(पारीत व्दारा श्री. भास्कर बी. योगी, मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक – 21 मे, 2019)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
02. तक्रारकर्ता हा पदवीधर असुन त्याने त्याचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्याकरीता तीन दुधारु गाई विरुध्दपक्ष क्रं.1 यांचेकडून कर्जाऊ रुपात खरेदी केल्या होत्या तसेच सदर गाईचे हायपोथीकेड विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेकडून करुन घेतले होते. तक्रारकर्त्याने तीन्ही गाईचा विमा विरुध्द पक्ष क्रमांक 2 ते 4 यांचेकडून काढला होता. त्याचा पॉलीसी क्रमांक 3016/56221278/00/000 असुन, प्रिमीयम रुपये 8,640/- रुपये 60,000/- मध्ये प्रत्येक गाई विमाकृत केलेला होता. तीन्ही गाईची एकूण किंमत रुपये 1,80,000/- ठरविण्यात आली होती व सदर पॉलीसी ही दिनांक 16/05/2016 ते 15/05/2019 पर्यंत वैद्य होती आणि विमा कंपनीने तीन्ही गायीच्या कानाचा बिल्ला क्रमांक USGI/000000678713, USGI/000000678781 व USGI/000000678794 दिला होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याची USGI/000000678781 कानाचा बिल्ला असेलेली गाय दिनांक 28/06/2016 रोजी आजारी पडली असल्याकारणाने त्याने पशुवैद्यकीय डॉक्टर श्री. डी.डी. किंडेरले यांचेकडून तपासणी दिनांक 28/06/2016 ते 02/07/2016 पर्यंत केली व दिनांक 02/07/2016 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मरण पावली. तक्रारकर्त्याने वर नमुद कानाचा बिल्ला असलेली गाय मरण पावल्याबाबतची माहिती विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना दिनांक 04/07/2016 रोजी दिली व विमा दावा रक्कम मिळण्याचा अर्जासह सदर गायीचा पोस्टमार्टम अहवाल, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र तसेच व्हॅल्युएशन प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचेकडून घेतले. तक्रारकर्त्याने संपूर्ण कागदपत्रे विमा दावा मिळण्याकरिता विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. सोबतच मरण पावलेल्या गायीच्या कानाचा बिल्ला देखील दिला होता. तरी देखील विरूध्द पक्ष विमा कंपनीने दिनांक 04/10/2016 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्त्याचा विमा दावा उशीराने दाखल केला, म्हणून नाकारला. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम न दिल्यामुळे त्याने आपले वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसला विरुध्द पक्षाने उत्तरही दिले, परंतु विमा दाव्याची रक्कम न दिल्याने तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल करुन पुढीलप्रमाणे मागणी केल्या आहेत. गाईच्या विम्याची रक्कम रुपये 60,000/- वर द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याजासह रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- विरुध्द पक्षाकडून मिळण्याची विनंती केली आहे.
03. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विमा दावा नाकारल्याचे पत्र तसेच विरूध्द पक्षाला पाठविलेल्या दस्तावेजांची यादी इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
04. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
05. सदरहू प्रकरणामध्ये विरूध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांना मंचामार्फत नोटीस बजावल्यानंतर त्यांनी मंचासमक्ष हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांचा लेखी जबाब हाच त्यांचा शपथपत्रावरील पुरावा समजण्यांत यावा अशा आशयाची पुरसिस व लेखी युक्तिवाद दाखल केला. लेखी युक्तिवादासोबत पॉलीसी दस्तावेज सादर केले. तसेच पॉलीसीच्या अटी व शर्तीची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्म, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे प्रमाणपत्र तसेच पंचनामा दाखल केलेला आहे.
06. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
07. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- विरूध्द पक्ष विमा कंपनीला पॉलीसीबद्दल वाद नाही. तसेच त्यांना हे देखील मान्य आहे की, तक्रारकर्त्याने त्यांना विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे गायीच्या कानाचा बिल्ला व इतर संबंधीत दस्तऐवज दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये ग्राहक वाद हा आहे की, तक्रारकर्त्याने मृत गायीच्या विम्याचा प्रस्ताव 80 दिवस उशीराने दिलेला आहे, तसेच अटी व शर्तीमधील 5 (ए) नुसार आवश्यक कागदपत्रे सादर केले नाही, म्हणून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना दिनांक 04/07/2016 रोजी मृत गाईच्या विम्याचा प्रस्ताव सादर केला आहे ही अभिलेखावर दाखल पृष्ठ क्रं.14 वरुन सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने अभिलेखावर पृद्वठ क्रं. 84 वर दाखल केलेल्या वर्णन यादीतील दस्ताएवजांचे मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी विरुध्द पक्ष क्रं. 4 यांना दिनांक 23/07/2016 रोजी तक्रारकर्त्याच्या मृत गाईचा विमा दावा प्रस्ताव सादर केला असल्याची बाब सिध्द होत असल्यामुळे व तक्रारकर्त्याने विहीत मुदतीत विमा दावा सादर केला असल्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांनी घेतलेला आक्षेप अमान्य करण्यात येतो.
तक्रारकर्त्याने सदरहु मृत गाईचा विमा पॉलीसी दिनांक 16/05/2016 ते 15/05/2019 पर्यंत वैद्य होती. विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांनी अभिलेखावरील वर्णन यादीतील पृष्ठ क्रं. 71 ते 77 वर विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीची प्रत दाखल केली असुन, त्यात त्यांनी मौखिक युक्तिवादाच्या वेळी मंचाचे लक्ष “नोट” या शब्दाकडे वेधले त्यात दुधारु गाय जर मरण पावली तर विम्याच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम विमा कंपनी देण्यास तयार असु शकते, परंतु सदर विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचे मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर पॉलीसी ही सन 2008-2009 या वर्षासाठी वैद्य असल्याचे दिसून येत असल्याने व तक्रारकर्त्याची गाय ही दिनांक 02/07/2016 रोजी मरण पावली असल्यामुळे सदरहु विमा पॉलीसी मंचाला ग्राह्य धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
08. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे मृत गाईचा विमा दावा विहीत मुदतीत सादर केल्यानंतरही विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांनी 80 दिवसाचा उशीर झालेला असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारने ही दोषपूर्ण सेवा ठरते असे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारकर्ता मृत गाईच्या विम्याची रक्कम रुपये 60,000/- वर द.सा.द.शे. 09 टक्के दाराने व्याजासह विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे तसेच तक्रारकर्त्याला मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांचेकडून मिळण्यास तक्रारकता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले असल्यामुळे त्यांचेविरुध्द तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या मृत गायीच्या विम्याची रक्कम रू.60,000/- विमा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 04/07/2016 पासून 30 दिवसांचे आंत द. सा. द. शे.9% व्याजासह द्यावे.
3. विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. जर 30 दिवसाचे आंत सदर रक्कम तक्रारकर्तीला अदा करण्यांस कसुर केल्यास उपरोक्त रकमेवर द.सा.द.शे.12% व्याज देय राहील.
5. विरुध्दपक्ष -(1) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.