::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 22/11/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याची मयत आई श्रीमती उषा दुष्यंत कोठारकर हयांचे विरूध्द पक्ष क्र.2 यांचेकडे क्र.40341070000 या क्रमांकाचे बचत खाते होते. विरूध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने विरूध्द पक्ष क्र.2 यांचेमार्फत सदर खातेदाराची दिनांक 12/2/2014 ते 11/2/2015 या कालावधीकरीता क्र. जी-0000359 सदस्य क्र.01544 ही मास्टर विमा पॉलिसी काढली आणी तिचे वरील नमूद खात्यातून रू.669/- विमा प्रिमियमपोटी वळते करण्यांत आले. सदर पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म विरूध्द पक्ष क्र.2 ने स्वतः भरून त्यावर मयत उषा हिची स्वाक्षरी घेण्यांत आली होती. सदर पॉलिसीत तक्रारकर्त्याला नॉमिनी म्हणून निर्देशीत करण्यांत आले होते. तक्रारकर्त्याचे मयत आईला अशक्तपणा असल्यामुळे दिनांक 15/6/2014 ते 21/6/2014 पर्यंत आरोग्य केंद्र, तोहगांव येथे तिच्यावर उपचार करण्यांत आले परंतु दिनांक 21/6/2014 रोजी वायरल व इतर व्याधींमुळे तिचा मृत्यु झाला. तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तावेजांसह विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे विमा रक्कम मिळण्याकरीता विमादावा दाखल केला. परंतु विरूध्द पक्ष क्र.1 यांनी दिनांक 10/3/2015 च्या पत्रान्वये, विमाधारकाने विमाप्रस्ताव सादर करतांना तिचे स्वास्थ्याबाबतची महत्वपूर्ण माहिती लपविली, या कारणास्तव विमादावा नामंजूर केल्याचे तक्रारकर्त्यांस कळविले. तक्रारकर्त्याने नमूद केले की मयत विमाधारक उषा यांनी विमा प्रस्तावासोबतचे आरोग्याचे घोषणापत्रात प्रत्येक आजारासंबंधी तसेच गत पाच वर्षांत सर्दी, ताप यांसह पाच दिवसांपेक्षा जास्त राहिलेल्या इतर कोणत्याही व्याधींसाठी कोणतीही चाचणी करून घेतली नाही असे नमूद केले. विमाप्रस्तावाचा फॉर्म विरूध्द पक्ष क्र.2 यांचे शाखा प्रबंधक यांनी स्वतः भरला होता व त्यावर विमाधारकाची तक्रारकर्त्यासमक्ष स्वाक्षरी घेण्यांत आली होती. विमा पॉलीसी घेतांना विरूध्द पक्ष क्र.1 यांनी विमाधारकाची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक होते परंतुं विमाधारकाची कोणतीही हरकत नसूनही ती करण्यांत आली नाही. विमा काढल्यानंतर विमाधारकाचा चार महिन्यांनी मृत्यु झाल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी विमारक्कम देण्यांस नकार दिला. तक्रारकर्त्याचे आईने वरील विमा काढल्यानंतर विरूध्द पक्ष 2 यांचेमार्फतच बजाज अलायन्स लाईफ इन्श्युरस कंपनीकडून दिनांक 4/5/2013 ते 2/5/2014 या कालावधीकरीता रू.50,000/- चा जिवनविमा काढला होता व त्यालादेखील मास्टर पॉलिसीच्या अटी लागू होत्या. परंतु विमाधारकाचे मृत्युनंतर सदर विम्याची रक्कम तक्रारकर्त्यांला देण्यांत आली आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांस विमारक्कम देण्यांस नकार देवून सेवेत त्रुटी केली आहे. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्ष क्र.1 व 2 विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला विमादाव्याची रक्कम रू.1 लाख त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह द्यावी तसेच शारिरीक व मानसीक त्रासाकरीता नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले.
4. विरूध्द पक्ष क्र.1 ने हजर होवून त्यांनी प्राथमीक आक्षेपासह लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व कायद्याचा दुरूपयोग करणारी असल्यामुळे ती खर्चासह खारीज करण्यांत यावी. मृत विमाधारकाने विमापॉलीसी घेतांना तिचे स्वास्थ्याबाबत खरी माहिती लपवून व फसवणूक करण्याचे हेतूने खोटी माहिती देवून सदर पॉलीसी घेतली. मयत विमाधारक उषा हिने पॉलीसी प्रस्तावासोबतचे आरोग्याचे घोषणापत्रात, ती कोणत्याही आजाराने ग्रस्त नसल्याचे नमूद करून व ही माहिती सत्य असल्याची घोषणा केली होती. विमाधारकाचे मृत्युनंतर तक्रारकर्त्याने दिनांक 23/1/2015 रोजी विमादावा दाखल केला. विमा काढल्यानंतर चार महिन्यांत विमाधारकाचा मृत्यु झाल्याचे दस्तावेजांवरून निदर्शनांस आल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांचे तपास अधिका-यामार्फत प्रकरणाचा तपास केला असता निष्पन्न झाले की मयत विमाधारक उषा यांनी विमापॉलीसी घेण्यापूर्वी दिनांक 29/9/2012 आणि 22/6/2013 रोजी डॉ. करूणा विवेक रामटेके नर्सींग होम अॅन्ड फिजिशीयन्स यांच्याकडे डायबेटीस टाईप 2, हायपरटेन्शन आणि जुना सेरेब्रोव्हस्क्युलर अॅक्सीडेंट/इव्हेंट या आजाराकरीता उपचार घेतलेला आहे व ही बाब त्यांनी स्वतः आजाराबाबत दिलेल्या इतिहासावरून निदर्शनांस आली. त्यासंदर्भात चौकशी अधिका-याचे शपथपत्रासह अहवाल आणि दिनांक 29/9/2012 आणि 22/6/2013 रोजी मयताने सदर डॉक्टरकडून घेतलेल्या उपचाराशी संबंधीत दस्तावेज व सदर डॉक्टरचा जबाब दिनांक 2/2/2015 प्रकरणात दाखल केलेला आहे. विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडून पॉलीसी घेतांना सदर आजाराबाबत विमाधारकास माहिती असूनही मयत विमाधारकाने ती माहिती मुद्दाम लपवून ठेवली व फसवणूक करून पॉलीसी घेतलेली आहे. त्यामुळे विमाधारकाने विमाप्रस्तावात आरोग्यविषयक महत्वाची माहिती लपविल्याच्या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमादावा योग्यरीत्या नाकारण्यांत आला असून विरूध्द पक्ष क्र.1 चे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. सबब त्यांचेविरूध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
5. विरूध्द पक्ष क्र.2 हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात नमूद केले आहे की, विरूध्द पक्ष क्र.2 यांनी मयत उषा या खातेदाराच्या विम्याच्या प्रिमियमची रक्कम, तिच्या खात्यातून वळती करून विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडे जमा केली. विमाधारक ग्राहकाच्या विमाहप्त्याची रक्कम खात्यातून वळती करून वि.प.क्र.1 कडे जमा करण्याचे काम करतात परंतु त्याबाबत ते कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. वि.प.क्र.2 हे तक्रारकर्त्याला कोणतीही विमारक्कम देणे लागत नाहीत. विमाधारकाचा विमाप्रस्ताव फॉर्म त्यांनी भरून त्यावर विमाधारकाची स्वाक्षरी घेतली नाही. वि.प.2 चे सेवेत कोणतीही त्रुटी नसून त्यांचेविरूध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
6. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे तसेच शपथपत्र, दस्तावेज, लेखी युक्तीवाद उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्ता प्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
7. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा ग्राहक असल्याबाबत उभय पक्षात वाद नाही. मयत उषा कोठारकर या विरूध्द पक्ष क्र.2 यांच्या खातेधारक असून त्यांनी विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडून घेतलेल्या मास्टर विमा पॉलिसी अंतर्गत दिनांक 12/2/2014 ते दिनांक 11/2/2015 या कालावधीकरीता विमाकृत होत्या व सदर विमा वैधता कालावधीमध्ये त्यांचा दिनांक 21/6/2014 रोजी मृत्यु झाला व तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी अंतर्गत नॉमीनी म्हणून वि.प.क्र.1 कडे विमादावा दाखल केला याबाबतही उभय पक्षात वाद नाही. विमा घेतल्यापासून चार महिन्यांचे आंत विमाधारकाचा मृत्यु झाल्याचे दस्तावेजांवरून निदर्शनांस आल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी डी.बी. तपास एजेंसीतर्फे प्रकरणाचा तपास केला असता मयत विमाधारक उषा यांनी विमापॉलीसी घेण्यापूर्वी दिनांक 29/9/2012 आणि दिनांक 22/6/2013 रोजी डॉ. करूणा विवेक रामटेके नर्सींग होम अॅन्ड फिजिशीयन्स यांच्याकडे डायबेटीस टाईप 2, हायपरटेन्शन आणि जुना सेरेब्रो व्हस्क्युलर अॅक्सीडेंट/इव्हेंट या आजाराकरीता उपचार घेतलेला आहे. तसेच ही बाब महय्यताचे कुटूंबियांनी आजाराबाबत दिलेल्या इतिहासावरून निदर्शनांस आली असे तपास अहवालात नमूद आहे. व सदर अहवाल चौकशी अधिका-याचे शपथपत्रासह प्रकरणात दाखल आहे. सदर अहवालात संबंधीत अधिका-याने नमूद केले आहे की मयत विमाधारक ही 2012 सालापासून डॉ.करूणा रामटेके, व डॉ. प्रमोद गहमे, प्रा.आ.केंद्र टोहेगांव यांचेकडे डी.एम. आणि हायपरटेन्शन या आजाराकरीता उपचार घेत होती व दिनांक 21/6/2014 रोजी विमाधारकाची प्रकृती गंभीर झाल्याने तिला प्रा.आ.केंद्र तोहगांव येथे नेण्यांत आले परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. तसेच मयत विमाधारकाने दिनांक 29/9/2012, 6/3/2014 व 19/3/2014 रोजी प्रा.आ.केंद्र तोहगांव येथे तसेच 22/6/2013 डॉ.सौ.रामटेके यांचेकडे रोजी घेतलेल्या उपचाराशी संबंधीत दस्तावेज व सदर डॉक्टरचा जबाब दिनांक 2/2/2015 प्रकरणात दाखल केलेला आहे. यावरून मयत विमाधारक विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडून पॉलीसी घेण्यापूर्वीच 29/9/2012 पासून डायबेटीस टाईप 2, हायपरटेन्शन आणि जुना सेरेब्रो व्हस्क्युलर अॅक्सीडेंट/इव्हेंट हया आजाराबाबत उपचार घेत होती हे सिध्द होते. सदर पॉलिसी घेतेवेळी विमाधारकाला सदर आजारांबाबत माहिती असूनही मयत विमाधारकाने ती माहिती मुद्दाम लपवून दिनांक 12/2/2014 रोजी पॉलीसी घेतलेली आहे. विरूध्द पक्ष क्र.1 ने दाखल केलेल्या विमा प्रस्तावाचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमाधारकाने सदर पॉलिसीकरीता विमाप्रस्तावाच्या फॉर्ममधील आरोग्याचे घोषणापत्रात अनु.क्र.3 मध्ये नमूद डायबेटीस मेलीटस या रोगाबाबत घोषणा करणे क्रमप्राप्त असूनही, ती सदर आजाराने ग्रस्त नसल्याचे नमूद करून सदर विधान सत्य असल्याबाबत घोषीत करून स्वाक्षरी केलेली आहे. विमा करार हे आत्यंतिक विश्वासावर आधारीत करार असल्याकारणाने विमाधारकाने विमाप्रस्तावात तिचे आरोग्याबाबत महत्वाची माहिती हेतुपूरस्सर लपवून ठेवून विमा पॉलिसी घेतलेली आहे हे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी दस्तावेज व डी.बी.इन्व्हेस्टीगेटरच्या श्री. डॅनीयल या तपासणी अधिका-याचे शपथपत्र दाखल करून सिध्द केलेले आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने पी.सी.चाको आणी अन्य विरूध्द चेअरमन, एल.आय.सी. 2008 (एआयआर) सुप्रिम कोर्ट, पान क्र.424 या प्रकरणात विषद केलेले न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणात पूर्णतः लागू होते. विमाधारकाने विमा प्रस्तावात आरोग्य विषयक महत्वाची माहिती लपविल्याच्या कारणास्तव विरूध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्याचा विमा दावा योग्यरीत्या नाकारण्यांत आला असे मंचाचे मत असल्याने विरूध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 चे विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.93/2015 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 22/11/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.