श्री. आनंद धोंडीबा तांबे,
रा. 16, दत्त दिगंबर, नंदीवली रोड, ... अर्जदार
डी.एन.सी.स्कुलजवळ, डोंबिवली (इ), जि. ठाणे.
विरुध्द
1. आयआयटीयन्स फाऊंडेशन, ... गैरअर्जदार
फाऊंडेशन एज्युकेशन सर्व्हीसेस प्रा.लि.,
रचना प्राईड, फडके रोड, बाबासाहेब जोशी मार्ग,
अरिहंत बँक, डोंबिवली (इ) 421 201, जि. ठाणे.
2. आयआयटीयन्स फाऊंडेशन,
फाऊंडेशन एज्युकेशन सर्व्हीसेस प्रा.लि.,
301, तिसरा मजला, प्रणव कमर्शियल प्लाझा,
एम.जी.रोड, मुलुंड (वेस्ट), मुंबई 400 080.
समक्ष- श्री. आर.बी. सोमानी -मा.अध्यक्ष
श्रीमती. ज्योती अय्यर - मा. सदस्या
तक्रारदारातर्फे अॅड. व्ही.के.सावंत
एकतर्फा आदेश
द्वारा श्री. आर.बी. सोमानी - मा.अध्यक्ष
(दिनांक 16/03/2012)
प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये थोडक्यात खालीलप्रमाणेः
तक्रारदाराने आपल्या मुलासाठी आयआयटीयन्स 2011-12 सुपर 30 बॅचमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. बॅच फुल असूनदेखील तक्रारदाराचे मुलास प्रवेश देण्यात आला. सदर क्लासचे नांव आयआयटीयन्स असून त्यांचे शिकवणी वर्ग दादर, मुलुंड, डोंबिवली, कल्याण येथे आहेत. तक्रारदाराने डोंबिवली सेंटरकरीता प्रवेश घेतला होता. सदर शिकवणी वर्गाचे प्रॉस्पेक्टस् तक्रारदारास दिले नाही. तक्रारदारास सांगितले गेले की आठवडी 2-3 वर्ग घेण्यात येतील. जुलै, 2011 पर्यंत अभ्यासक्रमातील अर्धा भाग पूर्ण होईल. छापील शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येईल. चाचण्या घेण्यात येतील, वैयक्तीकरित्या लक्ष दिले जाईल आणि रु. 75,000/- सदर बॅचमधील प्रत्येक पाल्याची फी राहिल. म्हणून तक्रारदाराने सामनेवाले हयांना रु. 35,000/- चा धनादेश प्रवेशापोटी सामनेवालेस दिला.
दि. 8/4/2010 रोजी तक्रारदाराचा मुलगा योगेश नियोजित ठिकाणी गेला असता त्यास कोणताही शिकवणी वर्ग आढळून आला नाही. परंतु सामनेवाले यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. तक्रारदाराचा मुलगा दि. 30/4/2010 पर्यंत शिकवणी वर्गात गेला होता. त्यानंतर तो सदर शिकवणी वर्ग झाले नाहीत.
विरुध्द पक्षाने काही काळ थांबण्यासाठी पुन्हा कळविले. 2-3 विदयार्थी असून शिकवणी वर्ग नियमित नव्हते. कोणतेही स्टडी मटेरियल दिले गेले नाही.
दि. 30/6/2010 पर्यंत फक्त दोन पाठ शिकविले गेले. शिकवणी वर्ग अनियमित का आहेत याची विचारणा केली आणि स्टडी मटेरियल पुरविण्याची विनंती केली होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रारदाराचे मुलाचे 4 महिने वाया गेले आणि म्हणून नार्इलाजास्तव सामनेवालेकडे फी ची मागणी केली होती, ती त्याने दिली नाही.
सामनेवाले यांनी योग्य शिकवणी न देऊन, सांगितलेनुसार पाठयपुस्तक व इतर साहित्य न पुरवून तसेच विहीत मुदतीत शिकवणी पूर्ण न करुन तक्रारदाराचे मुलाची कोणतीही मदत केली नाही आणि अशाप्रकारे सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तक्रारदाराने विनंती केली की त्याला त्याने सामनेवालेस दिलेली रक्कम रु. 35,000/-, 15% व्याजासह परत मिळावे व इतर खर्च मिळावा.
तक्रारदाराने तक्रारीसोबत सामनेवाले यांनी दिलेली पावतीची प्रत, सामनेवालेंना दिलेली नोटीसची प्रत व इतर दस्तऐवज दाखल केले आहेत.
मंचामार्फत सामनेवालेस नोटीस काढली गेली असता नोटीस लागून ते गैरहजर राहिले व नोटीस निशाणी 4 सामनेवालेंना बजावल्याचे पोचपावती निशाणी 6 वरुन स्पष्ट होते आणि म्हणून मंचाचेमते सामनेवालेस नोटीस प्राप्त होऊनदेखील ते विहीत मुदतीत हजर झाले नाही अथवा त्यांचेवतीने कोणताही लेखी जबाब दाखल केला गेला नाही. म्हणून मंचाचे आदेश दि. 17/12/2011 नुसार प्रकरण एकतर्फा सुनावणीकरीता ठेवण्यात आले. तक्रारदारास ऐकण्यात आले. दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली व मंच खालील निष्कर्षाप्रत पोहोचला.
निष्कर्षः
मंचासमोर तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले असून आपले कथनाचे समर्थन केले आहे. दाखल दस्तऐवजांवरुन व लेखी कथनावरुन मंचासमोर ही बाब स्पष्ट होते की तक्रारदाराने आपले पाल्याकरीता सामनेवालेकडे दि. 7/4/2010 रोजी रु. 35,000/- भरुन शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता व डोंबिवली सेंटरकरीता त्याने रक्कम भरली होती. सदर रकमची पावती निशाणी ‘ए’ पान 9 वर दाखल आहे.
तक्रारदाराचे कथनास कोणताही विरोध नाही. नोटीस लागून सामनेवाले गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवालेस नोटीस पाठविल्याचे दस्तऐवजावरुन सिध्द होते व नोटीस दि. 16/10/2010 पान 10 वर आहे. त्यामध्येसुध्दा तक्रारदाराने त्याने जमा केलेले फीपोटी आगाऊ रक्कम व्याजासह मागणी केलेली आहे.
मंचासमोर सिध्द होते की तक्रारदाराचे मुलाचे शिकवणी वर्गाची शिकवणी योग्य झालेली नाही. तक्रारदाराचे मुलास जेमतेम दोन पाठ शिकवल्या गेले ते सुध्दा दि. 30/6/2011 पर्यंत. याचा अर्थ तक्रारदाराचे पाल्याने सामनेवालेकडे शिकवणी घेतली आहे. परंतु उर्वरीत पाठयक्रम वेळेचे आंत पूर्ण न झाल्याने सामनेवाले यांची शिकवणी तक्रारदाराचे पाल्याने सोडून दिली आहे असे स्पष्ट होते. तरीसुध्दा मंचासमोर हे सिध्द झाले की तक्रारदाराचे मुलाने काही काळ शिकवणी घेतलेली आहे. तसेच मंचासमोर सामनेवाले यांचे गैरहजेरीमुळे हे सिध्द होते की तक्रारदाराचे म्हणणे रास्त व योग्य आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाले यांनी अर्जदाराचे पाल्यास सांगितलेनुसार योग्य शिकवणी वेळेचे आंत न देऊन दोषपूर्ण सेवा दिली आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारास त्याने जमा केलेल्या रकमेपैकी रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार) दि. 7/4/2010 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजदराने परत करावे.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) देय करावे.
5. सामनेवाले यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेश प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे अन्यथा आदेशीत देय रकमेवरील व्याज 9% ऐवजी 12% राहिल यांची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांस निशुल्क उपलब्ध करुन दयावी.