निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार विजय पि. रामगिरी गिरी यांनी स्वतःसाठी व कुटूंबीयासाठी मेडीकल पॉलिसी घेतली आहे जीचा पॉलिसी क्र. 987252323 असा असून सदरील पॉलिसीचा कालावधी दिनांक 12/03/2009 ते 12/03/2026 पर्यंत आहे. सदर पॉलिसीचा प्रतीवर्षी हप्ता रक्कम रु. 10,000/- आहे. अर्जदाराने सन 2014 पर्यंत हप्ते नियमीतपणे भरलेले आहेत. दिनांक 26/03/2014 रोजी अर्जदार हिंगोली येथे ट्रेनींगमध्ये असतांना अस्वस्थ वाटल्याने त्याच्या गावी डोंगरकडा येथे परत आला व डॉ. बिडखे यांच्या दवाखान्यात दाखवल्यानंतर त्यांनी संजीवनी हॉस्पीटल, नांदेड यांच्याकडे दाखल होण्यास सांगितले. त्यानुसार अर्जदार संजीवनी हॉस्पीटल, नांदेड येथे शरीक झाला. अर्जदाराने सदर हॉस्पीटलमध्ये दिनांक 26/3/2014 ते 29/03/2014 पर्यंत उपचार घेतले व डॉक्टरांनी त्यांची एंजिओग्राफी पण केली. अर्जदारास त्या दरम्यान उपचारासाठी रु. 25,198/- इतका खर्च आला. इलाजाचा खर्च मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे सर्व कागदपत्रे, फाईल, बिले, फॉर्म, अडमीट कार्ड ई. दाखल केले व रक्कम मिळण्यासाठी विनंती केली परंतू गैरअर्जदार यांनी कागदपत्रांची मागणी केली. मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली तरी सुध्दा गैरअर्जदार यांनी दिनांक 18/08/2014 रोजी रिमांडर पाठवून तीच कागदपत्रे मागीतली आणि परत 03/09/2014 रोजी देखील रिमांईडर पाठवून परत तिच कागदपत्रे मागीतली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे चकरा मारुन इलाजाचा खर्च मागीतला परंतू ‘तुम्ही कागदपत्रे सादर केलेली नसल्यामुळे तुम्हास रक्कम देता येणार नसल्याचे सांगितले. म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज पूर्णतः मंजूर करण्यात यावा. गैरअर्जदार यांना अर्जदारास त्याला झालेला इलाज खर्च रक्कम रु. 25,198/- दिनांक 29/03/2014 पासून 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्च रक्कम रु. 5,000/-ची मागणी अर्जदाराने केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराचा सदरचा तक्रार अर्ज खोटा असून तो खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 12/03/2009 रोजी LIC health plus plain policy घेतलेली आहे व त्याचा प्रिमियम पण भरलेला आहे. सदर पॉलिसीचा क्र. 987253323 असा आहे. अर्जदाराने विमा दावा दाखल केल्यानंतर अर्जदारास दिनांक 22/04/2014, 22/05/2014, 15/07/2014, 30/07/2014 व दिनांक 18/08/2014 आणि 03/09/2014 व नंतर दिनांक 14/01/2015 रोजी स्मरणपत्रे देवून देखील संबधीत दवाखान्याचे साक्षांकित प्रती दाखल केलेली नाहीत. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विमा दाव्या बद्दल काहीही केलेले नाही. आज ही क्लेम डिस्चार्ज व्हाऊचर भरुन दिल्यास पॉलिसीच्या नियमानुसार देय रक्कम देण्यात येईल. गैरअर्जदाराने अर्जदारास कोठलीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. अर्जदारानेच नमूद केलेले कागदपत्र व अटी यांची पूर्तता केलेली नाही म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज दंडासहीत व खर्चासहीत फेटाळून लावावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून LIC health plus plan policy पॉलिसी घेतलेली होती व त्याचा प्रिमियम देखील भरलेला होता. हे गैरअर्जदारास मान्य आहे. गैरअर्जदार यांचे एवढेच म्हणणे आहे की, अर्जदारास अनेकवेळा स्मरणपत्र देवून देखील अर्जदाराने संबंधीत कागदपत्र दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, त्यांनी अर्जदारास अनेकवेळा स्मरणपत्र दिलेले आहे. गैरअर्जदाराने प्रत्येक वेळेस अर्जदारास 1) Attested copies of previous hospital papers. 2) Attested photo copy of treating consultant. 3) Attested photo CAG report. या कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येते. अर्जदाराचे म्हणणे आहे की, CAG report काय आहे हे संबंधीत हॉस्पीटल यांना माहीत नाही. मंचाने देखील CAG report काय आहे असे गैरअर्जदार यांना विचारल्यावर ते देखील त्याबद्दल माहिती देवू शकले नाहीत. यावरुन असे दिसते की, अनावश्यक व असंबंधीत कागदपत्रांची मागणी करुन गैरअर्जदाराने अर्जदारास इलाजाचा खर्च देण्याचे टाळले आहे, असे दिसून येते. गैरअर्जदाराने मंचातर्फे कागदपत्राबद्दल विचारणा झाल्यावर अर्जदारास इलाजाचा खर्च दिलेला आहे परंतू अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे व मंचात तक्रार दाखल करण्यास खर्च झालेला आहे, त्यास गैरअर्जदार हे जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावे.
3. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.