निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 23/04/2013 तक्रार निकाल दिनांकः- 07/03/2014
कालावधी 10 महिने. 12 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्री.प्रकाश पिता मारोती घोंगडे/धोंडगे, अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.नौकरी, अॅड.व्हि.के.बलखंडे.
रा.राहुल नगर,परभणी ता/जि.परभणी.
विरुध्द
1 इंण्डेन गॅस एजन्सी, गैरअर्जदार.
मार्फत अंबुरे इंण्डेन गॅस वितरक (डिस्ट्रीब्युटर्स) अॅड.टि.एम.फारुकी.
26, स्टेडीयम कॉम्पलेक्स,परभणी
2 इंण्डेन गॅस एजन्सी, कस्टमर केअर सेल, स्वतः
युनीटी बिल्डींग 4 था मजला,
जे.सी.रोड, बंगलोर 560002 कर्नाटक.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे गॅस टाकी न देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो परभणी येथील रहिवाशी असून त्याने घरगुती वापरासाठी इंण्डेन गॅस एजन्सीचे पुर्वीचे वितरक मेसर्स गोदावरी गॅस डिस्ट्रीब्युटर परभणी यांचे कडून गॅस कनेक्शन घेतले होते व सदर गॅस पुरवठा घेतेवेळी त्याने 2000/- रु. एवढी अनामत रक्कम गोदावरी गॅस वितरककडे भरली होती. त्यावेळी अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 1330/98 असा होता. सदरचे कनेक्शन अर्जदाराने 30/06/1996 रोजी घेतले होते. ज्याचा S.V. No. 379284 हा होता व अशा रितीने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, इंण्डेन गॅसचे पहिले वितरक गोदावरी गॅस एजन्सी राजेश कॉम्पलेक्स, वसमतरोड परभणी येथे होते. त्यानंतर सदर गॅसचे नविन वितरक गैरअर्जदार क्रमांक 1 झाले आणि अगोदरच्या गॅस वितरकचे सर्व ग्राहक गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे वर्ग करण्यात आले. त्यामध्ये अर्जदार सुध्दा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वर्ग करण्यात आला होता. आणि गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास दिनांक 22/07/2011 पर्यंत नियमीत गॅस पुरवठा केला.
अर्जदाराचे म्हणणे की, तो शासकीय नोकरदार असल्यामुळे त्याची बदली वसमत येथे झाली. त्यामुळे त्यास जुलै 2011 नंतर नियमित गॅस टाकी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून घेवु शकला नाही. त्यानंतर तो परभणी येथे रहावयास आल्यानंतर नोव्हेंबर 2012 मध्ये गॅस टाकी घेण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे गेला असता त्यांनी असे सांगीतले की, अर्जदाराचा सदरचा ग्राहक नंबर बंद करण्यात आला आहे.
गैरअर्जदारानी अर्जदाराचा ग्राहक नं 1330/98 का व केव्हा बंद केला याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास केव्हाही लेखी कळविले नाही व कोणतेही योग्य कारण नसताना गैरअर्जदारानी अर्जदाराचा सदरचा ग्राहक नंबर बंद केला आहे व ही गैरअर्जदाराची त्रुटीपूर्ण सेवा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदाराकडे अनामत रक्कम 2000/- रु. भरणा केला आहे व त्यानी 22/07/2011 पर्यंत नियमीत गॅस पुरवठा अर्जदारास केलेला आहे. असे असतांनाही केवळ अर्जदारानी गॅस सिलेंडर घेतले नाही. म्हणून अर्जदारास न कळविता गैरअर्जदारांनी अर्जदाराचा गॅस पुरवठा बंद केला आहे. याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदारास अर्ज डिसेंबर 2012 मध्ये दिला होता, परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 1330/98 सुरळीत करुन गॅस सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरु करण्याचे आदेश द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 5,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 2,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये ग्राहक कार्डची प्रत, अर्जदाराचा गैरअर्जदारास केलेला सिलेंडर मागणीचा अर्ज, रजी पोच पावती, स्मरणपत्र, स्मरणपत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा आमचा ग्राहक नाही. त्यामुळे त्यास आमच्या विरुध्द सदरची तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही, व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार आमचा ग्राहक नसल्या कारणाने त्यास आम्ही गॅसची टाकी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आम्ही अर्जदारास केव्हाही गॅस सिलेंडर दिलेले नाही व त्यामुळे आम्ही त्याचा गॅस पुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदाराने गॅस पुरवठा सुरळीत करावा म्हणून केलेली विनंती योग्य नाही. तो आमचा ग्राहक नसले कारणाने परत सिलेंडर मागण्याचा अधीकार नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 9 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 18 वर आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही गैरअर्जदार क्रमांक 1 याकडे अर्जदाराबाबत चौकशी केली असता आम्हाला असे कळले की, तो अर्जदार आमचा ग्राहक नाही. गोदावरी गॅस एजन्सी ही मे 2002 साली संपुष्टात आलेली आहे. सदर गोदावरी गॅस एजन्सीचे सर्व ग्राहक हे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वर्ग करण्यात आलेले आहेत व वर्ग करण्यात आलेले सर्व ग्राहकास गैरअर्जदार क्रमांक 1 कडून सिलेंडर घेत आहेत. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही.
तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे आहे की, LPG
Connection चा कागदोपत्री पुरावा हा Subscription Voucher असते व ते अर्जदाराने सदर तक्रारी सोबत दाखल केलेले नाही. त्यामुळे अर्जदाराची सदरची तक्रार ग्राहक म्हणून चालू शकत नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्गदर्शना प्रमाणे ज्याच्या जवळ इण्डेन गॅस सिलेंडर मुळ कागदपत्रा शिवाय आहे व जर त्याना सदरचे Connection सुरळीत करावयाचे असतील तर Security Deposit जमा करावे लागते तरच त्याचे Connection Regular केले जाते म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे इण्डेन गॅस ग्राहक क्रमांक 1330/98
सिलेंडर देण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली
आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने इण्डेन गॅसचे कनेक्शन 30/06/1996 रोजी गोदावरी गॅस एजन्सी परभणी यांचेकडून ग्राहक क्रमांक 1330/98 अन्वये घेतले होते. ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील दाखल केलेल्या गॅस कार्डवरुन सिध्द होते व सदर कनेक्शनचे S.V. No. 379284 हा होता. ही बाब देखील सदर कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच सदर कार्डावरुन हे सिध्द होते की, इण्डेन गॅस गैरअर्जदार क्रमांक 2 चा गोदावरी एजन्सी मार्फत अर्जदार हा ग्राहक आहे. व त्याने गॅसची टाकी घेतली होती हे सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 2 याने नि.18 वरील दाखल केलेल्या लेखी जबाबात परिच्छेद क्रमांक 2 मध्ये मान्य केले आहे की, गोदावरी गॅस एजन्सी ही
मे- 2002 मध्ये संपुष्टात आली असून व सदर एजन्सीचे सर्व ग्राहक हे गैरअर्जदार क्रमांक 1 अंबुरे गॅस एजन्सी परभणीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराचे सदरचे गॅसचे कनेक्शन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वर्ग करण्यात आलेले होते. गैरअर्जदार क्रमांक 2 चे लेखी जबाबात म्हणणे की, अर्जदाराने तक्रारी सोबत S.V. ची पावती दाखल केली नाही. म्हणून सदरची तक्रार खारीज करावी हे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/1 वरील कार्डचे अवलोकन केले असता अर्जदाराचा S.V. नं. 379284 हा होता. म्हणजेच सदर S.V. नं.वर अर्जदाराचे कनेक्शन होते व तसेच गैरअर्जदाराने S.V. नं. 379284 हा दुस-या व्यक्तीचा आहे व अर्जदाराचा नाही या बद्दल कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर आणला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, इण्डेन गॅस सिलेंडर कोणाजवळ मुळकागदपत्राच्या शिवाय असेल त्यास Gas Connection Regularize करण्याकरीता Security Deposit भरावे लागते. हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही कारण अर्जदार हा नौकरी निमित्त बाहेर गावी असले कारणाने तो नियमित सिलेंडर घेवु शकला नाही व त्यामुळे अर्जदाराचे सदरचे Connection Block होवुन राहिले असे दिसून येते. व परत एकदा अर्जदाराने सदरचे Connection Regular करण्याकरीता security Deposit भरण्याची आवश्यकता नाही. कारण सदरचे Connection घेताना अगोदरचे वितरक गोदावरी गॅसकडे त्याने 2,000/- रु. Security Deposit जमा केलेले आहे.असे मंचास वाटते.
गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/1 वरील कागदपत्रावरुन असे दिसून येते की, जर एखाद्याचे कनेक्शन ब्लॉक होवुन बसले असेल तर अशा ग्राहकाना कनेक्शन Reactivation करण्यासाठी KYC फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे व त्या प्रमाणे अर्जदाराने त्याचे सदरचे कनेक्शन सुरळीत चालू करण्याकरीता KYC फॉर्म भरुन गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल करणे आवश्यक आहे. त्यास परत नवीन डिपॉझिट भरण्याची गरज नाही. अर्जदारास त्याचे बंद झालेले सदरचे गॅस कनेक्शन सुरळीत चालू करण्याकरीता अर्जदारास KYC फॉर्म भरुन गैरअर्जदाराकडे देणे करीता संधी देणे आवश्यक आहे. अन्यथा संधी न दिल्यास ते नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात होईल. असे मंचास वाटते. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत ग्राहक क्रमांक 1330/98
व S.V. नं 379284 अन्वये बंद असलेले कनेक्शन परत सुरळीत चालू
करण्याकरीता योग्य त्या नमुन्यात अर्ज भरुन ( KYC Form ) गैरअर्जदार
क्रमांक 1 मार्फत 2 कडे द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदरची आवश्यकती कागदपत्र प्राप्त झाल्या तारखे
पासून 01 महिन्याच्या आत अर्जदाराचे सदरचे Connection सुरळीत चालू
करावे.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.