नि.21 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 124/2010 नोंदणी तारीख – 21/4/2010 निकाल तारीख – 8/7/2010 निकाल कालावधी – 77 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ युवराज शामराव गायकवाड रा.पाचवड ता. वाई जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री सुधीर कांबळे) विरुध्द श्री शंकरराव एस. देशमुख डीव्हीजनल मॅनेजर, दी न्यू इंडिया एश्युरन्स कं.लि. सातारा मंडल कार्यालय, जीवनतारा, 513, एल.आय.सी. बिल्डींग, कलेक्टर ऑफिससमोर, सातारा-415 002 ----- जाबदार (अभियोक्ता श्री कालिदास माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे पाचवड येथील रहिवासी आहेत. त्यांनी शेती उत्पन्न व भाजीपाला पोच करणेसाठी टेम्पो खरेदी केला. सदरचे वाहन त्यांचा भाऊ सागर गायकवाड हा चालवित असतो व त्याच्या जोडीला वेळप्रसंगी प्रशांत तरडे हा दुसरा ड्रायव्हर वाहन चालवित असतो. सदरचे वाहनाचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला होता. सदरचे वाहन पॉलिसीचे कालावधीत अपघातग्रस्त झाले. त्यावेळी प्रशांत तरडे हा वाहन चालवित होता. अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले व त्यामुळे त्याचे दुरुस्तीसाठी रु.3,60,000/- इतका खर्च आला. सदरचे नुकसान भरपाईचा क्लेम मागणेसाठी अर्जदार हे जाबदार यांचेकडे गेले असता जाबदार यांचे कर्मचा-यांनी आम्ही क्लेम फॉर्म भरतो असे सांगून फॉर्म भरुन दिला. त्यावेळी त्यांनी वाहनावर ड्रायव्हर कोण असते असे विचारले असता अर्जदार यांनी सागर गायकवाड यांचे नाव सांगितले. त्यानंतर जाबदार यांनी प्रशांत तरडे यांचे लायसेन्सची मागणी केली. त्यानंतर अचानक जाबदार यांनी योग्य ते लायसेन्स नाही, तसेच खरी माहिती पुरविली नाही या कारणास्तव अर्जदार यांचा क्लेम नाकारला. जाबदार यांनी मागणी केलेप्रमाणे श्री तरडे यांचे हेवी व्हेईकलचे लायसेन्स जाबदार यांना दिले. परंतु तरीही जाबदार यांनी क्लेम मंजूर करण्यास नकार दिला. सबब वाहनाचे नुकसान भरपाई पोटी रु.3,60,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदारने वाहनास अपघात झाल्याची माहिती जाबदार यांना दोन आठवडयानंतर कळविलेली आहे. अर्जदार यांनी जो क्लेम फॉर्म भरुन दिला त्यामध्ये त्यांनी वाहनाचे चालकाचे नाव म्हणून श्री सागर गायकवाड यांचे नाव नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्षात अपघाताचे वेळी श्री प्रशांत तरडे हा वाहन चालवित होता. याशिवाय वाहनात आणखी चार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु जाबदार यांनी ड्रायव्हरबाबत क्लेमफॉर्ममध्ये खोटी माहिती दिली. श्री प्रशांत तरडे यांचेकडे अपघातग्रस्त वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना नव्हता. त्याचेकडे लाईट मोटर व्हेईकल या सदरातील परवाना आहे. परंतु अपघातातील वाहन हे मेडियम गुडस व्हेईकल या सदरातील आहे. जाबदार यांनी नेमलेल्या श्री धनवडे या इन्व्हेस्टीगेटर यांनी केलेल्या तपासामध्येही श्री तरडे यांचेकडे अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले आहे. तसेच अपघातचेवेळी सदरचे वाहनाचा वापर प्रवासी वाहून नेण्यासाठी केला आहे. अपघातानंतर सदरचे वाहनाचा सर्व्हे श्री संदीप नवले या सर्व्हेअर यांचेकडून जाबदार यांनी करुन घेतला आहे. तसेच फायनल सर्व्हे श्री सुभाष नवले यांनी केला आहे. त्यांचे अहवालानुसार निव्वळ रक्कम रु.2,17,806/- इतकी नमूद करण्यात आली आहे. परंतु अर्जदार यांनी पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे अर्जदार सदरची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 20 ला पाहिला. जाबदारतर्फे वकील श्री माने यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अपघाताचे वेळी वादातील वाहन हे श्री प्रशांत तरडे हे चालवित होते. परंतु अर्जदार यांनी त्यांचे क्लेमफॉर्ममध्ये श्री सागर गायकवाड यांचे नाव नमूद केले आहे. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.12/3 ला क्लेम फॉर्म दाखल केला आहे. सदरचे क्लेमफॉर्ममध्ये ड्रायव्हर या सदराखाली श्री सागर गायकवाड यांचे नाव नमूद आहे. याउलट जाबदार यांनी नि.12/7 ला दाखल केलला समरी क्रिमिनल केस क्र. 04555/9/09 ची कागदपत्रे पाहिल्यास अपघाताचे वेळी श्री प्रशांत लक्ष्मण तरडे हे वाहन चालवित असल्याचे दिसून येते. यावरुन अर्जदार यांनी क्लेमफॉर्ममध्ये चुकीची माहिती दिली असल्याचे दिसून येते. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, वाहनाचा चालक श्री प्रशांत तरडे याचेकडे वाहन चालविण्याचा अधिकृत व वैध परवाना नव्हता. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.12 सोबत श्री प्रशांत तरडे यांचे वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत दाखल केली आहे. त्याचे अवलोकन करता श्री प्रशांत तरडे यांचेकडे लाईट मोटार व्हेईकल या सदरातील वाहन चालविण्याचा परवाना असल्याचे दिसून येते याउलट अपघातग्रस्त वाहन हे मेडियम गुड्स व्हेईकल या सदरातील आहे. जाबदार यांनी नि.12 सोबत श्री एस.एस.धनवडे यांचा तपास अहवाल दाखल केला असून त्यामध्ये त्यांनी अपघातसमयी श्री प्रशांत तरडे हे वाहन चालवित होते व त्यांचे अधिकृत व वैध परवाना नव्हता असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सदरचे अहवालाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.16 ला श्री धनवडे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. वरील सर्व बाबी विचारात घेता अर्जदार यांनी श्री तरडे यांचेकडे योग्य तो परवाना नसतानाही त्यांचे ताब्यात वाहन देवून पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग केला आहे हे स्पष्ट दिसून येते. सबब अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारण्याचा जाबदार यांचा निर्णय योग्य व संयुक्तिक आहे असे या मंचाचे मत आहे. 7. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, श्री प्रशांत तरडे यांचेकडे प्रथम लाईट मोटर व्हेईकल या सदरातील परवाना होता व त्यानंतर त्यांनी हेवी गुडस व्हेईकल या सदरातील परवाना घेतला. अशा प्रकारे एकाच व्यक्तीला संबंधीत कायद्यातील तरतुदींनुसार दोन वेगवेगळे परवाने काढता येत नाहीत. परंतु तरीसुध्दा श्री प्रशांत तरडे यांनी दोन वेगवेगळे परवाने काढल्याचे दिसून येते. सदरची बाब ही अयोग्य व बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. 8. अर्जदार यांनी नि.20 सोबत वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा दाखल केला आहे. परंतु सदरचे निवाडयातील घटनाक्रम व प्रस्तुत तक्रारअर्जातील घटनाक्रम हा भिन्न असल्याचे सदरचा निवाडा या तक्रारअर्जास लागू होत नाही. याउलट जाबदार यांनी दाखल केलेले निवाडे प्रस्तुत तक्रारअर्जास लागू होतात. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 8/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | HONABLE MR. Mr. S. K. Kapse, MEMBER | |