने अन्य विमा कंपन्यांकडून घेतलेल्या पॉलिसींची माहिती वि.प. यांना दिली नाही. अशा प्रकारे श्री महादेव मुरुगप्पा हिरेमणी याने चुकीची व खोटी माहिती वि.प. यांना दिलेमुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र नाहीत असे कथन केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ वि.प. यांनी इनव्हेस्टीगेटरचा रिपोर्ट व अॅफिडेव्हीट तसेच अन्य विमा कंपन्यांकडून आलेले मेल याकामी दाखल केले आहेत. सदर इन्स्व्हेस्टीगेटरचे रिपोर्टचे अवलोकन करता त्यामध्ये तक्रारदाराचा मु्लगा महादेव मुरुगप्पा हिरेमणी याचा कापड व्यवसाय होता हे मान्य केले आहे. तसेच विमाधारकाने आयकर विवरणपत्रे भरलेली आहेत. वि.प. ने याकामी रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी व पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनी या कंपन्याच्या विमा पॉलिसी महादेव मुरुगप्पा हिरेमणी याने घेतलेचे कथन केले आहे. परंतु सदर पॉलिसीच्या प्रती वि.प. यांनी याकामी दाखल केलेल्या नाहीत. वि.प. यांनी सदर कंपन्यांचे मेल दाखल केले आहेत. परंतु सदरचे मेल शाबीत करण्यासाठी वि.प. यांनी कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही. वि.प. यांनी मेलच्या प्रमाणीत प्रती दाखल केल्या असल्या तरी शपथपत्राशिवाय सदरच्या विमा पॉलिसी ग्राहय धरता येणार नाहीत. यावरुन अन्य कंपन्याच्या विमा पॉलिसी महादेव मुरुगप्पा हिरेमणी याने घेतलल्या होत्या ही बाब शाबीत होत नाही. वि.प. यांनी अन्य कंपन्यांच्या विमा पॉलिसी शाबीत करणेासाठी कोणताही ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय विमाधारकाने अन्य कंपन्यांच्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या ही बाब गृहीत धरता येणार नाही. तसेच विमा पॉलिसी घेताना विमा प्रपोजल फॉर्म हा एजंट मार्फत भरला जातो. त्यांनी जी माहिती विचारली जाते, तेवढी माहिती विमाधारक सांगत असतात. विमा कंपनीच्या एजंट लोकांनी इतर विमा पॉलिसीबाबत माहिती विचारली होती व ती तक्रारदाराने सांगितली नाही व लपवून ठेवली हे गृहित धरता येणार नाही. वि.प. ने तक्रारदाराचे मुलाला विमा पॉलिसी दिली आहे तसेच पॉलिसीचे विमा हप्ते भरुन घेतले आहेत आणि विमाधारकाचा हार्ट फेलने मृत्यू झालेनंतर आता विमा रक्कम द्यावी लागेल म्हणून वि.प. ने घेतलेला सदरचा बचाव हा योग्य वाटत नाही. वि.प.ने पॉलिसी देणेपूर्वीच सर्व माहिती घेणे आवश्यक होते. तथापि तसे झालेले नाही. त्यामुळे वि.प.ने चुकीचे कारण देवून तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे. याकामी विप ने त्यांचे तक्रारदाराचे नोटीसला दि. 9/01/2020 रोजी दिले उत्तरात तक्रारदार या मयताची आई आहे हे मान्य केले आहे व तक्रारदार या पॉलिसीच्या बेनिफिशिअरी असलेचे मान्य केले आहे. तसेच तक्रारदारांचे नांव विमा पॉलिसीवर नॉमिनी म्हणून आहे. सबब, तक्रारदार या विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब, वि.प. यांनी आपली कथने शाबीत केलेली नाहीत असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. महादेव मुरुगप्पा हिरेमणी या विमाधारकाचे निधन हे वि.प. यांचे विमा पॉलिसीचे कालावधीत झाले असल्याने तक्रारदार मयताची आई ही नॉमिनी असलेने विमाक्लेमपोटी पॉलिसीची रक्कम रु.11,00,000/- वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 11,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.