(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 08/03/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 17.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यास हृदयाचा त्रास होता, त्यामुळे त्याने नागपूर येथील एकविरा हार्ट इंस्टीटयुट येथे औषधोपचार सुरु केला व तेथील डॉ. प्रशांत जगताप यांनी पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि.13.09.2003 रोजी गैरअर्जदारांनी पेसमेकर बसविले त्याच्या शस्त्रक्रियेचा एकूण खर्च रु.2,50,000/- एवढा आला. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार कंपनीने त्यांचे पेसमेकर हे अत्यंत उत्कृष्ठ असल्याचे आश्वासन दिले, जर सदर पेसमेकरमधे काही त्रास झाला तर ते नवीन पेसमेकर बदलवुन देईल आणि त्याकरीता बसविण्याचा खर्च ते देतील. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने मॉडेल क्र. एस.डी. 203 सिग्मा, अनुक्रमांक पी.जे.डी.203/22 एच लिडचा प्रकार – बिपोली, डिव्हाईस-कार्डियाक पेसमेकर, प्रकार-डी बसविले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, सदर पेसमेकर बसविल्यानंतर तक्रारकर्त्यास सतत श्वसनाचा त्रास होत होता. त्याने याबाबतची तक्रार डॉक्टरांकडे केली असता त्यांनी सदर पेसमेकर चांगल्या कंपनीचे असल्यामुळे व्यवस्थित कार्य करीत आहे, घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, तो सुरत येथे दि.30.09.2005 रोजी व्यवसायाचे कामाकरीता गेला असता तेथे त्याची तब्येत अचानक बिघडली व तो बेशुध्द पडला, त्यामुळ त्याला ‘महाविर हॉस्पीटल’ सुरत येथे औषधोपचाराकरता भरती करण्यांत आले होते. तेव्हा पेसमेकरची तपासनी करण्याचा सल्ला देण्यांत आला, त्या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधीने ‘महावीर हॉस्पीटल’ येथे येऊन हृदयामधे बसविलेल्या पेसमेकरची तपासनी केली असता त्यामध्ये काही प्रमाणात बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारकर्त्याला ‘नानोटी हॉस्पीटल’ मुंबई येथे तपासनीकरता हलविण्यांत आले व त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यांत आली, तेव्हा हृदयातील पेसमेकरच्या दोन्ही लिडस् बदलविण्यांत आल्या. सदर शस्त्रक्रियेपासुन पूर्णपणे तंदूरुस्त होण्याकरीता तक्रारकर्त्याला दि.07.10.2005 पर्यंत ‘नानोटी हॉस्पीटल’, मुंबई भरती राहावे लागले व त्याकरता तक्रारकर्त्याला रु.1,25,000/- एवढा खर्च आल्याचे नमुद केले आहे. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्यास नेहमीच श्वसनाचा त्रास होत होता म्हणून तक्रारकर्त्यास डॉ. अमित वोरा यांचेकडे 15-15 दिवसांनी तपासनीकरता जावे लागत होते व प्रत्येक भेटीला रु.800/- ते रु.1,200/- एवढी रक्कम द्यावी लागत होती. तसेच तक्रारकर्ता श्वसनाच्या त्रासामुळे तो व्यवसायात लक्ष केंद्रीत करु शकला नाही, त्यामुळे त्याची व्यवसायात पत कमी झाल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याची दि.02.09.2009 रोजी अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्याला डॉ. अमीत वोरा यांचेकडे तपासनीकरीता नेले, त्यावेळी डॉ. वोरा यांनी तक्रारकर्त्यास श्वसनाचा त्रास हा दोषयुक्त पेसमेकरमुळेच होत आहे व ते बदलविण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर दि.26.10.2009 रोजी ‘श्रीमती सुशीलाबेन आर. मेहता ऍन्ड सर कीजाभाई प्रेमचंद कार्डियाक इंस्टिट्युट’, मुंबई येथे पेसमेकर बदलविण्याकरीता तक्रारकर्ता भरती झाला व त्यावेळी तक्रारकर्त्यास दोषयुक्त पेसमेकर बदलवुन नवीन पेसमेकर बदलविण्यांत आले, याकरीता त्याला रु.76,598/- एवढा खर्च आला. तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी दोषयुक्त पेसमेकर पुरविल्यामुळे त्याला अत्यंत शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार कंपनीचे रिजनल मॅनेजर, श्री. चिराग शहा यांनी तक्रारकर्त्याची भेट घेऊन सदर बाब डॉ. जगताप यांनी सांगितल्याचे कबुल केले. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, सदर पेसमेकर दोषयुक्त असुन ते पुरविल्यामुळे त्यास त्रास झाला, तसेच भरपाई करता दोषयुक्त पेसमेकर संबंधी दि.15.11.2009 रोजी गैरअर्जदारांना ई-मेलव्दारे कळविले व रु.10,00,000/- ची नुकसानीची भरपाई म्हणून मागणी केली. त्यानंतर गैरअर्जदारांनी 2500 यु.एस. डॉलर देण्यांचे कबुल केले होते, असेही तक्रारकर्त्याने नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे सदर तक्रार मंचात दाखल केलेली असुन ती व्दारा उपचाराकरता व शस्त्रक्रियेकरता झालेला खर्च रु.5,65,000/-, आर्थीक नुकसानीचे रु.1,35,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.3,00,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.2 व 3 हे मंचासमक्ष उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारित करण्यांत आला. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केलेले आहे ते खालिल प्रमाण... गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 चे कर्मचारी आहेत, त्यांनी मान्य केले आहे की, ते जीवनरक्षक उपकरणे बनवितात तसेच कार्डियाक रिसाईनक्रोनायझेशन थेरपी, इमप्लॅन्टेबल कार्डिओव्हर्टर आणि डेफीब्रिलेटर करीताच्या पेसमेकर सारखी उत्पादने आहेत. इमप्लॅन्टेबल कार्डीओव्हॅस्कुलर डेफीब्रिलेटर (आयसीडी) हे गैरअर्जदार क्र.1 ने बाजारात आणलेले उपकरण असुन त्यामुळे हृदयाचे संतुलनाशी संबंधीत विकारांवर उपचार करता येतो. तसेच याची गुणवत्तेची प्रचंड किर्तीची असते व त्याला युनायटेड स्टेट्स फुड ऍन्ड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन तसेच युरोपिअन फुड ऍन्ड ड्रग्स ऍथोरिटीज यांचेकडून मान्यता असते व भारतात आयात करण्या अगोदर त्यास सीई मार्क म्हणून ओळखल्या जाते. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, पेसमेकर हे उपकरण असुन त्याला सेंसर, बॅटरी आणि शिसे (लहार तारा) असुन ते हृदयाचे कप्यांना जोडल्या जाते व ते ठोके उत्सर्जनाचे कार्य करतात याला पेसिंग म्हणतात. त्यांनी पुढे नमुद केले आहे की, पेसमेकर ही जीवनरक्षक उपचार पध्दती असुन ते बसविल्यानंतर रुगणाला वेळेच्या वेळी नियमीत तपासणीकरुन घेणे आवश्यक असते. तसेच शिसे हे पेसमेकर पेक्षा वेगळे घटक असुन ते आयुष्यभराची हमी देत नाही. 5. गैरअर्जदारांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात सदर तक्रार ही चुकीची दाखल करण्यांत आल्याचे म्हटले आहे तर डॉक्टर हे रुग्णाचे मुल्यमापण करुनच पेसमेकर बसवीत असतात. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व तक्रारकर्ता यांचेमध्ये कोणताही करार झालेला नाही, तसेच स्थानिक वितरकाकडून पेसमेकर खरेदी करुन तक्रारकर्त्यास पेसमेकर रोपणाची सेवा पुरविली आणि एकविरा हार्ट हॉस्पीटल, नागपूरला आणून दिले. तसेच तक्रारकर्त्यास काही तक्रार असल्यास ती गा-हाणे रुग्णालय व रुग्ण यांचेमधील आहे, त्यामुळे सदर तक्रार ही खारीज होण्यांस पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, वारंटी पॉलिसीनुसार तक्रारकर्ता पात्र आहे, परंतु त्या पेक्षा जास्तीची मागणी तो करु शकत नाही. रुग्णाच्या हृदयाला किती वेळा झटके/उत्तेजना देण्याकरीता बॅटरी वापरण्यांत आली यावर पेसमेकरचे आयुष्य अवलंबुन असते असे नमुद केलेले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, जर उपकरणामध्ये दोष आढळून आला तर कंपनी ते परत बदलविते. तसेच रुग्णालय/ डॉक्टरांमार्फत रुग्णाशी/तक्रारकर्त्याशी संपर्क करण्याकरता कंपनीने पावले उचलली याचा अर्थ पेसमेकर दोषपूर्ण होते असा होत नाही. गैरअर्जदार क्र.1 ने पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याची मुंबई येथे जेव्हा माहिती मिळाली तेव्हा विनामुल्य पेसमेकर बदलवुन देण्यांत आले. तसेच तक्रारकर्त्याने खर्चाबाबत विमा कंपनीकडे दावा केल्यामुळे गैरअर्जदारांकडे केला नाही व गैरअर्जदार क्र.1 यांनी विनंती केल्या प्रमाणे देयकाची प्रत पुरविली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 6. सदर तक्रार मंचासमक्ष मौखीक युक्तिवादाकरीता दि.25.02.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर, गैरअर्जदारांचे वकील हजर त्यांनी युक्तिवाद केला त्यानंतर दि.05.03.2011 रोजी तक्रारकर्त्याचे वकीलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला, तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 एकविरा हार्ट इंस्टीटयुट’ नागपूर यांचेकडे दि.13.09.2003 रोजी पेसमेकर बसविले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन तसेच गैरअर्जदारांचे कथनावरुन स्पष्ट होते. 8. तक्रारकर्त्याने आपल्या उत्तरात आक्षेप घेतला आहे की, त्याचा गैरअर्जदार क्र.1 यांचेमधे कोणताही करार नव्हता. परंतु ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करता तक्रारकर्त्याने पेसमेकर करता एकविरा हॉस्पीटलला रक्कम प्रदान केलेली आहे व त्या रकमेवर गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून पेसमेकर पुरविल्या गेले, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्त्याने दि.13.09.2003 रोजी पेसमेकर बसविल्यानंतर तो सुरत येथे व्यावसायीक कामाकरता दि.30.09.2005 रोजी गेला असता त्या ठिकाणी त्याची तब्येत खराब झाली व त्याला ‘महावीर हॉस्पीटल’ मधे भरती करण्यांत आले. त्या ठिकाणी तब्येतीमधील बिघाडाचे कारण हे पेसमेकरमध्ये बिघाड झाल्यामुळे झाला, या कथनाचे पृष्ठयर्थ तक्रारकर्त्याने मंचासमक्ष दस्तावेज क्र.2 जो ‘महावीर हेल्थ ऍन्ड मेडिकल रिलीफ सोसायटी’, सुरत चे डिस्चार्ज समरी कार्ड दाखल केलेले आहे. त्यामधे पेसमेकरच्या लिडमध्ये दोष असल्यामुळे ते बदलण्याबद्दल सुचित केले होते, हे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरात असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्ता नागपूर येथील ‘एकवीरा हार्ट इंस्टीटयुट’/ डॉ. प्रशांत जगताप यांच्या परवानगी शिवाय बाहेरगावी गेले हे तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा दर्शविते. परंतु सदर बाब कोणत्याही दस्तावेजांवरुन स्पष्ट होत नाही. डॉ. जगताप यांनी तक्रारकर्त्यास प्रवास करण्या विषयी निर्बंध घातले नव्हते, त्यामुळे गैरअर्जदारांचा सदर आक्षेप अमान्य करण्यांत येतो. तक्रारकर्त्याने ‘महावीर हेल्थ ऍन्ड मेडिकल रिलीफ सोसायटी’, सुरत येथून ‘नानोटी हॉस्पीटल’ मुंबई येथे तपासनीकरता हलविण्यांत आले, त्या ठिकाणी तक्रारकर्त्याची शस्त्रक्रिया करण्यांत आली, पेसमेकरच्या दोन्ही लिड्स बदलविण्यांत आल्या व सदर पेसमेकर हे हृदयाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे बसविण्यांत आल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे. सदर बाब गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरातील परिच्छेद क्र.6 मध्ये शिसे (लिड) बदलविण्यांत आल्याचे मान्य केलेले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यास रोपण करण्यांत आलेल्या पेसमेकरची लिड मुंबई येथे दि.07.10.2005 रोजी बदलविण्यांत आली. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्यास वारंवार श्वसनाचा त्रास होत होता व त्याकरीता तो डॉ. अमीत वोरा यांचेकडे तपासनीकरता जात असल्याचे नमुद केले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याची दि.02.09.2009 रोजी प्रकृति अस्वस्थ झाल्यामुळे डॉ. वोरा यांनी दि.26.10.2009 रोजी ‘श्रीमती सुशीलाबेन आर. मेहता ऍन्ड सर कीजाभाई प्रेमचंद कार्डियाक इंस्टिटयुट’, मुंबई येथे दि.26.10.2009 रोजी शस्त्रक्रिया करुन पेसमेकर बदलवुन त्या विशिष्ट प्रणालीन्वये पेसमेकर बसविले ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केली असुन सदर बाब गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरातील परिच्छेद क्र.7 मध्ये मान्य केलेली आहे. परंतु सदर पेसमेकर हे दोषयुक्त होते ही बाब अमान्य केलेली आहे. यावरुनच स्पष्ट निष्कर्ष निघतो की, दि.27.10.2009 रोजी तक्रारकर्त्याचे पेसमेकर बदलविण्यांत आले होते. गैरअर्जदाराने पुढे असेही नमुद केले आहे की, दि.27.10.2009 रोजी उपकरण गैरअर्जदारांनी बदलवुन दिलेले आहे, त्या पृष्ठयर्थ त्यांनी गुंतागुंतीपासुन तक्रारकर्त्यास वाचविण्याकरता सदर उपकरण बदलविण्याची खबरदारी घेतली असे नमुद केले आहे. मंचाचे असे मत आहे की, पेसमेकर दोषयुक्त नव्हते किंवा गैरअर्जदारांची कोणतीही जबाबदारी नव्हती तर त्यांनी पेसमेकर बदलवुन दिले यावरुनच ही बाब स्पष्ट होते की, सदर पेसमेकरमध्ये काही प्रमाणात दोष होता. त्यामुळेच गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर पेसमेकर बदलवुन दिलेले आहे. सदर पेसमेकर बदलविल्यानंतर तक्रारकर्त्यास विशेषत्वाने कोणताही त्रास उद्भवला नाही. 10. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमधे रु.4,65,000/- दि.13.09.2003 ते 27.10.2003 पर्यंत रुग्णालयाचा खर्च रु.1,00,000/- दि.13.09.2003 ते 27.10.2003 पर्यंत डॉक्टरचा सल्ला घेण्याकरता आलेला खर्च रु.1,35,000/- व गैरअर्जदार कंपनीने पुरविलेल्या दोषयुक्त पेसमेकरमुळे व्यवसायाचे झालेले नुकसान मिळण्याची मागणी केलेली आहे. परंतु सदर तिनही मागणींच्या पृष्ठयर्थ कोणतेही दस्तावेज दाखल केलेले नाही. या उलट गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता असे नमुद केले आहे. तर तकारकर्त्याने दाखल केलेल्या प्रतिउत्तरामध्ये त्याने विमा कंपनीकडे दावा दाखल केला नव्हता असे म्हटले नाही व त्याबाबत मौन पाळले. यावरुन तक्रारकर्त्याने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता असा निष्कर्ष निघतो. 11. तक्रारकर्त्याने रु.3,00,000/- दोषयुक्त पेसमेकरमुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची मागणी केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्यास गैरअर्जदारांनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये 2500 यु.एस. डॉलर देण्याचे आश्वासन दिले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र 8 वरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदारांचे वकीलांनी सुध्दा युक्तिवादाचे वेळी तक्रारकर्ता हा 2500 यु.एस. डॉलर मिळण्याकरता फक्त पात्र ठरु शकेल असे म्हटले आहे. याउलट गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, सदर पेसमेकरच्या दोषासंबंधी त्याने डॉ. जगताप यांना सुचित केले होते. परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, यावरुन असा निष्कर्ष निघतो की, सदर पेसमेकरमधे दोष होता. तसेच याबाबतची पूर्व कल्पना गैरअर्जदारांना असतांना त्यांनी ते पुरविले हे स्पष्ट होते. असे उपकरण जे जीवनाशी, जीवन रक्षक प्रणाली म्हणून उपयोगात येतात असे उपकरण दोषयुक्त असल्याची जाणीव असतांना ती परविणे ही सेवेतील त्रुटी आहे व त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रास झालेला आहे, त्याकरीता त्यांनी रु.3,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी जरी अवास्तव वाटत असली तरी तक्रारकर्ता हा न्यायोचितदृष्टया रु.2,00,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 12. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या खर्चाची रु.10,000/- ची मागणी केलेली आहे सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता न्यायोचितदृष्टया रु.3,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदार क्र.3 विषयी तक्रारकर्त्याचे कोणतेही कथन नसुन व त्यांचे विरुध्द मागणी नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.3 विरुध्दची तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.2,00,000/- आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावे. अन्यथा त्यावर द.सा.द.शे.9% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज देय राहील. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदार क्र.3 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते. 6. गैरअर्जदाराने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |