श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी घर गहाण ठेवून गैरअर्जदाराकडून रु.9,00,000/- कर्ज दि.20.02.2007 रोजी 15.75 व्याज दराने घेतले होते. सदर कर्जाची परतफेड 192 हप्त्यामध्ये करावयाची असून रु.13,994/- प्रतिहफ्ता याप्रमाणे, (मुद्दल रु.9,00,000/- + व्याज रु.17,86,848/- ) रु.26,86,848/- देणे होते. याप्रमाणे कर्जाचा हफ्ता 05.04.2007 पासून सुरु होऊन नियमितपणे त्याची परतफेड 42 हफ्त्यात करण्यात आली व गैरअर्जदाराने आगाऊ रक्कम रु.1600/- तीन दिवसाच्या व्याजाबाबत घेतली. कराराप्रमाणे रु.5,87,748/- घेणे असतांना रु.6,77,592/- गैरअर्जदारांनी त्यांच्याकडून वसुल केले व अतिरिक्त रक्कम रु.89,844/- वसुल केली. मुद्दलाची रक्कम रु.1,96,875/- भरली असतांना ती कमी करुन न दाखविता, रु.27,113.98/- मुद्दल भरल्याचे दाखविण्यात आले व शिल्लक मुद्दल रु.8,72,886/- दर्शविण्यात आली. अशाप्रकारे रु.2,59,605.02/- रक्कम आगाऊ वसुल करण्यात आली. तसेच खाते बंद करीत असतांना प्रोव्हीजनल चार्ज म्हणून रु.48,183.31 घेतले, म्हणजे एकूण अतिरिक्त रक्कमेपोटी रु.3,09,388.31 गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून घेतलेले आहे. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदाराने ठरलेल्या व्याज दरामध्ये मध्येच वाढ करुन सदर रक्कम वसुली केलेली आहे व तक्रारकर्त्याची फसवणूक केलेली आहे, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन मागणी केली आहे की, जास्तीची घेतलेली रक्कम रु.3,09,388.31 व यावर 17.75 टक्के व्याज मिळावे, अगोदर घेतलेल्या मुद्दलावर पुन्हा घेतलेले व्याज रु.12,781.18 परत मिळावे, मानसिक व आर्थिक नुकसानीची भरपाई रु.40,000/- व कार्यवाहीच्या खर्चाबाबत रु.15,000/- ची मागणी केलेली आहे. आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण 9 दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यामध्ये मुख्यतः कर्ज वितरण व त्याबाबत झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे यांचा समावेश आहे.
2. तक्रारीचा नोटीस प्राप्त झाल्यावर गैरअर्जदारांनी वारंवार तक्रारीस लेखी उत्तर दाखल करण्याकरीता वेळ मागितला. मंचाने पूरेशी संधी देऊनही गैरअर्जदाराने तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने दि.09.08.2011 रोजी ‘विना लेखी जवाब कारवाई’ चालविण्याचा आदेश पारित केला व प्रकरण युक्तीवादाकरीता ठेवण्यात आले. युक्तीवादाचेवेळेस तक्रारकर्ते हजर, त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदारांना संधी देऊनही त्यांनी युक्तीवाद केला नाही. तसेच मंचासमोर उपस्थित होऊन तक्रारकर्त्याची विधाने नाकारली नाही किंवा कोणत्याही प्रकारे स्वतःचा बचाव केला नाही. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
3. तक्रारकर्त्याने 42 हफ्त्यांची मिळून एकूण रक्कम रु.6,77,592/- गैरअर्जदाराकडे जमा केलेले आहे. या व्यतिरिक्त खाते बंद करतांना रु.48,183.31 भरल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे त्याचे जवळून रु.3,09,388.31 जास्तीचे गैरअर्जदाराने घेतलेले आहेत. यासंबंधीचे तक्रारकर्त्याचे विधान गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे खोडून काढलेले नाही व ती रक्कम अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन गैरअर्जदाराने घेतलेली असल्यामुळे तक्रारकर्ते रक्कम परत मिळण्यास पात्र आहे. यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम रु.3,09,388.31, तीवर 24.09.2010 पासून तर रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपावेतो, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यावर लावलेल्या व्याजदराप्रमाणे 15.75 टक्केसह द्यावे.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी क्षतिपूर्तीदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे. न पेक्षा गैरअर्जदार उपरोक्त आदेश क्र. 2 च्या रकमेवर 18 टक्के व्याज देणे लागतील.